News Flash

पायोजी मैने राम रतन धन पायो

अंतरातला श्रीकृष्ट भेटण्यासाठी मनाचा शोध घेतला पाहिजे.

श्रीकृष्णभेटीची प्रचंड आस लागलेल्या मीराबाईला, संत रईदास यांनी नामजप साधनेचा मार्ग सांगितला, त्या वेळी तिला खूप आनंद झाला. ‘राम रतन धन म्हणजे नाम रतन धन.’ मला मिळालेले हे धन कधी खर्च होत नाही, वाढतच जाते. तसेच हे धन कोणी चोरत नाही, असे ती सांगते.

हे पद खूप लोकप्रिय आहे, तथापि आपल्या अंतरातला श्रीकृष्ण भेटण्यासाठी मनाचा शोध घेतला पाहिजे. यासाठी प्रथम आपली दृष्टी बाह्य़ जगाकडे  न पाहता आपल्या आतील जग पाहण्याकडे वळवता आली पाहिजे, हे तिला संत रईदासांनी सांगितले होते. त्यावर तिचे पद – ‘मोहे लागी लगन गुरू चरनन की’. त्यात ती म्हणते, मला माझ्या गुरूच्या चरणाची ओढ आहे, कारण.. ‘मीरा के प्रभू गिरीधर नागर, उलट भयी मोरे नैन की’, माझी दृष्टी त्यांनी उलटीकडे म्हणजे अंतरंगात वळवली, त्यामुळे संसाराची भीती गेली. (सुलट दृष्टी म्हणजे बाह्य़ जगाकडे वळलेली दृष्टी) मीराबाईला रईदासांच्या मार्गदर्शनाखाली साधनेचा आनंद मिळू लागला. यानंतर आपल्या साधनेसाठी ज्या वेळी रईदास हिमालयात जायला निघाले त्या वेळी त्यांच्या पाया पडून तिने पद म्हटले.. ‘जोगी मत जा, मत जा, मत जा’. या पदातला प्रत्येक शब्द मन हेलावणारा आहे. या पदात ती म्हणते, ‘मी तुमच्या पाया पडते, मला सोडून जाऊ  नका, ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग मला दाखवा. (हमको गईल बता जा) मला न्यायचं नसेल तर चंदनाच्या चितेवर माझा देह ठेवा, त्याला अग्नी द्या व ती राख तुम्ही तुमच्या अंगाला लावा, पण मला सोडून जाऊ  नका’. (अगर चन्दन की चिता रचाऊ, अपने हात जला जा.. जल भल भई भस्म की ढेरी, अपने अंग लगा जा) पुढे ती म्हणते, माझी जीवनज्योत त्या परमज्योतीत तुम्हीच लावून द्या. माझा जीव ईश्वरात विलीन करा (मीरा के प्रभू गिरीधर नागर, ज्योत मे ज्योत मिला जा) श्रीकृष्णाच्या परमभक्तीनेच ही मेवाडची राणी संतपदाला पोचली.

 

माधवी कवीश्वर

madhavi.kavishwar1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2016 1:04 am

Web Title: payji maine ram rattan dhan payo
Next Stories
1 दया धर्म का मूल है
2 कृष्णाच्या भक्तीत मुरणारी मुरली
3 परिपूर्ण कर्म
Just Now!
X