18 February 2019

News Flash

२८. कृपामृत

कलावती आई यांच्या चरित्रातला एक लहानसा प्रसंग आहे.

कलावती आई यांच्या चरित्रातला एक लहानसा प्रसंग आहे. त्या लहान असताना एकदा त्यांच्या वडिलांचे दोनशे रुपये हरवले. घरातच त्यांनी ते ठेवले होते. पण नेमके कुठे ठेवले, तेच त्यांना आठवत नव्हते. सगळीकडे शोधून झालं, पण पैसे मिळेनात. त्याच दिवशी ते कुणाला तरी द्यायचे होते. तेव्हा ते अतिशय चिंताक्रांत झाले. बाळला म्हणजे आईंना वडिलांचा तो काळजीयुक्त चेहरा पाहून वाईट वाटलं. त्यांनी आपले खाऊचे पैसे असलेला डबा आणून त्यांना दिला. त्यात बरोबर दोनशेच रुपयांची चिल्लर आणि नोटा होत्या. त्यामुळे वडिलांना हायसं वाटलं. दुसऱ्या दिवशी काही कारणासाठी त्यांनी भगवद्गीता वाचण्यासाठी घेतली तेव्हा त्यात त्यांनीच ठेवलेल्या दोनशे रुपयांच्या नोटा मिळाल्या. त्या पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. बाळ मात्र वडिलांना म्हणाली, ‘‘बघा अण्णा! तुम्ही ही गीता रोजच वाचनात ठेवली असतीत, तर काल तुम्हाला पैसे शोधायचा त्रास झाला नसता!’’ प्रसंग अगदी साधासा वाटतो, पण तो आपल्यालाच खूप काही शिकवून जातो. आपल्या घरातही सद्ग्रंथ काही कमी नसतात. पण ते आपल्या रोजच्या वाचनात नसतात. अनेकजण तर म्हणतात की, म्हातारपणी पाहू! आज काय घाई आहे!! श्रीधर स्वामी एकदा म्हणाले की, ‘‘माणूस आयुष्याचा विमा काढतो. याचाच अर्थ आयुष्याची शाश्वती नाही, हे त्याला कळत असतं, पण त्यामुळेच सत्संग लवकरात लवकर जेवढा होईल तेवढा साधून घ्यावा, अशी काही बुद्धी त्याला होत नाही!’’ तर आयुष्याचा काही भरवंसा नाही, हे माहीत असताना माणूस म्हणतो.. बऱ्याच गाथा आहेत, ग्रंथ आहेत, पण आत्ताच काय घाई आहे? वाचू ते म्हातारपणी! तेव्हा घरात सारं संतसाहित्य आहे, पण त्यातली एक ओवीसुद्धा आपण वाचत नसू, तर मग त्याचं मनन होणं, चिंतन होणं, त्या बोधानं जागृत होणं आणि त्यानुसार जगण्याची प्रेरणा लाभणं ही तर फार पुढची गोष्ट झाली. संतांनी आपलं हृदयच अक्षरा-अक्षरांतून खुलं केलं आहे. ते नुसते शब्द नाहीत. जणू जालीम औषधं आहेत. त्यांच्या वाचनानं आधी अहंप्रेरित धारणेला धक्के बसू लागतात. हळूहळू जाग येऊ लागते. अभंगातला एक एक शब्द जणू आपली खरी ओळख करून देऊ लागतो.. शब्दांची टरफलं तुटतात आणि अर्थाचे दाणे सहजतेनं हाती येतात.. त्या अर्थाचं जेव्हा पचन सुरू होतं, अर्थात मनन, चिंतन सुरू होतं तेव्हाच ते सद्विचार जणू रक्तात मिसळू लागतात.. आंतरिक धारणेची जडणघडण करू लागतात. आपल्या आंतरिक दोषांची जाणीव होऊ लागते. हा अहंचा संग सोडण्याची इच्छा निर्माण होते, पण ते स्वबळावर शक्य नाही, हेसुद्धा जाणवू लागतं. जेव्हा ही स्थिती होते तेव्हाच तळमळ निर्माण होते. त्या तळमळीनंच भ्रम आणि मोहाचं धुकं विरू लागतं. अध्यात्मपथावर खरी वाटचाल सुरू होते. अशी तयारी होऊ लागते तेव्हाच सद्गुरू अंतरंग प्रकट करू लागतो. त्यांचा बोध, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा हेच कृपामृत आहे. आई सांगतात त्यानुसार, हे कृपामृत कलिमलदहन करणारं आहे. अर्थात मनातला विसंगत, विरोधी, विकारी, विखारी विचारांचा मळ जाळून टाकणारं आहे. त्या कृपामृताचं खरं सेवन झालं पाहिजे. त्या कृपेला सुसंगत जगणं हीच खरी सेवा आहे, हेच खरं सेवन आहे, ते सुरू झालं पाहिजे. तरच साधक आत्मस्वरूपात अर्थात सद्गुरू स्वरूपात रंगू लागेल. कलावती आई यांच्या बोधस्वरूपाचा नित्य संग हीच प्रेरणा आजही देत आहे.

First Published on February 8, 2018 2:18 am

Web Title: loksatta chintandhara part 30