‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सध्या धमाल सुरू आहे. खरं तर या मालिकेचा विषय तसा जुनाच आहे. पण, त्याची मांडणी जरा उत्सुकता वाढवणारी आहे, हे नाकारता येणार नाही. गुरुनाथ आणि शनायाबद्दल राधिकाला आता सगळं कळल्यामुळे आता मालिका आणखी उत्सुकतेची ठरणार आहे. आता राधिका या प्रकरणाला मस्त नागपुरी ठसका देईल यात शंका नाही. मालिका त्या दिशेने जात आहे. या मालिकेवर टीकाही झाल्या. ‘चुकीचा संदेश देतेय’, ‘चांगलं काही दाखवायचं तर हे काय’ अशा अनेक टीकांना मालिका सामोरी गेली आहे. पण, ही मालिका बघण्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. मालिका चांगली की वाईट यात न जाता मुद्दय़ाला हात घालू या.

गेल्या आठवडय़ातल्या एका एपिसोडमधला एक किस्सा इथे सांगायचा आहे. १२ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये गुरुनाथला त्याच्या आईचा फोन येतो. तो त्याच्या घरात कपडय़ांना इस्त्री करीत असतो. हा सीन लाँग आणि क्लोज शॉट असं दोन्हीमध्ये आहे. यामध्ये घराचं मुख्य दार बंद असलेलं दाखवलंय. इस्त्री करत असताना त्याचा फोन वाजतो. तेव्हा तो फोन शोधत सोफ्याजवळ येतो. तिथल्या एका टेबलवर त्याचा फोन असतो. तो फोन उचलतो आणि तिथेच म्हणजे सोफ्याजवळच उभं राहून आईशी बोलायला लागतो. त्याचं र्अध बोलणं क्लोज शॉटमध्ये आहे. त्यानंतर तो पुन्हा इस्त्री करत असलेल्या टेबलपाशी चालत जातो. तिथेही थोडा वेळ क्लोज शॉट आहेत. नंतर एका वाक्यासाठी लाँग शॉट आहे. त्या वेळीसुद्धा दार बंद आहे. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा लाँग शॉट आहे, त्या वेळी मात्र दार उघडलेलं आहे. शेवटी तो चिडून फोन ठेवतो आणि इस्त्री करत असलेलं शर्ट सोफ्याच्या दिशेने फेकतो, त्या वेळी लाँग शॉट आहे. या लाँग शॉटमध्ये पुन्हा दार बंद आहे. या संपूर्ण सीनमध्ये गुरू दाराजवळ गेला, दार बंद केलं, दार उघडलं असं एकदाही झालेलं नाही. इस्त्री करण्याचं टेबल ते सोफा आणि सोफा ते इस्त्री करण्याचं टेबल इतकाच तो चाललेला आहे. मग दार उघडलं कोणी आणि कसं? कुछ तो गडबड है!

कोणत्याही कलाकृतीच्या बाबतीत कंटिन्यूइटी म्हणजे सलगता असणं खूप महत्त्वाचं असतं. इथे गडबड झाली की चाणाक्ष प्रेक्षक ते लगेच पकडतात. मालिका करताना खूप ताण असतो. एकच सीन लाँग आणि क्लोज अशा दोन्ही प्रकारच्या शॉट्ससाठी दोन वेळा शूट करावा लागतो, कधी कधी एका दिवसात एक एपिसोड पूर्ण करावा लागतो; असे अनेक नियम, अटी, चौकटी मालिकेचं शूट करताना असतात. या सगळ्या ताणातून मालिका तयार होते. यामागे मालिकेच्या संपूर्ण टीमची मेहनत असते, हे पूर्णत: मान्य आहे. इतक्या ताणात काम करायचं म्हणजे छोटय़ा चुका होणारच, ही पळवाट मात्र चुकीची आहे. किमान कंटिन्यूइटीचा तरी अतिशय बारीक विचार करायला हवा. एकाच कलाकाराचे दोन सीन पाठोपाठ असतील तर त्याच्या कपडय़ांचा विचार केला जातो. पहिल्या सीनमध्ये कपडे जसे आहेत तसेच दुसऱ्या सीनमध्ये असण्याकडे लक्ष असतं. तसंच आजूबाजूच्या गोष्टींकडेही असायला हवं. मालिकेची नायिका सुंदर दिसावी, कशी दिसावी, अमुक एक ट्रॅक हवा, तो नको अशा असंख्य गोष्टींकडे मालिकेची टीम लक्ष ठेवून असते. मग अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा फटका मालिकेलाच बसतो.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11