पुढच्या तीन महिन्यात चित्रपटांची धमाल असणार आहे. प्रेक्षकांचा लाडका प्रशांत दामले ‘भो- भो’ मधून गुप्तहेर बनून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याशिवाय ‘चीटर’, ‘लाल इश्क’ ‘वन वे तिकीट’ या आगामी चित्रपटांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मराठी चित्रपटांमध्ये भरपूर प्रयोगशीलता होती. दुष्काळ, नातेसंबंध, सायफाय, दाक्षिण्यात्यांची कॉपी असं बरचं काही पाहायला मिळालं. बॉलीवूडच्या तुलनेनं आपला जीव जरी छोटा असला तरी आपल्या कन्टेन्टमध्ये बरीच विविधता असते हे आपण वारंवार सिद्ध करतो असतो त्याचीच ही एक झलक म्हणावी लागेल. मात्र एकंदरीतच या तिमाहीत ‘नटसम्राट’ सोडला तर इतरांना व्यावसायिक यश तुलनेनं कमीच लाभलं म्हणावं लागेल. ‘रंगा पतंगा’ची चर्चा चांगलीच झाली होती, चित्रपटाला मिळालेले पुरस्कार आणि एकंदरीतच निर्मितीत असलेलं नावीन्य चित्रपटाला फारसं तारू शकलं नाही. तर ‘सायफाय फुंतरु’ला फारसं यश मिळालं नाही.

असो, मात्र पुढच्या तीन महिन्यांत बरीच धम्माल असणार आहे. पण ते पाहण्यापूर्वी एका वेगळ्या विषयाची थोडीशी चर्चा करायला हवी. साधारण मार्च एप्रिल हा पुरस्कारांचा महिना असतो. आणि अर्थातच पुरस्कार म्हटले की त्यात वादविवाद हमखास असतात. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारातील मराठी टक्का तुलनेनं कमी झाला आहे. ‘रिंगण’, ‘सैराट’ या अजूनही प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांची वर्णी लागली आहे. तर प्रदर्शित झालेल्यांमध्ये ‘कटय़ार’चे नाव आहे. यावर अनेकांच्या भिवया उंचावल्या होत्या. त्या आणखी उंचावण्याचं कारण आपल्याच राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाने कान महोत्सवात पाठवलेल्या चित्रपटांमुळे. ‘रिंगण’, ‘सायलेन्स’ आणि ‘वक्रतुंड महाकाय’ हे चित्रपट महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे  कान्सला पाठवले गेले आहेत. ‘रिंगण’ आणि ‘सायलेन्स’ अजून प्रदर्शित व्हायचे आहेत. त्यामुळे त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही. पण ‘वक्रतुंड महाकाय’ आपण कानला पाठवत असू तर विचार करावा लागेल. मागील वर्षांत अनेक वेगळे प्रयोग आपण पाहिलेले असताना त्यातून कान्सला पाठवण्यासाठी ‘वक्रतुंड’ आवडावा हे जरा आश्चर्यच म्हणावे लागेल. अर्थात संचालनालयाचे प्रसिद्धीपत्रक पाहिल्यावर लक्षात येते. आपल्या निवडीच्या समर्थनार्थ संचालनालय लिहिते की राज्यात दिल्या जाणाऱ्या विविध चित्रपट पुरस्कारांच्या समितीवरील मान्यवर परीक्षकांनी याची निवड केली आहे. आपल्या निवडीसाठी दुसऱ्यांच्या निकषांचा आधार घ्यायची गरज पडणे आणि तसे सांगणे यातच एकंदरीत काय झाले असावे याची कल्पना येते.

असो, तर पुरस्कारांचे हे कवित्व पुन्हा महिनाअखेरीस राज्य पुरस्कारांच्या वेळी सुरू होईलच. तोपर्यंत रसिकांनी येणाऱ्या चित्रपटांमध्ये मन रिझवायला हरकत नाही.

तर एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात ‘सैराट’ असल्यामुळे नेहमीप्रमाणे अन्य कोणताही चित्रपट त्या आठवडय़ात येत नाहीये. पण २२ एप्रिलला येणाऱ्या ‘भो-भो’ ने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मोजकेच चित्रपट करणाऱ्या प्रशांत दामलेची गुप्तहेराची धम्माल भूमिका यामध्ये असणार आहे. प्रशांत दामलेंचं कमबॅक म्हणून याकडे पाहिले जात आहे. प्रशांत दामले या चित्रपटात जरी गुप्तहेर असला तरी त्याच्या एकंदरीतच व्यक्तिमत्त्वात असलेला विनोदी ढंग पाहता त्यांचा गुप्तहेर भरपूर गोंधळ घालणारा असू शकतो. हेरगिरी करणारं हे पात्र हेरगिरी करता करता स्वत:च्या आयुष्यात अनेक संकट ओढवून घेताना दिसते. सौरभ गोखले आणि अनुजा साठे ही खऱ्या आयुष्यातील जोडी लग्नानंतर प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार आहे. भरत गायकवाड यांच्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये या तिघांच्या सोबत सुबोध भावे, संजय मोने, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे दिसणार आहेत.

याच आठवडय़ात येणारा ‘मेक इन इंडिया’ मात्र आता पुढे ढकलण्यात आला आहे. मे महिना हा ‘चीटर’, ‘३५ टक्के काठावर पास’, ‘लाल इश्क’ यांचा असणार आहे. यातील कलाकार, वेगळे विषय आणि त्यांचे निर्माते यांच्यामुळे एकंदरीतच या चित्रपटांची चांगलीच चर्चा आहे.

नावातूनच चित्रपटात काय असेल याची जाणीव होणाऱ्या ‘चीटर’मध्ये वैभव तत्त्ववादी नायकाच्या भूमिकेत आहे. वैभव गेल्या काही महिन्यात आपण वैविध्यपूर्ण भूमिका करू शकतो हे दाखवून देत आहे असेच लक्षात येते. चित्रपटाच्या ट्रेलरवरून एकंदरीतच त्याच्या टपोरीपणाची कल्पना येऊ शकते. हृषीकेश जोशी, आसावरी जोशी, सुहास जोशी, पूजा सावंत अशी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचे ऐंशी टक्के शूटिंग हे मॉरिशस येथे झाले आहे. दिग्दर्शक अजय फणसेकर सांगतात की, केवळ छान छान लोकेशन म्हणून नाही तर चित्रपटाची नायिकाच मॉरिशसची आहे. शिक्षणासाठी ती पुण्यात येते तेव्हा तिची भेट या टपोरी ‘चीटर’शी होते. आणि त्याच्या प्रेमात पडते. सर्व प्रकारच्या चीटिंगमध्ये माहीर असलेला वैभव चीटिंग करता करता मॉरिशसला पोहोचतो. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी केलं आहे. ते सांगतात की वैभव एकंदरीतच या लुकला अगदी सूट झाला आहे. त्याची ही फसवेगिरी कोणत्या टोकाला जाते हे त्याने चांगलंच मांडलं आहे.

२० मे रोजी येणाऱ्या ३५ टक्केकाठावर पास मध्ये प्रथमेश परब आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये पुन्हा एकदा पडद्यावर दिसत आहे. अर्थात त्याची पठडी सोडून काही वेगळं काम आहे की कसे हे पडद्यावरच कळेल. तर २७ मे रोजी प्रदर्शित होणारा ‘लाल इश्क’ हा चित्रपट सध्या चांगलाचा चर्चेत आहे तो संजय लीला भन्साळी यांच्या निर्मितीमुळे. सध्या याचे प्रमोशनदेखील एकंदरीतच भन्साळी स्टाइलने सुरू आहे. मराठीत चकचकीत भूमिका करणारा स्वप्निल जोशी आणि हिंदीतली अंजाना सुखानी यांच्या भूमिकांमुळे एकंदरीतच ग्लॅमरस चित्रपट असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात भन्साळींच्या एकंदरीत प्रकृतीला जाणारा चित्रपट पाहायला मिळेल. त्याची झलक पोस्टरपासूनच सुरू होत आहे. ‘गुपित आहे साक्षीला’ अशी टॅगलाइन कम सबहेडिंग हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. रोमान्स आणि थ्रिलर अशी साधारण रचना असावी असं म्हणायला सध्या वाव आहे. एक निश्चित की भन्साळींसारखा आघाडीचा निर्माता दिग्दर्शक जर मराठीत येत असेल तर काही नवीन प्रयोग व्हायला हरकत नाही. स्वप्नाली जोशी – वाघमारे याचे दिग्दर्शन करत आहेत.

मराठीत साधारणपणे एखाद्या महिन्याच्या चित्रपटांचीच चर्चा असते. पण यंदा जून-जुलैपर्यंत अनेक चित्रपटांना आपली प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यात अनेक बडय़ा बॅनरचे चित्रपट असल्यामुळे तेव्हा चांगलीच स्पर्धा व्हायला हरकत नाही. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचा ‘वायझेड’ अशा एकदम टिपिकल मुंबईकर अत्रंगी नावाचा चित्रपट जूनमध्ये येण्याची शक्यता आहे. तर तीन वर्षे प्रदर्शनासाठी ताटकळलेला भगवानदादाच्या आयुष्यावर आधारीत आणि विद्या बालनच्या भुमिकेमुळे चर्चेत असलेला ‘अलबेला’देखील जूनमध्ये प्रदर्शित होऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे. तर क्रुझवरील प्रवासात घडणारी गोष्ट सांगणारा ‘वन वे तिकीट’देखील १० जूनला येतोय. त्यात इटली स्पेन आणि फ्रान्स अशा देशांची सफर तर आहेच पण क्रुझवरचा पहिलाच मराठी सिनेमा म्हणूनदेखील याकडून अपेक्षा आहेत. तर याच महिन्याचा अखेरीस बंटी -प्रशांत या फॅशन फोटोग्राफर जोडीचा ‘पिंडदान’ हा फॅशन इंडस्ट्रीतील अनुभवावर आधारीत चित्रपट जूनच्या शेवटच्या आठवडय़ात येत आहे. प्रशांत पाटील यांचे दिग्दर्शन तर बंटी देशपांडे यांचे छायाचित्रण यात असणारा आहे. मराठीत फारसा हाताळला न गेलेला हा विषय त्याच क्षेत्रातील अनुभवी लोकांकडून मांडला जात असल्यामुळे काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

जूलै महिन्यात ‘अ‍ॅण्ड जरा हटके’ आणि ‘हाफ तिकीट’ हे दोन्ही मोठय़ा बॅनरचे चित्रपट आहेत. तर दुसरीकडे ‘ती फुलराणी’ या गाजलेल्या नाटकावर चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली असल्यामुळे गाजलेल्या नाटय़कृतीवर मराठी चित्रपटांचा ट्रेण्ड या वर्षांतदेखील सुरू राहील असे दिसतंय. ‘ती फुलराणी’ हे नाटकदेखील सध्या नव्या संचात रंगमंचावर येत आहे. त्याच वेळी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असल्यामुळे पुढचे काही महिने फुलराणीचा प्रभाव असेल. अमोल शेटगे यांच्या दिग्दर्शनाखाली राजश्री लांडगे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका यात असणार आहेत. तर सतीश राजवाडे सध्या अंकुश चौधरीला घेऊन ‘ऑटोग्राफ’ चित्रित करत असून तो १२ ऑगस्टला प्रदर्शित होईल.
सुहास जोशी – रिंगण