30 March 2020

News Flash

शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा

यानंतर गावोगावी भागवत धर्माचा प्रसार करीत ही भावंडं नेवाशाला आली.

प्रत्येक जीवात अविनाशी ब्रह्म आहे, आत्मा आहे, हे पैठणच्या ब्रह्मवृंदाला मान्य होत नव्हतं. संन्याशाची मुलं म्हणून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची मुंज करायला त्यांनी नकार दिला. सगळीकडे एकच चैतन्य, एकच ब्रह्म भरून राहिले आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानोबांनी रेडय़ाला वेदघोष करायला सांगितलं. या प्रसंगाचं वर्णन करताना एकनाथ महाराज लिहितात, ‘रेडय़ामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा..’ या ज्ञानोबांवर सर्व संतांनी, सर्व महाराष्ट्राने खूप प्रेम केले. पैठणचा ब्रह्मवृंद या प्रसंगानंतर  ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांना शरण गेला.

यानंतर गावोगावी भागवत धर्माचा प्रसार करीत ही भावंडं नेवाशाला आली. येथील प्रवरा नदीत स्नान केल्यानंतर नेवाशाला महादेवाच्या मंदिरात ही भावंडे आली. इथे निवृत्तिनाथांच्या आज्ञेवरून ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरील भाष्य, म्हणजे ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. अमृतानुभव, अनेक अभंग, गौळणी, पसायदान कीर्तन जे जे शक्य होत ते केल्यानंतर ज्ञानोबांनी समाधी घेण्याचे ठरवले. त्या वेळी निवृत्तिनाथांच्या मनाची अवस्था नामदेवांनी अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत लिहिली,

निवृत्ती देव म्हणे करिता समाधान,

काही केल्या मन राहत नाही,

बांधल्या तळ्याचा फुटला असे पाट,

ओघ बारा वाट मुरडताती..

माय बापे आम्हा त्यागीयेले जेव्हा,

ऐसे दु:ख तेव्हा झाले नाही ..

आईवडील गेले त्या वेळीही इतके दु:ख झाले नाही, एवढे माझा ज्ञाना आता दिसणार नाही म्हणून दु:ख होते आहे. निवृत्तिनाथ एवढे ज्ञानी, तरीदेखील त्यांना शोक आवरत नव्हता. खरोखर ज्यांच्यावर आपले खूप प्रेम असते त्यांचा वियोग सहन करणे किती कठीण आहे नाही का? एकदा माणूस पंचत्वात विलीन झाला की, पुन्हा त्याचे दर्शन नाही. भक्ती आणि उपासना हाच दु:ख कमी करण्याचा मार्ग आहे, हेच संत सांगतात.

-माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2016 1:05 am

Web Title: dnyaneshwar mauli abhang
Next Stories
1 पंढरीचा महिमा
2 घेई कान्होपात्रेस हृदयास..
3 नाचती वैष्णव भाई रे..
Just Now!
X