सायमन पेग हा ब्रिटिश अभिनेता विशिष्ट विनोदाच्या तत्त्वज्ञानातून खूप गंभीरपणे प्रेक्षकांना अंकित करतो. त्याच्या कोणत्याही चित्रपटामध्ये विनोदाची स्वतंत्र भूमी, स्वतंत्र राष्ट्र दिसते. हे चित्रपट केव्हाही वेगळी ‘फिल गुड’ अवस्था देतात. त्याच्या सिनेमांसोबत ताज्या फिल गुडी प्रेमपटाबद्दल..
नोरा एफरॉन या दिवंगत अमेरिकी महिला पत्रकाराने हयातभर लेखनातील पठडीबाज मांडणीशी जसा यशस्वी लढा मांडला, तसाच हाती आलेल्या पटकथांनी ‘रोमॅण्टिक’ सिनेमांचा साचा ढवळून काढला. म्हणजे सिनेनिर्मितीपासून काही तपानुतपे प्रेमपटांचा जागतिक फॉम्र्युला ठरला होता. नायक-नायिकेचे अशक्य स्थितीत समोरासमोर येणे, त्यांच्या मनात एकमेकांविषयी द्रुतगतीने प्रेम साकळणे, मग गैरसमजांच्या वळणांनी प्रेक्षकांच्या डोक्यात खळबळ उडवून देऊन अंतिमत: गळाभेट अथवा चुंबनभैरवी अशी प्रेमपटांची ठोकळेबाज रचना झाली होती. हॉलीवूडने या ठोकळेबाजपणालाही नवनव्या क्लृप्त्यांनी उदात्त अन् नवेनवे रूप दिले, तर बॉलीवूडने या ठोकळकथांना गाणी- धांगडधिंगाणा वगैरेंचा बाज देऊन टाकला.
नोरा एफरॉनने लिहिलेल्या पटकथांपैकी ‘व्हेन हॅरी मेट सॅली’, ‘स्लीपलेस इन सिअ‍ॅटल’, ‘यू हॅव गॉट मेल’ आदी चित्रपटांनी ठोकळेबाज प्रेमकथांची रेवडी उडवून देत ‘पठडीबाहेरच्या प्रेमकथां’ची एक भलतीच नवी चौकट तयार केली. यात नायक, नायिका अशक्य स्थितीत एकमेकांसमोर उभे ठाकतात, मात्र त्यांच्यात प्रेम घडण्याची सुतराम शक्यता नसते. जगातील विजोडपणाच्या मूर्तिमंत आवृत्त्या म्हणून पडद्यावर दिसणारे नायक-नायिका पुढे वास्तववादी प्रेमविचार मांडत, नात्यातील संघर्षांची गाथा रचत अप्रेमाच्या शक्यतांवर मात करतात. प्रेमपटांचा हा फॉम्र्युला क्रमांक-२ पुढे खूप अनुकरणीय झाला. एफरॉनचे डझनावरी चित्रपट, सेरेण्डिपीटी, लव्ह अ‍ॅक्चुली आणि रिचर्ड लिंकलेटरच्या ‘बिफोर सनराईज’नंतरच्या मालिका अन् दरवर्षी दाखल होणारी हॉलीवूड, बॉलीवूडमधील अनेक उदाहरणे यांबाबत देता येतील.
दुसऱ्या फॉम्र्युल्याचा अंगीकार आजचे नवे चित्रकर्ते आणि पटकथाकार मोठय़ा प्रमाणावर करीत असल्याने दरसाल दर शेकडा प्रेमकथांमध्ये वकुबागणीक चकचकीत पठडीबाहेरच्या वाटा तयार होत आहेत. पठडीबाह्य़ राहण्याची अन् तरीही त्यातून साजूक प्रेमकथा घुसविण्याची धडपड सुरूच आहे.
या पठडीबाहेरच्या वाटांची चांगली ताजी आवृत्ती पाहायची झाली, तर ब्रिटनच्या ‘मॅन अप’चा उल्लेख करावा लागेल. सायमन पेग आणि लेक बेल या कलाकारांची ही रोमॅण्टिक कॉमेडी सध्या भरपूर चर्चिली जात आहे. प्रेमाचा अगदीच नेहमीचा हलकाफुलका विनोद असूनही तो नवरोमॅण्टिक म्हणून ठसतो. हे त्याचे वैशिष्टय़ होण्यासाठी इतर अनेक घटक एकत्र आले आहेत.
त्यातला पहिला घटक आहे तिरकस विनोदीपटांनी ब्रिटनइतकाच अमेरिकी सिनेमामध्ये रुळलेला सायमन पेग हा अभिनेता आणि दुसरा टीव्ही मालिकांमध्ये गाजलेला दिग्दर्शक बेन पाल्मर.
सायमन पेग या अभिनेत्याच्या कारकीर्दीचा आलेख ‘शॉन ऑफ द डेड’ या चित्रपटाद्वारे एकाएकी चढत शिखरावर गेला. कॉरनॅटो आइस्क्रीमच्या तीन प्रकारांप्रमाणे चित्रपटांची ‘ब्लड अ‍ॅण्ड आइस्क्रीम’ चित्रत्रयी (हॉट फझ आणि एण्ड ऑफ द वर्ल्ड) पूर्ण होईस्तोवर पूर्वाश्रमीचा हा ब्रिटिश टीव्ही कलाकार हॉलीवूडच्या सेलिब्रिटीपदापर्यंत गेला.
वरवर झॉम्बीपटांचे आवरण ठेवणारा ‘शॉन ऑफ द डेड’ होता आजच्या तंत्रयुगाच्या समाजातील व्यसनांधतेबाबत भरपूर काही सांगणारा. कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या आहारी गेलेल्या आणि संवेदना हरवून बसलेल्या समाजाचे रूप या चित्रपटाने झॉम्बींशी लढणाऱ्या नायकाद्वारे दाखवून दिले होते. स्वत: ओढवून घेतलेल्या निष्क्रियतेने प्रवाहाबाहेर फेकला गेलेला हा नायक मुर्दाड आयुष्य भिरकावून सोडून गेलेल्या प्रेमिकेला पुन्हा हस्तगत करण्यासाठी सज्ज होतो. मालिकेतील पुढल्या ‘हॉट फझ’मध्ये पोलीस दलात कर्तव्यदक्षतेचा कहर असल्याने वरवर शून्य गुन्हेगारी असलेल्या गावात बदली झालेला नायक तेथे गुप्तपणे सुरू असलेल्या गैरप्रकारांना उघडकीस आणतो. त्यानंतर सहकारी नायिकाही गटवतो. तिसऱ्या ‘एण्ड ऑफ द वर्ल्ड’मध्ये उतारवयात आपल्या तरुणपणी राहून गेलेल्या छोटुकल्या स्वप्नपूर्तीसाठी मित्रांना घेऊन एक दिवस जुन्या शहराचा फेरफटका घडवितो. उलथापालथ झालेल्या या शहरात बदललेल्या गोष्टींचा छडा लावतो. लहानपणातील स्वप्नपूर्तीच्या दिशेने सरकताना हरविलेल्या प्रेमाचाही त्याला शोध लागतो.
या चित्रमालिकेला कुणी प्रेमपट म्हणत नसले, तरी विडंबनासाठी शेकडो सिनेमांची उसनवारी करताना लोकांना आवडणारा खास प्रेमाचा ट्रॅक जाणूनबुजून या चित्रपटांत अस्तित्वात राहिलेला आहे. अनुक्रमे झॉम्बीपट, पोलीसपट आणि सायफाय सिनेमांचे हे अभ्यासू विडंबन होते. दिग्दर्शक एडगर राईट आणि सायमन पेग, निक फ्रॉस्ट या कलाकारांनी एकत्रितरीत्या तयार केलेल्या ‘स्पेस्ड’ या टीव्ही मालिकेची (यू टय़ूबपासून इतर सर्व माध्यमांत ती सहज उपलब्ध आहे.) ही चित्रत्रयी एकप्रकारे विस्तारित रूप आहे.
या सगळ्या चित्रपटांमध्ये सायमन पेगचे विनोदाचे लोकविलक्षण तत्त्वज्ञान येते. तो विनोद बाष्कळ, अंगविक्षेपी अथवा खिदळवणारा नसतो. पुष्कळ विचारी आणि गंभीररीत्या सादर होत असतो. अन् गंमत म्हणजे, त्याच्या पुढल्या सर्व चित्रपटांमध्ये त्याचे हे विनोदी व्यक्तिमत्त्व तंतोतंत विस्तारित झालेले दिसते. ‘रन फॅटबॉय रन’, ‘हाऊ टू लूझ फ्रेण्ड अ‍ॅण्ड एलिनेट पीपल’, ‘पॉल’ हे प्रेमकथा अस्तित्वात असणारे चित्रपट, ‘किल मी थ्री टाइम्स’, ‘बिग नथिंग’मध्ये खलनायकी छापाचे असतानाही त्याचे खास विनोदअंग शाबूत राखणारे सिनेमे. ‘हेक्टर अ‍ॅण्ड सर्च ऑफ हॅपीनेस’, ‘बर्क अ‍ॅण्ड हेअर’, ‘ए फॅण्टॅस्टिक फिअर ऑफ एव्हरीथिंग’ ते अलीकडचाच ‘अ‍ॅब्सुल्युटली एनीथिंग’, हॉलीवूडमधील ‘स्टार ट्रेक’, ‘मिशन इम्पॉसिबल’ या सर्वामध्ये सायमन पेगच्या अभिनयाचा वैयक्तिक विनोदाने फुललेला खासमखास ठसा आहे. एका अर्थी सायमन पेगच्या विनोदाची ही स्वतंत्र भूमी, स्वतंत्र राष्ट्र आहे. ही जातकुळी कुठल्याही समकालीन वा पूर्वसुरींच्या विनोदात आढळत नसल्याने त्याचे चित्रपट केव्हाही वेगळीच ‘फिल गुड’ अवस्था देणारे ठरतात.
‘मॅन अप’ हा चित्रपट त्याची अभिनयविनोदी परंपरा विस्तारित करताना उतारवयात सकारात्मक विचारांचा पाठपुरावा करणारा प्रेमकफल्लक नायक म्हणून त्याला समोर आणतो. चित्रपटाला सुरुवात होते नॅन्सी (लेक बेल) ही ‘माझ्या आयुष्यात प्रेम-बिम संकल्पनाच अस्तित्वातच नाहीच मुळी’ याचे जागोजागी भीषण दाखले देणारी पत्रकार. (हा पेशा चित्रपट सुरू असणाऱ्या दिवसभरात कुठेही ठळक जाणवत नसला तरी.) ट्रेनमध्ये असताना तिच्या प्रेमद्वेष्टी स्वभावाची चुणूक तिच्या समोरच्या जागेत बसून प्रवास करणाऱ्या मुलीला येते. ‘ब्लाइंड डेटिंग’ला निघालेल्या या मुलीला नॅन्सीच्या पराकोटीच्या नकारात्मक विचारांची दया येते. आपल्याकडील सकारात्मक विचारांचे पुस्तक तिला नॅन्सीकडे सुपूर्द करावेसे वाटते. हाती पडलेल्या या पुस्तकामुळे नॅन्सीच्या बाबत मात्र भलतीच गोष्ट घडते. ट्रेनमध्ये भेटलेल्या मुलीची ते विशिष्ट पुस्तक ही ब्लाइंड डेटसाठीची खूण असल्यामुळे तिची जॅक (सायमन पेग) या व्यक्तीशी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाठ पडते. मग पुढे आढेवेढे घेत स्पष्टीकरण देत असतानाच जॅकच्या उतावीळ औत्सुक्याच्या ताणात ही ओढविलेली ‘ब्लाइंड डेट’ तिला साकारावी लागते.
काही तासांतच स्वभावातील भिन्नता दोघांच्या लक्षात येते. तरी ते बोलण्या, चालण्याच्या व्यवहाराला टाळत नाहीत. एका रेस्तराँमध्ये पूर्वाश्रमीच्या पत्नीला घटस्फोटाच्या दाखल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी जॅकने बोलावले असते. त्या पत्नीला नॅन्सीसोबत आपण खूश असल्याची खोटी बतावणी करणे हाही जॅकचा नॅन्सीला बोलावण्याचा उद्देश असतो. नॅन्सी या प्रयोगात शक्यतेच्या पलीकडे उत्तम अभिनय वठवते आणि पुढे दिवसभर जॅकसोबत त्याच्या गमतिशीर स्वभावात दडलेल्या हळवेपणाला हुडकून काढते. मात्र एका टप्प्यावर नॅन्सी प्रामाणिकपणे आपण चुकून कसे भेटलो, याचे स्पष्टीकरण करीत जॅकपासून विलग होते.
प्रेमपटाचा फॉम्र्युला क्रमांक २ यानंतर वेगामध्ये सक्रिय होऊ लागतो आणि जुन्या-नव्या क्लृप्त्यांचा आधार घेत चित्रपटाची कहाणी गन्तव्य स्थानाकडे कूच करते.
चित्रपटात नॅन्सीची लेक बेलने साकारलेली व्यक्तिरेखा ही पेगहून वरचढ असली, तरी यात त्याच्या पूर्वभूमिकांतील सगळेच संचित यात एकत्रित आलेले आहे. मुर्दाड आयुष्य जगणाऱ्या शॉन ऑफ द डेडपासून ते एण्ड ऑफ द वर्ल्डमधील उतारवयात अणुमात्र प्रेमावर जगण्याची भिस्त ठेवत पुढे जाणाऱ्या व्यक्तिरेखांना सांधणारे त्याचे ‘मॅन अप’मधील अस्तित्व आहे.
नॅन्सीची प्रेमाविषयी अगदीच टोकाची नकारात्मक अढळ मते येथे कोसळण्याची शक्यता दाखविण्यात आलेली नाहीत. ब्लाइंड डेटमध्येही जॅकच्या मतांची खिल्ली उडवत त्याच्याशी साधलेल्या संवादाचा परिणाम आणि कुटुंबाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला टाळून अनिच्छेने जॅकशी चाललेला सहवास यांतून पुढे देखणे गिमिकतंत्र चित्रपटात साकारले आहे. ते लोकांना पैसे वसूल रोमॅण्टिक कॉमेडी पाहिल्याचे समाधान देऊ शकेल.

दिग्दर्शक बेन पाल्मर हा चित्रपट नवरोमॅण्टिका होण्यासाठी आणखी महत्त्वपूर्ण ठरला आहे. या दिग्दर्शकाने साकारलेली ‘इनबिटविनर्स’ ही मालिका आज सिनेमांइतकाच जागतिक टीव्ही मालिकांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. ही ब्रिटिश मालिका एका उच्चभ्रू लोकांसाठीच्या हायस्कूलमध्ये एकत्र आलेल्या चार मध्यमवर्गीय मित्रांची प्रेम पटकाविण्यासाठी करावी लागणारी धाडसकथा दाखविणारी आहे. ही टीव्ही मालिका इतकी गाजली की नंतर त्याचे दोन चित्रपटही तयार झाले. आपल्याकडे टीव्ही मालिका समाजाचे वरवरचे चित्र मांडत अतिरंजित कल्पनांच्या आहारी जातात. इथे मात्र तसे नाही. भवताल, कुटुंब आणि तयार झालेल्या तंत्राधिष्ठित जगामुळे होणारी तरुणांची कुचंबणा सर्व पातळीवर ठेवून विनोदाच्या अस्सल प्रेमकफल्लक व्यक्तिरेखा इनबिटविनर्स मालिकेत आणि सिनेमांत दिग्दर्शक बेन पाल्मर यांनी आणल्या आहेत.
मॅन अपमध्ये दिग्दर्शक पाल्मर आणि सायमन पेग या दोघांचे साटेलोटे होणे चित्रपटातील विनोदाची धार वाढविण्यास उपयोगी ठरली आहे. हा अभिनेता माहिती नसल्यास आवाढव्य गंभीर विनोदाची ओळख करून घेण्यासाठी त्याचा कोणताही चित्रपट पाहणे उपयुक्त ठरेल. अन् त्याच त्याच रोमॅण्टिका पाहायला आवडणाऱ्या वा नावडणाऱ्या सिनेप्रेमींना मॅन अपमधून प्रेमाची नवी शिकवण मिळेल.

response.lokprabha@expressindia.com