News Flash

मालिकांच्या शीर्षकांची ऐशीतैशी

मसालेदार गोष्टींसाठी मालिका ऑफ ट्रॅक होऊ लागल्या आहेत.

सध्याच्या टीव्ही मालिकांची शीर्षकं कितीही आकर्षक वाटली तरी ती मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकशी विसंगत वाटताहेत. मसालेदार गोष्टींसाठी मालिका ऑफ ट्रॅक होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ‘शीर्षकात काय आहे?’ असंच म्हणण्याची वेळ आता आली आहे.

‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअरने म्हणून ठेवलंय ते काही खोटं नाही. त्याचं हे विधान मालिकांच्या बाबतीत अगदी फिट बसतं. मालिकांची शीर्षकं आणि त्यांची कथा, आशय-विषय याचा सध्या काहीही ताळमेळ नसल्याचं लक्षात आलंय. मालिकेच्या सुरुवातीला त्या-त्या शीर्षकासोबत मालिकेचा विषय जातोही. तसा तो जायला हवाच, पण काही एपिसोडनंतर मालिका त्यांचे रंग दाखवायला लागते. टीआरपी, लोकप्रियता यात अडकून मालिका भरकटू लागते. मग मालिकेचा आणि त्याच्या शीर्षकांचा परस्परांशी काहीही संबंध राहत नाही. सिनेमाच्या आधी ज्याप्रमाणे ‘डिस्क्लेमर’ दाखवतात, तसं आता मालिकेच्या सुरुवातीलाही दाखवावं. ‘मालिकेच्या कथेचा, आशय-विषयाचा आणि त्याच्या शीर्षकाचा काही भागांनंतर परस्परांशी काहीही संबंध नाही. तो आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा’ असं त्या ‘डिस्क्लेमर’मध्ये असावं. म्हणजे कसं मालिकावाल्यांची टीका झेलण्यापासून सुटका होऊ शकेल. अर्थात या सगळ्यामुळे त्यांच्या लोकप्रियता आणि टीका यांवर तसूभरही परिणाम होत नाही ही गोष्ट वेगळी आणि आश्चर्याची.
शीर्षक आणि मालिकांच्या विषयाची विसंगती हे प्रमाण अलीकडे वाढलंय. याचं पहिलं उदाहरण म्हणजे ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही बहुचर्चित मालिका. जान्हवीच्या गरोदरपणावरून सोशल साइट्सवर जो काही धुमाकूळ चालू आहे त्यामुळे ही मालिका कितीही वाईट होत चालली असली तरी तिचं ‘चर्चा तर होणारच’ असं झालंय. शीर्षकात जे मांडलंय त्यात पाणी घालत दाखवून जमाना झाला आता. जान्हवी गोखल्यांची सून झालीही आणि सून झाल्यावरचं रामायण, महाभारतही झालं. सून होऊन काळ लोटला तरी मालिका सुरूच. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेने खरं तर चांगला वेग घेतला होता, पण डेली सोपच तो. त्याच दिशेने प्रवास करणार हे ठरलेलं. इशू-अंकिताची दुश्मनी, लग्न, संसार, सूड, कुरघोडी या गोष्टी खच्चून भरलेल्या घराला म्हणजे त्यांच्या भाषेत त्या बंगल्याला ‘स्वप्नांचा सुंदर बंगला’ असं का म्हणत असाव्यात, हा अनुत्तरित प्रश्न आहे. ‘का रे दुरावा’ असा प्रश्न पडूच कसा शकतो मालिकेच्या नायक-नायिकांना? आणि तेही ते दोघंही घरी-दारी-ऑफिसमध्ये असे चोवीस तास एकमेकांसमोर, एकमेकांबरोबर असताना? शिवाय हा तथाकथित दुरावा त्यांनी स्वत:चं ओढवून घेतला आहे. सध्याच्या काळात नोकरी मिळणं कठीण आहे हे मान्य केलं तरी मुंबईसारख्या ठिकाणी ट्रॅव्हल टुरिझमच्या कंपन्यांचा तुटवडा निश्चितच नाही. त्यामुळे दुसरीकडे नोकरी मिळण्याची शक्यताही इथे नाकारता येत नाहीत. त्यामुळे जय-अदिती नाइलाज असला तरी एकाच कंपनीत नोकरी करण्याचा अट्टहास धरत स्वत:च दुरावा निर्माण करताहेत. त्यामुळे याचं नाव ‘हवाहवासा दुरावा’ असं काहीबाही ठेवलं तरी चालू शकेल.
खरं तर मालिकांची शीर्षकगीतं हा खूप आधीपासून चर्चेचा विषय आहे. हिंदी-मराठी सगळ्याच मालिकांनी उत्तमोत्तम शीर्षकगीतं प्रेक्षकांना दिली आहेत. खासगी चॅनलच्या सुरुवातीच्या काळात गेलो तर अगदी ‘क्यूंकी साँस भी कभी बहू थी’ या मालिकेच्या शीर्षकगीतापासूनची आठवण होते. स्मृती इराणीचं दरवाजा उघडून ‘रिश्तों के भी रूप बदलते है’ असं म्हणत सगळ्यांचं स्वागत करणं वगैरे प्रेक्षकांना आवडत होतं. ते इतकं प्रभावी होतं की ते आजही जसंच्या तसं आठवतं. तसंच काहीसं ‘कहानी घर घर की’, ‘कुटुंब’, ‘कुसुम’ अशा अनेक मालिकांचंही झालं. मराठीतही शीर्षकगीतांचा सिलसिला बघायला मिळाला. ‘आभाळमाया’, ‘प्रपंच’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘वादळवाट’, ‘अवंतिका’, ‘झोका’, ‘अग्निहोत्र’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीतं आजही त्यांच्या चालीसह तोंडपाठ असतील. शीर्षकगीतांचा हा सिलसिला आजही बघायला मिळतो. पण गाडी अडतेय ती शीर्षकं आणि मालिकांचा आशय यांचा एकमेकांशी फारसा संबंध नाही इथे. आताच्या मालिकांची शीर्षकगीतं चांगली असली, गुणगुणाविशी वाटली तरी शीर्षक आणि मालिकेच्या कथेचा संबंध काही भागांनंतर दिसून येत नाही.
मधुमेह असलेल्यांसाठी पथ्य असलेली मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. आदित्य-मेघनाच्या रेशीमगाठी जुळून आता वर्ष लोटलं, पण मालिकेचा पूर्णविराम घ्यायचा काही इरादा दिसत नाही. रेशीमगाठी जुळेपर्यंत हे शीर्षक मालिकेला शोभून दिसत होतं. आता मात्र ‘पुरे झाल्या रेशीमगाठी’ हे शीर्षक तंतोतंत जुळतंय. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेला जवळपास चारेक र्वष झाली, तरी मालिकेतल्या नायिकेचं ‘पुढचं पाऊल’ प्रभावीपणे दिसलेलं नाही. दिसलं ते फक्त अक्कासाहेबांचंच. पूर्वी एका मराठी मालिकेने रेकॉर्ड केला होता. ‘चार दिवस सासूचे’ असं त्या मालिकेचं नाव. ही मालिका अकरा र्वष चालू राहिली. या मालिकेच्या सुरुवातीचेच काही एपिसोड सासूचा छळ वगैरे दाखवला नंतर पुढची सगळी र्वष सासूचा सुनेला पाठिंबा, सगळ्या संकटांना सासू-सुनेचा एकत्र लढा असं सगळं दाखवलं. तरीही मालिकेचं शीर्षक ‘चार दिवस सासूचे’. त्याचं नाव ‘दहा र्वष सासूची’ असं काही तरी ठेवायला खरं तर हरकत नव्हती. असो.. असंच काहीसं ‘माझिया या प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेचंही. म्हणजे मालिकेतल्या नायक-नायिकांना एकमेकांचं प्रेम कळलं होतं, जाणवलं होतं, त्यांचं लग्नही झालं. तरी प्रीत कळेना? डेली सोपची कथा पुढे बदलण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मालिकेचं शीर्षक ठेवताना खूप विचारांती निर्णय घ्यायला हवा. पण, आकर्षक वाटलं, प्रेक्षकांच्या जवळचं वाटलं की ते सरधोपटपणे दिलं जातं. अर्थात सगळेच या टोपलीतले नाहीत. अपवाद यालाही आहेत. म्हणूनच काही हुशार, चाणाक्ष मंडळींनी मालिकेचं शीर्षक म्हणून त्या-त्या मालिकेतल्या मुख्य भूमिकेचीच नावं दिली. ‘देवयानी’, ‘रुंजी’, ‘दूर्वा’, ‘कमला’, ‘सरोजिनी’, ‘स्वरांगिनी’ अशी काही त्या मालिकांची नावं.
एखादी मालिका सुरू होण्याआधी तिच्या प्रमोशनचा प्रेक्षकांवर भडिमार केला जातो. सुरू असलेल्या मालिकांच्या ब्रेकमध्ये किमान दोनदा असं अध्र्या तासात सहा वेळा तरी त्याचे प्रोमो दाखवले जातात. आकर्षक प्रोमो आणि शीर्षकांमुळे प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट बघतातही. मालिका सुरू होते. काही एपिसोड दणक्यात गाजतात. हळूहळू त्यातला ताजेपणा कमी होऊ लागतो. इथेच मालिकेची गाडी घसरायला सुरुवात होते आणि मग शीर्षक आणि मालिकेच्या कथेची विसंगती वाटू लागते. शीर्षक बदलता येत नाही. मालिकेची पटकथा सोयीनुसार, गरजेनुसार बदलता येऊ शकते. पण, म्हणूनच पटकथा कितीही आणि कशीही बदलली गेली तरी त्याच्याशी संबंधित असं शीर्षक देण्याचं आव्हान मालिकावाल्यांना पेलवता आलं पाहिजे. ते होताना फारसं दिसत नाही. काही मालिका याला अपवाद आहेत. पण हे अपवाद कमीच.
‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेचा विषय तसा चांगला होता, पण पहिले पाढे पंचावन्न. लग्नानंतर नवरा-बायकोत वयाचं अंतर असल्यामुळे त्यांच्यात प्रेम रुजायला वेळ लागतो. हळूहळू ही प्रेम खुलण्याची प्रक्रिया मालिकेतून दाखवली. पण त्यांची मनं एकमेकांची झाल्यावर कशाला हवीये पुढे ही मालिका? शीर्षकाप्रमाणे मालिका जिथे संपवायला हवी तिथे संपवली नाही. मालिका शीर्षकाच्या पुढे गेली आहे. त्यामुळे शीर्षकाशी मालिका विसंगत वाटू लागली आहे. हिंदीत तर अशी शेकडो उदाहरणं सापडतील. ‘रिपोर्टर्स’ या मालिकेकडून खरं तर फार अपेक्षा होत्या. त्याचे प्रोमोज बघता नेहमीच्या ड्रामेबाजीपेक्षा वेगळी मालिका बघायला मिळणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. अर्थात मालिकेच्या शीर्षकावरून मीडियाचं चित्र बघायला मिळेल असंही वाटत होतं. पण निराशा झालीच. मीडिया राहिला बाजूला, पण मालिका प्रेमकथेच्या रुळावर गेली. चवीपुरता रोमान्स ठीक होता, पण इथे चवीपुरतं मीडियाचं चित्रण दिसतंय. त्यामुळे या मालिकेचं नाव ‘रिपोर्टर्स.. खबर.. दिल से दिल तक’ हे बदलून ‘रिपोर्टर्स.. एक प्रेमकथा’ असं ठेवायला हवं. ‘शास्त्री सिस्टर्स’ ही आणखी एक मालिका याच फळीतली. शीर्षकावरून काय वाटतं तर बहिणी-बहिणींची हलकीफुलकी कथा असेल. खरं तर आताच्या काळात टीव्हीवर ‘हलक्याफुलक्या’ कथेची अपेक्षा करणं म्हणजे चूकच. पण तरी काही अपवादात्मक मालिकांमुळे अजूनही प्रेक्षक अशी अपेक्षा करायला पुढे सरसावतो. अशी शीर्षकं वाचून, ऐकून मालिकांबाबत स्वप्नरंजन होऊ लागते. पण काही एपिसोडनंतर लगेचच या स्वप्नांना तडा दिला जातो. तर शीर्षकावरून बहिणींची कथा वाटणाऱ्या मालिकेत बहिणींचं प्रेम, त्यांच्यातलं नातं, जिव्हाळा हे केंद्रस्थानी असेल. या गोष्टी मालिकेत असल्या तरी त्याचा बाज हा फॅमिली ड्रामाच आहे.
अतिशयोक्तीचा कळस गाठलेली मालिका म्हणजे ‘कबूल है’. या मालिकेची लोकप्रियता प्रचंड आहे. ती का आहे हे न उलगडणारं कोडं. यात आता कितवी पिढी सुरू आहे हा संशोधनाचा विषय आहे. ‘कबूल है’वरून अर्थात ती प्रेमकहाणी असणार यात शंका नाही. पण सुरुवातीचे काही एपिसोड्स वगळता नंतर या मालिकेची गाडी रुळावरून घसरत गेली. फक्त सूड घेणं आणि सुडावर मात करत संकटाला सामोरं जाणं. मग पुन्हा एक नवा सूड असं हे सतत भिरभिरणारं चक्र यात आहे. त्यामुळे जुन्या सिनेमांप्रमाणे ‘बदले की आग’, ‘बदला लुंगी’ वगैरे अशी काहीशी नावं या मालिकेला शोभली असती. ‘जमाई राजा’ या नावातच धमाल आहे खरं तर. या नावाचा हिंदी सिनेमा फार गाजला होता. त्यावर आधारित असलेली ही मालिकाही मजेशीर असणार असा अंदाज होता. पण इथेही बिनसलंच. मालिकेतील गंमत राहिली बाजूला पण मालिकेने प्रेमाचा त्रिकोणच पकडला. मग घटस्फोट, प्रेमाची जाणीव, जुनी मैत्री, सूड वगैरे यात मालिका अडकली. तो ‘जमाई’ सासरी ‘राजा’ होण्याची स्वप्न पाहत बसला, पण त्याच्या पुढय़ात वेगळ्याच गोष्टी आल्या. ‘इतना करो ना मुझे प्यार’ या मालिकेच्या शीर्षकानुसार मालिका आत्ता कुठे घडू लागली आहे. मालिका सुरू होऊन आठेक महिने झाल्यानंतर घटस्फोटित जोडप्याचं पुन्हा लग्न झालंय. एकमेकांबाबत प्रचंड तिरस्कार असताना मालिकेचं नाव ‘इतना करो ना मुझे प्यार’ असं कसं असू शकतं?
थोडक्यात काय, शीर्षक आणि मालिकेचा विषय याचा समांतर रेषेत प्रवास सुरू आहे. एकमेकांशी काहीच ताळमेळ नाही किंवा शीर्षकात जी एका ओळीची कथा नेहमी दिसून येते ती त्या-त्या मालिकांमध्ये दाखवून झाली आहे. वास्तविक इथेच त्या मालिका संपवायला हव्या. पण, ‘वाढता वाढता वाढे’ हे मालिकांचं धोरण अप्रत्यक्षरीत्या स्वीकारल्यामुळे मालिका लांबलचक खेचण्याचा गुन्हा त्यांना माफ असतो. मात्र या सगळ्यात प्रेक्षकांची दिशाभूल होते, निराशा होते याकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे मालिकांच्या पटकथेत पाणी घालून ती आणखी किती वाढवणार याचा विचार करतानाचा मालिकेच्या शीर्षकाबाबतही तार्किकदृष्टय़ा किमान विचार होणं अपेक्षित आहे..!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:10 am

Web Title: tv serials 5
टॅग : Chota Pada,Tv Serials
Next Stories
1 आशू आवडे सर्वाना!
2 ‘तुमचं आमचं..’तून युथफूल प्रेमकथा
3 कुरघोडी करण्यात, घरचेच लोक जोरात
Just Now!
X