मालिकेच्या ठरलेल्या गणितांमध्ये आता आजी या पात्राची भर पडतेय. सध्या काही मालिकांमध्ये आजी ही व्यक्तिरेखा प्रकर्षांने दिसून येतेय. पण, या आजीचं रूप वेगळं आहे. आजच्या पिढीला समजून, सांभाळून घेणारी आजी विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

मालिकांची बांधणी कशी एकदम ठरलेली असते ना. एक कुटुंब. त्यातल्या तरुण मुलाची किंवा मुलीची कहाणी. बहुतेकदा ती मुलीचीच कहाणी असते. पण, असो. तर अशा या कहाणीसाठी आजूबाजूची मंडळीही भक्कमच हवी. त्यामुळे कुटुंबाच्या इतर सदस्यांनाही महत्त्व दिलं जातं. यात आई-वडील, भाऊ-बहीण तर असतातच. शिवाय कुटुंब मोठं दाखवायचं असेल तर काका, काकू, चुलत भावंडं वगैरे गोतावळाही असतो. हिंदी मालिकांमध्ये तर कुटुंब वाढण्याला काही मर्यादाही नसतात. पण, मराठीत तसं प्रकरण आटोक्यात असतं. सध्या मराठी मालिाकांमध्ये कुटुंबाच्या इतर गोतावळ्यात हमखास बघायला मिळतेय ती आजी. अनेक मालिकांमध्ये त्यांचं फक्त ‘दिसणं’ नाही तर ‘असणं’ही अनुभवायला मिळतंय.

आजी म्हटलं की जुने विचार, वागण्याची जुनी पद्धत, रीतभात, परंपरा वगैरेची भाषणं देणारी असं सगळं डोळ्यांसमोर येतं. पण, मालिकांनी मात्र या सगळ्याला छेद दिला आहे. ‘नांदा सौख्य भरे’, ‘किती सांगायचंय मला’, ‘काहे दिया परदेस’, ‘येक नंबर’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘पुढचं पाऊल’ या मालिकांमध्ये आजी या पात्रामुळे गंमत येतेय. मालिकांचे विषय गंभीर, सामाजिक, राजकीय वगैरे असले तरी आजीमुळे मालिकेत खुसखुशीतपणा येतोय. या सगळ्या मालिकांमधली आजी फार आधुनिक नसली तरी आधुनिकतेचा स्वीकार करणारी आहे. इतर वेळी सासू-सुनेचा ड्रामा, कटकारस्थानं, कुरघोडी असं सगळं दाखवणाऱ्या वाहिन्या आजीच्या बाबतीत मात्र नरम झाल्यासारख्या वाटतात. हे चांगलंच आहे. असं दाखवल्यामुळेच या मालिकांच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एका प्रसंगात तरी आजी असावी अशी छुपी इच्छा प्रेक्षकांची आहे.

आजी म्हटलं की काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधली माई आजी आठवतेय. काय आठवतेय ना? विसरण्यासारखी नाहीच ती. चॉकलेट लव्हर असलेल्या त्या आजीचं पात्र मालिकेत उठून दिसायचं. अशीच एक आजी सध्या एका नव्या मालिकेत धमाल आणते. झी मराठीच्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतली आजी. कुटुंबापासून लांब एकटं राहणाऱ्या मुलांना डबे करून देणे हे तिचं काम. ते ती आवडीने करते. ती तिच्या जावयाच्या घरात राहते. पण, जावयाच्या घरात राहताना संकोच करणाऱ्या सासूंपैकी ती बिलकूलच नाही. तिला एखादी गोष्ट पटली की ती तिचं मत देते आणि पटली नाही की स्पष्ट सांगते. तिच्या भाषेत गोडवा आहे. आजी आणि तिचा जावई यांच्यात चाललेलं शीतयुद्ध हा तर गमतीचाच एक भाग आहे. तर अशी ही ‘काहे दिया..’मधली आजी थोडय़ाच दिवसांत लोकप्रिय झाली आहे. शुभांगी जोशी या अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी मालिकेत दिसत असून त्यांनी साकारलेली आजी जमून आली आहे.

जुन्या काळातली नऊवारी साडी, डोक्यावर पदर, कपाळावर भलं मोठं कुंकू अशी आजीबद्दलची प्रतिमा तयार होते. पण, मालिकेतली आजी आता या पलीकडे गेली आहे. काही मालिकांमध्ये जरी ती नऊवारी साडीत दिसत असली तरी तिचे विचार मात्र आजच्या पिढीशी जमवून घेणारे आहेत. कलर्स मराठीची ‘किती सांगायचंय’ या मालिकामधील आजी तशीच काहीशी. नऊवारी साडीत परंपरा, कुटुंब, रूढी यांना महत्त्व देणारी, नोकरी करणाऱ्या नातसुनेकडून कुटुंबाला सांभाळून घेण्याची अपेक्षा ठेवणारी आजी असली तरीही त्याच नातसुनेला सांभाळून, समजून घेणारीही ती आहे. मुळात आधुनिक विचार स्वीकारणारी आहे. नातवाला मैत्रीण असू शकते, तो तिच्याशी बराच वेळ बोलू शकतो अशा अनेक गोष्टी ती आजी सहज स्वीकारते. कुटुंबप्रमुख म्हणून या आजीला महत्त्व आणि आदराचं स्थान आहे. सविता मालपेकर यांनी वठवलेली आजी रुबाबदार पण, तितकीच प्रेमळही आहे.

मालिका हॅपनिंग बनवायची असेल तर त्यात सगळंच हवं. प्रेम, रुसवे, फुगवे, भांडणं, कारस्थानं, ड्रामेबाजी वगैरे या सगळ्यालाच इथे फुल डिमांड! म्हणूनच सासू-सुनेचं कुरबुरीचं तर कधी प्रेमाचं नातं इथे दाखवलं जातं, नायक-नायिकेतलं भांडणं, प्रेम दिसतं, गैरसमजांमुळे कुटुंबात दुरावा निर्माण होतो, एखादा ट्विस्ट येऊन मालिकेचं कथानकच फिरतं; अशा अनेक घडामोडी मालिकेत होत असतात. त्यात मालिकेतली पात्र गंमत आणणार असतील तरी दुधात साखरच! म्हणूनच साहाय्यक व्यक्तिरेखांनाही मालिकेत महत्त्व असतं. म्हणून ‘नांदा सौख्य भरे’मधली वच्छी आत्या लोकप्रिय झाली. तर ‘अस्सं सासर सुरेखबाई’मध्ये विभा ही व्यक्तिरेखा महत्त्वाची झाली आहे. तर अशाच साहाय्यक व्यक्तिरेखांमध्ये आता आजी दिसू लागली आहे. आजी म्हटलं की आणखी एका मालिकेचा उल्लेख करावासा वाटतो. ‘होणार सून मी हय़ा घरची’ या मालिकेचा. यातल्या आई-आजीची लोकप्रियता तुफान होती. इथेही आई-आजी कुटुंबप्रमुख म्हणूनच दाखवल्या होत्या.

उपदेशाचे डोस पाजणारी हमखास व्यक्ती म्हणजे आजी, असं गमतीने अनेक जण म्हणतात. ‘हे असं करावं’, ‘अशी पद्धत आहे आपली’, ‘परंपरा जपावी’ अशा एक ना अनेक सूचनावजा उपदेश आजी करत असते. पण, मालिकांमधल्या आजी यापैकी फारसं काही करताना दिसत नाहीत. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे. मालिकांमधल्या आजी वेगळ्या आहेत. इतर पिढय़ांना समजून घेणाऱ्या, समजवून सांगणाऱ्याही आहेत. स्टार प्रवाहच्या ‘येक नंबर’ या मालिकेतली आजी म्हणजे बायजीमध्ये हा गुण प्रकर्षांने दिसून येतो. नातसुनेला ती खूप सांभाळून घेते. नातसुनेला काही अडचणी, संकटं असतील तर ते सोडवण्यासाठी ती तिला मदतही करते. सासू-सुनेचं नातं हा मालिकेतला केंद्रबिंदू मानला जायचा. आता हे चित्र थोडंसं बदलत असलं तरी काही मालिकांमध्ये आजही या नात्यातल्या कुरबुरी दिसतातच. ‘येक नंबर’मध्ये मात्र नातसून आणि सासू यांचं नातं प्रेमाचं आहे. प्रॅक्टिकल विचारांची बायजी अर्चना पाटकर यांनी उत्तम साकारली आहे. ही बायजी मालिकेत भाव खाऊन जाते.

सध्याचा मालिकांचा हमखास प्रेक्षकवर्ग म्हणजे गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांमध्येही आजींची संख्या जास्त असते. त्यामुळे या आजी मंडळींचा डेली सोप्समध्ये अक्षरश: जीव अडकलेला असतो. कोणत्या मालिकेत काय घडतंय, कोणत्या मालिकेत काय घडण्याची शक्यता आहे, कोणत्या मालिकेत कोणत्या प्रसंगाला कोण कोणाला काय म्हणाले अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे संदर्भासह स्पष्टीकरणासह तयार असतात. अशीच एक आजी बघायला मिळते ‘नांदा सौख्य भरे’मध्ये. ही आजीही नऊवारी साडीतलीच. पण, विचारांनी आजच्या पिढीसोबत चालणारी, त्यांना समजून घेणारी. या मालिकेतली आजी संध्याकाळी सात वाजले की, टीव्हीचा रिमोट घेऊन बसते. रागिणी सामंत या अभिनेत्रीने साकारलेली आजी गोड आहे. प्राइम टाइमचा एक हक्काचा प्रेक्षक या आजीत दिसतो. केवळ प्राइम टाइमच नाही तर सकाळचा भविष्याचा कार्यक्रमही ही आजी आवर्जून बघते. फक्त टीव्ही बघते म्हणून ती आधुनिक विचारांची आहे असं नाही. तर मालिकेत विविध प्रसंगांमधून तसं दाखवलं जातं. एका पिढीचे विचार पूर्णपणे बदलणं हे शक्य नाही. पण, तसा प्रयत्न करायला हरकत नसते. तेच मालिकांमधून दाखवलं जातंय. या मालिकांमधल्या आजी जुन्याला धरून नव्याचा स्वीकार करणाऱ्या आहेत.

सगळ्यात मजा येते ती ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेमधल्या आजीची. मालिकेचा विषय धार्मिक रूढी, प्रथा, परंपरा आणि आधुनिक विचार यांभोवती फिरतो. मालिकेचं कथानक त्याच्या वेगाने सुरू आहे, पण त्याला धरूनच ऊर्मी म्हणजे मालिकेतल्या नायिकेची आजी लक्षात राहते. नातीची काळजी म्हणून तिला लपवून केलेल्या गोष्टी, तिला हवा तो पदार्थ करून देणारी प्रेमळ आजी रमा जोशी यांनी उत्तम सादर केली आहे. या आजीचे आणि तिच्या मुलाचे वादरूपी संवाद खुसखुशीत वाटतात. मालिकेतल्या वासूवर ही आजी चिडते. पण, तोच वासू आजारी असताना स्वत:च्या घरी आणल्यावर त्याची काळजीही तीच घेते. आजीची प्रेमळ बाजू इथे दाखवली आहे. ‘पुढचं पाऊल’ ही स्टार प्रवाहवरची सगळ्यात जुनी आणि लोकप्रिय मालिका. अक्कासाहेब या व्यक्तिरेखेविषयी वेगळं सांगायला नकोच. रुबाब, घराणेशाहीचा आब असं सगळंच हर्षदा खानविलकर यांनी आजवर चांगलं साकारलंय. सासू म्हणून ही व्यक्तिरेखा गाजलीच. आता हीच व्यक्तिरेखा आजी या भूमिकेतून दिसतेय.

कधीच न ओरडणारी, भरपूर लाड करणारी, हवं ते सगळं देणारी, बाजू घेणारी अशी व्यक्ती म्हणजे आजी. आजी असल्याचं सुख आजी असणाऱ्या प्रत्येकाने अनुभवलंच असेल. प्रेक्षकांना भावनिकदृष्टय़ा जोडण्यासाठी मालिका, चॅनल्स नेहमीच प्रयत्न करत असतात. विविध मालिकांमध्ये आजी ही व्यक्तिरेखा दाखवून चॅनल्सनी प्रेक्षकांना सुखावलं आहे. मालिकेत इतर वेळी काहीही घडो, गैरसमज होवोत, कारस्थानं होवोत, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडोत असं काहीही होवो; पण आजी प्रकरण मालिकांमध्ये चवीपुरतं का होईना आणल्यामुळे मालिका स्वादिष्ट बनली आहे; हे मान्य करावंच लागेल!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com