13 July 2020

News Flash

पै चराचर विनोदे पाहिजे

विनोदी अभंगांनी लोकांना अंतर्मुख ही केले.

पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे..

ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी जीवनात विनोदाचे महत्त्वही सांगितले आहे. विनोद हा आनंदी मनाचा आरसा आहे असेही ते म्हणतात. जगाकडे विनोदी दृष्टीने पाहिल्यास मनाचा क्षोभ कमी होतो. अनेक संतांनी समाजाला विनोदातून प्रबोधन केले. ‘आवा निघाली पंढरपुरा..’ अशासारख्या विनोदी अभंगांनी लोकांना अंतर्मुख ही केले. ओशोंचं एक वचन आहे. If you find a saint, who has no sense of humor, then he is not a saint at all संतांप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात चि. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी अशा अनेक लेखकांनी आपल्या विनोदी साहित्याने समाजप्रबोधन केले. आपल्या ‘हसवणूक’ या पुस्तकात, पु. ल. म्हणतात, ‘जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये पकडून नियतीने चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपल्या भोवती जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आपण आणखी काय करणार?’ विनोदाने मनावरचा ताण कमी होतो आणि हा ताण कमी झाला की आरोग्य सुधारते हे

डॉ. नॉर्मन कझीन्स यांनी स्वत:वर प्रयोग करून सिद्ध केले. हे डॉक्टर गंभीर आजारांनी त्रस्त होते. औषधोपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. बरेच दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना वाटले नकारात्मक विचारांनी प्रकृती बिघडते. तर सकारात्मक विचारांनी ती सुधारायला हवी. त्यांनी रुग्णालयात राहण्याऐवजी हॉटेलमध्ये राहून उपचार घ्यायचे नक्की केले. हॉटेलमध्ये औषधाचा भाग म्हणून रोज एक विनोदी चित्रपट पाहायचा निर्धार केला. विनोदी चित्रपटामुळे त्यांचे मन प्रफुल्लित राहू लागले. आश्चर्य म्हणजे साधारण महिनाभराने त्यांचे शरीर औषधांना प्रतिसाद देऊ लागले आणि हे डॉक्टर पूर्ण बरे झाले. Anatomy of illness या त्यांच्या पुस्तकात ही सर्व माहिती दिली आहे. आपल्याला आणि दुसऱ्यांना आनंद देणारा निर्मळ विनोद असावा हे ते आवर्जून सांगतात. मंगेश पाडगावकरांनी पु. लं. बद्दल म्हटले आहे. पु.लं. स्पर्श होताच दु:खे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली. निराशेतून माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.

 

madhavi.kavishwar1@gmail.com

माधवी कवीश्वर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2016 1:02 am

Web Title: mind stable thoughts
Next Stories
1 सोमकांतु नीज निर्झरी
2 आनंदात राहा
3 नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंग
Just Now!
X