24 May 2020

News Flash

कवित्व शब्द सुमन माळा

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही...

दासबोधात रामदास स्वामींनी काव्य कसं असावं या संबंधी मार्गदर्शन केलं आहे. त्यात ते म्हणतात,

कवित्व शब्द सुमन माळा,

अर्थ परिमळ आगळा..

शब्दरूपी फुलांची माळा म्हणजे काव्य होय. त्या फुलांचा सुंदर सुगंध म्हणजे कवितेचा अर्थ होय. त्याच प्रमाणे कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्प रुपे.. असेही ते सांगतात. कविता लहान, समजायला सोपी असावी. आपल्या महाराष्ट्रात प्रगल्भ प्रतिभेचे कितीतरी कवी होऊन गेले, कितीतरी कवी आहेत. अगदी थोडय़ा शब्दात, कवितेचा आविष्कार, आभाळतील विजेसारखा चमकून जातो अशीच अगदी लहान परंतु अर्थवाही अशी कवी कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता म्हणजे ..

‘पाऊल चिन्हे’ एका रात्री गच्चीत निवांत बसलेल्या कुसुमाग्रजांच्या मनात विचार येतो खरंच या जगात देव आहे का? सहज त्यांची नजर आकाशाकडे जाते, आकाश चांदण्यांनी चमकत असतं, ते त्या ताऱ्यांना विचारतात, तुम्ही सर्व विश्वात फिरत असता, तुम्ही तरी देव पाहिला आहे का?

मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुशिले,

परमेश्वर नाही, घोकत मम मन बसले,

परी तुम्ही चिरंतन या विश्वातील प्रवासी,

का चरण केधवा, तुम्हास त्याचे दिसले?

त्यावर त्या चांदण्या कवीला उत्तर देतात..

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही,

तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही,

उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे,

त्यांनाच पुसशी तू, तो आहे किंवा नाही?

अरे वेडय़ा, सबंध विश्वात तो ईश्वर फिरत असतो. आम्ही चांदण्या म्हणजे त्या ईश्वराच्या पावलांचे ठसे आहोत. त्याच्या अस्तित्वाचा, आणखी दुसरा कुठला पुरावा हवा?

अगदी थोडय़ा शब्दात, कवी कुसुमाग्रजांनी, किती सुंदर ईश्वर निष्ठा काव्यातून लिहिली आहे. अशी काव्ये म्हणजे, त्यांना मिळालेला ईश्वराचा प्रसादच, नाही का?

 

माधवी कवीश्वर

madhavi.kavishwar1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2016 1:05 am

Web Title: suman mala
Next Stories
1 मुझसे बुरा न कोय
2 गोरूवे बैसली रुखा तळी
3 अवघाची संसार सुखाचा करीन
Just Now!
X