जे कार्य आपल्या वाटय़ाला आलं आहे, ते कसं करायचं आहे? तर ‘तितुके’ करायचे आहे. म्हणजे जेमतेम नाही, जेवढय़ास तेवढं नाही, तर नेमकं आणि पूर्ण करायचं आहे. अर्थात कर्तव्यकर्म करताना कर्माची अनावश्यक शृंखला निर्माण करून त्यातच गुंतून पडायचं नाही. हे कार्य करतानाही सदा देवाच्या द्वाराजवळच राहायचं आहे. हे देवाचं द्वार म्हणजे काय? मुळात द्वार असतं तिथून आपल्याला आत जाता येतं किंवा बाहेर पडता येतं. अगदी त्याचप्रमाणे बाहेरून कुणी आत येऊ नये यासाठीही जसा त्या द्वाराचा उपयोग होतो तसाच आतलं कुणी बाहेर पडू नये, यासाठीही द्वाराचा उपयोग होतो! मग हे देवाचं द्वार कोणतं आहे? देहालाच जर देवालय मानलं, तर या देहाची इंद्रियं हीच ती द्वारं ठरतात! या डोळ्यांनी जग आपण आत घेतो, कानांनी जगाचं श्राव्यरूप आत येतं, त्वचेनं जगाचं स्पश्र्यरूप अनुभवलं जातं. त्याचप्रमाणे या इंद्रियद्वारांवाटे आपल्या भावना, जाणिवा, इच्छा यांचंही प्रक्षेपण जगाकडे होतं. हीच द्वारं बंद झाली म्हणजे अलिप्त झाली की बाहेरचं जे जे त्याज्य आहे ते ते आत येण्यापासून रोखलं जातं जे जे मोलाचं आहे ते बाहेर सांडण्यापासून थोपवलं जातं. तेव्हा जगात वावरताना, जगातली सर्व कर्तव्यंकर्म अचूक करण्याचा प्रयत्न करतानाच ही देवाची द्वारं सोडायची नाहीत. देवाला विन्मुख होऊन जगायचं नाही. थोडक्यात सद्गुरूला, सद्गुरूंच्या बोधाला विन्मुख होऊन जगायचं नाही. पुढे म्हणतात, देवाचे वैभव सांभाळावे, न्यूनपूर्ण पडोचि नेदावे! म्हणजे सद्गुरूंचं जे वैभव आहे ते सांभाळायचं आहे, त्यात काही उणं पडू द्यायचं नाही. आता हे वैभव कोणतं आहे? तर ते आत्मिक वैभव आहे. सद्गुरू बोधानुरूप जगण्याला जो व्यापक आयाम मिळाला आहे, तो व्यापकपणा सुटू द्यायचा नाही. संकुचित व्हायचं नाही. ‘न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें,’ म्हणजे आपल्या बाजूनं काही उणं पडू द्यायचं नाही. अर्थात त्या बोधानुरूप जगण्याच्या प्रयत्नात काही उणं पडायचं नाही, हा निर्धार जपायचा आहे. या चढत्या वाढत्या रीतीनं सद्गुरूचं भजन वाढवायचं आहे. अर्थात सद्गुरू बोधानुरूप जगण्याचा परीघ वाढवायचा आहे. अखेर समर्थ सांगतात, सद्गुरूचं असं दास्य करायचं आहे आणि प्रत्यक्ष जरी ते पूर्ण साधलं नाही, तरी त्याची मानसपूजा करायची आहे! अर्थात असं जगणं साधावं, हा विचार मनात सतत घोळवायचा आहे. आता या दास्यभक्तीच्या समासात देवाचं भौतिक वैभव वाढवण्याचेही अनेक मार्ग सांगितले आहेत आणि त्यामुळे ते प्रत्यक्ष साधलं नाही तरी मानसपूजेत कल्पायला समर्थ सांगतात, असं वाटतं. तोही अर्थ आहेच, पण मनाची धारणा आधी तशी सद्गुरूमय झाली पाहिजे, हा सूक्ष्म अर्थ इथं लागू होतो. हे जे वैभव सांगितलंय ना, त्याच्याही अनेक सूक्ष्म अर्थछटा जाणवू लागतात. मंदिरात तळघर आणि भुयार कशाला असतील? त्याचा अर्थ हाच की आपली जी भक्ती आहे ती जगापासून लपली पाहिजे. सद्गुरूविषयीच्या ज्या भावना आहेत त्यांचं प्रदर्शन होता कामा नये. जगात वावरत असताना, जगातली सर्व कर्तव्यंकर्म पार पाडत असतानाच मनाच्या तळाशी हे चिंतन, स्मरण, परिशीलन सतत सुरू राहिलं पाहिजे. छत्र, चामरं, सुवर्ण सिंहासनं आदींचा अर्थ असा की आपल्या जगण्यातून आपल्यावरील कृपाछत्राची, आपल्या निर्भय दृढ बैठकीची जगाला जाणीव झाली तरी चालेल, पण आपलं लक्ष बाह्य़ जगाकडे नव्हे, आंतरिक वैभवाकडेच असलं पाहिजे.