News Flash

जेणे होय उपरती

ज्याचे वाचन केले असता अवगुण निघून जातात, सद्बुद्धी होते, अधोगती टळते, त्या पुस्तकाला ग्रंथ म्हणावे.

जेणे होय उपरती, अवगुण पालटती,
जेणे चुके अधोगती, या नाव ग्रंथ..
– समर्थ रामदास

ज्याचे वाचन केले असता अवगुण निघून जातात, सद्बुद्धी होते, अधोगती टळते, त्या पुस्तकाला ग्रंथ म्हणावे. संत एकनाथांच्या एका मुलीचं, गोदावरीचं लग्न, पैठणचे एक विद्वान चिंतामणीशास्त्री यांच्याशी झालं, परंतु शास्त्री रोज रात्री बाहेर जात. घरी थांबत नसत. त्यामुळे गोदावरी निराश असे, हे पाहून एकनाथांना फार वाईट वाटे.  एक दिवस काही विचार करून ते चिंतामणशास्त्र्यांना भेटायला आले. शास्त्रीबुवांनी आम्हाला कसलाही उपदेश करू नका म्हणून एकनाथांना सुनावले. त्यावर एकनाथ म्हणाले, ‘‘शास्त्रीबुवा, आज मी एक अतिथी बनून तुमच्याकडे आलो आहे, तुमच्याकडे एक भीक मागतो आहे. तुम्ही अतिथी धर्म जाणता, आपण रोज रात्री बाहेर जाण्यापूर्वी माझ्या मुलीला गीतेचा एक अध्याय वाचून दाखवावा एवढी एकच विनंती मी करायला आलो आहे. बाकी माझी कसलीही तक्रार नाही, एकनाथांनी त्यांना हात जोडून विनंती केली आणि ही विनंती चिंतामणशास्त्रींनी आनंदाने मान्य केली. रोज रात्री बाहेर पडण्यापूर्वी ते गीतेचा एक अध्याय गोदावरीला वाचून दाखवत. पाहता पाहता ते अंतर्मुख होऊ लागले. गीतेमधील नवव्या अध्यायाने ते विचारात पडले, ‘अपीचेत्सुदुराचारो..’ हा गीतेतला श्लोक ते पुन:पुन्हा मनात घोळवू लागले. जर एखादा अत्यंत दूर्वर्तनी माणूससुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजू लागला तर तो सदाचारीच आहे असे समजावे, असे श्रीकृष्णाचे वचन वाचून ते विचारात पडले. पाहता पाहता शास्त्रीबुवा श्रीकृष्णभक्त झाले.
त्यानंतर गोदावरी व चिंतामणशास्त्री यांना जो मुलगा झाला तो म्हणजे मुक्तेश्वर. मुक्तेश्वराने रामायण, महाभारत, भागवत यावर सुंदर काव्ये केली. मराठीमधील महान ग्रंथकार म्हणून मुक्तेश्वरांना मान मिळाला. भगवद्गीता या गं्रथाचा मोठा चमत्कार चिंतामणशास्त्री यांच्या जीवनात दिसून येतो.

– माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 1:04 am

Web Title: samarth ramdas shlok
Next Stories
1 मीठे वचनसे सुख उपजे
2 .. फळभारे वृक्ष लवे
3 स्वत:ची कीव करू नका
Just Now!
X