20 September 2018

News Flash

१०. त्याग आणि परमलाभ : १

स्वामी विवेकानंद यांच्या सांगण्यानुसार, धर्म हा वादाचा नव्हे, आस्वादनाचा विषय आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या सांगण्यानुसार, धर्म हा वादाचा नव्हे, आस्वादनाचा विषय आहे. आत्मानुभूती हाच धर्माचा खरा हेतू आहे. हे आस्वादन आहे मुक्तीचं. मुक्तीचा अनुभव हाच खरा परम आनंदाचा अनुभव आहे. पण ही मुक्ती सहज आहे का? आपण आज मुक्त नाही, अर्थात बंधनात आहोत, त्याचं कारण काय? कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या आसक्तीत आपण मनानं अडकून आहोत, हेच बंधनाचं कारण आहे. प्रत्यक्षात जी गोष्ट या घडीला मनाला मोहून टाकते तिच्यातून स्वत:ची सुटका करून घेणं, त्या गोष्टीचा त्याग करता येणं सोपं आहे का? अर्थातच नाही.. आणि त्यामुळेच त्या गोष्टीच्या आसक्तीतून मुक्त होणंही शक्य नाही. आपण अशा अनंत गोष्टींमध्ये मनानं अडकून असतो आणि ‘धर्म’ तर सर्व संकुचित गोष्टींच्या पकडीतून आपल्याला सोडवू पाहातो. त्यासाठीच धर्माच्या आधारानं काही नीतीनियम अस्तित्वात आले. माणसानं माणूस म्हणून विकसित व्हावं, परिपक्व व्हावं, व्यापक व्हावं यासाठी म्हणून हे जे सारे नीतीनियम अस्तित्वात आले त्यांचा पाया खरं तर त्याग हाच आहे, हे आपल्या पटकन लक्षात येत नाही. हा त्याग कसला आहे? तर वरच्या पातळीवरील गोष्टी मिळवण्यासाठी खालच्या पातळीवरील गोष्टींचा त्याग! धर्माच्या आधारानं साकारलेले सर्व नीतीनियम, सामाजिक संकेत आणि बंधने तसंच चांगलं वागण्यासाठीचा सर्व जो बोध आहे, त्यांचा पाया त्यागच आहे. स्वामीजी म्हणतात, ‘‘तुमच्या शेजाऱ्याची मालमत्ता हिरावून घेण्याच्या मोहाचा त्याग करा. त्याच्यावर हात टाकण्याच्या मोहाचा त्याग करा. दुबळ्यांवर जुलूम करण्याच्या आनंदाचा त्याग करा. खोटेनाटे सांगून इतरांना फसवण्याच्या सुखाचा त्याग करा. विवाह म्हणजे व्यभिचाराच्या त्यागाव्यतिरिक्त आणखी काय आहे? त्याग करा.. स्वार्थत्याग करा. पण काहीच न मिळवण्यासाठी नव्हे! परंतु उच्चतर गोष्टींच्या लाभासाठी त्याग करा.’’ मग स्वामीजी महत्त्वाची गोष्ट सांगतात की,‘‘तुम्हाला उच्च असे काहीतरी प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही त्याग करू शकणार नाही.  तुम्ही बोलाल, धडपड कराल, पुष्कळ गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. पण उच्च गोष्टीचा लाभ झाला की त्याग आपोआपच घडेल. मग खालच्या प्रतीच्या गोष्टी आपोआपच गळून पडतील.’’ (भारताची आध्यात्मिक विचारधारा, पृ. ५१). थोडक्यात उच्च गोष्टीच्या लाभासाठी सुरू असलेली धडपड आणि सामान्य गोष्टींच्या प्रभावातून सुटण्याची जी धडपड आहे ती जेव्हा अतिशय प्रामाणिकपणे, जिद्दीनं, निष्ठेनं सुरू होते तेव्हा तीच जीवनसाधना बनते. अशी साधना सातत्यानं घडत सहज होऊ लागली की नंतरच व्यापकतेचा, उच्च पातळीवरच्या व्यापक जाणिवेचा लाभ होईल. तो झाला की संकुचित जाणीव आपोआप गळून पडेल. स्वामीजी यालाच व्यवहार्य धर्म मानतात. हा ‘त्याग’ सहज कसा साधेल, याबाबत एक अत्यंत सूचक बोध स्वामीजी करतात. ते म्हणतात, ‘‘व्यवहार्य धर्म म्हणजे मी आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन जाणे. (त्यासाठी) चुकीचे तादात्म्यीकरण थांबवा!’’ हे वाक्य अतिशय गूढ आणि अर्थगर्भ आहे. खरा धर्म म्हणजे आत्म्याशी एकरूप होऊन जाणं, हाच आहे.. पण ‘आत्मा’ म्हणजे काय, याचा जोवर अनुभव नाही, तोवर त्याच्याशी एकरूप तरी कसं होणार? तोवर आत्मा म्हणजे निव्वळ शब्दसंग्रहातला एक शब्दच नाही का? ते आत्मतत्त्व आकळण्यासाठीच या वाक्याचा उत्तरार्ध महत्त्वाचा आहे!

HOT DEALS
  • I Kall Black 4G K3 with Waterproof Bluetooth Speaker 8GB
    ₹ 4099 MRP ₹ 5999 -32%
  • Honor 8 32GB Pearl White
    ₹ 14210 MRP ₹ 30000 -53%
    ₹1500 Cashback

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

First Published on January 12, 2018 3:10 am

Web Title: loksatta chintandhara part 12