12 December 2018

News Flash

९. वाद आणि आस्वाद

धर्माची तात्त्विक बाजू म्हणजे काय

स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘आपण अनेक पुस्तकं आणि धर्मग्रंथ वाचतो. आपल्या लहानपणापासून आपल्याला दुसऱ्यांकडून अनेक प्रकारच्या कल्पना मिळतात आणि त्या आपण वारंवार बदलत असतो. धर्माची तात्त्विक बाजू म्हणजे काय, ते आपल्याला कळते. आपल्याला त्याची व्यावहारिक बाजू म्हणजे काय, हे समजते, असेही आपल्याला वाटते.’’ (भारताची आध्यात्मिक विचारधारा, पृ. ४४). स्वामीजी शब्दयोजना अत्यंत अचूक आणि नेमकी करतात. ते म्हणतात त्याप्रमाणे, धर्म म्हणजे काय, याबाबत लहानपणापासून आपण अनेकांकडून अनेक कल्पना ग्रहण करीत असतो. कसं वागावं, काय वागावं, काय केल्यानं देवाला आवडतं, अशा पातळीपासून लहानपणी आपल्यावर ‘संस्कार’ केले जात असतात. ज्यांनी हे ‘संस्कार’ आपल्यावर केले असतात त्यांनीही तर ते त्यांच्या लहानपणी अन्य मोठय़ा माणसांकडूनच ग्रहण केलेले असतात! तर अशा कल्पना आपण इतरांकडून ऐकतो आणि त्यातल्या काही आपण स्वीकारतो किंवा आपल्याला स्वीकाराव्या लागतात. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा या कल्पनांमध्येही पालट होत जातो. त्यात आपण बदल करीत असतो. याच जोडीने धर्माची तात्त्विक बाजू आपल्याला माहीत असते कारण ती शब्दांतच तर मांडलेली असते! तेव्हा माझ्या धर्माचं तत्त्वज्ञान कसं उत्तुंग आहे, श्रेष्ठ आहे हे आपल्याला शब्दांतून बरंच मांडता येतं. मग स्वामीजी म्हणतात, ‘‘आपल्याला त्याची (धर्माची) व्यावहारिक बाजू म्हणजे काय, हे समजते, असेही आपल्याला वाटते!’’ म्हणजे तात्त्विकदृष्टय़ा जो धर्म श्रेष्ठ आहे त्याची व्यावहारिक बाजू म्हणजे व्यवहारात आपण जे वागतो, जो  व्यवहार करतो, तो त्या धर्मालाच धरून आहे, असं आपण बिनदिक्कत मानत असतो! तर, धर्माची जी स्थूल बाजू आहे ती काटेकोरपणे पाळणं म्हणजेच धर्मपालन, असं आपण मानतो. त्या स्थूल कृतीमागचा जो सूक्ष्म उद्देश आहे तो खरंतर जाणून घेतला तर लक्षात येईल की कालपरत्वे स्थूल कृती बदलूही शकते, पण मूळ हेतू अखंड राहू शकतो. उदाहरणार्थ, उपवास! उपवास म्हणजे भगवद्जाणिवेच्या निकट राहणं, हा सूक्ष्म अर्थ लक्षात घेतला तर आपण ज्या पद्धतीनं उपवास करतो वा पाळतो त्यात ही जाणीव असते का, हे तपासता येईल आणि आपल्या उपवास पाळण्यातील कितीतरी उणिवा लक्षात येतील! तेव्हा आपण ‘धार्मिक’ आहोत, असं मानतो, पण प्रत्यक्षात धर्म म्हणजे काय, त्याचा उगम कशात आहे, याबाबतचं स्वामीजींच्या विचारांच्या आधारे साधलेलं चिंतन पाहिलं तर लक्षात येईल की धर्माचा खरा हेतूच आपण नीट लक्षात घेत नाही. हा हेतू आहे मुक्त होणं! सर्व तऱ्हेच्या संकुचित कल्पनांतून मुक्त होणं. स्वामीजी सांगतात, ‘‘तुम्ही अष्टौप्रहर प्रार्थना करीत असाल, साऱ्या जगातील धर्मग्रंथ वाचत असाल आणि अस्तित्वातील  सर्व देवांची पूजा तुम्ही करीत असाल, पण आत्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय तुम्हाला मुक्ती लाभणार नाही. म्हणून केवळ शब्द, तत्त्वचर्चा किंवा वादविवाद नको, तर आत्मसाक्षात्कार हवा. हाच खरा व्यवहार्य धर्म आहे.’’ (पृ. ५३). अर्थात धर्म हा शब्दांच्या पिंजऱ्यात नाही, कोरडय़ा तत्त्वचर्चेत नाही, वादविवादात नाही, तर केवळ आणि केवळ आत्मानुभूतीत आहे. अनुभवात आहे.. आणि जो शुद्ध अनुभवाचा भाग आहे त्यात वादाचा नव्हे, आस्वादनाचा आनंद आहे!

First Published on January 11, 2018 3:36 am

Web Title: loksatta chintandhara part 10