19 February 2020

News Flash

नाही भव्य-दिव्य तरी…

गणेशोत्सवामुळे दोन आठवडे चित्रपटसृष्टी शांतच होती.

गणेशोत्सवामुळे दोन आठवडे चित्रपटसृष्टी शांतच होती. पण यापुढच्या काळात मात्र यारीदोस्ती, फोटोकॉपी, मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अनवॉन्टेड, वनवे तिकीट यांच्याबरोबरच निवडुंग, अ‍ॅडल्ट्स ओन्ली आणि डॉट काम मॉम असे चित्रपट येऊ घातले आहेत. ते भव्य-दिव्य असतील असे नाही, पण वेगळ्या प्रयोगांची अपेक्षा करायला हरकत नाही.

वेगळी कथा, प्रयोग करून पाहण्याची इच्छा आणि हे सर्व करायला निर्मात्यांची बऱ्यापैकी तयारी ही आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची काही महत्त्वाची वैशिष्टय़े म्हणावी लागतील. पण त्याचबरोबर कसलाही पाचपोच नसलेल्या चित्रपटांचा दरवर्षी होणारा भरणा हेदेखील अगदी हमखास दिसणारे चित्र. गेल्या पाचएक वर्षांत हे अगदी नेहमीचे चित्र झाले आहे. २०१६ चे वर्ष अर्धे संपले तरी अगदी मोजकेच चित्रपट सोडले तर हाती निराशाच आली आहे. हिंदी चित्रपट निर्मार्त्यांनी मराठीत प्रयोग करूनदेखील हाती काहीच लागलेलं नाही. दर आठवडय़ाला अगदी तीन ते चार चित्रपट प्रदर्शित होण्याचं नावीन्यदेखील ओसरून गेलं आहे.

मागच्या महिन्यात आलेल्या ‘वाय झेड’ने मात्र मंदीची कसर थोडी भरून काढली. पण वितरणात फटका बसल्यामुळे म्हणावा तेवढा व्यवसाय होऊ शकला नाही. दोन-तीन र्वष लटकलेला ‘अस्तु’ अखेरीस प्रदर्शित झाला, पण बॉक्स ऑफिसने फार काही आधार नाही दिला. ‘गणवेश’ बरा होता. आणि स्टोरी टेलिंगचा वेगळा ढाचा घेऊन आलेल्या ‘चौर्य’ची चर्चा बरीच झाली. त्याचबरोबर ‘चौर्य’ने अंध प्रेक्षकांसाठी केलेल्या तांत्रिक करामतीचं कौतुक करायला हवं. या नव्या प्रयोगाचा वापर भविष्यात अन्यत्र व्हायलादेखील हरकत नाही.

मध्येच काही काळ ‘एम एस धोनी’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या मराठी डबिंगवर विनाकारण बालिश विरोध करून मराठी चित्रपट महामंडळाने भरपूर गोंधळ घालून घेतला. खरं तर चित्रपट हा व्यवसाय आहे आणि त्याला विनाकारण अस्मितेची जोड द्यायची काहीही गरज नाही. पण चित्रपट महामंडळाच्या नव्या कार्यकारणीला आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी ही धडपड गरजेची वाटली असावी. यापलीकडे या सर्व प्रकरणात काहीही अर्थ नाही.

गणेशोत्सवामुळे दोन आठवडे चित्रपटसृष्टी शांतच होती. चित्रपटसृष्टीत चित्रपटाच्या नावापासून ते मुहूर्तापर्यंत अनेक गोष्टींसाठी ज्योतिषांचा आधार घेतला जातो असा एक सार्वत्रिक समज आहे. त्यात तथ्य किती हा मुद्दा बाजूला ठेवला तरी अनेक र्वष पितृपक्ष हा चित्रपट प्रदर्शनासाठी धार्जिणा नव्हता. पण हल्ली तो समज मोडला जातोय. कारण यंदा या पंधरवडय़ात चक्क चार मराठी चित्रपट येत आहेत. ‘यारी दोस्ती’ आणि ‘फोटोकॉपी’ हे १६ सप्टेंबरला. तर ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अनवॉन्टेड’ आणि ‘वनवे तिकीट’ हे २३ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहेत.

‘यारी दोस्ती’ आणि ‘फोटोकॉपी’ या दोघांचे वैशिष्टय़ म्हणजे हे विषय थेट तरुणाईशी निगडित आहेत. त्याचमुळे असेल की काय पण या निर्मात्यांनी पितृपक्षाला फार काही थारा दिलेला नसावा. दोन्ही चित्रपटांचे कथानक तरुणाईला खेचून घेणारं असल्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे प्रमोशन महाविद्यालयात करण्यात आलं होतं. सध्या प्रमोशनचा हा ट्रेण्ड चांगलाच रुळताना दिसतोय. ‘यारी दोस्ती’च्या प्रमोशनला गणेशोत्सवाची जोडदेखील मिळाली आहे. चित्रपटातील कलाकारांनी गणेशाची मूर्ती तयार करून गणेश मंडपात जल्लोश केला होता. अर्थात चित्रपटात गणू नावाचं एक पात्र असून त्याच्याशी याचा संबंध जोडला आहे, पण हे पात्र काय भूमिका निभावतंय हे सध्या तरी गुलदस्त्यात ठेवलं आहे. ‘यारी दोस्ती’मधून किशोरवयीन मुलांचे भावविश्व टिपण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप मुख्य भूमिकेत आहे. आकाश वाघमोडे त्याच्या सोबतीस असून आशीष गाडे आणि सुमित भोकसे हे पदार्पण करत आहेत.

पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस या फ्रेश जोडीने ‘फोटोकॉपी’ची धम्माल अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे पोस्टरवर असणारी पिपाणी आणि चित्रपटातील पिपाणी हे गाणं सध्या चांगलंच गाजताना दिसतंय.

‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अनवॉन्टेड’ आणि ‘वनवे तिकीट’ हे जरा वेगळ्या वळणाचे चित्रपट २३ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहेत. मॉरिशस, थायलंड, सिंगापूर, युरोपमध्ये चित्रित केलेले हिंदी चित्रपट हल्ली सर्रास पाहायला मिळतात. पण मराठी चित्रपटांमध्येदेखील हा ट्रेन्ड रुळू लागला आहे. ‘वन वे तिकीट’ हा चित्रपट तर चक्क इटली, स्पेन आणि फ्रान्स या तीन देशांत चित्रित झाला आहे. क्रूझवरचा प्रवास आणि त्यात घडणाऱ्या थरारक घटना हा चित्रपटाचा प्लॉट असला तरी त्यानिमित्ताने झगमगाट आणि परदेश प्रवास मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सचित पाटील, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, शशांक केतकर, नेहा महाजन असे ग्लॅमरस चेहरे यानिमित्ताने क्रूझवर पाहायला मिळतील. इंडो-वेस्टर्न संगीताचा बाज असल्यामुळे जरा काही तरी वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

‘पप्पी दे, पप्पी दे पारूला’ या गाण्यातून प्रसिद्ध झालेली स्मिता गोंदकर एकदम काहीशी कौटुंबिक पाश्र्वभूमी असणाऱ्या चित्रपटात दिसणार आहे ती ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अनवॉन्टेड’मध्ये. जोडीला क्राइम पेट्रोल फेम राजेंद्र शिसतकरदेखील आहे. करिअर आणि घर याची कसरत सांभाळताना ‘वॉन्टेड आणि अनवॉन्टेड’मध्ये उडणारा गोंधळ आणि धावपळ यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

दुष्काळाच्या पाश्र्वभूूमीवर साकारलेला ‘निवडुंग’ १४ ऑॅक्टोबरला प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक  परिस्थितीवर भाष्य करणारा विषय दिग्दर्शकाने थेट पदापर्णातच हाताळला आहे. दुष्काळावर अनेक चित्रपट येऊनदेखील हा विषय कसा मांडला जातोय याची उत्सुकता आहे.

गेल्या एक-दोन वर्षांत हिंदीतील नामवंत कलाकार, निर्माते मराठीत अनेक प्रयोग करत आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रियंका चोप्राची निर्मिती असलेला ‘व्हेंटिलेटर’ ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असला तरी सध्या प्रमोशनचा धडाका सुरू आहे. गणेशोत्सवाची संधी साधत नुकतेच अंधेरीच्या राजाच्या मंडपात ढोल- ताशाच्या गजरात एक गाणे अनिल कपूर यांच्या हस्ते आणि जितेंद्र जोशी याच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. हिंदूी निर्मात्यांच्या सहभागामुळे प्रमोशनवर चांगलाच जोर दिसून आला. मराठी निर्मात्यांनादेखील याची दखल पुढील प्रमोशनमध्ये घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे सध्या तरी ‘व्हेंटिलेटर’च्या कथेवर आणि कलाकारांवर फारसे भाष्य होताना दिसत नाही. पण ११६ कलाकारांचा समावेश यामध्ये असल्याचे समजते.

‘अ‍ॅडल्ट्स ओन्ली’ असं जरा वेगळं नाव असलेल्या चित्रपटाचं वेगळेपण कथेत आहे की नाही यावर भाष्य नाही, पण हा चित्रपट आयफोनवर चित्रित केला जाणार असल्यामुळे त्याबद्दल मात्र सध्या बरीच उत्सुकता आहे. सप्टेंबरच्या शेवटी हे चित्रीकरण सुरू होत आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ‘शिनमा’ चित्रपटात ‘चिमणी उडाली’ हे काहीसं अत्रंगी गाणं सादर केलं होतं. ‘अ‍ॅल्ट्स ओन्ली’मध्येदेखील आनंद शिंदेच्या आवाजात ‘आपला हात जगन्नाथ’ हे असेच एक गीत ध्वनिमुद्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे चर्चेला जोर आला असला तरी कथानक काय असेल यावरच चित्रपट तरेल.

असो, तर दिवाळीसाठी सध्या तरी फारसं काही भव्यदिव्य समोर दिसत नाही. पण नोव्हेंबरमध्ये येणारा सचिन कुंडलकरांचा ‘वजनदार’ मात्र चर्चेत आहे. प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या दोन्ही ग्लॅमरस अभिनेत्री या चित्रपटाच्या नायिका असणार आहेत. सचिन कुंडलकर नवनवे प्रयोग करण्यात माहीर आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा करायला हरकत नाहीत.

‘डॉट कॉम मॉम’ – अमेरिकेतला मराठी चित्रपट

‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि ‘अवघा रंग एकच झाला’ या दर्जेदार नाटकांच्या सादरकर्त्यां डॉ. मीना नेरुरकर या ‘डॉट कॉम मॉम’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. गेली अनेक र्वष अमेरिकेतील वास्तव्यात मराठी नाटकांबरोबरच हॉलीवूडपट, अमेरिकेत टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या या दिग्दर्शिय प्रयोगाकडून अनेकांना उत्सुकता आहे.

एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातील मुलगा अमेरिकेत नोकरीसाठी जातो. तेथे आयटी क्षेत्रात मेहनतीने स्वत:ची कंपनी स्थापन करतो. मिलेनिअर होतो. आईवडिलांना अमेरिकेत बोलवतो. पण फक्त आईच येते. आजवर सर्वसामान्यांचं आयुष्य जगलेली आई एकंदरीतच अमेरिकेतल्या पॉलिश्ड वातावरणात दबून जाते. तिच्यात एक अवघडलेपण येतं आणि सहा महिने राहणारी आई लगेच परत येते. पुन्हा एकदा तिला मुलगा अमेरिकेत बोलावतो. तेव्हा ती जाते का, गेलीच तर तिकडे तिला काय अडचणी येतात, ती कशी वावरते, तिच्या आणि मुलाच्या नात्यातील भावविश्वात काय घडते अशी चित्रपटाची एकंदरीत कथा.

जवळपास ८० टक्क्यांहून अधिक चित्रपट अमेरिकेत चित्रित झाला आहे. अमेरिकेत चित्रित झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट म्हणावा लागेल. अमेरिकेतील भारतीय लोकांच्या जनजीवनावरदेखील त्यातून प्रकाश पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेतील चित्रीकरणासाठी अमेरिकेतीलच तंत्रज्ञांनी काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या तांत्रिक बाबीत नावीन्य जाणवू शकतं. व्हाइट हाउस, वॉशिंग्टन मेमोरियल अशा अनेक आउटडोअर चित्रीकरणातून कथानक पुढे सरकतं. विशेष म्हणजे अमेरिकेतच चित्रित करूनदेखील चित्रपटाचा खर्च आवाक्यात झाला आहे. खर्चावरील नियंत्रण हे तेथील व्यावसायिकतेमुळे शक्य झाल्याचं मीना नेरुरकर सांगतात.

अमेरिकेतील कथानक असल्यामुळे एकंदरीतच चित्रपटाची भाषा, गाणी यावर मराठी – इंग्लिश असा संयुक्त प्रभाव दिसून येतोय. सुधीर फडके आणि एन. दत्ता यांच्या सुरावटीवर जगदीश खेबुडकरांचा गीताचा मुखडा आणि उर्वरित गीतामध्ये इंग्लिश मराठीची गुंफण असं मिश्रण ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. अशोक पत्की आणि नील नाडकर्णी यांनी संगीत दिलं आहे. तर कथा, संवाद, गीत, नृत्य आणि दिग्दर्शन हे डॉ. मीना नेरुरकर याच करत असून चित्रपटातील ‘डॉट कॉम मॉम’ची मध्यवर्ती भूमिकादेखील साकारत आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 16, 2016 1:24 am

Web Title: upcoming marathi movies
Next Stories
1 झगमगाट आणि नवीन प्रयोग
2 झगमगाटी महिना
3 सायफाय, नातेसंबंध आणि दुष्काळ
Just Now!
X