परम प्राप्ती हेच मनुष्य जन्माचं खरं उद्दिष्ट आहे आणि त्या ध्येयपूर्तीसाठीच जणू अनंत क्षमतांनी युक्त असा देह माणसाला लाभला आहे. दर्शन, स्पर्शन, श्रवण, मनन, चिंतन आदी क्षमतांमुळे माणूस परम तत्त्वाचा शोध घेऊ शकतो. पण प्रत्यक्षात याच क्षमतांचा गैरवापर करून तो मोह आणि भ्रमात फसण्याचाही धोका असतो. या जीवनातील वास्तवाचं दर्शन, हे खरं दर्शन! मात्र जे खरं आहे ते माणसाला पाहताच येत नाही आणि जे भ्रामक आहे तेच त्याला सत्य भासतं! शुद्ध ज्ञानाचं श्रवण त्याला नकोसं वाटतं, पण परिनदेनं किंवा स्वस्तुतीनं भरलेलं किंवा निर्थक गोष्टींत रमणारं बोलणं ऐकण्यात त्याला गोडी वाटते. शाश्वतताचं नव्हे तर अशाश्वताचं चिंतन करण्यात तो गढून जातो.. निर्थक गोष्टींच्या मननात तो मोलाचा वेळ निर्थक घालवतो. हे चित्र बदलावं या कळकळीतूनच संत अहोरात्र बोध करीत असतात. त्यांना वाटत असतं की, या जगात वावरताना माणसानं या अशाश्वत जगात अशाश्वताचाच पसारा वाढविण्यात न गुंतता शाश्वताच्या प्राप्तीचीच साधना केली पाहिजे. त्यायोगेच त्याच्या जीवनाला परम अर्थ प्राप्त होईल. मग या जगात वावरताना जगाच्या भ्रम-मोहयुक्त प्रभावापासून स्वत:ला दूर ठेवून ध्येयनिष्ठ जीवन कसं जगावं, हा प्रश्न साधकाच्या मनातही स्वाभाविकपणे उमटतो. कलावती आई त्यावर म्हणतात, ‘‘आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो तर आपले आणि त्यांचे नाते नसतानाही दादा, वहिनी, मामा, मामी इत्यादी नावांनी तेथील माणसांना संबोधतो. तसेच लहानांशी लहानांप्रमाणे आणि मोठय़ांशी मोठय़ांप्रमाणे बाह्यात्कारे वागतो. परंतु आपल्या अंतर्यामी, आपण येथे थोडय़ा दिवसांसाठीच आलो आहोत, आपल्याला घरी परत जायचे आहे, याचे आपणास सदा स्मरण राहते. त्यामुळे ज्या कामासाठी आलो आहोत ते काम पूर्ण करण्याकडेच आपले सारखे लक्ष असते. त्याप्रमाणे आपण या जगातले पाहुणे आहोत, परमेश्वराकडून आलो असून त्याच्याचकडे परत जायचे आहे हे गुरुबोधाद्वारे पक्के समजले म्हणजे इहलोकात राहीपर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी संबंध येतो, त्या सर्वाशी त्या त्याप्रमाणे वागणे सहजच जमू लागते. आपले दुष्कृत्य घालविण्यासाठी आणि सत्कृत्याची जोड करण्यासाठी आपण या देहात आलो आहोत याचे स्मरण सदोदित राहते. त्यामुळे आपले वागणे आपसूकच अनासक्त बनते.’’ अर्थात माणसाचा देह आपल्याला का लाभला आहे? तर, दुष्कृत्य घालविण्यासाठी आणि सत्कृत्य साधण्यासाठी! आता दुष्कृत्य कोणतं आणि सत्कृत्य कोणतं? तर परम तत्त्वापासून आपल्याला दूर करणारं प्रत्येक कृत्य हे दुष्कृत्य आहे आणि परम तत्त्वाचं भान जपणारं प्रत्येक कृत्य हे सत्कृत्य आहे. आपल्या या मनुष्य देहातल्या सर्व क्षमता या खरं तर स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही पातळीवरील सत्कृत्यांसाठी साह्यकारीच आहेत. त्यामुळे हा देहच खरं तर परमार्थासाठीचं मुख्य साधन आहे. या देहातच परमार्थाचा नित्य निवास घडला पाहिजे. अर्थात हा देह म्हणजेच ‘परमार्थ निकेतन’ झाला पाहिजे! हा मनुष्य जन्म परमार्थ केंद्रित कसा होईल, त्यासाठी काय केलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, हे आता आपण कलावती आई यांच्या बोधसागरातून जाणून घेणार आहोत.

 

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Raj Thackeray Padwa melava
“राज ठाकरे ठरवतील तीच धर्माची बाजू असेल”, मनसेच्या वरिष्ठ नेत्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ