23 February 2019

News Flash

२९. देव-दास : १

दास्यभक्तीचा नित्यनूतन संस्कार अंत:करणात ज्या दिवशी दृढ होईल

दास्यभक्तीचा नित्यनूतन संस्कार अंत:करणात ज्या दिवशी दृढ होईल, ती खरी दासनवमी! पण हे दास्य म्हणजे नेमकं काय? हे दास्य कुणाचं आहे? समर्थाच्या नावावरूनच उघड होतं की हे ‘रामा’चं दास्य आहे.  आता प्रभु राम हेच त्यांचे सद्गुरू होते त्यामुळे हे सद्गुरूंचंच दास्य आहे. पण दास्य म्हणजे नेमक काय? हे दास्य म्हणजे गुलामी आहे का? ‘दासबोधा’च्या चवथ्या दशकाचा सातवा समास दास्यभक्तीचा आहे. पण तो वरवर वाचला तर काय दिसतं? की देवाचं भौतिकातलं वैभव वाढवणं म्हणजे दास्यभक्ती, असंच जणू समर्थ सांगत आहेत. म्हणजे मंदिरं जीर्ण झाली असतील तर ती नव्यानं बांधणं, मोडलेली सरोवरं नव्यानं तयार करणं, धर्मशाळा बांधणं इथपासून ते छत्रचामरं, सुवर्ण सिंहासनं, नाना प्रकारची यानं अर्पित करणं.. इतकंच नव्हे तर भुयारं, तळघरंदेखील देवासाठी बांधण्यापर्यंत या दास्यभक्तीचं वर्णन आहे! म्हणजे देवासाठी का होईना, भौतिकातलाच पसारा वाढवायला समर्थ सुचवत आहेत का, असा प्रश्नही कुणाला पडेल. खरंतर समर्थाचा देव अतिशय व्यापक आहे. एका स्फुट प्रकरणात ते म्हणतात, ‘‘देहदेवालयामध्यें। पाहाणें देव तो बरा। देव सांडूनि देवाल्यें। वर्णिती सर्वही कवी।।’’ म्हणजेच, मनुष्याचा देहच देवालय आहे आणि त्यातल्या देवाचं दर्शन झालं पाहिजे, असं समर्थ बजावतात. आता हा देहातला ‘देव’ कोण आहे? या प्रकरणात समर्थ सांगतात, ‘‘दिसेना लोचनाला रे। घाला मन त्यामधें। येकला सर्व देवालीं। गुप्त नानापरीं वसे।। अनंत कोटि देवाल्यें। त्यामधें येकला प्रभु। दीपानं दिसेना नाहिं।  त्यानें त्यासचि पाहणें।। उजेडें दिसेना नाहिं। अंधारें गुप्त होय ना। कदा हातासि लागेना। सर्वथा पूजिता नये।। देवाल्ये वर्णिती ज्ञाते। ते ज्ञाते नव्हती कदा। देव वर्णील तो ज्ञाता। ज्ञानें मोक्षचि पावतो।।’’  हा देव डोळ्यांनी पाहता येत नाही, त्यात मनच ओतलं पाहिजे, ओवलं पाहिजे! हा देव दिवा लावल्यानं दिसत नाही की अंधारात गुप्त होत नाही. तो आपल्या हाती येत नाही, म्हणजे आपल्या कर्तृत्वानं गवसत नाही. देवळाचं म्हणजे नुसतं बाह्य़रूपाचं भारंभार वर्णन करणाऱ्याला जग ज्ञानी समजत असेल, पण ते ज्ञाते नव्हेत. जो हा ‘देव’ ओळखेल, तोच खरा ज्ञानी आहे.. तोच बंधनमुक्त होतो.. मग हा आपल्याच देहात व्याप्त असलेला ‘देव’ नेमका आहे तरी कोण? तो ओळखता कसा येईल? त्याचं दर्शन कसं साधेल? त्याचा सूचक उलगडा दासबोधातील दास्यभक्तीच्या समासातील तीन ओव्यांत होतो. या समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात, ‘‘सातवें भजन तें दास्य जाणावें। पडिलें कार्य तितुकें करावें। सदा सन्निधचि असावें। देवद्वारीं।। देवाचें वैभव सांभाळावें। न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें। चढतें वाढतें वाढवावें। भजन देवाचें।।’’ या समासाच्या अखेरीस ते सांगतात की, ‘‘ऐसें दास्य करावें देवाचें। येणेंचि प्रकारें सद्गुरूचें। प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें। करित जावें।।’’ (ओवी २८). म्हणजे दास्य हे भजन आहे. भजनचा अर्थ काय? एकनाथी भागवतात आपला सर्व प्रपंच हा देवाचा आहे, याचं भान ठेवून जगणं, हेच खरं भजन आहे. वर दिलेल्या तीन ओव्यांतली तिसरी ओवी पाहिली तर, ‘येणेंचि प्रकारे सद्गुरूचें,’ या शब्दांतून समर्थ सांगतात की देव आणि सद्गुरू यांत कोणताही भेद नाही. हे लक्षात घेतलं की पहिल्या ओवीचा अर्थ स्पष्ट होतो तो असा की, आपल्या वाटय़ाला आलेली सर्व कर्तव्यं पार पाडावीत (पडिलें कार्य तितुकें करावें) पण सद्गुरूंच्या द्वारापासून कधीही दूर जाऊ नये!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

First Published on February 9, 2018 2:39 am

Web Title: loksatta chintandhara part 9