श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? की, परमार्थ हा स्वत:नं स्वत:शी खेळायचा खेळ आहे. अर्थात परमार्थ हा स्वत:हून स्वत:साठी सुरू केलेला आणि स्वत:पुरता असलेला अभ्यास आहे. प्रवृत्ती आणि निवृत्तीविषयीचं साधकाच्या मनात सुरू असलेलं द्वंद्वं आणि त्याद्वारे त्याचं सुरू असलेलं आत्मपरीक्षण हा या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.. आणि आपण गेल्यावेळी हे पाहिलं की जे मुमुक्षू आहेत, आंतरिक मुक्तावस्थेचीच ज्यांना खरी ओढ आहे त्यांच्याच मनात हे द्वंद्व आणि हे आत्मपरीक्षण सुरू असतं. ज्यांच्या मनात हे आत्मपरीक्षण सुरू नाही, ज्यांचं मन प्रपंचाच्या आसक्तीच्याच पकडीत आहे त्यांचा परमार्थ हा प्रपंचातल्या इतर अनेक गोष्टींमधली एक गोष्ट, असा होऊन जातो. मग हौसेनं ते पारायण करतील, उपासतापास करतील, देवळात जातील, तीर्थयात्रांना जातील.. मन रमवतील आणि नव्या उमेदीनं प्रपंचातच अधिक रूतूनही जातील. पण ज्याला वारंवार रूतत जाण्याच्या या सवयीचा उबग येऊ लागला आहे त्याचं मन स्वस्थ, शांत राहणार नाही. मुलाचा आजार दूर व्हावा, नोकरी मिळावी, नातू व्हावा म्हणून करून पाहण्याची गोष्ट म्हणजे परमार्थ नव्हे, हे त्याला पक्कं कळून चुकलं असतं. त्यामुळेच त्याच्या मनात हे द्वंद्व अटळपणे उद्भवतं.   ‘साधक सोपान’ या पुस्तकात डॉ. श्रीकृष्ण देशमुख ऊर्फ पू. काका यांनी या द्वंद्वाच्या संदर्भात समर्थाचा दाखला दिला आहे. ते म्हणतात, ‘‘समर्थ रामदास स्वामींनी एका अभंगात साधकाच्या मनातील द्वंद्वाचे नेमके वर्णन केले आहे. त्यांनी एक फार सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतात : प्रवृत्ती सासुर निवृत्ती माहेर। तेथे निरंतर मन माझे।। माझे मनी सदा माहेर तुटेना। सासर सुटेना काय करू।। येथे ते प्रवृत्तीला सासर आणि निवृत्तीला माहेर म्हणतात. फार पूर्वीपासून सासरचा संबंध दु:खाशी आणि माहेरचा संबंध सुखाशी जोडण्यात आला आहे. समर्थही आपल्याला निवृत्तीपर माहेर हे सुखाचे कारण आहे, असे सांगतात पण तरीही प्रवृत्तीपर सासरातून सुटका होत नाही आणि माहेरी जाता येत नाही, अशी खंत व्यक्त करतात. पुढे हे द्वंद्वं सुटावयास संतसंगेविण उपाय नाही, असे सांगतात. ज्ञानेश्वर महाराजही श्रीकृष्ण मुखातून अर्जुनाला सांगतात की, ‘स्वत:च्या बुद्धीवर प्रवृत्ती किंवा निवृत्ती यांचे ओझे घेऊ नको.’ (पृ. ७१). आता माउलींची जी ओवी पू. काकांनी उद्धृत केली होती तिच्या पूर्वाधात हे ओझं न घेण्यास सांगितलं आहे आणि ओवीचा उत्तरार्ध सांगतो की, ‘‘अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायी।।’’ अर्थात हे प्रवृत्ती आणि निवृत्तीचं ओझं बुद्धीच्या माथी मारण्यापेक्षा माझ्या ठायी चित्तवृत्ती ठेव! तेव्हा संतसंगाशिवाय किंवा सद्गुरूंच्या ठायी चित्तवृत्ती एकरूप झाल्याशिवाय हे ओझं आणि हे द्वंद्व संपणार नाही. पण पू. काका आता या प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीचं ओझं वाटण्याच्या मूळ कारणांचा मागोवा घेतात. प्रवृत्तीचं म्हणजे प्रपंचाचं ओझं का वाटतं, हे पाहताना प्रपंचाची सरधोपट व्याख्याही ते मांडतात आणि चार भिंतींपलीकडे समाजकारण, राजकारण आणि इतर सर्व व्यापार यांच्याजोडीनं आपला जो प्रपंच  सुरू आहे तोही सूचित करतात. मग, ‘मी कर्ता आहे,’ ही भूमिकाच या प्रपंचाचे ओझे वाटण्याचे पहिले कारण आहे, असे ते सांगतात. कर्तेपणाचा हा मुद्दा परमार्थाच्या वाटचालीत अत्यंत कळीचा आणि तितकाच संभ्रमाचं वादळ निर्माण करणारा ठरतो. या कर्तेपणाच्या मुद्दय़ाची पू. काका थोडी वेगळी उकल करतात.

– चैतन्य प्रेम