चुकीच्या गोष्टींशी आपलं तादात्म्य कसं आहे, हे कळण्यासाठी मनाची फरपट आधी थांबली पाहिजे. म्हणजे मग मन कसं आणि कुठं अनावश्यक गुंततं आणि त्यानं किती मानसिक शक्ती विनाकारण खर्च होते, हे उमगू लागेल. स्वामी विवेकानंद विचारतात, ‘‘ज्या गोष्टी विनाशशील आहेत त्यांच्या मागे धावणं श्रेष्ठ की जे कधीही बदलत नाही त्याची उपासना करणं श्रेष्ठ?’’ हा  प्रश्न जेव्हा आपल्या मनातल्या प्रत्येक विचारतरंगाच्या, वासनातरंगाच्या पाश्र्वभूमीवर स्वत:ला विचारू, प्रत्येक कृती जेव्हा या प्रश्नाच्या पाश्र्वभूमीवर जोखून पाहू तेव्हाच आपण अशाश्वत, नश्वर गोष्टींमागे कसं धावत आहोत, हे जाणवू लागेल. आपण ज्यांना ‘आपलं’ मानतो, अशा व्यक्तींवर भावनिक, मानसिकदृष्टय़ा  अवलंबून आपण स्वत:ला दुर्बल करीत असतो. दुसऱ्यांकडून आपण अपेक्षा बाळगतो आणि त्या अपेक्षापूर्तीच्या आशेनं जगत राहतो. त्यामुळे मानसिकदृष्टय़ा पंगुही होतो. स्वामीजी म्हणतात, ‘‘आयुष्यातली बरीच वर्षे आपण सतत दुसऱ्यावर विसंबत आलो आहोत. मला जर एखाद्या व्यक्तीपासून थोडेसे सुख लाभले आणि ती व्यक्ती निघून गेली तर माझे सुखही निघून जाते.. माणसाचा मूर्खपणा पहा, तो सुखासाठी दुसऱ्या माणसांवरच अवलंबून राहतो! सर्व प्रकारच्या वियोगापासून स्वाभाविकपणेच दु:ख होत असतं. सुखासाठी आपण संपत्तीवर अवलंबून राहावे? संपत्तीत चढउतार होत असतो.’’ (भारताची आध्यात्मिक विचारधारा, पृ. ५८). तेव्हा व्यक्ती आणि संपत्ती म्हणजे भौतिक संपदा या दोन्ही गोष्टींत चढउतार होतच असतात. त्यामुळे त्यांच्यावर मनानं अवलंबलो तर मनाच्या स्थैर्यावरही सहज आघात होणं शक्य असतं. त्यामुळे त्यांच्यामागचं हे वृथा धावणं थांबलं की मग जे कधीही बदलत नाही, अशा तत्त्वाकडे लक्ष जाईल. स्वामीजी पुढे म्हणतात, ‘‘अविकारी आत्म्याशिवाय दुसऱ्या कशावरही अवलंबून राहिल्याने आज ना उद्या दु:ख भोगावे लागणारच.’’ (पृ. ५८). आता हा आत्मा कसा आहे? स्वामीजींच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘आत्म्याव्यतिरिक्त इतर सर्व काही परिवर्तनशील आहे. तुमच्या स्वत:च्या आत्म्याव्यतिरिक्त काहीही शाश्वत नाही. आत्म्यातच अनंत, अविकारी आनंद आहे. ध्यान हे  या आनंदाप्रत पोहोचण्याचे द्वार आहे. प्रार्थना, अनुष्ठाने आणि उपासनेचे इतर सर्व प्रकार हे सर्व ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत.’’ (पृ. ५८). थोडक्यात, आत्मा अखंड, शाश्वत, अनंत आणि अविकारी आहे त्या स्थितीपर्यंत पोहोचायचं, ती स्थिती प्राप्त करून घ्यायची, तर आपल्यातल्याच अनंत, अखंड, शाश्वत तत्त्वाचा आंतरिक शोध सुरू झाला पाहिजे. हा आनंदाचा शोध ध्यानानंच साध्य आहे, असं स्वामीजी सांगतात आणि इतर तऱ्हेच्या सर्व उपासना हे या ध्यानाचे प्राथमिक पाठ असल्याचं सांगतात. अनेक साधनामार्गातला एक मार्ग म्हणजे ‘ध्यान’ असंच आपण मानतो, पण स्वामीजी सर्वच साधनांना ध्यानाचे प्राथमिक पाठ म्हणतात! म्हणजेच या प्रत्येक उपासनेची परिपूर्ती ही ध्यानातच होते, असंच स्वामीजींना सूचित करायचं आहे.. पण जोवर अशाश्वत, विनाशशील, नश्वर गोष्टींचं सदोदित सुरू असलेलं ‘सहजध्यान’ थांबत नाही, तोवर शाश्वत, अविनाशी तत्त्वाचं ध्यान सुरू होत नाही. ते ध्यान सुरू होण्यासाठी आणि त्यायोगे शाश्वत आनंदाच्या परमलाभासाठी विनाशशील गोष्टींमधल्या आसक्तीचा त्याग साधावाच लागतो.