‘श्रीरामचरित मानस’मध्ये तुलसीदास म्हणतात, ‘बिनु सतसंग ज्ञान न होई!’ म्हणजे सत्संगाशिवाय ज्ञान होत नाही. आता हे ज्ञान जर शुद्ध, खरं असणं अपेक्षित असेल, तर तो सत्संगही शुद्ध आणि खरा असला पाहिजे, हे उघडच आहे. या खरेपणाला, शुद्धपणाला श्रीधर स्वामींनी ‘अव्यंग’ असा फार समर्पक शब्द योजला आहे. त्या सत्संगात उणीव असता कामा नये, त्रुटी असता कामा नये. का? कारण भवबंध तोडण्याचं मोठं व्यापक आणि जीवनाला पूर्णता देणारं काम या सत्संगानं साधायचं आहे! हा सत्संग अव्यंग नसेल, तर काय होईल? तर हा भवबंध अधिक पक्का होईल! अंगाला आधीच चिखल लागला आहे आणि तो धुवून टाकण्याऐवजी जर एखाद्या ‘स्वयंघोषित’ सत्पुरुषानं मला अधिकच चिखलानं माखून टाकलं, तर त्याला सत्संग म्हणावं का? समजा माझे हात बांधले गेले आहेत, ते सोडवण्यासाठी मी अशा ‘सत्पुरुषा’कडे गेलो. तो म्हणाला, ‘‘पूर्ण बांधलेल्या माणसाला सोडविण्याची मला हातोटी आहे. पण तुझे तर फक्त हातच बांधले आहेत. तेव्हा प्रथम मी तुझे पायही बांधतो, मग तुला सोडवतो!’’ तर अशाच्या नादी लागूनही सत्संग साधला जाईल का? आता कुणाला वाटेल की, सत्संगात खरा आणि खोटा, असा भेद आहे का? तर आजकालच्या सत्संगात तरी हा भेद दिसतो. कारण सत्संग करणाऱ्याला, म्हणजेच शाब्दिक आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्याला जर लोकेषणा, वित्तेषणा असेल तर तो सत्संग खोटाच असतो. लोकेषणा म्हणजे लोकांकडून मानसन्मानाची ओढ, स्तुतीची ओढ आणि वित्तेषणा म्हणजे भौतिक सुखसाधनांच्या आणि पशाच्या प्राप्तीची लालसा. सत्संग हा आपल्या जगण्यात सत्य काय आणि असत्य काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय, हे बिंबवणारा असला पाहिजे. ज्याच्याकडे पसा आहे, सत्ता आहे, लौकिक आहे अशाच्या कलाने सत्य काय याचा निर्णय देऊ शकतो. त्यामुळे असा सत्संग हा भ्रम, मोह आणि आसक्ती तोडणारा नव्हे, जोपासणाराच ठरतो. आता सत्संग म्हणजे तरी काय हो? तर जे सत्याचाच ठसा मनावर उमटवतं आणि ज्यायोगे मनातला भ्रम, मोह ओसरू लागतो, तोच सत्संग आहे. मग तो सत्पुरुषाचा आहेच, पण सद्ग्रंथाचा आणि साधनेचाही आहे. नुसतं सत्पुरुषाच्या सहवासात राहिलो, पण त्याचा बोध नीट ग्रहण केलाच नाही तरी तो अव्यंग सत्संग ठरणार नाही. खऱ्या सत्संगात सद्बुद्धी जागी होते. आपलं नेमकं कुठं चुकतं, हे उमगू लागतं. मग लगेच स्वसुधारणा साधत नाही, पण पुन्हा तशी चूक घडणार असेल, तर त्याआधी मनच स्वयंसूचना देऊन सावध करू लागतं. ‘मनोयोगा’त आपण पाहिलं ना? की खरं काय आहे, हे शोधायची तळमळ निर्माण झाली की, समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘खरें शोधीतां शोधीतां शोधताहे, मना बोधीतां बोधीतां बोधताहे!’’ अशी स्थिती होते. म्हणजे सत्याचा शोध सुरू केला की जो सत्यरूपच आहे असा सत्पुरुषच आपल्याला शोधू लागतो. आपण आपल्या मनात बोध घोळवू लागलो की, तो आत्मबोधक सद्गुरूच आपल्या मनाला आतून बोधवू लागतो! तेव्हा खऱ्या सत्संगासाठी धर्माच्या बाजारात कुठं भटकत बसायला नको. प्रत्यक्ष सत्पुरुषाचा सहवास नसेल, तर अंत:करणपूर्वक संत-सत्पुरुषांचा बोध वाचून त्यावर मनन-चिंतन सुरू करावं, तो बोध आपल्या आचरणात उतरवण्याचा अभ्यास करावा. त्यानंही आंतरिक सत्संग सुरू होईल आणि तो आपल्या अंतर्मनाला अव्यंग करू लागेल.