15 December 2018

News Flash

४६. हालचाल

श्रवण ही नवविधा भक्तीतली पहिली भक्ती आहे

श्रवण ही नवविधा भक्तीतली पहिली भक्ती आहे, पण श्रवण म्हणजे ऐकणं, हे आपल्याला माहीत असलं तरी खरं ऐकणं आपल्याला कधी साधतच नाही. आपलं सगळं ऐकणं हे ‘मी’च्याच जाणिवेला अनुसरून आणि त्यानुसारच्या प्रतिक्रियांनी बद्ध असंच असतं. व्यवहारातली ही सवय अध्यात्मात मोठी बाधक ठरते. कारण तिथंही आपण नीट ऐकूनच घेत नाही. मग आपल्या वागण्यातल्या आसक्तीजन्य चुका जरी कुणी सांगितल्या तर आपला अहंकार दुखावतो आणि आपण आपल्या चुकीचंच समर्थन करणारी शाब्दिक वकिली सुरू करतो. तेव्हा आपण नीट ऐकूनही घेत नाही. त्यामुळे त्या श्रवणाचा खरा लाभच होत नाही. इथं ज्याच्या अंत:करणाच्या कुंडलामध्ये, तळ्यामध्ये तो बोध ऐकून परिवर्तनाचं वारं तरंग निर्माण करणार आहे तो भक्त साधा नाही. आपल्या जीवनाचं खरं हित काय, खरा उद्देश काय, हे जाणून घ्यायला तो तळमळत आहे. आपलं कसं होतं बघा, आपला सगळा परमार्थ हा बोलका आणि बोलण्यापुरताच राहातो. विमलाताई ठकार म्हणायच्या ना की, सत्संगाला, रामकथेला, प्रवचन-कीर्तनाला लाखोंची गर्दी जमते. घरून आणलेल्या कांबळ्यावर बसूनही लोक कथा वगैरे ऐकतात आणि घरी जाताना ते कांबळं झटकून घेतात. म्हणजे काय की, सत्संगातली कणभर मातीसुद्धा घरी नेत नाहीत, मग विचार कुठून नेणार!

तर अशी गत आहे. अध्यात्माच्या गप्पा मारायला आणि ऐकायला आपल्याला आवडतं.. पण तसं जगायला आवडत नाही. भ्रम, आसक्ती, मोह, अहंकार.. यातलं काहीही सुटत नाही. ‘भावदिंडी’ची पहिली प्रत श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या पादुकांवर ठेवायला म्हणून मी गेलो होतो. तात्यासाहेब केतकर यांचे सुपुत्र आणि महाराजमय झालेले दिनूमामा मोठय़ा आत्मीयतेनं बोलले. त्यांच्याही हाती एक प्रत ठेवली तेव्हा म्हणाले, ‘‘मी सध्या काहीच वाचत नाही. तेव्हा कृपया वाचायला लावू नका, फक्त मी महाराजांचा कसा होऊ, ते सांगा.. आणखी काय नेमकं करू, ते सांगा!’’ ज्यांना दिनूमामा म्हणजे कोण, हे माहीत आहे त्यांच्या अंगावर हे वाचूनही काटा येईल! मी खूप ओशाळलो आणि जाणवलं, हा बोध माझ्यासाठीच आहे! लिहिलंत खूप, आता कृतीत आणा, असं जणू महाराजच सांगत होते! तेव्हा इथं सांगणारा जसा खरा सद्गुरू आहे ना, तसंच ऐकणाराही खरा तळमळीचा साधक आहे! जे ऐकल्यानंतर तत्काळ त्याला अनुरूप कृतीचा प्रयत्न सुरू होतो ते ऐकणं खरं. अशाच्याच चित्तात, जे ऐकलं त्याचे धक्के बसून तरंग उमटत असतात. आता ज्ञान किंवा शुद्ध बोध ऐकून धक्का का बसावा? तर आपण किती चुकीच्या पद्धतीनं विचार करीत होतो, वागत होतो आणि जगातल्या आसक्तीचा आपल्यालाच कसा त्रास होत होता, या जाणिवेचचे ते खरे धक्के असतात. भ्रमाची झोप अचानक उतरावी आणि खडबडून जाग यावी, तसं होतं ते. तेव्हा सद्गुरूचा बोध भक्ताच्या कर्णकुंडलात शिरताच तो त्याच्या अंतर्मनाच्या तळ्यात जागृतीचे तरंग निर्माण करतो. मग हा भक्त अनन्य होत जातो. या भक्तालाच नाथांनी ‘राधा’ म्हटलं आहे! ‘वारियाने कुंडल हाले’ या तीन शब्दांचा भक्तिमार्गाच्या अंगानं हा अर्थ समोर आला. आता दुसरा अर्थ पाहू. इथंही ‘वारियाने’ म्हणजे सद्गुरूंनी बोधासह शक्तीचा प्रवाह सोडताच, ‘कुंडल हाले’ म्हणजे कुंडलिनी शक्ती जागी होऊन तिच्यात ऊध्र्वगामी हालचाल सुरू झाली, हा अर्थ आहे!

First Published on March 8, 2018 2:24 am

Web Title: loksatta chintandhara part 51