News Flash

९७. प्रकाश वाट

जोवर अनुभवानं आत्म्याची झलक मिळत नाही तोपर्यंत! आता पहा, ज्या आत्म्याचा अनुभव नाही तोच मी आहे,

जो आत्मा आपल्याला स्पष्ट अनुभवानं माहित नाही, तोच आपण आहोत आणि आत्मा हा अकर्ता असल्यामुळे आपणही अकर्ते आहोत, हे मानणं सोपं आहे? पण तरीही सर्वच संतसत्पुरुषांप्रमाणे डॉ. श्रीकृष्ण देशमुख ऊर्फ पू. काका ते मानायला सांगतात आणि मोठी मार्मिक गोष्ट अशी की ज्या शास्त्राच्या आधारे ते मानायचं आहे, ते शास्त्र नंतर विसरायलाही सांगतात! मी आत्मा आहे आणि आत्मा हा अकर्ता असल्याने मीदेखील खरा कर्ता नाही, या शास्त्राच्या सांगण्यावर शंभर टक्के श्रद्धा ठेवायला हवी, असं ते सांगतात. ही श्रद्धा कधीपर्यंत ठेवायची आहे? तर,  जोवर अनुभवानं आत्म्याची झलक मिळत नाही तोपर्यंत! आता पहा, ज्या आत्म्याचा अनुभव नाही तोच मी आहे, यावर विश्वास ठेवायचा आहे. यामागे एक गूढ कारण आहे. ते कारण असं की, मी जीवबुद्धीनं, देहबुद्धीनं जगत आहे. मी देहच आहे, ही धारणा पक्की व्हायला मी काही त्याचा जप केलेला नाही, तप केलेलं नाही की मनन, चिंतन केलेलं नाही. तरीही ‘मी देह आहे,’ हा भाव, हे आकलन, ही धारणा पक्की आहे. या देहाशी आपलं सहज तादात्म्य आहे. त्यामुळे या देहाला जे जे सुखावणारं आहे ते ते उत्तम आहे, चांगलं आहे, ही कल्पना आहे. त्यासाठी ते सारं मिळवण्याची धडपड आहे. त्यातून भौतिकाची आसक्ती मनात खोलवर पक्की होत आहे. मग अशावेळी ‘मी देह नाही,’ हे सांगून पटणारं नाही. त्याला ‘मी आत्मा आहे,’ ही जोड द्यावी लागते. मग देह तर मला दिसतो, आत्मा दिसत नाही. तरीही जो दिसत नाही, तोच खरा मी, मानायचं आहे. तो कसा आहे? तर तो शाश्वत आहे, समर्थ आहे, स्वतंत्र आहे, आनंदस्वरूप आहे. मग मी अशाश्वत, अनित्य, परावलंबी, परतंत्र आणि सुख-दु:खमिश्रित जिणं का जगत आहे, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही. मग मी जर तो आत्मा असेन, तर मी निर्लिप्त, अकर्ता आहे, हे शास्त्राचं म्हणणं माझ्या अनुभवाचं का होत नाही, हा विचार जागा होईल. या सांगण्यावर श्रद्धा ठेवायला सांगण्यामागे एक सूक्ष्म हेतू आहे. तो असा की, माझ्या मन, चित्त, बुद्धीवर कर्तेपणाचा जो वज्रलेप चढला आहे तो या ‘मी आत्मा आहे आणि म्हणून मी अकर्ता आहे,’ या धारणेचा स्वीकार केल्यावर हळूहळू खरवडला जाऊ लागेल. मग ज्या ज्या वेळी कर्तेपणाचा अहंकार जागा होईल, त्या त्या वेळी अकर्तेपणाची जाणीवसुद्धा जागी होईल. आता अनुभवानं ‘मी आत्मा आहे,’ ही झलक मिळेपर्यंत शास्त्रावर श्रद्धा ठेवायची आहे. ही झलक कशी मिळणार? तर ती केवळ सद्गुरू आधारावर, सद्गुरू कृपेनं त्यांच्या बोधानुसार जीवनात आचरण सुरू केल्यानं लाभणार आहे. म्हणजेच त्यांच्या बोधानुसार आचरण सुरू केलं की आपल्या कर्तेपणाच्या अहंकारातला पोकळपणा जाणवू लागणार आहे, आपला संकुचितपणा जाणवू लागणार आहे, मी आणि माझेपणाची आपल्यातली आसक्ती आणि तिच्यावरचं आपलं विसंबणं जाणवू लागणार आहे. शास्त्राचं काम तिथपर्यंतच आहे! आपण बंधनात जगत आहोत, ही जाणीव करून देण्यापर्यंत आणि जगण्यातील मुक्तीची आस निर्माण करण्यापर्यंत त्यांचा उपयोग आहे. एकदा ती आस जागी झाली की साधना सुरू होईल. इतकंच नव्हे, तर खरी आस, खरी तळमळ निर्माण झाली, तर जगण्यातली प्रत्येक कृती ही साधनाच होऊ लागेल! अनवधान ओसरू लागेल. अवधान येईल. अनवधानानं अज्ञानाच्या विळख्यात होतो, आता अवधानानं ज्ञानाच्या प्रकाशात चालणं सुरू होईल.

chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 4:31 am

Web Title: loksatta chintan dhara part 97
Next Stories
1 ९६. शब्द-श्रद्धा
2 ९५. विचाराचं बोट
3 ९४. साधना विवेक
Just Now!
X