19 February 2020

News Flash

सुरुवात तरी चांगली

मस्त हलकीफुलकी गोष्ट सांगणारा हा चित्रपट सध्या बऱ्यापैकी लोकप्रिय होताना दिसत आहे.

‘ती सध्या काय करते’ या हलक्याफुलक्या चित्रपटाने २०१७ ची सुरुवात झाली. पुढील पंधरवडय़ात फारसे काही वैशिष्टय़पूर्ण नसले तरी फेब्रुवारीचा पहिला आठवडा बऱ्याच अपेक्षा निर्माण करणारा आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०१६ हे वर्ष जरी विक्रम करणारे असले तरी एकंदरीतच चित्रपट उद्योगाच्या दृष्टीने फार काही आशादायी वगैरे ठरले नाही. त्यातच नोव्हेंबर- डिसेंबर या दोन्ही महिन्यांवर निश्चलनीकरणाचा थेट फटका बसल्याचे दिसून आले. या पाश्र्वभूमीवर ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटामुळे २०१७ सुरुवात तरी आश्वासक झाली असे म्हणता येईल.

मस्त हलकीफुलकी गोष्ट सांगणारा हा चित्रपट सध्या बऱ्यापैकी लोकप्रिय होताना दिसत आहे. सतीश राजवाडे यांना पुन्हा जुना सूर गवसला असे देखील म्हणता येईल. अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर ही नवीन जोडी, तेजश्री प्रधानचा पहिला मराठी चित्रपट असं काहीसे पहिलेपण यामध्ये असले तरी गोष्ट सांगण्याची दिग्दर्शकाची शैली आणि उत्तम संकलन यामुळे सारी भट्टी चांगलीच जुळून आली आहे. आशय घनता वगैरे बाबतीत फार काही मोठी उडी नसली तर एकंदरीतच मांडणी ज्या पद्धतीने झाली आहे त्यामुळे चित्रपट सर्वसामान्यांपर्यंत पोहचला असे म्हणता येईल. निवेदनाचा बाज असला तरी आत्मचरित्रकथनाचा फील येत नाही. महत्त्वाचे म्हणजे हे सारेच एकदम हलकेफुलके असल्यामुळे सहज पचनी पडते. (महाविद्यालयीन काळातील अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर म्हणजे संसारी अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान हे अजिबात पटत नसले तरी.)

अजूनही अनेक चित्रपटगृहांत दंगल गर्दी खेचत असताना ‘ती सध्या..’च्या आश्वासक सुरुवातीनंतर मात्र उर्वरित जानेवारी मात्र सध्यातरी काहीसा सुनासुनाच आहे. १३ जानेवारीला येणाऱ्या ‘करार’ची वेगळ्या कथानकामुळे त्याची दखल घ्यावी लागेल. मनोज कोटियन दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे मध्यवर्ती भूमिकेत असून उर्मिला कानेटकर, क्रांती रेडकर प्रमुख भूमिकेत आहेत. सरोगसी माता हा विषय यामध्ये हाताळण्यात आला आहे. करिअरच्या मागे धावण्यामुळे मूल होऊ न देणाऱ्या जोडप्याची ही कथा. करिअरमध्ये विशिष्ट टप्पा गाठल्याशिवाय मूल नको असा करारच करणारा नवरा, तो टप्पा गाठल्यावर संततीची अपेक्षा करू लागतो. पण त्याची पत्नी मूल देण्यास असमर्थ ठरते. तेव्हा घरकामाला असणाऱ्या विधवा महिलेशी सरोगसी माता होण्याचा करार केला जातो. त्यातून निर्माण होणारी नवी गुंतागुंत आणि जन्माला आलेले नवे करार असे या चित्रपटाचे कथानक आहे.  स्पर्धात्मक युगातील भावनाशून्यता मांडण्याचा प्रयत्न यातून झाला आहे.

त्यानंतरचे पुढील दोन आठवडे सध्यातरी एकदमच रिकामे आहेत. असे आठवडे रिकामे घालवणे आणि एकाच आठवडय़ात भारंभार चित्रपट किंवा एकापाठोपाठ एक चांगले चित्रपट प्रदर्शित करणे हे मराठी चित्रपटसृष्टीचे सध्या वैशिष्टय़ ठरू लागले आहे. त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही.

फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवडय़ात  ‘बघतोस काय, मुजरा कर’, १० फेब्रुवारीला ‘फुगे’ आणि ‘ध्यानीमनी’ असे तीन चित्रपट येत आहेत. फुगेच्या प्रदर्शनाबद्दल सध्यातरी अजूनही निश्चित तारीख सांगीतली जात नाही. फुगे हा खरे तर डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणार होता. पण नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर हे प्रदर्शन फेब्रुवारीत ढकलावे लागले. स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे या दोघांची केमेस्ट्री या चित्रपटात प्रथमच पाहायला मिळणार आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुले लग्नाआधी धम्माल करायला म्हणून गोव्यात जातात आणि तेथे जे घडते त्यावर हे सारे कथानक फिरते. स्वप्निल जोशी हा चॉकलेट हिरो म्हणूनच पाहिला जातो. त्याला अशा भूमिका सूट होतात. पण सुबोध भावे गेल्या एक-दोन वर्षांत तशा शांत-संयमी भूमिका करताना दिसतो. पण फुगेतील त्याची भूमिका ही आजवरच्या कामाला छेद देणारी वाटते. दोन मित्रांमधील प्रेम अशी संकल्पना असल्याचे ट्रेलर आणि प्रमोशनमधून सांगितले जाते, पण चित्रपटातील रंगीबेरंगी वातावरण, दोन मित्रांची जरा अधिकच घनिष्ठ मैत्री, प्रदर्शित होणारी छायाचित्रे असे सारे काही चित्रपटाचे कथानक नेमके कसे फिरतेय याबाबतीत अनेक तर्कवितर्क करायला लावणारे आहे.

‘ध्यानीमनी’ या नाटकावर आधारित ‘ध्यानीमनी’ हा चित्रपट १० फेब्रुवारीला येत आहे. नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

गेल्या काही वर्षांत शिवाजी महाराज आणि एकूणच इतिहास आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनाबाबत बरीच चर्चा सुरू असते. सरकारदरबारीदेखील अनेक घोषणा सुरू असतात. त्यातच गेल्या महिन्यात खुद्द पंतप्रधानांनीच भर समुद्रात ३६०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन केले. पण त्याच वेळी इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गडकिल्ल्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष होताना दिसते. हे दुर्लक्ष अधोरेखित करणारा आणि त्यासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या तरुणांच्या प्रयत्नांना मध्यवर्ती ठेवणारे कथानक ‘बघतोस काय, मुजरा कर’ या चित्रपटात आहे. हल्ली गल्लीबोळात आणि गावखेडय़ात सगळीकडेच शिवरायांच्या नावाने मंडळे सुरू आहेत. अशा मंडळांच्या गाडय़ांवर विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात अनेक वाहनांच्या मागे ‘बघतोस काय, मुजरा कर’ असे लिहिलेले दिसते. या चित्रपटातील तरुणदेखील असेच शिवप्रेमी आहेत. पण केवळ अशी वाक्ये लिहणारे नाहीत, तर किल्ल्यांच्या संवर्धनातून आजूबाजूंच्या गावाचा विकास कसा होईल हेदेखील पाहणारे. अस्मितेचा मुद्दा पुढे रेटून विकासाचे मुद्दे मागे टाकणारे राजकारणदेखील यामध्ये मांडण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण, त्याचे राज्य पातळीवर होणारे परिणाम, अस्मिेतत वाहवत जाणारी जनता आणि दुसरीकडे गडकिल्ल्यांसाठी योजना आखणारे तरुण असा हा संघर्ष असल्याचे दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतात. हेमंत ढोमे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न आहे. शिक्षणासाठी लंडनला असताना बंकिंगहॅम पॅलेसमधील १२ व्या शतकापासून जपून ठेवलेल्या वस्तू, तसेच वास्तू त्यांनी पाहिल्या होत्या. वारसा संवर्धनाचा हा प्रयत्न आणि आपल्याकडील उपेक्षा यातून हे कथानक सुचल्याचे ते सांगतात. स्मारक करण्यावर आक्षेप नाही, पण हे स्मारक पाहून जर एखादा पर्यटक या किल्ल्यावर गेला तर त्याला केवळ उद्ध्वस्त अवशेषच पाहायला मिळतील, त्यामुळे त्यांच्या संवर्धनाचा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे या कथानकातून सूचित केल्याचे ते सांगतात. चित्रपटाचा काही भाग लंडनमध्येदेखील चित्रित करण्यात आला आहे, तर रोहीडा, रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड या किल्ल्यांवर याचे चित्रीकरण करण्यात आले. काही किल्ल्यांचे हवाई छायाचित्रण त्यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. लंडनमध्ये नेमके काय होते हे मात्र सध्या तरी गुलदस्त्याच ठेवले आहे.

मध्यंतरी मिलिंद कवडे यांनी रायबा या चित्रपटाद्वारे मराठीतून गॉडफादर करायचे घोषित केले होते. या चित्रपटाची निर्मिती अजून सुरू झालेली नाही. पण आणखीन एक गॉडफादर सध्या मराठीत येऊ घातला आहे. त्यावर सध्या काम सुरू असून लवकरच त्याची घोषणा केली जाईल. दुसरीकडे छोटा राजनच्या आयुष्यावर मराठी चित्रपट लवकरच येऊ घातला आहे. थोडक्यात काय तर गुन्हेगारी कथानकाचे चित्रपटांचे आकर्षण वाढतेच आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटाला संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठीच एक विक्रम होणार आहे. आरजी प्रोडक्शन शेवटच्या आठवडय़ात एकाच वेळी  १३ चित्रपट प्रदर्शित करणार आहे. यापूर्वीचा हॉलीवूडमध्ये एकाच निर्मिती कंपनीने एका वेळी पाच चित्रपटांचा प्रदर्शित करण्याचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. आरजी प्रोडक्शनच्या या १३ चित्रपटांमध्ये पाच मराठी चित्रपट असणार आहेत. ही बाब महत्त्वाची आहे.

मराठी चित्रपटांची सूची वेबसाइटवर

व्ही. शांताराम फाऊंडेशनतर्फे मराठी चित्रपटांचा १०० वर्षांचा एक उत्तम दस्तावेज मागील वर्षी प्रकाशित करण्यात आला होता. हा संपूर्ण दस्तावेज आता इंटनरनेटच्या दुनियेतदेखील उपलब्ध करण्यात आला आहे. मराठी फिल्म डेटा (marathifilmdata.com) या वेबसाइटवर १९३२ ते २०१३ पर्यंतच्या मराठी चित्रपटांच्या सर्व नोंदी पाहता येतील. लवकरच या वेबसाइटवर चित्रपटांच्या पुस्तिका, पोस्टर्सदेखील अपलोड केले जातील. चित्रपट, निर्माता, संगीत, कथा, गीते, छाया, कला, संवाद, संकलन, गीतमुद्रण, दिग्दर्शन, कलाकार वर्ष अशा विविध प्रकारे ही वर्गवारी पाहता येते. तसेच १९६२ पासूनच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चित्रपट पुरस्कारांची सविस्तर माहितीदेखील यात आहे. २०१३ पर्यंतची सर्व माहिती ग्रंथरूपात आहे. पण यानंतरची माहिती ही वेबसाइटवर अपलोड केली जाणार आहे. अभ्यासकांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल.

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 13, 2017 1:01 am

Web Title: marathi movie 2017
Next Stories
1 यश केवळ पाच टक्के
2 वजनदार महिना
3 समाजातील बदलांवर भाष्य
Just Now!
X