ज्ञातात सुरू असलेल्या अज्ञाताच्या शोधातच धर्माचं बीज असलं पाहिजे. कारण या जगात जे काही आहे, जे काही माणसानं प्राप्त केलं आहे त्यानं तो खऱ्या अर्थानं सुखी नाही. जे त्याच्याकडे या घडीला नाही आणि जे तो मिळवू पाहात आहे ते मिळालं, तरीही तो पूर्ण सुखी होईलच, याचीही काही शाश्वती नाही. थोडक्यात प्रत्येकाचा अंतरात्मा हा अखंड परम सुखासाठीच तळमळत आहे. या जगातल्या यच्चयावत गोष्टी मिळूनही ते अखंड आणि परम सुख काही त्याला लाभणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘प्रत्येक हृदयामधून युगानुयुगे चालू असलेले शाश्वत आक्रंदन तुम्ही लक्षात घेतले आहे काय? आपण दारिद्रय़ाकडून फसविले जातो. आपण धनी बनतो आणि संपत्तीकडून फसविले जातो. आपण अज्ञानी असतो. आपण वाचतो, शिकतो आणि आपल्या ज्ञानाकडून फसविले जातो. कोणीही मनुष्य केव्हाही संतुष्ट असत नाही. हे दु:खाचे कारण आहे..’’ स्वामीजी सांगतात ती ही ‘फसवणूक’ फार विलक्षण आहे. आपल्या वाटय़ाला दारिद्रय़ आलं असेल, तर आपल्याला वाटतं की आपल्या दु:खाचं कारण हे दारिद्रय़ आहे! मग ती गरिबी दूर करण्यासाठी आपण अव्याहत धडपडत राहातो. आपण श्रीमंत असू, तर त्या संपत्तीनं आपण फसवले जातो. कारण त्या संपत्तीपाठोपाठ आढय़ता, गर्व, अहंकार, लोभ, मोह वगैरे सर्व विकार आपोआप चिकटत असतात. ते आपल्या मूळ स्वरूपापासून आणि मूळ ध्येयापासूनच आपल्याला विचलित करीत असतात. त्यामुळे ती संपत्तीही फसवत असते. आपण निरक्षर असतो आणि साक्षर होऊ लागतो. मग लिहायला शिकतो, वाचायला शिकतो.. लिहू लागतो, वाचू लागतो आणि मग ते ‘ज्ञान’च आपल्याला फसवतं. कारण त्या ‘ज्ञाना’नं आपण ज्ञानी झाल्याचा भ्रम निर्माण होतो. इतरांपेक्षा आपल्याला अधिक समजत आहे, हा भ्रम निर्माण होतो. त्यातूनही आढय़ता, अहंकार, गर्व आणि इतरांविषयीचा तुच्छताभाव उत्पन्न होतो. थोडक्यात तो ‘ज्ञानीपणा’च आपल्याला फसवतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपापासून आणि खऱ्या ध्येयापासून आपल्याला विचलित करीत असतो. तर स्वामीजी म्हणतात, ‘‘..कोणीही मनुष्य केव्हाही संतुष्ट असत नाही, हे दु:खाचं खरं कारण आहे, परंतु त्याबरोबरच ते चांगल्या गोष्टी प्राप्त होण्याचेही कारण आहे. ती प्रगतीची निश्चित खूण आहे.’’ तेव्हा या जगातल्या कोणत्याही गोष्टीनं माणूस कधीच खऱ्या अर्थानं संतुष्ट होत नाही. हे त्याच्या दु:खाचं जसं कारण आहे तसंच ते या जगापलीकडे, या अशाश्वतापलीकडे काही शाश्वत आहे का, याचा शोध घेण्याचंही कारण आहे. हा शोधच संकुचिताच्या खोडय़ात अडकलेल्या माणसाला व्यापक बनवतो. माणसाला व्यापक करणं, त्याला संकुचिताच्या सर्व बंधनांतून सोडवणं, त्याला त्याच्या मूळ स्वरूपाप्रमाणेच मुक्त, स्वतंत्र करणं, हाच खरा धर्म आहे.. हेच धर्माचं मूळ उद्दिष्ट आहे.. हेच धर्माचं कारण आहे! स्वामीजीही सांगतात, ‘‘आपण येथे कशासाठी आहोत? आपण येथे मुक्तीकरता, ज्ञानाकरता आहोत. आपल्याला स्वत:ला मुक्त करण्यासाठी ज्ञान हवं असतं. मुक्तीसाठीच सर्वाचं आक्रंदन – हे आहे आपलं जीवन!’’ तेव्हा जगत असतानाच कोणत्याही आंतरिक बंधनात न अडकणं आणि मुक्तपणे जगता येणं, हे आपलं खरं ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठीच धर्म खरं तर अवतरला आहे.