19 February 2020

News Flash

वजनदार महिना

मराठी चित्रपटांसाठी २०१६ हे वर्ष फारसं लाभदायक नाही असंच दिसतंय.

काही अपवाद वगळता एखाद्या मराठी चित्रपटाची वाहवा करावी आणि तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा असं गेल्या काही महिन्यांत घडलेलं नाही. पण दिवाळीनंतर मराठी सिनेसृष्टीत काहीसं  वेगळं चित्र बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. ‘वजनदार’ आणि ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमांमुळे नोव्हेंबर महिना वजनदार ठरेल का, ते लवकरच कळेल.

मराठी चित्रपटांसाठी २०१६ हे वर्ष फारसं लाभदायक नाही असंच दिसतंय. वर्षांतील दहा महिने संपले तरी ‘नटसम्राट’ आणि ‘सैराट’ हे दोन बॉक्स ऑफिस हिट आणि ‘रंगा’, ‘पतंगा’, ‘वायझेड’ अशा काही बऱ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर थोडेफार यश मिळवलेले चित्रपट सोडले तर फार काही हाताला लागलेलं नाही. किंबहुना प्रयत्न बरेच झाले. ‘अ‍ॅण्ड जरा हटके’, ‘एक अलबेला’, ‘लाल इश्क’ अशी काही नावं घेता येतील. पण सध्यातरी या वर्षांतील दहा महिने केवळ कोरडेच म्हणावे लागतील. अर्थात चित्रपटांची संख्या काही कमी झालेली नाही. या पाश्र्वभूमीवर दसऱ्यानंतर आलेल्या ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ आणि ‘फॅमिली कट्टा’ या दोन्ही चित्रपटांकडून फार अपेक्षा होत्या. पण त्यादेखील पूर्ण होऊ शकल्या नाहीत. २०१५च्या दिवाळीत चक्क दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि त्यांनी चांगला व्यवसायदेखील केला होता. यावर्षी भर दिवाळीत आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘शिवाय’ या दोन हिंदी चित्रपटांमुळे मराठीने हे धाडस केलेले नाही. पण दिवाळीनंतरच्या शुक्रवारी म्हणजे चार नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘व्हेंटिलेटर’कडून अपेक्षा ठेवता येतील. प्रियंका चोप्रासारखी हिंदीतली अभिनेत्री थेट मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरली असल्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. नोव्हेंबरमध्ये यानंतर ‘वजनदार’ सोडल्यास फार काही आशा नाहीत.

‘वजनदार’मुळे पुन्हा एकदा सचिन कुंडलकरांनी काय नवीन प्रयोग केला आहे याकडे अनेकांचे लक्ष आहे. १० वर्षांत आठ चित्रपट या संयत वेगाने नवनवीन प्रयोग करण्यात कुंडलकरांचा हातखंडा राहिला आहे. प्रत्येक प्रयोगात त्यांना यश मिळालेच आहे असे नाही. कुंडलकरांच्या चित्रपटाचं वैशिष्टय़ सांगायचे तर त्यांचे विषय नेहमीच्या पठडीतील स्टोरी मटेरियलपेक्षा वेगळा ट्रॅक पकडणारे असते. कधी कधी ते उच्चभ्रू वर्गाशी निगडित असते तर कधी मध्यमवर्गीयांशी निगडित. तो शेतावरचा किंवा जातव्यवस्था वगैरे भाष्य करणारा नसतो. पण ते जे मांडतात त्यात व्यावसायिकता असते. त्यामुळे केवळ विषय मांडायचा म्हणून ते मांडले जात नाहीत. मागील वर्षी आलेल्या ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’मधून हे अगदी ठळकपणे जाणवले होते.

११ नोव्हेंबरला येणाऱ्या ‘वजनदार’मधून त्यांनी असाच एक वेगळा विषय हाताळला आहे. हा चित्रपट सध्या चर्चेत आहे तो पोस्टरवर दिसणाऱ्या सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या लठ्ठ व्यक्तिरेखांमुळे. हे असे विषय ठरवून हाताळले जातात की कसे याबद्दल सचिन कुंडलकर सांगतात की, त्यांच्या चित्रपटाच्या कथा ते स्वत:च लिहीत असतात. त्यांना आजूबाजूला येणाऱ्या अनुभवावर ती कथा बेतलेली असते. पण आजवर त्यांनी कधीच स्वत:ची कथा लिहिलेली नव्हती. म्हणजे थेट वैयक्तिक अशी कथा. गेली काही वर्षे इतरांच्या कथा लिहिल्यानंतर त्यांना आपली कथा लिहावीशी वाटली. पण ती कंटाळवाणी न करता विनोदाच्या अंगाने खुसशुशीतपणे सांगितली तर लोकांपर्यंत पोहोचणे सोपे जाते. कुंडलकरांनी हेच सूत्र पकडल्याचे ते सांगतात.

हल्ली सुंदर दिसण्याचा, स्लिम, ट्रीम दिसण्याचा काळ आला आहे. पण आपण फिट आहात का याबद्दल फारशी काळजी कोणालाही नसते असे कुंडलकर सांगतात. या सुंदर दिसण्याच्या नादात पाश्चिमात्यांच्या मापात तुम्ही नसाल तर जगायलाच लायक नाही आहात असा ग्रह झाला आहे.

वजनदार ही दोन मध्यमवर्गीय मैत्रिणींची गोष्ट आहे. पण त्या मुंबई, पुणे अथवा इतर मध्यम शहरातील नाहीत. त्या आहेत पाचगणीतल्या. एक गृहिणी आणि दुसरी सॉफ्टवेअर इंजिनीअर. पाचगणी आणि दोन मैत्रिणी हे समीकरण मुद्दामच निवडले आहे. कारण पुरुषांपेक्षा स्त्रियाच या दिसण्याच्या समजाला बळी पडतात. आणि पाचगणी हे तेथील डोंगराळ भागामुळे जाणीवपूर्वक निवडले आहे. कथानकाबद्दल कुंडलकर सांगतात की, अनेक ठिकाणी अगदी शाळा-कॉलेजमध्येदेखील अनेक वेळा या दिसण्यावर मुलामुलींना कार्यक्रमात वगैरे प्राधान्य दिले जाते. शाळेत पाहुणे आले की गोरी, उंच, सुंदर मुलंमुलींनाच स्वागतासाठी पुढे केले जाते. अशा वेळी जाडय़ा मुलांना कसलाच वाव नसतो. अशांना तू चांगला दिसतोस किंवा दिसतेस, कुटुंबात तुझं काय स्थान आहे हे सांगणारं कोणीच नसते. हे कोण सांगणार हेच मांडणारी हा चित्रपट आहे. समाज तुमची चेष्टा करायला लागला की तुम्हीच स्वत:ची चेष्टा करायला लागता. आपण स्वत:ची चेष्टा करायची नाही. आपण चांगले आहोत, आपण फिट आहोत याकडे आपले लक्ष हवे. बारीक माणसांनादेखील फिट असणे गरजेचे असते. या साऱ्या कथानकावर हा चित्रपट बेतला असला तरी तो विनोदी खुसखुशीत असा कौटुंबिक अंगाने जाणारा असल्याचे कुंडलकर सांगतात.

कुंडलकर स्वत: याबद्दल आपला अनुभव सांगतात की आजवर त्यांना वजन कमी करायला सांगितले, ना ते कसे करू शकतो याबाबत चांगला सल्ला दिला. त्यांना चेष्टेलाच तोंड द्यावे लागले. फिटनेसतज्ज्ञ शैलेश परुळेकर तुलनेने त्यांच्या आयुष्यात खूप उशिरा आले.

‘वजनदार’चे कथानक अशा वेगळ्या अंगाने जाणारे प्रयोगशील असल्यामुळे कलाकारांनादेखील पडद्यावरील मेहनतीपेक्षा जरा अधिक मेहनत घ्यावी लागली आहे. ती म्हणजे वजन वाढवण्यासाठी. या वजन वाढवण्याबद्दल सचिन कुंडलकर चेष्टेने सांगतात की, वजन वाढवणे म्हणजे काही खायचे काम नाही असं व्याख्यानच आता द्यावे लागेल. अर्थातच या सिनेमामुळे ही चर्चा अपेक्षितच आहे. चित्रपटासाठी प्रिया बापटने १६ किलो तर सई ताम्हणकरने १२ किलो वजन वाढवले होते. याबद्दल ते पुढे सांगतात की, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखालीच काम करावे लागते. प्रिया ही पुरीसारखी फुगायला हवी होती, तर सई ही गृहिणी असल्यामुळे तिच्या पोटावर वळ्या दिसण्याची गरज होती. प्रियाने शैलश परुळेकर यांच्या तर सईने अब्बास या फिटनेस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले आहे. सचिन सांगतात की या वजन वाढवण्याच्या प्रक्रियेत कंटाळा येईल एवढे खावे लागते. पण त्याच वेळी वाढणाऱ्या वजनाचे अनावश्यक चरबीत रुपांतर होऊ नये म्हणून नियमित व्यायामाची गरज असते. या सर्व काळात म्हणजे जवळपास आठ-दहा महिन्यांच्या कालावधीत या दोघींनी नवीन चित्रपट, जाहीर कार्यक्रम स्वीकारले नव्हते. दोन महिने वजन वाढवायला, दोन महिने चित्रीकरणाचे आणि वजन वाढवण्यासाठीच्या काळाच्या तिप्पटीने म्हणजेच सहा महिने वजन कमी करायला द्यावे लागले.

थोडक्यात काय तर मराठीने प्रयोगशीलता जोपासत हा चित्रपट साकारलाय म्हणावे लागेल. दोन बऱ्यापैकी जाडय़ा नायिकांना मध्यवर्ती ठेवणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरच्या अखेरीस प्रदर्शित होणारा ‘भय’ हा सध्या चर्चेत आहे तो त्याच्या झगमगाटी म्युझिक लाँचमुळे आणि त्यावेळी हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि अरेबिक भाषेत प्रदर्शित केला जाईल या घोषणेमुळे. म्युझिक लाँच वेळी बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि सोहेल खान यांची उपस्थिती हेदेखील विशेष म्हणावे लागेल. प्रत्येक माणसाच्या मनात एक भीती दडलेली असते. या भीतीचाच वापर कथानकात मध्यवर्ती करण्यात आला आहे. राहुल भातणकर यांच्या दिग्दर्शनाखाली अभिजीत खांडकेकर, सतीश राजवाडे, उदय टिकेकर, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे अशी कलाकारांची फौज यामध्ये आहे. चित्रपटातली गाणी एकदम हटके असून क्रुझ, हेलिपॅड, दुबईतील गगनचुंबी इमारतींच्या पाश्र्वभूमीवर ही गाणी चित्रित झाली आहेत त्यामुळे काहीसा वलयांकित असा हा विषय म्हणायला हरकत नाही. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात आक्रंदन हा चित्रपट प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. तर दिवाळीनंतर ‘फॅमिली’ हा विनोदी ढंगाचा चित्रपट येऊ घातलाय. सध्यातरी त्याची प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मध्ये काही दिवस आलेली मरगळ झटकली जाण्याची शक्यता आहे ती ‘फुगे’ या चित्रपटामुळे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे या जोडगोळीमुळे या चित्रपटात काहीतरी वेगळं पाहायला मिळण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. स्वप्ना वाघमारे जोशी या दिग्दर्शिकेच्या ‘फुगे’च्या कथानकाबाबत चर्चा नसली तर सध्या तरी स्वप्नील आणि सुबोध या दोघांच्या लुकमुळे बरीच उत्सुकता ताणली गेली आहे. ‘फुगे’ हे शीर्षकगीत नुकतेच रिलिज करण्यात आले, तेव्हा फुग्यांच्या सान्निध्यात या दोघांनी भरपूर धम्माल केली होती. विशेष म्हणजे गेले दोन वर्षे बराचसा गंभीर भूमिका करणारा म्हणून झालेली सुबोध भावेची इमेज या चित्रपटात एकदम वेगळ्याच वळणावर जाणारी आहे. एकदम स्वच्छंदी असा तरुण सुबोध यातून दिसणार आहे. दोन डिसेंबरला हा ‘फुगे’ प्रदर्शित होत आहे.

काही नव्या चित्रपटांचे मुहूर्त होत आहेत. मागील आठवडय़ात महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांच्या भावविश्वावर आधारित ‘वळण’ या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. महाविद्यालयीन जीवनाच्या वळणावर घडणाऱ्या गोष्टींमुळे मुलांचं आयुष्य जसं घडू शकते तसेच बिघडूदेखील शकते. हाच विचार या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न आहे. पण नेमके वळण कोणते हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे. नेहमीच्या महाविद्यालयीन जीवनापेक्षा काहीतरी वेगळं येथे पाहायला मिळेल हे मात्र निश्चित. शिवा त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनाखाली मोहन जोशी, वर्षां उसगावकर, ॠतुराज फडके, पंकज, विष्णू, जैमिनी आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी घोषणा झालेल्या दोन चित्रपटांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक म्हणजे ‘रायबा’ हा चित्रपट आणि दुसरा ‘अ‍ॅडल्टस ओन्ली’. गॉडफादर ही कादंबरी आणि त्या कथानकाशी साम्य असणारे जगभरातील जवळपास ८० भाषांतून चित्रपट तयार होणं हे या मूळ कथानकाचं गारुड म्हणता येईल. आता थेट हेच कथासूत्र घेऊन ‘रायबा’ हा मराठी गॉडफॉदर येत आहे. ‘रायबा’मध्ये गॉडफादरचा गाभा घेण्यात आला आहे, पण कथा भारतीय आहे. एका शेतकऱ्यांच्या मुलाचा डॉन होण्याचा प्रवास यातून मांडला जाणार आहे. महाराष्ट्राच्या पाश्र्वभूमीवर घडणारे हे कथानक असणार आहे. ‘रायबा’ची कथा मिलिंद कवडे यांनी लिहिली असून तेच दिग्दर्शक आहेत. तर ‘अ‍ॅडल्टस् ओन्ली’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मिलिंद कवडे यांनी आयफोन सिक्सचा वापर करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. दरम्यान आयफोन सेव्हन हे मॉडेल बाजारात दाखल झाल्यामुळे आता याच चित्रपटाचे चित्रीकरण आयफोन सेव्हनवर होणार आहे. नोव्हेंबर अखेरीस हे चित्रीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे.

तूर्तास सध्यातरी साऱ्या अपेक्षा ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘वजनदार’वरच आहेत. त्यामुळे हा वजनदार महिना काय करतो हे पाहावे लागेल.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2

First Published on November 4, 2016 3:04 pm

Web Title: year 2016 for marathi movies sairat vajandar ventilator and other marathi movie
Next Stories
1 समाजातील बदलांवर भाष्य
2 नाही भव्य-दिव्य तरी…
3 झगमगाट आणि नवीन प्रयोग
Just Now!
X