20 January 2019

News Flash

६. ज्ञात अज्ञात

अगदी थेट सांगायचं तर, नेमकं कसं जगावं, हे सांगण्याच्या गरजेतून ‘धर्म’ जन्माला आला!

प्रतिनिधिक छायाचित्र

माणसानं माणूस व्हावं.. माणूस म्हणून जगावं, हा संतांचा सांगावा होता. पण माणूस म्हणून जगणं, म्हणजे तरी काय? पशुपक्षी बोलू शकत नाहीत, माणूस बोलू शकतो.. पशुपक्षी उत्तमोत्तम पदार्थ रांधू शकत नाहीत, माणूस रांधू शकतो. पशुपक्षी विचार करू शकत नाहीत, माणूस विचार करू शकतो. ते कल्पना करू शकत नाहीत, माणूस कल्पना करतो.. मग माणसानं केवळ खाणं, बोलणं, विचार करणं आणि कल्पना करणं; एवढय़ापुरतंच जगावं का? माणसात आणखी काही विशेष नाही का? माणूस विचार करू शकतो हे खरं, पण तो अविचारही बराच करतो! तो कल्पना करू शकतो, हे खरं पण त्या कल्पनेत प्रमाणाबाहेर रूतत जाऊन तो भ्रम आणि मोहातही फसू शकतो. तेव्हा यापेक्षाही अधिक काही करण्याची क्षमता माणसात निश्चितच असली पाहिजे. ती कोणती असावी, माणसानं माणूस म्हणून जगावं म्हणजे नेमकं कसं जगावं आणि मनुष्यजन्माचं खरं ध्येय काय, याबाबत आपण आता स्वामी विवेकानंद यांच्या बोधसागरातून थोडं काही जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या. हा बोधसागर आहे आणि आपल्याकडे आहे ती फक्त ओंजळ.. त्या ओंजळीत या क्षणी जे जे गवसेल ते ते आपल्यापुढे ठेवणार आहे!

माणूस या विश्वात जन्मतो, विश्वात जगतो आणि विश्वातच अखेरचा श्वासही घेतो. त्यामुळे त्याची सारी धडपड, सारे प्रयत्न या विश्वातच घडत असतात. आपल्या अवतीभवती पसरलेल्या  या विश्वाचं वर्णन करताना स्वामीजी फार प्रत्ययकारी असं चित्रात्मक रूपक वापरतात. ते म्हणतात, ‘‘हे विश्व जणू एखाद्या लहान मुलाप्रमाणे अंधारातून रांगत रांगत बाहेर पडते आणि नंतर एखाद्या म्हाताऱ्याप्रमाणे त्याच अंधारात परत गडप होऊन जाते.’’ माणसाचं आयुष्यही असंच तर आहे! अज्ञाताच्या अंधारातून तो या जगात येतो आणि पुन्हा अज्ञाताच्याच अंधारात विलीन होतो.  आपण नेमके कुठून आलो, हे त्याला सांगता येत नाही आणि मृत्यूनंतर आपण कुठे जाणार, हेही त्याला सांगता येत नाही. केवळ जगणं हातात असतं. पण हे जगणंही त्याच्या पूर्ण परिचयाचं असतं का? ‘पुढच्या क्षणी काय होईल,’ हे त्याला माहीत असतं का? आपल्या कृतीचं नेमकं फळ त्याला कळत असतं का? याचाच अर्थ रोजचं जगणं तसंच असलं, एकाच चाकोरीतलं असलं तरी अनंत संभाव्यता त्यात अंतर्भूत असतात. थोडक्यात ज्ञात भासणाऱ्या जगातलं जगणं अज्ञाताच्याच हातात असतं! त्यामुळे नेमकी कृती कोणती करावी, फळाच्या चिंतेतून मुक्त कसं व्हावं.. अगदी थेट सांगायचं तर, नेमकं कसं जगावं, हे सांगण्याच्या गरजेतून ‘धर्म’ जन्माला आला! ज्ञाताला अज्ञाताशी जोडणारा दुवा म्हणून माणसानं धर्माकडे पाहिलं.  स्वामीजी सांगतात, ‘‘हे आपले इंद्रियगम्य, तर्कगम्य आणि बुद्धीगम्य असे विश्व दोन्हीकडून अमर्याद, अज्ञात आणि अज्ञेय अशा तत्त्वाने वेढलेले आहे. या विश्वातच सगळा शोध, सगळा विचार आणि सगळ्या घटना अंतर्भूत आहेत..’’ याला जोडून स्वामीजी मोठं सूत्र सांगतात की, ‘‘यांच्यापासूनच लोक ज्याला ‘धर्म’ म्हणतात ते ज्ञान उद्भवते.’’ आता या इंद्रियगम्य, तर्कगम्य जगातला हा शोध आणि त्या शोधामागचा विचार नेमका कोणता आहे? त्या शोध आणि विचारातून ज्या घटना घडतात त्या कोणत्या आणि त्यांच्या घुसळणीतून जे ज्ञान प्रसवतं त्याला स्वामीजी नेमकं कोणत्या अर्थानं ‘धर्म’ महणतात?

चैतन्य प्रेम

First Published on January 8, 2018 1:47 am

Web Title: real goal of human being