18 September 2019

News Flash

‘थर्टी फर्स्ट’चा मोका ‘प्रवाह’वर

सेलिब्रेशनसाठी सगळेच नवनवीन प्लान करतात, पण काहींची टीव्हीवरील कार्यक्रमांना पसंती असते.

अक्कासाहेब म्हणजे हर्षदा खानविलकर यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

वर्षांच्या शेवटच्या दिवशी सेलिब्रेशनसाठी सगळेच नवनवीन प्लान करतात, पण काहींची टीव्हीवरील कार्यक्रमांना पसंती असते. यंदा अशा प्रेक्षकांसाठी ‘स्टार प्रवाह’ एक कार्यक्रम घेऊन आलाय; ‘ये रे ये रे सोळा.’

वर्ष संपायला येतंय तसं थर्टी फर्स्टला काय करायचं म्हणून सगळ्यांचे विविध प्लॅन्स सुरू झालेत. कोणी शाळेच्या ग्रुपसोबत धमाल करणार आहे तर कोणी मैत्रिणींचाच ग्रुप नाइट आऊट करणार आहेत. कोणाची कुटुंबाला पसंती आहे तर कोणी कॉलेज फ्रेंड्ससोबत डिनर करणार आहे. असे अनेक प्लॅन्स त्या दिवशीच्या लिस्टमध्ये असतील. पण काहींचं टीव्हीसमोर बसून मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्याचं ठरलंय. त्यांच्यासाठी विविध वाहिन्यांवर कार्यक्रमांची खास मेजवानी असेल. काही वाहिन्या वर्षभर झालेल्या कार्यक्रमातील गाजलेले परफॉर्मन्सेस दाखवतील तर काही एखाद्या कार्यक्रमाचंच पुन:र्प्रक्षेपण करतील. तर काही वाहिन्या उत्तम सिनेमा दाखवण्याकडे वळतील. अशा विविध कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होणार यात शंका नाही. पण स्टार प्रवाहचा ‘ये रे ये रे सोळा’ हा कार्यक्रम या वर्षअखेरीचं आकर्षण असेल. ‘ये रे ये रे’ या संकल्पनेचं हे दुसरं वर्ष. गेल्या वर्षी ‘ये रे ये रे पंधरा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदाच्या कार्यक्रमाची टॅगलाइन आहे ‘सोळावं वरीस मोक्याचं..!’
lp32‘ये रे ये रे सोळा’ हा कार्यक्रम नुकताच मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जल्लोशात पार पडला. ‘पुढचं पाऊल’मधील अक्कासाहेब म्हणजे हर्षदा खानविलकर यांच्या गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याच मालिकेतला अभिजीत केळकर याचीही या परफॉर्मन्समध्ये साथ मिळाली. एरवी अक्कासाहेबांना वेगळ्या रूपात बघत असल्यामुळे ह्य़ा परफॉर्मन्समध्ये बघून प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. मालिकेतल्या व्यक्तिरेखेइतकाच प्रतिसाद त्यांच्या सादरीकरणाला मिळाला. ‘‘माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मी कधीच नृत्य केलं नाही. मागच्या वर्षी पिंगा हा नृत्यप्रकार केला होता. पण या वर्षी कार्यक्रमाची सुरुवात करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मला कार्यक्रमाची संकल्पना खूप आवडली. मीही तशीच नेहमी सकारात्मक असते. काम करतानाच आहे तो क्षण आनंदाने जगून येणाऱ्या दिवसाकडे आशेने बघत जगायंच असं माझं मत आहे’’, हर्षदा सांगतात. स्त्री-संरक्षण, स्त्री-सक्षमीकरण अशा विविध विषयांवर अनेकदा बोललं जातं. हाच मुद्दा या कार्यक्रमातूनही मांडला आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात स्त्रीचं स्थान किती महत्त्वाचं असतं हे सांगणारा एक परफॉर्मन्स प्रेक्षकांची पसंती मिळवून गेला. जुई गडकरी, वंदना वाकनीस, अश्विनी एकबोटे, पल्लवी पाटील, तारका पेडणेकर, शर्मिला शिंदे या सगळ्याजणींनी मिळून स्त्रीच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे दाखवले. लुकाछुपी, इतनीसी हसी, पिया रे अशा अर्थपूर्ण गाण्यांवर त्यांनी अप्रतिम सादरीकरण केले.
अशा मनोरंजक कार्यक्रमाचं निवेदनही तितक्याच मनोरंजक होणं महत्त्वाचं असतं. हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन जाधव या जोडीने खुमासदार निवेदनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. हेमंत ढोमे याने निवेदनाचं लेखन केलं. निवेदनाचं स्वरूप मात्र नाटिकेसारखं ठेवल्यामुळे ते अधिक मनोरंजक झालं. हेमंत आणि प्रियदर्शन या दोघांनी धोका आणि मोका या जुळ्या भावंडांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. २०१६ हे वर्ष धोक्याचं असेल की मोक्याचं म्हणजे नकारात्मक असेल की सकारात्मक हा शोध घेणारी ही दोन पात्रं संपूर्ण कार्यक्रम धमाल करतात. धोका नकारत्मकतेचं तर मोका सकारात्मकतेचं प्रतीक आहे. या निवेदन-नाटिकेचा लेखक हेमंत ढोमे सांगतो, ‘‘ये रे ये रे सोळा या कार्यक्रमाच्या नावावरून मला धोका आणि मोका ही पात्रं सुचली. सोळावरून मला ‘सोळा वरीस धोक्याचं’ हे गाणं आठवलं आणि धोक्यावरून मोका या शब्दाचा वापर करावासा वाटला. म्हणून धोका आणि मोका ही पात्रं उभी केली आणि विषय सकारात्मकता आणि नकारात्मकता या विषयावर केंद्रित केला.’’ दिगंबर नाईक, प्रियदर्शन आणि हेमंत या तिघांनीही पहिल्यांदाच एकत्र एका रंगमंचावर काम केलंय. त्यांच्यासोबत नम्रता आवटेही आहे. ‘एकत्र काम करण्याचा खूप आनंद आहे. कार्यक्रमाच्या टॅगलाइनप्रमाणे मीही येणाऱ्या वर्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतोय. २०१५ हे वर्ष माझ्यासाठी खास होतं. असंच येणारं वर्षही असावं असा सकारात्मक विचार मी करतोय’’, प्रियदर्शन सांगतो.
कार्यक्रमाचं दिग्दर्शन विशाल मोडवे याने तर कार्यक्रमातील नृत्य दिग्दर्शन रोहन रोकडे या कोरिओग्राफरने केलं. रोहन रोकडेच्या ग्रुपचाही एक परफॉर्मन्स झाला. सचिन भांगरे आणि ग्रुपच्या संगीतमय परफॉर्मन्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. पिंप, पातेलं, पाइप, ज्वारीचे दाणे, लाइटर्स अशा रोजच्या जगण्यातल्या गोष्टी वापरून अनोखा संगीत परफॉर्मन्स दिला. युव्ही अ‍ॅक्ट हा व्हिज्युअली माइम असलेल्या परफॉर्मन्सनेही प्रेक्षकांची चागंली पसंती मिळवली. मायकल जॅक्सन आणि रजनीकांत हे दोघे समोरासमोर आल्यानंतर भांडण होऊन काय होतं हे सांगणारी कथा या अ‍ॅक्टमध्ये मांडली आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यंदा ‘लक्ष्य’ या मालिकेच्या टीमनेही सादरीकरण केलं. पहिल्यांदाच या टीमला कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळाल्यामुळे मालिकेची संपूर्ण टीम खूश होती. एरवी पोलिसांच्या वेशात असलेली टीम कार्यक्रमात ‘विदाउट वर्दी’ दिसल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा अनुभव वेगळा होता. मालिकेच्या टीममधले अशोक समर्थ lp33सांगतात, ‘‘आमच्या सेटवर नेहमीच सकारात्मक ऊर्जा असते. आम्ही सगळे एकमेकांना कुटुंबच मानतो. त्यामुळे आमच्याकडे हेवेदावे, मतभेद असतातच. एकीही खूप आहे. एकमेकांना सामावून, सांभाळून घेण्याची क्षमता आहे. अशी सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे काम करण्याचा उत्साहही वाढतो. अशीच ऊर्जा आणि उत्साह २०१६ मध्येही टिकून राहावा असा विचार करून आम्ही नवीन वर्षांचं स्वागत करणार आहोत.’’
मालिकेतल्या जोडय़ांमधलं प्रेम बघता त्याचा परफॉर्मन्स होणार नाही हे शक्य नाही. त्यामुळे दुर्वा-केशव, परी-साहील, एक्का-देवयानी, देवा-वेदा अशा सगळ्यांच्या रोमँटिक परफॉर्मन्सने मजा आणली. तोळा तोळा, स्वप्न सांगून आले, तू मिला अशा यंदाच्या मराठी सिनेमांच्या लोकप्रिय गाण्यांवर या जोडय़ांनी नृत्य सादर केलं. या परफॉर्मन्सच्या शेवटी ‘दिल धडकने दो’ या गाण्यावर दहा-पंधरा सेकंदांचा ‘व्हिडीओ मॅपिंग’ हा प्रकारही आहे. मराठी सिनेसृष्टीच्या प्रार्थना बेहेरे आणि सोनाली कुलकर्णी या आघाडीच्या दोन तारकांनी त्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला चार चांद लावले. प्रार्थनाने जॅझ हा नृत्यप्रकार सादर केला तर सोनाली कुलकर्णीने ‘पोस्टर गर्ल’ या तिच्या आगामी सिनेमातल्या गाण्यावर नृत्य सादर केलं. कार्यक्रमाच्या अखेरीस ‘हॅपी न्यू इयर’ या धमाल अ‍ॅक्टमध्ये सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन स्टेजवर ‘शाम शानदार’ या गाण्यावर परफॉर्म केलं. वेगवेगळे नृत्यप्रकार, खुमासदार निवेदन, प्रयोगशील सादरीकरण या सगळ्यामुळे थर्टी फर्स्ट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल यात शंका नाही!
response.lokprabha@expressindia.com

First Published on December 25, 2015 1:01 am

Web Title: new year celebration on star pravah channel