बारा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या इंडियन आयडॉलचा आता नववा सीझन सुरू झाला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनच्या परीक्षकांचं त्रिकूट यावेळीही नवा आयडॉल निवडण्यासाठी सज्ज झालं आहे.

काही कलाकृतींची एक वेगळीच जागा असते इंडस्ट्रीत. ती कोणीच हलवू शकत नाही. कलाकृतीचंच कशाला सिनेसृष्टीतल्या काही कलाकारांचंच उदाहरण घ्या. ‘कौन बनेगा करोडपती’ करावं ते अमिताभ बच्चन यांनीच. तर ‘बिग बॉस’चा कर्ताधर्ता असावा सलमान खानच; मग भले त्यात कितीही भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या तरी तो सगळं नीट निस्तरतो. अर्थात त्याच्या स्टाइलने. आता त्याची स्टाइल कोणती हे वेगळं सांगायला नकोच. तर आताचा मुद्दा हा कलाकृतीपुरता आहे. इथे ही कलाकृती म्हणजे नुकताच सुरू झालेला ‘इंडिअन आयडॉल’ हा रिअ‍ॅलिटी शो. साधारण बारा वर्षांपूर्वी हा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी त्याच्या आजूबाजूला त्याला टक्कर देणारा दुसरा कोणताच शो नव्हता. त्यामुळे हा रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांसाठी तसा नवाच होता. ऑडिशन, एलिमिनेशन, परफॉर्मन्स वगैरे गोष्टी छान वाटत होत्या. या शोचा दर्जाही उत्तमच होता. पहिला सीझन हिट झाल्यावर दुसरा, तिसरा असे आठ सीझन झाले. आता सुरू झालाय तो नववा सीझन. कार्यक्रमाचा साचा तोच असला तरी या सीझनमध्ये काहीसं नावीन्य दिसून येतंय. कार्यक्रमाच्या जुन्या फॉरमॅटलाच आजवर प्रेक्षकांची पसंती मिळत आली आहे. त्यामुळे फॉरमॅटला फार धक्का लावला जाणार नाही, असं स्पष्ट दिसून येतंय.

१९१६ च्या डिसेंबरमध्ये इंडियन आयडॉलचा नववा सीझन सुरू झाला. या सीझनची बरीच चर्चा होती. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सोनू निगम बऱ्याच वर्षांनंतर या कार्यक्रमात परीक्षक म्हणून परत येत होता. आणि या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचं परीक्षकांचं त्रिकूट म्हणजे सोनू निगम, फराह खान आणि अनू मलिक ही मंडळी एकत्र दिसणार होती. म्हणून या शोच्या पहिल्या एपिसोडविषयी उत्सुकता होती. स्पर्धकांची गाणी, एखाद्या स्पर्धकाबद्दल माहिती सांगणारी व्हिडीओ क्लिप, अँकरची मजामस्ती, काही स्पर्धकांचा संघर्ष, काही स्पर्धकांची खिल्ली उडवणं अशा सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे झाल्या. कार्यक्रमाचे याआधीही अनेक सीझन्स झाल्यामुळे नवीन सीझनमध्ये आणखी काय नवीन देणार ही खरं तर चॅनलवाल्यांसाठी कसोटी होती. तरी त्यांनी काही नव्या घटकांचा यात समावेश केला आहे. कार्यक्रमाचा मूळ बाज मात्र तसाच कायम आहे.

बारा वर्षांनी आलेलं परीक्षकांचं त्रिकूट स्पर्धकांची योग्य निवड तर करतंच आहे शिवाय प्रेक्षकांचं मनोरंजनही करतं. अनू मलिक यांची शेरोशायरी लोकप्रिय नसली तरी मनोरंजन करणारी निश्चित आहे. पहिल्या एपिसोडमध्येच त्याचा प्रत्यय आला. खुदा बक्ष हा संपूर्ण सीझनचा पहिलाच स्पर्धक. त्याच्या दमदार गाण्याने परीक्षकांनी त्याची निवड केली. त्यावर ‘खुदा बक्ष.. खुदाने तुम्हे हमारे लिए बक्षा है.. तू सर से पाँव तक संगीत का नक्षा है’ अशी शायरी म्हणत अनू मलिक यांचं कमबॅक झालं. थोडक्यात काय तर यंदाही त्यांची शायरी सहन करावी लागणार. फराह खानचं बिनधास्त बोलणं आणि अनूशी नोकझोक मजा आणतंय. सोनू निगम मात्र नेहमीप्रमाणे शांत दिसून येतोय. पण गायकीच्या बाबतीत मात्र तो अतिशय शिस्तीचा असल्यामुळे स्पर्धकांची निवडही तशीच काटेकोर नियमाने करताना दिसतोय. ही कार्यक्रमाची जमेची बाजू आहे. आवाज, अंदाज आणि रियाज हे स्पर्धकांकडे आहे की नाही हे अनुक्रमे अनू, फराह आणि सोनू तपासणार आहे. यंदाच्या सीझनची आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणवली. आधीच्या सीझनमध्ये एखादा स्पर्धक विशिष्ट बाजाची गाणी गाताना दिसला की त्याला विशेषत: ऑडिशनमध्येच दुसऱ्या प्रकारचं गाणं गायला लावलं जायचं. याचं कारण म्हणजे स्पर्धकांना सगळ्या प्रकारची गाणी जमली पाहिजे हे होतं. पण यावर्षीच्या सीझनमध्ये तसं चित्र आता तरी दिसून येत नाही.

इतर रिअ‍ॅलिटी शोप्रमाणे इंडियन आयडॉलमध्येही दर्दभरी कहाणी आहेच. त्यावरसुद्धा टीआरपी असतो. त्यामुळे अशी दर्दभरी कहाणी हवीच आणि ती आवश्यकच आहे. यामागची चॅनलची गणितं वेगळी असतात. एखादी गोष्ट प्रेक्षकांना आवडली की त्याचा भडिमार केला जातो. प्रेक्षक भावनिक असतात. त्यामुळे प्रेक्षकांना कार्यक्रमामध्ये गुंतवण्यासाठी स्पर्धकांच्या दर्दभऱ्या कहाण्यांचा वापर करावाच लागतो. म्हणूनच ऑडिशनमध्ये थुप्तेन आणि डॉली सिंगसारखे स्पर्धक बघायला मिळाले. पण त्यांच्या कहाण्यांनीच प्रेक्षक प्रभावित झाले नाहीत तर त्यांच्या गायकीनेही छाप पाडली. अशा कहाण्यांसोबत काही अतरंगी स्पर्धकही ऑडिशनमध्ये होते. ही कोणत्याही रिअ‍ॅलिटी शोची प्रथाच आहे जणू. चांगल्या स्पर्धकांची कमी नसतानाही अशा अतरंगी स्पर्धकांचा भरणा असतोच. इथेही आहे. यातही आचरटपणा सुरू असतोच. प्रत्येक एपिसोडमध्ये किमान सरासरी ६-८ मिनिटं अशा स्पर्धकांसाठी दिली गेली. खरं तर त्याची आवश्यकता नाही. पण पुन्हा इथे बिझनेसची गणितं येतात. असे स्पर्धक येतात किंवा त्यांना आणलं जातं. अशा स्पर्धकांचा आणि ज्यांना आयुष्यात बराच संघर्ष करावा लागला आहे अशांचे खास प्रोमो करून ते डिजिटल माध्यमांवरूनही फिरवले जातात. ही कार्यक्रमाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. शेवटी बिझनेस म्हटल्यावर इतना तो बनता है!

एकुणात, इंडियन आयडॉलच्या नवव्या सीझनची सुरुवात तरी दणक्यात झाली आहे. या कार्यक्रमातले स्पर्धक ही या शोची खासियत आहे आणि तीच महत्त्वाचीदेखील आहे. त्यांच्यामुळेच कार्यक्रमाचा दर्जा उत्तम होतोय. शिवाय यावेळी परीक्षकही जाणकार, अनुभवी आहेत. फराह खानला संगीतातलं ज्ञान नसलं तरी आवाज, अंदाज, रियाज यामधला अंदाज ती बघत असल्यामुळे आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या काही सीझनमध्ये ती परीक्षक म्हणूनच असल्यामुळे तिला स्पर्धकांची निवड करण्याइतपत ज्ञान आहे. याआधीच्या लहान मुलांच्या सीझनमध्ये सोनाक्षी सिन्हा परीक्षक म्हणून होती. तिचा तर तसा काहीच संबंध नव्हता. तरी मॅडम परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान झाल्या होत्या. पुन्हा इथे बिझनेसची गणितं लागू! या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यात अधिकाधिक वाढ होतेय. कार्यक्रमात काही प्रमाणात नावीन्य आणल्यामुळे कार्यक्रम खुलला आहे. कार्यक्रमाचा जुना फॉरमॅटच लोकप्रिय असल्यामुळे तो बदलला नाही हे चांगलं आहे. आता इतर रिअ‍ॅलिटी शोंना टक्कर देण्यासाठी या कार्यक्रमाने वाहवत जाऊ नये आणि दर्जा घसरवू नये, एवढंच! संगीतप्रेमींसाठी मात्र हा कार्यक्रम पर्वणी ठरला आहे.

चैताली जोशी – @chaijoshi11

response.lokprabha@expressindia.com