मी खरा कर्ता नाही की भोक्ता नाही, हे लक्षात ठेवून आचरण करणं हा विवेक झाला आणि या विवेकाचा विचार सतत जपणं ही साधना झाली, असं डॉ. श्रीकृष्ण देशमुख ऊर्फ पू. काका सांगतात. पुढे ‘मी ब्रह्म आहे,’ ही जाणीव जागी राहण्याचं महत्त्वही मांडतात आणि ही जाणीव कोटी कोटी र्कम करून नव्हे, तर विचारानं येईल, हे नमूद करतात. आता विचार कोणता? तर ‘मी खरा कर्ता नाही की भोक्ता नाही,’ या विवेकानुसार आचरण करायचं आहे, हा विचार! जेव्हा विचार सुटतो तेव्हाच अविचारीपणे आपण स्वत:ला कर्ता आणि भोक्ता मानू लागतो ना? मग खरं अचूक कर्म कोणतं करायला पाहिजे, हे माहित नसताना, कर्माची कला साधली नसताना त्या अविचारातून जी जी र्कम घडतात त्यांची फळंही वाटय़ाला येतात आणि भोगावी लागतात ना? तेव्हा आयुष्यात जे जे वाटय़ाला आलं आहे त्याच्याकडे साक्षीभावानं पाहिलं, त्यात न गुंतता-अडकता पाहू लागलो, तर मग गुंता नेमका कुठं आहे आणि तो कसा सोडवावा, हे जाणवेल. मग गेल्या भागात म्हटलं त्याप्रमाणे, मी जर ब्रह्म आहे, मी जर त्या परमात्म्याचा अंश म्हणवतो, तर मग मी त्याच्यासारखा व्यापक का नाही, माझं आचरण असं खुजं कसं, संकुचित कसं, स्वार्थकेंद्रित कसं, हा प्रश्न अंतर्मुख करायला लागेल. त्यानं आचरण सुधारत जाईल. हे जोवर होत नाही तोवर ‘साधना’ म्हणून कितीही गोष्टी करा.. जप करा, तप करा, ध्यान करा, तीर्थयात्रा करा.. अंतरंगातच जागृती नाही तर अंतरंगाशी जोडणाऱ्या या स्थूल आणि सूक्ष्म कृतींचा काय उपयोग आहे? त्या निव्वळ पार पाडल्या जाणार, उरकल्या जाणार, पण त्यातून साध्याच्या दिशेनं एक पाऊलही पडणार नाही. तेव्हा आपण कुठं, कसं गुंततो आहोत, कोणत्या क्षुद्र मनोवृत्तीपायी आपण व्यापकत्वापासून दुरावलो आहोत, संकुचित झालो आहोत, हे विचारानंच उकलू लागतं. पण पू. काका म्हणतात त्याप्रमाणे, केवळ विचारानेच जो अनुभव येणारा असतो, त्या ठिकाणीच साधकांची फार अडचण होते. काय अडचण आहे ही? पू. काका सांगतात, ‘‘एखादे व्रत-वैकल्य, उपासना, जप करण्याची साधकांची तयारी असते. फक्त विचार करण्याची आणि तो जपण्याची तयारी नसते. वस्तुत: विवेकाचा विचार सतत जपला तर प्रपंचाचे ओझे वाटणार नाही. जीव कर्ता असल्याने कर्माचे कर्तृत्व जिवाचे आहे आणि मी आत्मा असल्याने ते माझे नाही, हे सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा वारंवार पाठांतर करूनही जर कर्माचे कर्तृत्व घेतले तर माझा प्रपंच चांगला झाला, वाईट झाला, इत्यादी यशापयशाचे ओझे तयार होते किंवा प्रपंच असाच करेन, असा करणार नाही इत्यादी प्रकारचा आग्रह तयार होतो. हे कर्तृत्व जीव स्वत:वर लादून घेतो. साक्षित्व राखले तर प्रपंचाचे ओझे वाटण्याचे कारण उरणार नाही.’’ थोडक्यात आपण साधना करतो त्यामागची वैचारिक बैठक काय आहे, हे आपण अनेकदा जाणूनही घेत नाही किंवा समजलं तरी ते विसरून जातो. त्याची धारणा होत नाही. आपल्याला कृतीची सवय आहे. कृतीशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे सतत काहीतरी ‘साधना’ म्हणून करीत राहण्याची आवड उत्पन्न होते. किंवा अधिक अचूक सांगायचं तर एक साधना करीत असताना तिचा कंटाळा येऊन आणखी नवी काहीतरी साधना करावीशी वाटते. त्यामुळेच एकाच विचाराचं बोट पकडून स्वस्थ होणं आपल्याला साधत नाही, रुचत नाही आणि झेपत तर त्याहून नाही!

– चैतन्य प्रेम