23 January 2019

News Flash

७. शोधाचं बीज

पलीकडील सत्तेतून बाहेर पडणे आणि तिच्यातच लीन होणे हेच तत्त्व समग्र विश्वाच्या मुळाशी आहे.

माणसाला मुळात धर्माची गरज का भासली असेल? किंवा धर्म कोणत्या कारणानं निर्माण झाला असेल? त्याचा संकेत स्वामी विवेकानंद यांच्या एका वक्तव्यातून मिळतो. अमेरिकेत न्यू यॉर्क येथे स्वामीजींनी काही अभ्यास वर्ग घेतले होते. त्यातील मार्गदर्शनाचे सार ‘जीवनाचे उद्दिष्ट’ (रामकृष्ण मठ प्रकाशन) या पुस्तकात ग्रथित आहे. त्यात स्वामीजी सांगतात, ‘‘आपणापैकी बऱ्याच लोकांना लहानपणी सुंदर असा सूर्योदय पाहून मनात उचंबळून आलेल्या आनंदोर्मीची आठवण असेल; आपणापैकी सर्वानी आयुष्यात केव्हा ना केव्हा निश्चलपणे उभे राहून मावळत्या अशा सूर्याकडे पाहिलेच असेल, आणि निदान कल्पनेने तरी या साऱ्याच्या पलीकडे काय आहे, याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असेल. पलीकडील सत्तेतून बाहेर पडणे आणि तिच्यातच लीन होणे हेच तत्त्व समग्र विश्वाच्या मुळाशी आहे.’’ (पृष्ठ १/ यातलं अखेरचं वाक्य फार अर्थगर्भ आहे. त्याचा विचार आपण पुढे करूच) तर, स्वामीही सांगतात त्याप्रमाणे सूर्योदय वा सूर्यास्त/ तारकांनी भरलेलं आकाश /समुद्राचं विस्तीर्ण, धीरगंभीर रूप/ क्षितिज पाहून.. थोडक्यात सृष्टीचं हे विराट विविधांगी, तरीही एकलयीत नांदणारं रूप पाहून आपण कधी ना कधी अंतर्मुख झालोच असतो. त्याचवेळी आपल्या मनात हा प्रश्न, ही जिज्ञासा उद्भवते की, या विराट सृष्टीच्या पलीकडे काय आहे? आणि या अद्भुत सृष्टीचा मीदेखील एक भाग आहे, तर मग मी तरी कुठून आलो? गेल्या भागात सांगितलं त्याप्रमाणे अवतीभवती पसरलेल्या आणि आपल्याला ज्ञात भासणाऱ्या, परिचित भासणाऱ्या या विश्वातच हा शोध सुरू होतो. या सृष्टीपलीकडे काय आहे याचा शोध या सृष्टीतच सुरू होतो! तर हा शोध आहे ज्ञातात सुरू असलेला अज्ञाताचा शोध! त्यामागून विचार सुरू होतात. हे विचार आहेत अज्ञात असलेल्या त्या परमतत्त्वाचेच. या सृष्टीचं, माझंही परिचालन, परिपोषण, परिवर्तन करणाऱ्या त्या अगम्य शक्तीचे! त्या शोधाच्या ऊर्मीतून आणि विचारांच्या प्रेरणेतून जे जे काही घडतं.. त्या शोधासाठी आपल्या आकलनानुसार आणि क्षमतेनुसार जी काही धडपड सुरू होते आणि त्यातून जो काही अनुभव हाती लागल्यासारखा भासतो, त्याच घुसळणीतून माणसाच्या खाती जे ‘ज्ञान’ जमा होतं त्यालाच ‘धर्म’ म्हणता येईल! या डोळ्यांना दिसणाऱ्या विराट सृष्टीपलीकडे जे अदृश्य तत्त्व आहे त्याच्या शोधाची ऊर्मी.. कानांना ऐकू येणाऱ्या नादापलीकडे जो या घडीला श्रवणातीत आहे, असा काही ध्वनी आहे का, हे शोधण्याची ऊर्मी.. त्वचेला जे स्पर्शानं अनुभवता येतं त्या पलीकडे आजवर अस्पर्श राहिलेलं काही तत्त्व आहे का, ते शोधण्याची ऊर्मी.. जे अगम्य आहे ते जाणण्याची ऊर्मी.. त्या ऊर्मीतून जी धडपड सुरू होते त्या धडपडीला माणसानं एक आखीव रूप दिलं तीच ‘साधना’! त्या साधनेनं जे जे गवसू लागलं ते ज्ञानच धर्मतत्त्व म्हणून रूढ झालं. स्वामीजींच्या सांगण्याचं परिशीलन केलं, तर धर्माचा जन्म असाच झाला असावा असं वाटतं. आकलनाच्या प्रत्येक टप्प्यावर धर्मजाणिवेचा विकास होत गेला असला पाहिजे. आदिम माणूस झाडं, पाणी, सूर्य, चंद्र यांनाच देव मानत होता आणि पूजत होता. पुढे हे सगळं एकाच चैतन्य शक्तीतून प्रकट झालं आहे आणि तिच्याच आधारानं परिचालित आहे, ही जाणीव जसजशी विकसित होऊ  लागली तसतशी परमतत्त्वाविषयीची कल्पना व्यापक होऊ  लागली असावी. पण तरी खरा धर्म कोणता असावा, हा प्रश्न उरतोच.

First Published on January 9, 2018 1:30 am

Web Title: religious issue loksatta chintandhara part 7