04 March 2021

News Flash

समाजातील बदलांवर भाष्य

चित्रपट ही एक कलाकृती असते, तसेच ती निखळ मनोरंजन करणारीदेखील असावी.

चित्रपट ही एक कलाकृती असते, तसेच ती निखळ मनोरंजन करणारीदेखील असावी. पण त्याचबरोबर त्यातून समाजातील बदलांवर भाष्यदेखील अपेक्षित असते. ‘फॅमिली कट्टा’ आणि ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ हे दोन चित्रपट या कसोटीवर उतरण्याची अपेक्षा आहे.

सप्टेंबर महिना तसा मराठी चित्रपटांसाठी फार काही आशादायी गेला नाही. अगदी तीन देशांत चित्रीकरण होऊनदेखील बॉक्स ऑफिसच नाही तर आशयाच्या बाबतीतदेखील निराशाच झाली. पण ही निराशा दसऱ्याच्या तोंडावर दूर होण्याची अपेक्षा ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या दोन चित्रपटांकडून करायला हरकत नाही.

चित्रपटाकडे करमणुकीचं साधन म्हणूनच बहुतांशपणे आपल्याकडे पाहिलं जातं. पण त्याचबरोबर ते भाष्य करणारंदेखील माध्यम आहे. किंबहुना चित्रपटातून केलेलं भाष्य समाजाच्या पचनी लवकर पडतं. अर्थात त्याप्रमाणे समाज सुधारतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण असं भाष्य करणारे चित्रपट चांगल्या पद्धतीने तयार झाले तर त्याचा प्रभाव समाजमनावर नक्कीच पडतो. गेल्या आठवडय़ात आलेल्या ‘पिंक’ने हे बऱ्याच प्रमाणात दाखवून दिलंय. मात्र केवळ संदेश देणं हे चित्रपटाचं काम नसतं. एक कलाकृती म्हणून तो परिपूर्ण असायला लागतो. अन्यथा त्याचा बोधपट होतो. सिनेमा माध्यमाची पुरेपूर जाण असणारे सिनेमाकर्ते असतील तर मात्र अशा चित्रपटांकडून अपेक्षा ठेवता येते. ‘जाऊंद्याना बाळासाहेब’आणि ‘फॅमिली कट्टा’ हे असेच अपेक्षा निर्माण करणारे दोन चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहेत.

समाजातील बदल टिपण्याचं आशयसूत्र या दोहोंच्या केंद्रस्थानी आहे. कुटुंबव्यवस्थेत होणारे बदल, त्यातून दुरावलेल्या गोष्टी, तंत्रज्ञानाने जोडलेली माणसं, नव्या व्यवस्थेत सामावलेल्या नव्या घटकांचा अनुभव ‘फॅमिली कट्टा’मधून मिळणार आहे. तर तरुण पिढीतील बदल टिपण्याचा, त्यांच्याशी त्यांच्याच माध्यमातून संवाद साधला आहे तो ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटातून.

लेखक किंवा अभिनेता हा त्याच्या चष्म्यातून बऱ्याच वेळा चित्रपट पाहात असतो. पण जेव्हा तोच दिग्दर्शक अथवा निर्माता होतो तेव्हा त्यांच्या हातून काही तरी वेगळं निर्माण होण्याची शक्यता असते. ‘जाऊंद्याना बाळासाहेब’च्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत, तर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते या फॅमिली कट्टाच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत.

कौटुंबिक चित्रपट म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर एक टिपिकल मेलोड्रामा असणारा किंवा संदेश देणारा चित्रपट येऊ शकतो. पण फॅमिली कट्टामध्ये असे काही असणार नाही. फॅमिली कट्टा हा आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेचं रेखाटन करतो, तो बदलत्या समाजाचं प्रतीक आहे असं दिग्दर्शक सांगतात. कट्टा हा मोकळाढाकळा बंधनविरहित असतो. तरुणाई तर कट्टय़ाशीच निगडित असते. इंटरनेटवर अशाच कट्टय़ांवर आपण सारेच एकत्र असतो. पण कुटुंबाचं म्हणून जे बॉिण्डग असतं ते येथे असेलच असं नाही. चित्रपटातील फॅमिली कट्टा हा एक व्हॉट्स अ‍ॅपवरचा ग्रुप आहे. आजी-आजोबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा ग्रुप प्रत्यक्षात एकत्र जमतो. त्यातून ते हे सारं उलगडते.

कट्टय़ाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सांगतात की, आपला समाज हा इव्हेंटप्रिय झाला आहे. कारणांशिवाय एकत्र येत नाही. आज एकत्र कुटुंब पद्धतीचा आपण पुरस्कार करू शकत नाही. किंबहुना आज बदलत्या काळात खेडय़ातून शहराकडे, शहरातून परदेशाकडे असा आपला प्रवास झाला आहे. पण शरीराने दूर गेलो तरी मनाने जवळ असणं महत्त्वाचं आहे. केवळ रक्ताची नातीच नाही तर विस्तारित कुटुंबव्यवस्थादेखील महत्त्वाची असते. समाजात होणारे बदल कुटुंबातदेखील वेगवेगळ्या घटकांत दिसत असतात. निर्हेतूक भेटणंदेखील गरजेचं असतं.असाच आशय यामागे असल्याचं ते सांगतात.

‘जाऊद्यांना बाळासाहेब’ हा काहीसा ग्रामीण बाज असणारा चित्रपट असला तरी त्यातून जे भाष्य दिग्दर्शकाला करायचं आहे ते सार्वकालिक आहे. त्याबद्दल दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी सांगतात की, आजच्या समाजाला उत्सवी स्वरूप आलं आहे. पण समूहाकडून काहीतरी निर्माण करून घेण्यामध्ये राजकीय, सामाजिक व्यवस्थेला अपयश आले आहे. क्रांतीचे अग्रदूत म्हणून गणली जाणारी तरुणाई निर्माणामध्ये दिसत नाही. ती मिरवणुकीत नाचताना किंवा होìडग्जमध्ये शुभेच्छुक म्हणून दिसते. ही तरुणाई नेमकी तेथे का आहे, त्यांना त्यात काय आनंद मिळतोय हे जाणून घेण्याची प्रक्रिया हेच आशयसूत्र पकडून कथानक रचल्याचं गिरीश कुलकर्णी सांगतात.

तरुणाईशी त्यांच्याच भाषेत, लहेजा पकडत, बोलत बाळासाहेब हे पात्र रचण्यात आलं आहे. गणमान्य नेत्यासारखं अण्णासाहेब, दादासाहेब अशी बिरुदावली हल्ली सर्रास पाहायला मिळते. मात्र हे सुलभीकरण असल्याचं ते सांगतात. गल्लोगल्ली हल्ली असे बाळासाहेब पाहायला मिळतात. त्यात एक प्रकारची बेफिकिरी असते. जाऊद्या ना राव अशी भूमिका असते. पण त्यातून निर्माण काहीच होत नाही. या गल्लोगल्लीच्या बाळासाहेबांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कथा यात आहे.

गिरीश कुलकर्णी सांगतात की वंशपरंपरागत आलेला सत्तेचा राजकीय वारसा मिरवणाऱ्या तरुणांनी खरं तर स्वत:च्या ताकदीवर नवा डाव टाकायला हवा. मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाईला एका फटक्यात उडवून लावता येणार नाही. त्यांच्याशी बोलायला हवं. पण दुर्दैवाने राजकीय व्यवस्था हे काही करत नाही. त्यांना तरुण वर्ग वाइल्ड असेल तितका फायदेशीर असतो. राजकीय व्यवस्थेला हे सारे पूरक असतं. म्हणूनच त्यांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आशयसूत्रात असल्याचं ते सांगतात. पण हे आशयसूत्र सटल आहे. केवळ विनोदाने हसायचं म्हटलं तरी कथेचा ओघच असा आहे की ते प्रेक्षकांना नक्कीच जाणवेल असा विश्वास ते व्यक्त करतात.

दिग्दर्शक म्हणून गिरीश कुलकर्णी यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी मुळात त्यांना या माध्यमाची जाण आहे. गिरीश कुलकर्णी लेखक आणि अभिनेता म्हणून आणि उमेश कुलकर्णी दिग्दर्शक अशी जोडी आजवर आपण पाहिली आहे. दिग्दर्शीय प्रक्रियेत आडवळणाने गिरीश कुलकर्णी यांचा सहभाग असायचा. पण या चित्रपटामुळे त्यांच्यावर निर्णयप्रक्रियेची जबाबदारी आली आहे. त्याबद्दल गिरीश कुलकर्णी सांगतात की लेखक किंवा अभिनेता म्हणून मी अनेक वेळा स्वत:ला हवं ते मत मांडायचो. पण चित्रपटाच्या तांत्रिक बाबतीत मी अजिबात लक्ष द्यायचो नाही. दिग्दर्शक म्हणून सर्वात महत्त्वाची जाणीव झाली असेल तर ती तांत्रिक बाबींची. कुठे कुठे चुकण्याच्या शक्यता आहेत हे त्यामुळे लक्षात आल्याचं ते सांगतात. हा पहिलाच दिग्दर्शीय प्रयोग असल्यामुळे अजून तरी दिग्दर्शक त्यांच्यातील लेखकावर हावी झालेला नसल्याचं त्यांना वाटतं.

चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी ही जोडगोळी तर नाटकांपासूनच एकमेकांशी बांधलेली आहे. त्यामुळे त्यांचं टय़ुनिंग उत्तम आहे. प्रशांत दळवी समाजातील बदलत्या घटनांवर नेमकं भाष्य कायमच करत असतात. व्यवस्थेतील बदल त्यांनी आजवर टिपले आहेत. त्यामुळे ‘फॅमिली कट्टा’मध्ये हे भाष्य नक्की पाहायला मिळेल असा दिग्दर्शकांना विश्वास आहे. पण त्याचबरोबर हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे पाहावा असाच आहे. केवळ एका मार्केटिंग धोरणावर तो बेतलेला नाही असं ते सांगतात.

‘फॅमिली कट्टा’मध्ये दिलीप प्रभावळकर, रीमा लागू, सई ताम्हणकर, किरण करमरकर, प्रतिक्षा लोणकर अशी कलाकारांची फौज आहे. चित्रपटाचे चलचित्रीकरण महेश लिमये यांनी केले आहे. तर ‘जाऊंद्याना बाळासाहेब’मध्ये बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका गिरीश कुलकर्णी स्वत: करत आहेत. मोहन जोशी, रीमा लागू, भाऊ कदम, दीपक चौगुले आणि सई ताम्हणकर यामध्ये असणार आहेत. थोडक्यात एका सशक्त कथानकाला न्याय द्यायला कलाकारांची तेवढीच तगडी फौजदेखील आहे. तर अजय-अतुल यांनी संगीतामध्ये केलेले वेगळे प्रयोग जाऊंद्याना मध्ये पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या जोडगोळीनेदेखील निर्मितीत पहिले पाऊल टाकले आहे.

एकंदरीतच नेहमीच्याच टिपिकल कथानकाच्या पलीकडे जात सामाजिक आशय पकडणाऱ्या या चित्रपटांकडून काहीतरी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:21 am

Web Title: family katta and jaudyana balasabheb upcoming marathi movies
Next Stories
1 नाही भव्य-दिव्य तरी…
2 झगमगाट आणि नवीन प्रयोग
3 झगमगाटी महिना
Just Now!
X