गेल्या काही वर्षांमध्ये पठडी सोडत प्रेक्षकांच्या सिनेमा अनुभवाची, आवडीची परीक्षा घेणाऱ्या सिनेमांची रांगच लागलेली आहे. चित्र प्रकारांशी खेळत, मांडणीचा नवा आविष्कार सादर करीत दिग्दर्शक या माध्यमाची व्याप्ती रुंदावत आहेत. ऑस्करच्या स्पर्धेत चार महत्त्वाची मानांकने मिळवणारा ‘द रूम’ त्या पंक्तीतला चित्रपट आहे..

अकरा बाय अकरा आकाराच्या चार बंदिस्त भिंतींमध्ये एक लहानगा त्याच्या आईसह अत्यानंदामध्ये वावरताना दिसतो. अत्यानंदासाठी त्याच्याकडे कारणही आहे. पाचव्या वाढदिवसाचे. उठल्यानंतर तो आपल्या भवताली असलेल्या टीव्ही, फ्रीज, बेड, लॅम्प, टॉयलेट आदी सर्व निर्जीव वस्तूंशी बोलू लागतो. त्यानंतर आईसोबत व्यायामापासून इतर अनेक गोष्टी बालसुलभ औत्सुक्याने करू लागतो. वाढदिवसानिमित्ताने केक बनविणार असल्यानेही त्याच्या बागडण्यात वाढ झालेली असते. केक बनविण्यासाठी आईला मदत करण्यात तो रमतो. थोडय़ाच वेळात केक तयार होतो, मात्र त्यावर लावण्यासाठी मेणबत्त्या नसल्याचे तो आईच्या निदर्शनास आणतो. आता मेणबत्ती आणता न येण्याची हतबलता आई व्यक्त करते. या मुलाचा अत्यानंदाचा नूर उदासीत पालटतो. आईशी भांडतच तो रडू लागतो.

पहिल्याच पाच मिनिटांत ‘द रूम’ दाखविणारे हे दृश्य कथानकाची काहीच कल्पना नसणाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. ही पाच मिनिटे कथानकाच्या पुढल्या भीषण तपशिलांना सांधण्यासाठी उपयुक्त ठरतात. मुलीसारख्या वाढलेल्या जॅक नावाच्या या मुलाचे आईसोबत सुखसंपृक्त अवस्थेत वावरणे, व्हिडीओ गेम खेळणे, टीव्हीवर कार्टून पाहणे, मोजक्याच पुस्तकांतील गोष्टींचे वाचन करणे, अंडय़ाच्या कवचापासून तयार केलेल्या सापाशी खेळणे आदी गोष्टींचे कार्यक्षेत्र रूमच्या बाहेर का नाही, त्याची आई मेणबत्तीसारखी क्षुल्लक गोष्ट का आणू देऊ शकत नाही, याचे प्रश्न उपस्थित झालेल्या प्रेक्षकाला या काही मिनिटांतच माय-लेकाची रूममधील कैदावस्थेची जाणीव व्हायला लागते. मग या मुलाच्या निरागस निवेदनामागे असलेल्या भीषण पाश्र्वभूमीचे त्याच्या निवेदनात न उमटणारे तपशील प्रत्यक्षात स्पष्ट व्हायला लागल्यावर प्रेक्षक सहजच हादरून जातो.

एमा डॉनह्य़ू यांनी आपल्याच कादंबरीवरून बेतलेली ‘द रूम’ चित्रपटाची पटकथा कादंबरीहून वेगवान आहे. तरी कादंबरीइतकी ती श्रेष्ठ नसल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांमध्ये हा चित्रपट लोकप्रिय झाला असताना मोठय़ा प्रमाणावर रंगली होती. कादंबरी आणि चित्रपट ही दोन वेगवेगळी माध्यमे असल्याचा सिनेनिर्मितीपासून रंगणारा वाद जुना असला तरीही अशा चर्चाना विराम काही मिळत नाही. कादंबरीमधील पाच वर्षांचा निवेदक, पहिल्या शंभर पानांमध्ये दैनंदिन घटनांच्या पुनरावृत्त्या आणि रूममध्ये उमलणारे त्याचे छोटुकले भावविश्व यांच्यातून मिळणाऱ्या जाणिवा तितक्या प्रभावीपणे सिनेमा देत नसल्याची तक्रार या सिनेमावरील चर्चेत होती. मात्र पुस्तक वाचून सिनेमा पाहणाऱ्यांची आणि न पाहणाऱ्यांची संख्या यांचे प्रमाण नेहमीप्रमाणे प्रचंड व्यस्त असल्यामुळे कादंबरी निरक्षरांनी सरधोपट भाषेत सांगायचे तर सिनेमाचा वेगळा विषय, वेगळी मांडणी आणि वेगळाच प्रकार पाहून ‘द रूम’चा बऱ्यापैकी उदोउदो केला. ही कादंबरी ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्यक्षात घडलेल्या घटनेवरून लिहिण्यात आली होती. अमेरिका आणि युरोपमध्येही अशा घटनांची कादंबरी आधी व नंतर नोंद झाली आहे.

‘द रूम’ पाहिल्यानंतर कुणालाही त्याला कोणत्या गटात टाकावे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कैदेतून सुटकेचा हा सकारात्मक सिनेमा नाही, कुटुंबपट नाही, मनोविश्लेषणात्मक नाटय़ नाही किंवा लहान मुलाच्या भावविश्वाचे चित्रण करणारा बालपट नाही. वयाच्या पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी आई मुलाला आपल्या आयुष्याविषयी सांगते. ‘माझे तरुणपणी अपहरण झाले असून, आठवडय़ाला ‘रूम’मध्ये खाणे व इतर जिनसा घेऊन येणाऱ्या व्यक्तीमुळे तुझे या जगात आगमन झाले आहे. गेली सात वर्षे मी बाहेरच्या जगापासून, कुटुंबापासून पूर्णपणे तुटली असून आता आपण काहीही करून बाहेर पडायची वेळ आली आहे.’ या सत्यावर बाहेरचे जग, कुटुंब म्हणजे काय हे कधीही न पाहिलेल्या मुलाचे नक्की रूमबाहेर जाऊन आपण काय करायचे, याबाबतची गोंधळस्थिती भीतीचा पहिला धक्का द्यायला सुरुवात करते. पुढचे कथानक तयार करणारे धक्के भावूकतेच्या आडून या भीतीपटाचीच अनुभूती प्रेक्षकाला देते.

सुरुवातीला मा (ब्री लार्सन) आणि जॅक (जेकब ट्रेम्बले) यांची कैदावस्था स्पष्ट झाली, की माय-लेकांना बंदी बनवणाऱ्या ओल्ड निकच्या रूममधील आगमना-निर्गमनाचे त्रोटक क्षण येतात. बंदी बनविणाऱ्या खलनायकाला क्रूरकर्मा, शोषणकर्ता िहस्त्र रूपाऐवजी अत्यंत साधारणपणे येथे रंगविले आहे. तो आला की, मा हिने सांगितल्यानुसार जॅक कपाटसदृश बंद बिछान्यात अंग दुडपून झोपून जाण्याचा शिरस्ता पाळतो.

हा ओल्ड निक एका भेटीत आपली नोकरी सुटली असून, घरही जाणार असल्याचे स्पष्ट करतो. तेव्हा आपल्याला सोडून देण्याऐवजी मारून टाकले जाणार, या कल्पनेने हादरलेली मा निर्मनुष्य घराच्या लॉनमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘रूम’मधून सुटण्यासाठी शेवटच्या क्लृप्त्या लढण्यासाठी सज्ज होते. म्हटला तर हा निर्णायक क्षण. पण तो अशा प्रकारच्या चित्रपटांमधील पारंपरिक निर्णायक क्षणापेक्षा खूप वेगळ्या प्रमाणात इथे दिसतो. सुटकेच्या प्रसंगाला उगाच ताणण्यात किंवा नाटय़पूर्ण करण्यामध्ये दिग्दर्शिकेला स्वारस्य नाही. त्या सुटकेप्रसंगी ज्याने आयुष्यात पहिल्यांदाच रूमबाहेरच्या खऱ्या जगाचे दर्शन घेतले त्या पाच वर्षांच्या मुलाची काय भांबावलेली स्थिती होईल, याचे अचूक चित्रण करण्यामध्ये दिग्दर्शिका यशस्वी झाली आहे.
चित्रपटाच्या मध्यामध्येच झालेल्या माय-लेकांचा सुटकेनंतरचा बंदिवास हा सर्वात त्रासदायक भाग आहे. समाजीकरणाचे कसलेही ज्ञान नसलेल्या जॅकला टीव्हीवरील माणसे आणि त्यांचे जग हे परग्रहावरचे वाटत असतात. रूमच्या आत सामावलेला परिसर आणि बाहेरच्या जगातून प्रवेश करणारा ओल्ड निक हाच काय तो विश्वाचा पसारा, अशी त्याची समजूत असते. जॅक आणि कित्येक वर्षे कुटुंबापासून तुटली गेलेली मा यांचे समाजीकरणातील अडथळे, कुटुंबात झालेले बदल आणि भवतालात झालेले बदल यांच्याशी जुळवून घेताना त्यांच्या मनात रुतलेली ‘रूम’ स्पष्ट होऊ लागते.

रूम चित्रपट नक्कीच जगण्याचा, प्रेमाचा आशावादी संदेश देण्यात, प्रेक्षकांचे डोळे अश्रूंनी स्वच्छ  करण्यात यशस्वी होतो. पण त्यासोबत तो मानवी जगण्याच्या विविध पातळ्यांना, नात्यांना पडताळून पाहण्याचाही प्रयत्न करतो. ‘स्टॉकहोम सिण्ड्रोम’ नावाचा एक सिद्धांत आहे. ज्यानुसार बंदिवासात असलेल्या व्यक्तीला आपल्याला बंद करून ठेवणाऱ्या व्यक्तीविषयी कालांतराने सहानुभूती तयार होते. ‘द रूम’मध्ये हा सिद्धांत खोटा ठरवण्यात आला आहे. खाणे, औषध आणि गरजेच्या वस्तू पुरवून बलात्कार करीत राहणाऱ्या ओल्ड निकविषयी मा हिला अजिबात सहानुभूती वाटत नाही. याआधी बाहेर पडण्यासाठी तिने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेले असतात. ती मुलाच्या बळावरच रूममध्ये आनंदात जगत असते. निकला ती जॅकशी बोलू किंवा स्पर्शही करण्यास मज्जाव करते. याउलट जॅक याला बंदिवास, अत्याचार यांची जाणीवच नसल्याने, रूमच्या भवतालात घडणाऱ्या अल्पस्वल्प घटनांमध्ये तो त्याचे सुखी बालपण साजरे करीत असतो. त्याला निकविषयी कुतूहल असते. ते शमविण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा मा त्याला धारेवर धरते. रूममधल्या जगात सुरक्षित जगण्याचे धडे घेण्यात यशस्वी झालेला जॅक रूमबाहेरचे जग पहिल्यांदा पाहून हादरून जातो. मानसोपचार केंद्र, सुटकेनंतर माध्यमांमधील लोकप्रियता आणि बदलेलेल्या कुटुंबात मा हिचीच कुतरओढ व्हायला लागते. टीव्हीवरील मुलाखतीचा बोजवारा उडाल्यानंतर तिचा आत्महत्येचा प्रयत्नही फसतो. चित्रपट आणखी दु:खांच्या मार्गावर माय-लेकांना आणून ठेवतो.

खूपशा कहाणीचा अतिरेक झाला असला, तरी या सोप्या दिसणाऱ्या अवघड चित्रपटाविषयी बोलायला जाताना त्याची आवश्यकता मोठी आहे. मुळात या कादंबरीवरून पटकथा तयार करणे हे सर्वात आव्हानात्मक काम होते. कादंबरी लेखिकेनेच ते उत्तमरीत्या पेलले, अन् त्याची पोचपावती ऑस्करनेही नामांकन घोषित करून दिली.

लेनी अब्राहम्सन या दिग्दर्शकाचा फिरणारा कॅमेरा या छोटय़ाशा रूमला अजस्र रूप प्राप्त करून देतो. रूम ही जॅक आणि मा हिला कवेत घेणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या पात्रासारखी भासते. त्यातील अत्यल्प फर्निचर, भांडी आणि इतर प्रत्येक वस्तूंचे निर्जिवत्व येथे निघून जाते. जेकब ट्रेम्बले आणि ब्री लार्सनचा अभिनय या रूमला जिवंतपण आणतात. रूमच्या कैदेतील त्यांची आनंदी अवस्था सुटकेनंतर समाजिकरणाच्या प्रक्रियेत पूर्णपणे संपल्यानंतर हा अभिनय चढत्या क्रमाने फुलतो.

हा चित्रपट आनंददायी जगाचे वर्णन करीत नाही. भुतांच्या किंवा घाबरविणाऱ्या संकल्पनांइतकी इथली भीती नसली, तरी पात्रांवरील तणाव नक्कीच त्या तोडीचा काटा अंगावर आणणारा आहे. आपल्या भवतीचा परिसर, घरांच्या चार भिंती किंवा परिसराच्या दृश्यिक नोंदी त्या कशाही असल्या तरी आपल्यावर किती मोठा परिणाम करतात याची जाणीव ‘रूम’ पाहिल्यानंतर नव्याने होऊ शकते. चित्रपटाला अधिक समजून घेण्यासाठी कादंबरी उपयुक्त आहे. पण ती अतिसंयत कादंबरी वाचली नाही, तरी चित्रपटाच्या अनुभूतीत कमतरता येऊ शकणार नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये पठडी सोडत प्रेक्षकांच्या सिनेमा अनुभवाची, आवडीची परीक्षा घेणाऱ्या सिनेमांची रांगच लागलेली आहे. चित्रप्रकारांशी खेळत, मांडणीचा नवा आविष्कार सादर करीत दिग्दर्शक या माध्यमाची व्याप्ती रुंदावत आहेत. ‘द रूम’ त्या सिनेमांच्या पंक्तीत पक्का बसणारा आहे.
पंकज भोसले –