News Flash

झगमगाट आणि नवीन प्रयोग

सैराटच्या दुसऱ्या आठवडय़ात अनेक बॉलीवूड पटांनादेखील महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला.

सगळा मे महिना सैराटमय झाला होता. काही चित्रपटांना आपल्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळे आता जून महिन्यात मात्र भन्साळी बॅनरचा ‘लाल इश्क’, बोनी कपूर यांचा ‘लालबागची राणी’, एनएफडीसीचा ‘वीस म्हणजे वीस’, ‘चीटर’, ‘कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी’ आणि ‘बर्नी’ या चित्रपटांबरोबरच ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या डॉक्यु ड्रामाचीदेखील प्रतीक्षा आहे.

यंदाची उन्हाळी सुट्टी चढत्या तापमानाने गाजली, तशीच सैराटमुळेदेखील चर्चेत राहिली. यशस्वी चित्रपट म्हणून जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी सैराटमुळे निर्माण झालेल्या तथाकथित जातीधर्माच्या वादाने ही भट्टी आणखीनच तापवली होती. पण अनेक वर्षांनतर चित्रपटगृहात गाण्यावर लोकांनी नाच वगैरे केला, समीक्षकांनी गौरवलं, जाणत्या प्रेक्षकांनादेखील भावला असं बरंच काही येथे जुळून आलं. अर्थातच ही चर्चा अजून बराच काळ सुरू राहील. एक मात्र नक्की की ‘चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहावे’ अशी एक चर्चा यातून किमान पुढे आली. हा मुद्दा आपल्याकडे सिनेमा संस्कृती विकसित होण्याच्या दृष्टीने आशा पल्लवित करणारा भाग म्हणता येईल.

बाकी चित्रपट पाहून प्रेक्षक बिघडत नाहीत की सुधारतदेखील नाहीत हे जेव्हा तथाकथित संस्कृतिरक्षकांना आणि विविध सामाजिक चळवळींना जेव्हा कळेल तो सुदिनच. सैराटने एक मात्र केलं ते म्हणजे मराठीत केवळ आशयघनच नाही तर चांगला व्यवसाय करून देणारे चित्रपटदेखील तयार होत आहेत हे देशपातळीवर पोहोचवलं. सैराटच्या दुसऱ्या आठवडय़ात अनेक बॉलीवूड पटांनादेखील महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला. चांगला दिग्दर्शक आणि प्रभावी मार्केटिंग करणारा भक्कम निर्माता यांची सांगड असेल तर काय होऊ शकतं ते यातून ठसलं तरी मराठी चित्रपटसृष्टीला जरा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

असो.. तर सैराटच्या एकंदरीतच लोकप्रियतेमुळे मेच्या दुसऱ्या आठवडय़ात अपेक्षित असलेल्या ‘चीटर’, ‘पैसा पैसा’ अशा काही चित्रपटांना मात्र तारखा पुढं ढकलाव्या लागल्या. तर या आठवडय़ात येणारा ‘३५ टक्के पास’ आणखी पुढे गेला आहे.

येणाऱ्या एक-दीड महिन्यात बरीच गर्दी झालेली आहे. बिग बजेट, बिग बॅनर तर आहेतच, पण त्याचबरोबर दोन चांगले नवीन प्रयोगदेखील आहेत. एक म्हणजे भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतींचा आधार घेत साकारलेला ‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा  डॉक्यु ड्रामा किंवा डॉक्यु फिक्शन आणि एनएफडीसीचा ‘वीस म्हणजे वीस.’

मात्र या आठवडय़ात सर्वात मोठी चर्चा आणि जोर आहे तो ‘लाल इश्क’चा. नावावरूनच वेगळेपणाची सुरुवात असणाऱ्या या चित्रपटाचे ट्रेलर आणि पोस्टर पाहून काहीतरी वेगळं असेल असं जाणवतंय. तर एकंदरीतच प्रमोशनचा धडाका पाहिल्यावर भन्साळी इफेक्टदेखील काम करतोय. प्रचंड असे सेट्स, मोठय़ा प्रॉपर्टीज, खच्चून भरलेलं नाटय़ आणि स्टारकास्टच्या ग्लॅमरचा तडका ही भन्साळींची सारी वैशिष्टय़ं गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या प्रकारे जाणवत आहेत. गेल्या वर्ष-दीड वर्षांत हिंदी निर्मात्यांनी मराठीत उतरायला सुरुवात केली आहे. पण त्यात त्यांची स्वत:ची शैली प्रकर्षांने दिसली नाही. पण ‘लाल इश्क’मध्ये भन्साळी इफेक्ट थेट जाणवतोय. हिंदीतील शबिना खान या प्रसिद्ध वेशभूषाकार यात सहनिर्मात्या आहेत, तर दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे यांचं आहे.

रोमान्स आणि थ्रिल असं मिश्र कथानक या चित्रपटात असणार आहे. चित्रीकरणासाठी एका रिसॉर्टमध्ये गेलेला नायक, त्याला भेटलेली नायिका, त्याच वेळी तेथे झालेला खून, मग खुनी शोधण्यासाठी सुरू झालेली शोधकथा असा साधारण प्लॉट आहे. स्वप्निल जोशी गेली वर्ष-दोन र्वष सातत्याने एकाच साच्यातून प्रेक्षकांसमोर येताना दिसत आहे. त्या साच्यातून तो बाहेर पडतोय का हेदेखील कळू शकेल. भन्साळी हे एक अत्यंत व्यावसायिक चित्रपट निर्माते आहेत. असे निर्माते जेव्हा पैसे गुंतवतात, तेव्हा त्यांना त्यातून यशच अपेक्षित असतं. अर्थात सैराटमुळे सामाजिक जाणिवेवर आधारित प्रेमकथेकडे झुकलेला प्रेक्षकांचा लंबक थेट दुसऱ्या बाजूला अशा रोमॅण्टिक थ्रिलरकडे कसा झुकतोय ते एक-दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर कळू शकेल.

त्यानंतरचा आठवडा पुन्हा एकदा बॉलीवूडच्या निर्मात्याचा असणार आहे. बोनी कपूर निर्मित आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लालबागची राणी’ हा चित्रपट तीन जूनला प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मण उतेकर हे हिंदीतील एक दर्जेदार सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी ‘टपाल’ चित्रपटातून मराठीत आपल्या दिग्दर्शीय कौशल्याची चुणूक दाखवली होतीच. ‘लालबागच्या राणी’चं आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे वीणा जामकरची एकदम वेगळी भूमिका. तीदेखील गेल्या काही काळात सामाजिक धाटणीच्या चित्रपटांच्या साच्यात अडकलेली होती म्हणावे लागेल. तिला स्वत:लादेखील इमेज ब्रेक करण्याची संधी हवी होती. ती ‘लालबागच्या राणी’मुळे मिळाली असे तिला स्वत:लाच वाटतंय. लालबागच्या गणपती मिरवणुकीत हरवलेल्या मुलीचा शोध घेणारे आईवडील असा साधा पण मनाला भिडणारा कौटुंबिक बाज या कथेत आहे. असं हलकंफुलकं लोकांना आवडायला हरकत नाही.

तीन जूनलाच ‘यूथ’देखील प्रदर्शित होतोय. नावावरूनच चित्रपटाचा अंदाज येऊ शकतो. पण केवळ तरुणाईचा धांगडधिंगा असं याचं स्वरूप नाही. तरुणाईच्या दृष्टिकोनाबरोबरच हा चित्रपट पाण्याच्या ज्वलंत समस्येवरदेखील भाष्य करतोय. केवळ मौजमस्ती त्यापलीकडे फारसं काही जग न अनुभवलेल्या सहा मित्रांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी, त्यातून त्यांनी घडवलेले बदल अशी ही रोमांचक कहाणी आहे. नेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी आणि शशांक जाधव अशा या टोळीला राकेश कुडाळकर यांनी दिग्दर्शित केलं आहे. त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

पुढच्या आठवडय़ात दहा जूनला येणारा अजय फणसे दिग्दर्शित ‘चीटर’कडून देखील बऱ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे प्रेक्षकांना तर असतातच, पण वैभव तत्त्ववादी हादेखील इमेज ब्रेकिंगच्या मागे आहे. सोज्ज्वळ, सज्जन अशा भूमिकांतून तो थेट ‘चीटर’ म्हणून या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या आजवरच्या भूमिकांच्या १८० अंश विरुद्ध अशी ही भूमिका त्याला मिळाली आहे. ती त्याने कशी पेललीय हे प्रेक्षक ठरवतीलच. मॉरिशसमधील चित्रीकरण हादेखील एक आकर्षणाचा भाग त्यात असणार आहे. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हादेखील दहा जूनलाच येत आहे.

१७ जूनला दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. कांचन अधिकारी यांचा ‘कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी’ आणि नीलिमा लोणारी यांचा ‘बर्नी’. ‘कुलकर्णी व्हर्सेस’ हा विनोदी अंगाने जाणारा पण सध्या फोफावलेल्या सायबर गुन्हेगारी भाष्य करणारा चित्रपट आहे. क्रेडिट कार्डचा वापर करत नायिकेने नायकाची केलेली फसवणूक, त्यातून त्या दोघांची फुलणारी केमेस्ट्री आणि त्यातून तयार झालेली धम्माल पडद्यावर दिसणार आहे. सुबोध भावे आणि क्रांती रेडकर या प्रमुख भूमिकेत असून बाकी बरीच मोठी स्टार कास्ट यात आहे.

तर सुभाष भेंडे यांच्या ‘जोगीण’ या कादंबरीवरून प्रेरित होऊन गोव्याच्या निसर्गरम्य पाश्र्वभूमीवर साकारलेली अनोखी कथा ‘बर्नी’मध्ये दिसणार आहे. सैन्यातील नोकरीनंतर गोव्यात शांत निवृत्ती अनुभवणारे वडील, ‘बर्नी’चे लाडकोड करणारी आई अशा सुशेगात वातावरणाला अचानक वेगळं वळण मिळतं आणि बर्नीला या सर्वापासून दूर जावे लागते. वडील गेल्यानंतर तिच्या आयुष्यातील संघर्ष यात टिपला आहे. बर्नीच्या भूमिकेत तेजस्विनी लोणारने काम केले असून तर बऱ्याच वर्षांनतर नीलकांती पाटेकर पडद्यावर आल्या आहेत.

मल्टी स्टार म्हणावा असा ‘गणवेश’ २४ जूनला पडद्यावर येत आहे. मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, स्मिता तांबे आणि बरीच कलाकार मंडळी यात आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत कॅमेरामन म्हणून नावाजलेले अतुल जगदाळे यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे.

प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी सध्यातरी इतपतच मर्यादित आहे. पण मधल्या काळात रखडलेले अन्य काही चित्रपटदेखील येऊ शकतील. ‘पस्तीस टक्के काठावर पास’ खरे तर या पंधरा दिवसांतच येणं अपेक्षित आहे. पण अजून तरी तशी हालचाल दिसत नाही.

दुसरीकडे निर्माते नितीन देसाईंच्या ‘ट्रकभर स्वप्न’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेल्यांच्या स्वप्नांना पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न यात आहे. प्रमोद पवार दिग्दर्शित या चित्रपटात मकरंद देशपांडे व क्रांती रेडकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतील. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवर आधारित ‘१०६ हुतात्मा चौक’ या चित्रपटाची घोषणा झाली असून तो थेट २०१७च्या महाराष्ट्र दिनाला प्रदर्शित होणार आहे.

जगावेगळ्या विषयांना हात घालायचं मराठी चित्रपटसृष्टीचं वैशिष्टय़ पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आलंय ते ‘कोती’मुळे. तृतीयपंथीय भावाला समाज झिडकारतोय हे पाहून त्याच्या भावाने दिलेला लढा यातून मांडला आहे. विशेष म्हणजे हे कथानक अज्ञेश मुडशिंगकर आणि दिवेश मेदगे या बालकलाकारांच्या भोवती फिरणारे आहे. सुहास भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचा इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा गटात समावेश करण्यात आला होता. इतर अनेक महोत्सवात त्याचा गौरव करण्यात आला होता. ‘कोती’ जुलैच्या अखेरीस प्रदर्शित होत आहे. काही तरी वेगळं पाहायला मिळण्याची आशा बाळगायला हरकत नाही.

उदाहरणार्थ नेमाडे – एक नवा प्रयोग

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टी भरपूर प्रयोगशील झाली आहे. त्या प्रयोगशीलतेचाच एक नवा टप्पा ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या भालचंद्र नेमाडे यांच्यावरील फिक्शन किंवा डॉक्यु ड्रामाच्या माध्यमातून साकार झाला आहे. आपल्याकडे सिनेमा माध्यमाची एक प्रचलित चौकट आहे. त्यापलीकडे जात एखाद्या साहित्यिकाचं व्यक्तिमत्त्व आणि त्याच वेळी त्याच्या साहित्यातील पात्राचं चित्रपटीय रूपांतरण असा मेळ साधलेला हा प्रयोग आहे. अरुण खोपकरांनी कविवर्य नारायण सुर्वेवर अशा प्रकारचा डॉक्यु ड्रामा केला होता, त्यानंतर असा प्रयोग झाला नव्हता.

फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिक्षण घेतलेल्या अक्षय इंडीकर या तरुणाने एखाद्या मिशनप्रमाणे गेली अडीच वर्षे मेहनत घेत ही डॉक्यु फिक्शन तयार केली आहे. त्याला प्रचलित भाषेत आपण चित्रपट म्हणणार नाही. पण एकंदरीतच ट्रेलर पाहिल्यावर त्यातून दृक्श्राव्याची परिणामकारकता जाणवते. खास चित्रपटासाठी विविध ठिकाणी घेतलेल्या नेमाडेंच्या अनौपचारिक मुलाखती, त्यांची स्वगतं, कवितावाचन आणि त्याच वेळी त्यांनी निर्मिलेल्या पात्रांचं चित्रपटीय रूपांतरण असा एक छान दृक्श्राव्य कोलाज यात दिसून येतोय. चित्रपटाच्या निर्मितीबद्दल अक्षय सांगतो की, हे करताना त्याच्यासमोर एका पोतुर्गीज लेखकावरील माहितीपट होता. त्यात चित्रपटीय रूपांतरण नव्हते, पण तिचा बाज वेगळा होता. नेमाडेंच्यावर डॉक्यु फिक्शन करताना त्यांना नेमाडे तर मांडायचे होतेच, पण नेमाडेंनी त्यांच्या कथानकात
निर्मिलेल्या पात्रांनादेखील साकारायचे होते. त्यासाठी आम्ही प्रवास हे माध्यम पकडून १५ ठिकाणी चित्रीकरण केलं आहे आणि त्या प्रवासातच त्यांनी निर्मिलेली पात्रं मांडली आहेत.

एकंदरीतच ही मांडणी मराठी चित्रपटांसाठी नवीन म्हणावी लागेल अशी आहे. छोटय़ाशा चमूने सुमारे महिनाभर चित्रीकरण केल्यानंतर तब्बल ७० तासांचे फूटेज हाती आलं होतं. हे सारं दीड तासात बसवणं हेच मोठं आव्हान होतं. अक्षय सांगतो की, त्यांनी संपूर्ण चित्रीकरणादरम्यान भरपूर टिप्पणं काढली होती. ऑफिसच्या भिंतीवर सर्वत्र ही टिप्पणं चिकटवलेली होती. दृक्श्राव्याची लय साधणं महत्त्वाचं होतच, नेमाडे पोहचणंदेखील महत्त्वाचं होतं. आणि ते दुबरेध होऊ द्यायचं नव्हतं. क्षमा पाडळकरने तब्बल साडेतीन महिने या संकलनासाठी खर्च केले आहेत. तेव्हा ते सारं आटोपशीरपणे दीड तासात साकार झालं आहे. स्वप्निल शेटय़ेचं छायांकन हा या डॉक्यु फिक्शनचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू म्हणावं लागेल. संजय मोरे, केतकी नारायण यांनी नेमाडेंची पात्रं साकारली आहेत. चित्रपटाच्या निर्मितीबद्दल अक्षय सांगतो, ‘‘अरविंद पाखले यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आम्ही १५ लाखांचे कर्ज काढून ही निर्मिती केली आहे. आणि सध्या आम्ही प्रायोजकांच्या शोधात आहोत.’’ सध्या तरी ही डॉक्यु फिक्शन चित्रपटगृहातून प्रदर्शित होणार नाही. २७ मेला नेमाडेंच्या गावी सांगवीला तिचा खास शो आयोजित केला असून, नंतर जिल्ह्य़ाच्या प्रमुख ठिकाणी ती दाखवण्याचा मानस असल्याचे अक्षय नमूद करतो.

गेल्या पन्नासेक वर्षांत एनएफडीसीच्या माध्यमातून अनेक दर्जेदार चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना मिळाला आहे. पण त्यात बहुतांशपणे हिंदी चित्रपटांचाच भरणा असायचा. पण गेल्या काही वर्षांत एनएफडीसीने प्रादेशिक चित्रपटांनादेखील निधी द्यायला सुरुवात केली आहे. अर्थातच आशयघन चित्रपट देणाऱ्या मराठीतही त्यांनी हा प्रयोग केला असून, येत्या १० जूनला ‘वीस म्हणजे वीस’ हा पूर्णपणे एनएफडीसीच्या निधीवर तयार झालेला चित्रपट प्रदर्शित होत आहे. उदय भांडारकर यांनी त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. जाहिरात क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असणाऱ्या उदय भांडारकर यांनी अनेक जाहिरात फिल्म आणि काही लघुपटदेखील केल्या आहेत. पण पूर्ण लांबीचा असा हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.

चित्रपटाचे नाव वाचल्यावर वीस म्हणजे वीस काय असावं याची लगेचच उत्सुकता चाळवली जाते. ही एका गावातील छोटय़ाशा शाळेची कथा आहे. एका ध्येयवेडय़ा शिक्षकाला निवृत्तीनंतर लक्षात येते की, आपण अनेक गावांतून शिकवत होतो, पण आपल्या गावातच शाळा नाही. म्हणून तो स्वत:च्या घरातच शाळा सुरू करतो. पण काही काळातच तब्येतीच्या कारणास्तव त्याला शाळा चालवणे कठीण होते, तेव्हा त्याची इंजिनीअरिंगला असलेली मुलगी ही शाळा पुढे सुरू करते. गावातील मुलांमध्ये रमतेदेखील, पण लवकरच सरकारी नियमात अडकते. तो नियम म्हणजे शाळेत किमान वीस विद्यार्थ्यांची आवश्यकता असणे. ती शाळेत पुरती गुंतलेली असते, तिला शाळा सुरू ठेवायची असते. पण वीसचा आकडा कसा पार करायचा, हा यक्षप्रश्न असतो. तिची ही धडपड रुपेरी पडद्यावर चित्रित करण्यात आली आहे.

चित्रपटाची संकल्पना नेमकी कशी सुचली, यावर भांडारकर सांगतात की, सरकारचा हा वीस आकडा हा कसा आणि कोठून आला हे सरकारी कोडेच म्हणावे लागेल. मध्यंतरी वृत्तपत्रात याबाबत बरेच छापून आले होते. त्या वेळी प्रत्येक ठिकाणी शिक्षकांच्या बेकार होण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. पण वीसचा आकडा गाठता आला नाही म्हणून इतर विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणाला मुकावे लागणे हे नक्कीच चिंताजनक वाटत होते. त्यातूनच हा कथाविस्तार केल्याचे भांडारकर सांगतात.

एनएफडीसीच्या माध्यमातून चित्रपट म्हटल्यावर अनेकांना कदाचित अगदी कमी निधीमध्ये अनेक सरकारी नियमांमध्ये अडकणे असे वाटू शकते. पण भांडारकर सांगतात की, चित्रपटाच्या रचनेबाबत, क्रिएटिव्हिटीबाबत आमची भरपूर चर्चा होत असे. बजेटमध्ये देखील अनेक वेळा कमी-जास्त करावे लागत असे. पण एकदा सगळे मंजूर झाल्यानंतर एनएफडीसीने कसलाही हस्तक्षेप केला नाही. किंबहुना इतके स्वातंत्र्य आणि निधीसाहाय घेत चित्रपट करण्याची संधी मिळाली असल्यामुळे अनेक गोष्टी मला मोकळेपणाने मांडता आल्या.

अर्थात चित्रपटाचे ट्रेलर पाहिल्यावर त्यातील नावीन्य आणि कौशल्य लक्षात येतेच. तब्बल ३८ लोकेशनवर याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. अविनाश अरुणसारख्या दर्जेदार सिनेमॅटोग्राफरने या चित्रपटासाठी छायांकन केले आहे. संवाद लेखन दीपक जोशी आणि रवी भगवते यांनी संवादलेखन केले आहे. मृण्मयी गोडबोले, राजन भिसे, अरुण नलावडे यांच्या भूमिका असून, बाल कलाकारांमध्ये पार्थ भालेराव, मृणाल जाधव, मोहित गोखले, अश्मित पाठारे, साहिल कोकाटे यांच्या भूमिका आहेत.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:15 am

Web Title: marathi movies releasing in june 2016
टॅग : Marathi Movie
Next Stories
1 झगमगाटी महिना
2 सायफाय, नातेसंबंध आणि दुष्काळ
3 अपेक्षा की अपेक्षाभंग?
Just Now!
X