आपल्या मनाच्या ताब्यात गोष्टी न राहता जेव्हा आपलं मन अन्य गोष्टींच्या ताब्यात जातं, तेव्हा ते मन परावलंबी, परतंत्र होतं. आपण आपलं मानसिक, भावनिक, वैचारिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य गमावून बसतो. जे अशा भावनिक गुलामगिरीत अडकतात त्यांच्या मनाचा समतोल जातो, समत्व जातं. आणि  अध्यात्माच्या मार्गात मनाशीच तर प्रथम संबंध येतो! तेव्हा जीवनाचं मूळ रहस्य शोधण्याच्या उदात्त हेतूनं प्रेरित होऊन आपण जर अध्यात्माच्या मार्गावर आलो असू, तर अधिक सजगतेनं विषय प्रभावाच्या ताब्यातून सुटण्याचा विचार आपल्याला सुरू करावाच लागेल. याचा अर्थ असा नव्हे, की आपण विषयांच्या पकडीतून क्षणार्धात सुटू! नव्हे, कदाचित हा जन्मही सरेल, पण ती पकड सुटणार नाही. पण तरीही हा विचार जेव्हा सुरू होतो, तेव्हा थोडं अवधान तर येईल? थोडं आत्मपरीक्षण तर सुरू होईल? मग सद्गुरुबोधाचं बोट अधिक घट्ट पकडण्याची धडपड तर सुरू होईल? आणि मग त्या बोधानुरूप आचरण सुरू झालं, तर किंचित स्वसुधारणा तरी होत जाईल. पण त्यासाठी आधी त्या विषयांचा आपल्या आंतरिक जीवनावरील प्रभाव आणि त्यात सुखाशेनं आपलं जे गुंतणं आहे, त्या स्वकल्पनाबद्ध आणि अपेक्षाबद्ध गुंतण्यानं नाहक जाणारा जो वेळ आहे त्याचं भान आपल्याला आलं पाहिजे. बघा प्रत्यक्ष विषयभोग जो असतो तो फार मर्यादित असतो. पण त्या भोगाविषयीच्या कल्पना या दिवस-रात्र मनात घोळत राहू शकतात. विषय कल्पनांचा हा आभासी संग अधिक सूक्ष्म संस्कार करतो आणि त्यामुळे मनाला त्यांची ओढ लागते. तेव्हा आधी विषयांचे वास्तविक स्वरूप जाणून घेतल्यावर त्यांच्याबाबत विरक्तभाव म्हणजे काय, हे जाणवू तरी लागेल. लहान मुलाला चॉकलेटच्या चांद्या जमवण्याचा छंद असतो. हा कचरा टाकून दे, म्हणून कोणी किती समजावलं, ओरडलं, तरी त्याला तो अमूल्य खजिन्यासारखाच भासत असतो. त्यामुळे त्या चांद्या तो टाकून देत नाही, उलट जिवापाड जपतो. त्या चांद्यांशी त्याचं चिमुकलं भावविश्व जोडलं गेलं असतं. पण जसजसा तो मोठा होतो तेव्हा त्या चांद्या त्यालाही कचरा वाटू लागतात आणि एकवेळ अशी येते जेव्हा हसून तो त्या स्वत:च टाकून देतो! पण लहानपणी जशा त्या चांद्या त्याला कचरा वाटूच शकत नव्हत्या, तसे विषयांच्या पकडीत असताना विषय आपल्याला त्याज्ज्य वाटूच शकत नाहीत. ते मूल जसं, ‘मी स्वत: या चांद्या कमी करीन. काही टाकीन. पण तुम्ही कुणी त्या टाकू नका,’ असं सांगतं, तसं आपणही ‘मी स्वत: विषयांचं प्रेम कमी करीन. पण हे भगवंता तू ते आत्ता लगेच नष्ट करू नकोस,’असाच पवित्रा बाळगत असतो. तेव्हा हा अभंग सांगतो की, विषयांचं प्रेम मनात कायम असताना त्यांच्या प्रभावातून सुटण्याचा अभ्यास करू नका. विषयांचं प्रेम मनात कायम असताना जर त्यांच्या पकडीतून सुटण्याचा अभ्यास केला, तर ते अधिकच तीव्र होतील. मग ते एक मार्मिक उपमा वापरतात. पाणी हे जीवन आहे. जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण तेच पाणी जर साठवून अशुद्ध झालं किंवा अशुद्ध पाणीच जर घरात साठवून ठेवलं, तर त्यात किडे होतात. त्याचप्रमाणे अशुद्ध मनात शुद्ध ज्ञानाचं स्फुरण होऊ शकत नाही. अशुद्ध मन एकाग्र होऊ शकत नाही. उलट ते एकाग्र होण्याचा प्रयत्न जसजसा करू लागते तसतसं विषयांचं स्मरण आणि स्फुरण वेगानं होऊ लागतं!

– चैतन्य प्रेम