06 July 2020

News Flash

भंगावे ना कदा समाधान

सर्व जगावर ईश्वराची सत्ता आहे, या सत्तेबाहेर कोणीही जाऊ शकत नाही

राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान
हाची निरोप गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान
श्री गोंदवलेकर महाराजांच्या मालाडमधील मठात पू. कै. के. वी. बेलसरे यांनी ६६ वर्षे ज्ञानेश्वरीवर निरूपणे केली. या निरुपणात ते म्हणत, ‘श्री महाराजांनी नामजप साधनेबरोबर जीवन कसे समाधानात जगावे, हे सांगितले, त्यांचा निरोप मी तुम्हाला देत आहे’ जीवन समाधानाने जगण्यासाठी, या जगावर ईश्वराची सत्ता आहे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे, हे श्रोत्यांच्या मनावर ठसण्यासाठी, ते तुकाराम, ज्ञानेश्वर, नानक, समर्थ रामदासस्वामी अशा संतांच्या वचनांचा संदर्भ देत. ते ज्ञानेश्वरीची एक ओवी समजावून सांगत.
‘माळीये जेउते नेले, तेउते निवांतची गेले तया पाणिया ऐसे केले होआवे गा’
ईश्वर हा माळी आहे, जग हे उद्यान आहे, इथे व्यवस्था आहे, माळी जिकडे नेईल, तिकडे पाणी विनातक्रार जाते, शांतपणे जाते, तसे आपले जीवन विनातक्रार असावे, आपले जीवन कसे जावे, हे ठरलेले आहे, तक्रार करायची नाही, असे ते पुन्हा पुन्हा सांगत. सूफी संतांच्या रचना त्यांना फार आवडत. ते म्हणत, ‘प्रापंचिक माणूस, बाह्य़ जगाच्या नादी लागतो, वासना, इच्छा तृप्त होण्यासाठी धडपडत असतो, पण त्यातून त्याला कधीही समाधान मिळत नाही, समाधान मिळविण्याचा मार्ग आपल्या मनात आहे, मनाने ईश्वराची संगत धरावी. गुरू नानकांचे एक वचन ते अनेक वेळा सांगत
‘हुक्म खुदामे दुनिया सारी,
हुकूमसे बाहर कोई नही
हुक्म खुदाका समझे नानक,
आपने हू मै आप मिटाये’
सर्व जगावर ईश्वराची सत्ता आहे, या सत्तेबाहेर कोणीही जाऊ शकत नाही. ज्याला ईश्वराची सत्ता मान्य आहे, त्याचा अहंकार आपोआप जातो, अहंकार गेला की आपल्यातील दिव्य शक्तीची जाणीव होते, ही जाणीव झाल्यानंतर प्रत्येक दिवस आनंददायी वाटू लागतो, जीवनात प्रत्येकालाच आनंदच तर हवा असतो.

माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2016 1:05 am

Web Title: spiritual articles by loksatta chaturang
टॅग Chaturang,Guru
Next Stories
1 ..सर्वाचे मूळ गृहस्थाश्रम
2 चाह गयी चिंता गयी
3 बडा हुआ तो क्या हुआ
Just Now!
X