04 August 2020

News Flash

मीठे वचनसे सुख उपजे

तुलसीदास म्हणतात असं बोलावं की आपल्याला आनंद होईल तसंच आपलं बोलणं ऐकून दुसराही आनंदित होईल.

‘तुलसी मीठे वचनसे सुख उपजे चहू ओर’
तुलसीदास म्हणतात असं बोलावं की आपल्याला आनंद होईल तसंच आपलं बोलणं ऐकून दुसराही आनंदित होईल. मनापासून केलेलं कौतुक आपल्याला, तसंच ज्याचं कौतुक होतं, त्यालाही आनंद देऊन जातं.
हॉलीवूडची प्रसिद्ध चित्रतारका गेट्रा गाबरे ही पंधरा सोळा वर्षांची असताना एका सलूनमध्ये कामाला होती. घरची गरिबी असल्यामुळे तिचे कपडेही अगदी सामान्य असत. एकदा ती कामावर असताना, हॉलीवूडचा एक सिनेमा दिग्दर्शक त्या सलूनमध्ये आला. ही मुलगी त्याचे केस कापत असताना, तिच्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहून, तिला उद्देशून म्हणाला, ‘‘मुली, तू किती सुंदर आहेस’’ हे शब्द ऐकून ती मुलगी पुन्हा पुन्हा आपले रूप आरशात पाहू लागली. आपण सुंदर आहोत हे पहिल्यांदा तिला समजलं, त्या सिनेदिग्दर्शकाने तिला आपल्याबरोबर हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत आणलं, ही मुलगी आपण अधिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करू लागली. सिने दिग्दर्शकाचे शब्द तिला उमेद देऊन गेले. या उलट काही माणसं खूप कठोर बोलतात, असं बोलणं ऐकून मन निराशेनं खचून जातं.
कबीर म्हणतो, ‘शब्द शब्द सब कोई कहे, शब्द के हात न पाव, एक शब्द औषधी करे एक शब्द करे घाव’ दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला, त्यावेळी काही युद्ध कैद्यांना फाशी
देण्याऐवजी मानसिक खच्चीकरणाने, मृत्यू होतो का, याचे संशोधन करण्यासाठी, काही युद्धकैदी अमेरिकेने आपल्या ताब्यात घेतले. या कैद्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून, त्यांना एका खुर्चीवर बसवले. त्यानंतर, त्यांच्या हाताच्या शिरेत सुई टोचली, प्रत्यक्षात रक्त न काढता, त्यांना फक्त, तुझ्या शरीरातले रक्त आता कसे कमी होत आहे, हे सांगायला सुरुवात केली. हळूहळू, हे बोलणे ऐकून ते युद्धकैदी मनाने खचत गेले आणि काही तासांनी खरोखरच त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष रक्त न काढताच, केवळ कल्पनेने रक्तस्रावाचा अनुभव घेऊन, ते मृत्युमुखी पडले.

– माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2016 1:25 am

Web Title: alway talk and think positive
Next Stories
1 .. फळभारे वृक्ष लवे
2 स्वत:ची कीव करू नका
3 लहानपण देगा देवा
Just Now!
X