शास्त्र जे सांगतं तेच प्रमाण मानून त्यानुसार आचरण करणं, हा विवेक आहे. या विवेकाचा विचार सतत जपणे हा साधनेचा महत्त्वाचा भाग आहे. हा विचार सुटला तर साधना ठोकळेबाज होते, असं डॉ. श्रीकृष्ण देशमुख ऊर्फ पू. काका सांगतात.. आणि इथंच गैर आकलनातून विकल्पाचा पहिला काटा रूततो. तो विवेक या संकल्पनेबाबतच आहे. शास्त्र काय सांगतं, ते डोळे मिटून स्वीकारणं यालाच जग अविवेक मानतं! आणि शास्त्र जे सांगतं त्याचा अनुभव आल्याशिवाय ते मान्य करणार नाही, असा पवित्रा ठेवला तर निदान शास्त्र जे सांगतं त्यानुसार प्रयोग तरी करून पाहायची तयारी हवी ना? हे प्रयोग आचरणाशीच संबंधित आहेत. आता त्याआधीचा प्रश्न असा की शास्त्र नेमकं काय सांगतं, हे तरी कसं कळावं? तर त्याचा एकमेव उपाय म्हणजे संतसत्पुरुषांचा बोध ऐकणं. कारण ते जे सांगतात ते शास्त्राशी विसंगत नसतं. तुकाराम महाराज म्हणतात ना? की, वेदांचा अर्थ आम्हालाच माहित आहे, इतरजण शब्दार्थाची ओझी तेवढी वाहात आहेत! माउली सांगतात, ‘मंथुनी नवनीता तैसे घे अनंता!’ म्हणजे वेदाचं जे ज्ञान आहे त्याचं मंथन करून सद्गुरूंनी ते प्रकट केलं आहे. तो ज्ञानरूप सद्गुरूच ग्रहण कर.. बाकी सारं व्यर्थ आहे. तेव्हा शास्त्र जे सांगतं ते प्रमाण मानणं याचा अर्थ सद्गुरूबोधच प्रमाण मानून त्यानुसार आचरण करणं, हाच विवेक आहे. आपली प्रत्येक कृती ही मनाच्या ओढींनुसार घडत असते. मनाला जे आवडतं, त्याकडेच त्याची ओढ असते. मग जे आवडतं ते हिताचं आहे की अहिताचं, योग्य आहे की अयोग्य, याचा विचार मन करीत नाही. त्यामुळे आपल्याकडून होणारी बरीचशी र्कम अविवेकानं होतात. सद्गुरूबोध हा आपल्या मनाच्या अविवेकी ओढी तोडणारा आणि जे श्रेयस आहे, खऱ्या हिताचं, कल्याणाचं आहे, त्याकडे वळवणारा असतो. त्यामुळे आपण त्या बोधाशी सुसंगत जगत आहोत का, याचं सततचं परीक्षण हाच साधनेचा महत्त्वाचा भाग आहे. हा विवेक टिकवला नाही, तर मग साधना ठोकळेबाज होते. म्हणजे काय? तर आपण मनाच्याच ओढीनं जगत राहातो आणि देहानं साधनादेखील एखाद्या सामान्य कर्मासारखीच करून टाकतो! मग सकाळ संध्याकाळ माळ जपली जाते, पारायणं केली जातात, तीर्थयात्रा केल्या जातात, पण पू. काका म्हणतात, ‘‘यानं वस्तूची प्राप्ती होत नाही.’’ पुढे वस्तू म्हणजे सत् तत्त्व ब्रह्म असंही ते सांगतात. ब्रह्म म्हणजे सर्व संकुचितपणाचा निरास, ब्रह्म म्हणजे व्यापकत्व, अभेदत्व, ‘गुरूगीता’ सांगते की सद्गुरुशिवाय ब्रह्म दुसरं नाहीच. तेव्हा सद्गुरूभाव हाच ब्रह्मभाव आहे. सद्गुरू बोधाशी आंतरिक ऐक्यता, एकरूपता म्हणजेच ब्रrयैकत्व आहे. तेव्हा सद्गुरूबोधाला अनुरूप जगणं जोवर सुरू होत नाही, तोवर या सद्गुरू प्रेमभावाची प्राप्ती होत नाही.  पुढे पू. काका सांगतात की, ‘मी ब्रह्म आहे हा अनुभव कोटी कोटी कर्मे करूनही येणार नाही. तो विचारानेच येईल.’ आता मी ब्रह्म आहे म्हणजे काय? तर मी त्या सद्गुरूंचाच, त्या परमतत्त्वाचाच अंश आहे, हे भान येणं. आता अंशात अंशीचे गुण असणारच ना? अमृताच्या एका थेंबातही अमृताचेच सारे गुणधर्म असलेच पाहिजेत ना? मग मी जर त्या परमतत्त्वाचा अंश असेन, तर मी खुजा कसा असू शकतो? आणि जर मी खुजेपणानं, संकुचितपणानं जगत असेन, तर मी ‘अहं ब्रह्मास्मि’ असं नुसतं तोंडानं म्हणून काय उपयोग आहे, हा प्रश्न निर्माण होईलच ना?