19 September 2019

News Flash

हवीहवीशी ‘नकुशी’

‘मुलगाच हवा’ या आग्रहामागे ‘मुलगी नको’ हे अलिखित विधान असतं.

‘मुलगाच हवा’ या आग्रहामागे ‘मुलगी नको’ हे अलिखित विधान असतं. अशा वेळी मुलगी झाली की चक्क तिचं नावच नकुशी ठेवण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. एखाद्या व्यक्तीचं अस्तित्वच नाकारण्याच्या या अघोरी प्रकारावर बोट ठेवणारी नवी मालिका ‘नकुशी’ स्टार प्रवाहवर सुरू होते आहे. मुलीला नाकारण्याच्या मानसिकतेला मनोरंजनाच्या माध्यमातून दिलेली ही ‘शुगरकोटेड’ गोळी शह देईल अशी अपेक्षा आहे.

टीव्ही या माध्यमाची ताकद दिवसेंदिवस वाढतेय. या माध्यमाचा परिणामही अतिशय प्रभावशाली असतो. म्हणूनच टीव्ही चॅनल्सवर अधिकाधिक चांगल्या दर्जाचे कार्यक्रम, मालिका दाखवण्याची रेलचेल सुरू असते. चॅनल्सच्या या स्पध्रेत अनेकदा काही चांगले प्रयोग बघायला मिळतात. यामध्ये कधी कौटुंबिक विषय असतो तर कधी वास्तवदर्शी चित्रण असतं. कधी विनोदी अंगाने गंभीर विषय मांडलेला असतो तर कधी सामाजिक प्रश्नाची जाणीव करून देणारा विषय असतो. आशयविषयांमधल्या वैविध्यामुळे प्रेक्षकांना मात्र चांगल्या कलाकृतींचा आस्वाद घेता येतो. नेहमीच्या सास-बहू ड्रामापेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळत असेल तर प्रेक्षकांनाही ते हवंच असतं. असाच एक प्रयोगशील प्रयत्न स्टार प्रवाह घेऊन येत आहे. ‘नकुशी.. तरी हवीहवीशी’ या मालिकेच्या निमित्ताने एका सामाजिक वास्तवदर्शी प्रश्नावर भाष्य केलं जाणार आहे.

सातारा, वाई, कुडाळ या परिसरात तिसऱ्या मुलीचं नाव नकुशी ठेवलं जातं. तिसऱ्या मुलीचं नाव नकुशी ठेवलं की चौथा मुलगा होतो अशी त्या परिसरात समज आहे. या प्रथेवर मालिकेतून भाष्य केलं जाणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांचं शूटिंग वाई, सातारा याच परिसरात झालं आहे. जवळपास ४५ दिवस मालिकेची संपूर्ण टीम सातारा, वाई इथल्या गावांमध्ये राहात होती. वास्तवदर्शी सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसंच या मालिकेच्या शीर्षकगीताचाही थोडा भाग प्रदíशत झाला आहे. त्या गाण्याचीही सध्या चर्चा आहे. ग्रामीण लहेजा, छोटय़ा मुलीला संबोधित शब्द, आवाजातील टोन आणि संगीत या सगळ्यामुळे शीर्षकगीताने बाजी मारली आहे.

मालिकेचे निर्माते सुमित मित्तल त्यांच्या पहिल्या मराठी मालिकेच्या निर्मितीचं कारण सांगतात, ‘‘मराठी मालिकेची निर्मिती करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्याचा विषय. या मालिकेची कथा काल्पनिक नसून महाराष्ट्रातील काही ठिकाणांशी जोडलं गेलेलं वास्तव आहे. त्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे. आपण जे करतोय ते इतरांना आवडेल का, त्यातून टीआरपी मिळेल का असा नेहमीच विचार करू नये. काही वेळा आपण स्वत: केलेल्या कामातून किती समाधानी आहोत, आपल्याला ते पटलं की नाही ते बघावं. ‘नकुशी तरी हवीहवीशी’ या मालिकेमुळे आम्हाला समाधान मिळतंय. आत्तापर्यंत मालिका ज्या प्रकारे तयार झाली आहे ते काम अतिशय आनंद, समाधान देणारं आहे.’ निर्मात्यांची ही पहिली मराठी मालिका असली तरी ते मराठी मालिकांसाठी नवीन असल्याचे कोणीही जाणीव करून देत नाही, असं ते आवर्जून सांगतात. ‘साधारणपणे एखाद्या क्षेत्रात नवीन असलो की तिथे प्रत्येक वेळी तुम्हाला सिद्ध करावं लागतं. पण स्टार प्रवाहने याबाबतीत आम्हाला खूप सहकार्य केलं आणि म्हणूनच या मालिकेत वेगवेगळे प्रयोग करणं आम्हाला शक्य झालं’, असं ते सांगतात.

या मालिकेचे यूएसपी तसे बरेच आहेत. शशी सुमित प्रोडक्शन्सची ही पहिली मराठी मालिका आहे. सलग सहा र्वष यशस्वीरीत्या सुरू असणारी ‘दिया और बाती हम’ ही त्यांचीच िहदी मालिका. ‘कटय़ार काळजात घुसली’ या सिनेमाचं साहाय्यक दिग्दर्शन केलेले वैभव चिंचाळकर हे या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. सागर खेऊर हेही त्यांच्यासोबत दिग्दर्शन करत आहेत. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांनी या मालिकेचं शीर्षकगीत संगीतबद्ध केलंय. ते पहिल्यांदाच संगीतकार म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत. शीर्षकगीताला आवाजही त्यांचा आणि बेला शेंडे यांचा आहे. समीर सामंत यांनी शीर्षकगीताची रचना केली आहे. संतोष मुळेकर यांचं संगीत संयोजन आहे. मालिकेची पटकथा अभिजीत गुरू आणि चेतन सेंधाणे तर संवाद मनीष कदम यांचे आहेत. अशी सगळी अनुभवी मंडळी या मालिकेशी संबंधित आहे.

‘नकुशी’ या शब्दातच नकारात्मकता आहे. मालिकेत याच नकारात्मकतेचा विषय मांडला जाणार आहे. असं सगळं नकारात्मक असलं तरी त्यात सकारात्मक दृष्टिकोन दिसतो तो मालिकेचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांना. नकुशीचा प्रवास नकारात्मकतेकडे झुकणारा असला तरी तो सकारात्मकतेने दाखवायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे. ते या मालिकेबद्दल अधिक विस्तृतपणे सांगतात, ‘आयुष्यात प्रत्येकालाच कधी कधी ‘नकोशी’ किंवा ‘नकोसा’ची भावना येत असते. म्हणजे मित्र-मत्रिणींच्या घोळक्यात कधी एखाद्याला बाजूला सारून इतर सगळे काहीतरी बोलत असतील तर त्या क्षणासाठी त्या व्यक्तीला नकोशी किंवा नकोसाची भावना येते. सातारा, वाई भागातील मुलींची तर नकुशी म्हणून ओळखच आहे. एका क्षणासाठी आपल्यामध्ये निर्माण होणारी ती भावना नकुशी असलेल्या मुलींना आयुष्यभर जगावी लागते. अशा मुलींचं भावविश्व या मालिकेतून दाखवलं जाईल. नकुशीचा प्रवास मोठा आहे. तो नकारात्मक असला तरी नेहमी ‘हे चुकीचं ते चुकीचं’ असं न सांगता त्यातून सकारात्मक दृष्टिकोन मांडून चांगला संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. टीव्ही हे माध्यम अतिशय प्रभावशाली आहे. अशा माध्यमातून सामाजिक प्रश्न पोहोचणं गरजेचं आहे.’ जे लोक नकुशीची प्रथा, समज-गरसमज अनुभवत आहेत त्यांच्यापर्यंत त्याबद्दलची योग्य माहिती पोहोचावी आणि त्यातून एक जण जरी बदलला तरी समाधानकारक असेल असंही ते नमूद करतात.

मालिकेतल्या छोटय़ा नकुशीची भूमिका आभा बोडस हिने केली आहे. तर मालिकेतल्या  तिच्या दोन बहिणींची भूमिका अनुष्का गीते, अद्या धोत्रे यांनी साकारल्या आहेत. याशिवाय विद्याधर जोशी, अदिती देशपांडे असेही अनेक अनुभवी कलाकार यात आहेत. सातारा, वाई या ठिकाणी गावांमध्ये काही भागांचं शूट करण्यात आलं आहे. रिअल लोकेशनवर शूट करण्यासाठी चॅनल आणि निर्माते यांचं एकमत होणं गरजेचं असतं. ते झालं की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. या मालिकेचं बऱ्याच भागांचं शूट अशा रिअल लोकेशनवर करायचं होतं. त्याबाबतीत स्टार प्रवाहने सहकार्य केल्याचं निर्माते आणि दिग्दर्शक आवर्जून सांगतात.

महेश काळे आणि शास्त्रीय संगीत असं समीकरण आता सर्वश्रुत आहे. त्यांनी या मालिकेचं शीर्षकगीत केवळ गायलंच नाही तर ते संगीतबद्धही केलं हा प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्का होता. याबाबतची आठवण वैभव सांगतात, ‘कटय़ार काळजात घुसली या सिनेमामुळे महेश काळे यांच्या संपर्कात आलो. एकदा सहज गप्पा मारताना महेश म्हणाले की एखाद्या गाण्याला संगीत द्यायची इच्छा आहे. त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. ‘नकुशी’च्या निमित्ताने मला महेशने माझ्याकडे व्यक्त केलेली इच्छा आठवली. नकुशी या मालिकेचं शीर्षकगीत आम्हाला साधं, सुंदर हवं होतं. त्यासाठी महेशला विचारलं. त्याने पाठवलेला गाण्याचा पहिलाच ड्राफ्ट सगळ्यांना आवडला.’

सामाजिक विषय, वास्तवदर्शी विषय आणि मनोरंजन अशा सगळ्याची सांगड घालत ‘नकुशी तरी हवीहवीशी’ ही मालिका लवकरच स्टार प्रवाहवर सुरू होतेय. मालिकेचा प्रोमो आणि शीर्षकगीताची झलक तर प्रभावी वाटतेच आहे. त्यामुळे मालिकेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या मालिकांमध्ये आता ‘नकुशी’ची भर पडेल. मालिकेचा विषय बघता ती तिची वेगळी ओळख निर्माण करेल असा अंदाज आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 23, 2016 1:26 am

Web Title: nakushi marathi tv serial