04 August 2020

News Flash

बहिणींची जुगलबंदी

नेहमीच्या सास-बहू कारस्थानी ट्रेण्डपेक्षा हटके ट्रेण्ड सध्या मालिकांमध्ये दिसतोय.

नेहमीच्या सास-बहू कारस्थानी ट्रेण्डपेक्षा हटके ट्रेण्ड सध्या मालिकांमध्ये दिसतोय. मालिकांमधल्या सख्ख्या बहिणीच एकमेकींच्या पक्क्या वैरी झालेल्या आहेत. काहीजणी बहिणीविरुद्ध कट रचताहेत, काहीजणी बहिणीच्या संसारात अडथळा आणताहेत, तर काही बहिणीलाच पाण्यात बघताहेत. बहिणींची ही जुगलबंदी प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करतेय.

मराठी मालिका म्हटलं की त्याचा एक सर्वसाधारण साचा ठरलेला असतो. विषय वेगवेगळे आणि उत्तम असतात पण साचा साधारण एकच. म्हणजे कसं? तर; एक छानसं कुटुंब, नायक-नायिका, मग शेजारीपाजारी, त्यांचे व्यवसाय किंवा ऑफिस असतील तर तिथली मंडळी आणि नायक-नायिकांचा सुखी संसार. हे सगळं लागतंच एखाद्या मालिकेला. मग काही मालिकांमध्ये संसारापासून सुरुवात दाखवतात तर काही मालिकांची कथा ऑफिसपासून सुरू होते. यात पटकथा आणखी रंजक असतात. कधी कोणाची सासूच खाष्ट तर एखाद्या मालिकेत कोणाची जाऊच आगाऊ. एका मालिकेत नायक-नायिकांमधला दुरावा तर दुसरीत काय तर दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध. अशा एकेक भन्नाट कल्पना मालिकांमध्ये लढवत नवनवीन ट्रेण्ड येत असतात. सध्या एक ट्रेण्ड मालिकांमध्ये चांगलाच रंगतोय. बहिणींचा ट्रेण्ड! मालिकांमधल्या बहिणी सध्या चर्चेचा विषय झालेला आहे. बहिणींमधली ही जुगलबंदी प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.

मालिकेतलं मुख्य कथानक कायम ठेवून त्यात चवीपुरतं अशा बहिणींची जुगलबंदी दाखवली जातेय. मग ते लुटूपुटूचं भांडण असो किंवा एकमेकींचा बदला घेण्याची योजना असो; वाद हवेच. आता यात दोघी वाईट दाखवून चालणार नाही. त्यामुळे एक चांगली आणि एक वाईट असं दाखवलं तर बघणाऱ्यालाही मजा येईल हे मालिकावाले चांगलंच जाणतात. त्यामुळे मालिकेची नायिका चांगली आणि तिची बहीण वाईट असंच दाखवणं भाग आहे. का म्हणून विचारू नका. नायिकेला वाईट दाखवलं तर टीआरपी आणायचा कुठून? म्हणून ती चांगलीच! असो. तर अशा या बहिणींची कथा, पटकथा मालिकांमध्ये चांगलीच रंगतेय.

या ट्रेण्डमध्ये सगळ्यात पहिलं नाव येईल ते ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेचं. संपदा आणि स्वानंदी या दोघी सख्ख्या बहिणी. त्यांना आणखी दोन चुलत बहिणीही आहेत. त्यांचं स्वानंदीशी चांगलं जमतं. पण, संपदाशी नाही. संपदाचं कोणाशीच जमत नाही. ती जरा वेगळीच. अडेलतट्टू, हट्टी, भांडखोर, स्वत:चं खरं करणारी, स्वार्थी आणि खोटं बोलणारी. याउलट स्वानंदी. सगळ्यांशी जमवून घेणारी, इतरांचा विचार करणारी, खरं बोलणारी. तर या दोघींचं काही केल्या जमतच नाही. संपदा मोठी असूनही तिला घरातल्या सगळ्यात लहान असलेल्या जुईलीइतकीही अक्कल नाही असं दाखवलंय. स्वानंदीच्या चांगल्या स्वभावामुळे घरातले सदस्य तिच्या प्रेमात असतात, तिला महत्त्व देतात. हे संपदाला खुपतं आणि म्हणूनच ती तिच्यावर खार खाते. घरच्यांच्या नजरेत स्वानंदी कशी उतरेल यासाठी ती कोणत्याही थराला जाते. अगदी स्वत:च्या बहिणीचा संसार मोडण्यापासून ते बाबांची नोकरी घालवण्यापर्यंत ती काहीही करू शकते असं दाखवलंय. संपदा प्रत्येक वेळी स्वानंदीला पाण्यात बघते. स्वत:च्या बाबांच्या नोकरीचा प्रश्न आला तेव्हा बाईंना एक झटका लागला. तिनेच त्यांना अडकवलंय हे स्वानंदीला कळल्यावरही तिची मुजोरी काही केल्या कमी होईना. आता तरी ती शहाणी होईल, तिचे डोळे उघडतील वगैरे स्वप्न प्रेक्षकांनी रंगवली खरी, पण ते सत्यात उतरणं जरा कठीणच दिसतंय. तसं इतक्यात होणारही नाही असा अंदाज. कारण त्याशिवाय मालिकेला झणझणीतपणा येणार तरी कसा म्हणा!

हिंदी कलाकृतीचं अनुकरण मराठीत होत असतं असं अनेकदा म्हटलं जातं. ते काही अंशी खरंही आहे. पण हिंदीमध्ये बहिणींच्या नात्यांवर आधारित अनेक मालिका येऊन गेल्या. पुढे त्या रबरासारख्या खेचल्या गेल्या ही गोष्ट वेगळी. पण, किमान त्यांनी तो विषय हाती घेतला. ‘शास्त्री सिस्टर्स’, ‘एक हजारोंमें मेरी बहना है’, ‘ससुराल सिमर का’, ‘सपने सुहाने लडकपन के’, ‘अंबर धारा’ या त्यापैकी काही मालिका. मराठीतही अशी एक मालिका सध्या लोकप्रिय झाली आहे. ‘दुहेरी’ ही मालिका रहस्यमयतेकडे झुकलेली असली तरी त्याचं मूळ बहिणींचं नातं हेच आहे. धाकटय़ा बहिणीला म्हणजे नेहाला एका मोठय़ा संकटातून वाचवण्यासाठी थोरल्या बहिणीने म्हणजे मैथिलीने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं. तिथून या मालिकेच्या कथेला सुरुवात झाली. ‘बहिणीच्या रक्षणासाठी काहीपण’ अशी मालिकेची कॅचलाइन आहे. मालिकेत मैथिली वारंवार नेहाच्या विचारात असते. मैथिलीला नेहासाठीच तिच्यापासून दूर जावं लागलेलं असतं. सध्याच्या बहिणींच्या ट्रेण्डमधल्या मालिकांना ही एक मालिका अपवाद आहे. यातल्या सख्ख्या बहिणी एकमेकींसाठी स्वत:चं आयुष्य धोक्यात घालताहेत.  उद्ध्वस्त करत नाहीयेत.

13-lp-sisters

यापूर्वीही अनेक सिनेमा, मालिकांमधून बहिणींचं नातं दाखवलेलं आहे. संपूर्ण मालिका किंवा सिनेमा त्यांच्या नात्यावर आधारलेली नसली तरी त्यात त्यांचं प्रेम, नातं हा महत्त्वाचा टप्पा असायचा. सध्याच्या मालिकांमधलं बहिणींचं प्रेम मात्र काहीसं खुसखुशीत आहेत. अर्थात त्यात शेरास सव्वाशेर अशी गत नाहीये. कारण दोघींपैकी एक सतत कारस्थानं करणारी आणि दुसरी ते झेलणारी, त्यातून सहीसलामत बाहेर येणारी आहे. त्यामुळे ही चांगल्या-वाईटाची जुगलबंदी बघायला प्रेक्षकांनाही मजा येतेय. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेतली जुई आणि विभा यांचंही तसंच काहीसं आहे. सुरुवातीला जुई तिच्या वडिलांच्या संपत्तीचा आधार न घेता स्वत:च्या पायावर उभं राहून दाखवण्यासाठी नाव बदलून त्यांच्याच ऑफिसात काम करत होती. तिथे तिची बॉस होती तिचीच सख्खी मोठी बहीण विभा. जुई आणि तिचा सहकारी यश एकमेकांच्या प्रेमात पडतात. दुसरीकडे विभालाही यश आवडू लागते. पण, त्या दोघांच्या प्रेमापुढे विभाचं काहीच चालत नाही. जुई-यशचं लग्न होतं. आता ते त्यांचा सुखी संसार सुरू करत असतानाच ही त्यात मिठाचा खडा घालण्याच्या सतत प्रयत्नात आहे. विभा जुईची मोठी बहीण असूनही तिच्या आनंदात विरजण घालते. मालिकेत आता ही जुगलबंदी सुरू आहे. जुईच्या सासरी महागडी गिफ्ट्स आणून देणं, गरिबीवरून सतत टोमणे मारणं असे प्रकार मालिकेत सध्या दिसताहेत. विभाला नेमकं काय हवं ते तिचं तिला कळलं तरी पुष्कळ!

सलग पाच र्वष सुरू असलेली ‘पुढचं पाऊल’ ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. मालिकेतली नायिका म्हणजे कल्याणी आणि तिची सख्खी मामे बहीण रूपाली यांचं नातं सुरुवातीपासूनच कडवट दाखवलंय. लग्न होऊन दोघी एकाच घरात जातात म्हणजे सख्ख्या मामे-आते बहिणी सख्ख्या जावा! कल्याणी असते भोळी, साधी तर रूपाली महालबाड. कल्याणीविरुद्ध कारस्थानं करण्यात ती सतत बिझी असायची. मालिकेची पटकथा आता वेगळ्या वळणावर आहे. तसंच रूपाली ही व्यक्तिरेखाही आता मालिकेत नाही. पण बहिणींच्या नात्याबद्दल लिहिताना या मालिकेचा उल्लेख राहून कसं चालेल! असाच ट्रॅक मध्यंतरी ‘रुंजी’ मालिकेतही होता. खरंतर यातल्या बहिणी एकमेकींना सांभाळून घेणाऱ्या, एकमेकींवर प्रेम करणाऱ्या आहेत. पण मधल्या एका ट्रॅकमध्ये रुंजीची मोठी बहीण रुंजीविरोधात कटकारस्थान करत असते. त्यानंतर मात्र त्या पुन्हा एकत्र एकाच घरात सुखाने नांदताना दाखवल्या आहेत.

सिनेमा, मालिका हे समाजाचं प्रतिबिंब असतं असं म्हटलं जातं. समाजात घडणाऱ्या घडामोडी मालिका, सिनेमांमध्ये दाखवल्या जातात आणि काही वेळा तिथे दाखवले जाणारे प्रसंगांचे पडसाद समाजात उमटतात. त्यामुळे हे चक्र आहे. म्हणूनच मालिकांमध्ये वेगवेगळे ट्रेण्ड्स दिसत असतात. सणावारी मालिकांमध्ये सण, सामाजिक प्रश्नांवर भाष्य, ट्विस्ट असे अनेक ट्रेण्ड्स दिसून येतात. असाच ट्रेण्ड आहे बहिणींचा. बहिणींचा मुख्य ट्रॅक नसला तरी मालिकेला तडका त्याच्यामुळेच मिळतोय हेही खरं. ‘एक हजारोंमें मेरी बहना है’ असं सिनेमामध्ये म्हटलं गेलं असलं तरी तसं चित्र मालिकांमध्ये काही दिसून येत नाही.

14-lp-sisters

साधारण दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका त्याच पठडीतील. मालिकेच्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना पहिलं सरप्राइज मिळालं. लग्नाआधीच गरोदर असलेली मोनिका तिची त्यात काहीच चूक नाही अशा तोऱ्यात वावरते. तिचे सतत मूड स्विंग्स होतात. अतिशय स्वार्थी, उद्धट अशी मोनिका लग्न होऊन दळवी या प्रेमळ कुटुंबात येते. तिच्या स्वभावामुळे ती काही केल्या तिथे जमवून घेऊ शकत नाही. ती जमवून घेण्याचा प्रयत्न करतेय तर ते फक्त आणि फक्त तिला त्या घरात टिकून राहायचंय याचसाठी. तिची बहीण मानसी एकदम तिच्या विरुद्ध स्वभावाची. प्रेमळ, काळजीवाहू, नम्र, समजूतदार आणि होऊ घातलेली डॉक्टर अशी. त्यामुळे विक्रांत म्हणजे मोनिकाच्या नवऱ्याचं मानसीशी जास्त चांगलं पटतं आणि हे मोनिकाला खुपतं. त्यामुळे ती मानसीला सगळ्यांच्या देखत तर कधी एकांतात वाट्टेल तशी बोलत असते. मानसी चार शहाणपणाच्या गोष्टी सांगत असेल तर त्याकडे तुच्छतेने बघते. मानसीला ‘तू आता घरी जा’ असंही स्पष्टपणे सांगायला ती मागे-पुढे बघत नाही. तर अशी ही मोनिका-मानसी या बहिणींची कहाणी. मालिकेचा विषय अत्यंत वेगळा आहे. पण, त्याला या नात्याची फोडणी अधेमधे असणारच.

‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतलं मोठं गुपित अजून फुटायचंय. या मालिकेत ज्या कट्टर वैरी दाखवल्या आहेत त्या मीरा आणि सानिका दोघी खरंतर बहिणी आहेत. सानिका आणि साकेतचं लग्न झालेलं असतं. साकेतच्या घरी आश्रित म्हणून मीरा नावाची मुलगी राहत असते. लग्नानंतर सानिकाला मीरा खटकायला लागते. तिला मीरा आवडेनाशी होते आणि ती मीराला घराबाहेर काढण्याचे डाव रचते. तर इरावती म्हणजे सानिकाच्या आईचा एक भूतकाळ आहे. त्या भूतकाळाची साक्षीदार म्हणजे मीरा. मीरा ही इरावतीचीच मुलगी असते. पण, इरावती तिचा भूतकाळ मागेच ठेवत आयुष्यात जगत असते. मीरा इरावतीचीच मुलगी आहे हे कोणालाच माहीत नाही. हे सत्य फक्त इरावतीच्या वडिलांना म्हणजे मीरा-सानिकाच्या आजोबांना माहीत असतं. मालिकेत सध्या मीरा-सानिकाची जुगलबंदी बघायला मिळते. या दोघींमध्ये मीरा शांत आणि सानिका रागीट आहे. त्यामुळे सारासार विचार न करता सानिकाची कारस्थानं सतत सुरूच असतात. मालिकेत हे गुपित उघड झाल्यावर सानिका-मीरा यांच्यातलं नातं कसं वळण घेतं हे उत्सुकतेचं असेल. मालिकेच्या शेवटाकडे हे गुपित उघड झालं तर ‘हॅपी एण्डिंग’ होईल. पण मध्यावर दाखवलं तर त्यांच्यातलं वैर टिकून राहील आणि मालिकेला वेगळं वळण मिळेल असा अंदाज आहे.

बहिणींमधल्या नात्याचा हा ट्रेण्ड सध्या जोरात आहे. हा असा ट्रेण्ड आहे जो अधेमधे मिठाप्रमाणे चवीनुसार वापरला तर मालिका अतिशय चविष्ट होते. मालिका म्हटलं की त्यात सास-बहू ड्रामा आला. सासूचं सुनेला छळणं किंवा तिच्याविरुद्ध कारस्थानं करणं असं किचन पॉलिटिक्स आलं. हेही आता बऱ्यापैकी थांबलं आहे. मधल्या काळात कारस्थानांची ही जबाबदारी घरातल्याच कोणा एकावर यायची. म्हणजे घरातली नणंद, जाऊ, दीर किंवा अन्य कोणी. पण, आता ही गाडी वळतेय नायिकेच्या सख्ख्या बहिणीकडे. या ट्रेण्डमधल्या सगळ्याच बहिणी कारस्थानं रचत नसल्या तरी त्यांचं त्यांच्याच सख्ख्या बहिणीशी काही पटत नाही. पटत नसल्यामुळे त्यांच्यात होणारे वाद, मतभेद, भांडणं हे सगळं मालिकेच्या प्रेक्षकसंख्या वाढीत उपयोगी ठरतंय. पण असो. नेहमीच्या सास-बहू कारस्थानांपेक्षा बहिणींमधली ही जुगलबंदी बघताना प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:25 am

Web Title: marathi tv serials sisters
Next Stories
1 नव्या उमेदीचं तरुण चॅनल
2 जाणुनबुजून अतिरंजकता नको!
3 महाएपिसोड.. मालिकांचा सण!
Just Now!
X