एकदा सद्गुरू जवळच्या शिष्यांकडे पाहात म्हणाले, ‘‘असं चोरून किती जन्मं भेटणार?’’ काहींच्या मनात आलं, ‘चोरून म्हणजे?’ त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्हांकित भाव पाहून सद्गुरू हसून म्हणाले, ‘‘तुम्ही खरं तर माझेच आहात आणि मी तुमचा आहे. पण तरीही ते पटवून देण्यात किती वेळ जातो! आधी तर तुम्हालाच पटावं लागतं मग तुमचे म्हणून जे जे आहेत त्यांना पटावं लागतं.. त्यात पूर्ण जन्मही निघून जातो.. किती जन्म हेच सुरू राहणार?’’ भगवंतानं गीतेतही हेच सांगितलंय ना? ‘‘अवजानन्ति मां मूढा मानुषिंतनुमाश्रितम्!’’ मी मनुष्यदेह धारण करून येतो तेव्हा मूढ लोक मला ओळखत नाहीत. आताच्या परिस्थितीत मात्र मूढ राहिलेलं परवडलं, पण भोंदू गुरूपायी फसू नये, असंच अनेकांना वाटेल आणि त्यात काही चूक नाही. पण थोडा विचार करा. शिक्षण व्यवस्थेतसुद्धा भ्रष्टाचार शिरलाय म्हणून कुणी शिकायचं सोडलं का? अन्नधान्यात भेसळ होते म्हणून कुणी खायचं सोडलं का? लग्नं टिकत नाहीत म्हणून कुणी लग्न करायचं सोडलं का? तेव्हा धोका प्रत्येक गोष्टीत असतोच तसाच तो या मार्गातही आहे. पण म्हणून या मार्गाचा आणि गुरुपरंपरेचा त्याग करणं हा उपाय नव्हे. इतर गोष्टींत जसं आपण आधी आपल्या बुद्धीवर विसंबतो आणि शक्य तेवढी सावधानता बाळगून प्रयत्न करतो तेच इथंही करावं. तर मुद्दा असा की, जो खरा आहे आणि खऱ्या कार्यासाठीच आला आहे त्याला आधी सर्वार्थानं खोटय़ा ‘मी’च्याच आधारानं जगणाऱ्या आणि त्या ठिसूळ ‘मी’च्या पायावर तितक्याच ठिसूळ ‘माझे’पणाचा पसारा वाढविणाऱ्या जीवाला किती प्रकारे समजवावं, वळवावं आणि घडवावं लागतं! पुद्दुचेरीचे योगी अरविंद आणि माताजी यांचे एक अनन्य भक्त आणि श्रेष्ठ साधक मा. पुं. पंडित यांनी ‘कॉमेंट्रीज ऑन द मदर्स मिनिस्ट्री’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्याचा काही भाग आश्रमाच्या ‘संजीवन’ या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. तो इथं उद्धृत करीत आहे. यात पंडित म्हणतात, ‘‘मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीमध्ये जो विकास होत असतो, त्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर मानवाची संमती आणि सहकार्य आवश्यक असते. ज्या मानवाचा उद्धार करण्याकरिता प्रेषित आला असतो, त्याला प्रत्येक वेळी मानवाची प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि सहयोग देण्याची इच्छा यांचा विचार करावा लागतो. ज्यांचा उद्धार करायचा त्यांच्या अनुमतीखेरीज त्यांचा उद्धार होऊ शकत नाही! खरंच, कार्य करण्याच्या दृष्टीने  मनुष्य हा कठीण कवचासारखा असतो. त्याच्या सवयी तो सहजासहजी सोडायला तयार नसतो. मनुष्याच्या अंगी जडलेल्या प्रवृत्ती व तामसिकता यांचा जोर इतका असतो की विकासक्रमात विरोधावाचून पुढचे पाऊल टाकणे शक्य होत नाही. मनुष्य प्रत्येक गोष्टीसाठी मोबदला मागतो, त्याला पुराव्याची गरज असते आणि त्यामुळे प्रेषितालादेखील त्याच्या पातळीवर खाली उतरावे लागते.. मानवाप्रमाणे वागावे लागते. असे केले तरच मनुष्य त्याचा मार्गदर्शक म्हणून स्वीकार करतो. त्याचे अनुसरण करतो. या प्रक्रियेत साहजिकच कार्याचा दर्जा कमी होतो, अनावश्यक विलंब होतो व परिणामांविषयी अनिश्चितता निर्माण होते. मनुष्याच्या सवयींशी आणि गरजांशी जुळवून घेऊन कार्य करावे लागत असल्यामुळे प्रेषिताच्या कार्याची गुणवत्ता धोक्यात येते..’’ आता या विचारांचा आणि आजच्या लेखाचं शीर्षक ‘दीन-दास’ का आहे, याचा मागोवा पुढील भागात घेऊ.