अति लीनता सर्व भावे स्वभावे,
जना सज्जनालागी संतोषवावे
– समर्थ रामदास

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती, ए पी जे अब्दुल कलाम एक अत्यंत श्रेष्ठ वैज्ञानिक, मानवतेचे पुजारी होतेच, परंतु लीनता हा त्यांच्या स्वभावाचा फार मोठा गुण होता. तमिळनाडूतील रामेश्वरम् येथे एका गरीब मुस्लीम कुटुंबात जन्म घेतलेले कलाम मोठय़ा कष्टाने एरो स्पेस इंजिनीअर होतात, विक्रम साराभाई यांच्याबरोबर ‘इस्रो’मध्ये काम करून भारताचा पहिला उपग्रह अंतराळात पाठवितात, हे त्यांचे फार मोठे यश होते.
अत्यंत विनम्र स्वभावाच्या कलाम यांना कुठल्याच यशाचे पुरस्काराचे अप्रूप वाटले नाही तसेच एकच ईश्वरी तत्त्व सर्व जगात भरून राहिले आहे यावर त्यांचा विश्वास होता. २००२ मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर २००३ मध्ये ते आळंदीला विश्वशांती केंद्राला भेट द्यायला गेले होते. त्या वेळी त्यांच्या सन्मानासाठी खूप कार्यकर्ते जमा झाले होते. कलाम ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेणार हे ठरलेले होते म्हणून समाधीच्या समोरील पायऱ्यांवर कलाम यांच्यासाठी फुलांच्या पायघडय़ा घातल्या होत्या. फुलांच्या पायघडय़ांवरून चालण्यास त्यांनी नकार दिला. सुगंधी, रंगीत, नाजुक फुले ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. त्यांना आपल्या पायाखाली तुडविणे योग्य नाही, असे म्हणून पायघडय़ाच्या बाजूच्या रिकाम्या जागेवरून ते ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी आले. समाधीला फुले वाहिली. विश्वशांती सभागृहातील कामकाज संपल्यावर त्यांचे भाषण झाल्यावर त्यांनी ज्ञानेश्वरीतील पसायदानाचा अर्थ समजावून घेतला. या जागेत आपल्याला ईश्वरी सत्तेची जाणीव झाली, असे त्यांनी तेथील अभिप्रायाच्या वहीत लिहून ठेवले.
एकनाथांनी म्हटलं आहे, ‘वृक्षा फळे येती अपारे, फळभारे वृक्ष लवे’ भरपूर फळे आलेलं झाड, खाली लवतं, म्हणजे जणू नम्र होतं. ‘लीनता अखंड जयापाशी, तेथे ठाव नाही क्रोधासी,’ असेही समर्थानी सांगितले आहे.

माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com