तरुणांसाठी असलेल्या मराठी कार्यक्रमांच्या संख्येत लवकरच वाढ होईल. याचं कारण म्हणजे ‘झी युवा’ हे नवं चॅनल. युवा पिढीचे विचार, विषय, राहणीमान असं सगळ्याचं प्रतिनिधित्व करणारं हे चॅनल पुढच्या आठवडय़ात सुरू होतंय. वयाने आणि मनानेही तरुण असणाऱ्यांसाठीचं हे तरुण चॅनल नवी उमेद घेऊन येतंय.

सास-बहू ड्रामा बघायचा कंटाळा आलाय? मालिकेतल्या रोजच्या संकटांपासून लांब जायचंय? नायिकेचं मुळुमुळु रडणं बघण्याचा वीट येतोय? या सगळ्यातून थोडा बदल हवाय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जर ‘हो’ असतील तर त्यासाठी एक फ्रेश पर्याय लवकरच उपलब्ध होतोय. तरुणाईला बांधून ठेवणारं, फक्त वयाने नाही तर मनानेही तरुण असणाऱ्यांची करमणूक करणारं, युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणारं, यंगिस्तान दुनियेत फेरफटका मारणारं ‘झी युवा’ हे नवकोरं चॅनल पुढच्या आठवडय़ात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चॅनलच्या नावातच तारुण्य आहे. त्यामुळे या चॅनलवर प्रक्षेपित होणाऱ्या मालिकांमधून काहीतरी नवं, अनोखं, वेगळं, ताजं बघायला मिळणार यात शंका नाही.

गेल्या काही दिवसांपासून या चॅनलच्या जाहिराती झळकत होत्या. यात नेमकं काय असेल, कसं असेल, कोणकोणते कलाकार असतील, काय कथा असतील अशी उत्सुकता, कुतूहल सगळ्यांच्याच मनात होतं. हळूहळू एकेक करत मालिकांचे प्रोमो, जाहिराती झळकू लागल्या तशी ही उत्सुकता आणखी वाढली. त्यानंतर मालिकांच्या शीर्षकगीतांचे व्हिडीओ प्रक्षेपित होऊ लागले आणि मालिकांचा बाज लक्षात येऊ लागला. वेगळ्या विषयांच्या, धाटणीच्या मालिका असल्याचा अंदाज पक्का होत गेला. ‘लव्ह लग्न लोचा’, ‘बन मस्का’, ‘इथेच टाका तंबू’, ‘फ्रेशर्स’, ‘श्रावणबाळ रॉकस्टार’ अशी हट के नावं असलेले अनेक कार्यक्रम यामध्ये असतील.

सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रोमोजमध्ये जरा हट के आणि गंमत वाटणारा प्रोमो आहे ‘बन मस्का’ या मालिकेचा. मालिकेचं शीर्षक वेगळं असल्यामुळे नेमकं यात काय असणार हे उत्सुकता वाढवणारं आहे. मैत्रेयी आणि सौमित्र यांची प्रेमकहाणी सांगणारी ही मालिका आहे. त्यांचं प्रेमाचं नातं हे आजच्या एखाद्या तरुण जोडीसारखंच. भांडण आणि प्रेम यांचं मिश्रण असलेलं नातं. सगळ्यांसारखी प्रेमकहाणी असली तरी यांची कहाणी काहीतरी वेगळं सांगू पाहतेय असा अंदाज आहे. शिवानी रांगोळे आणि शिवराज वैचल हे दोन तरुण कलाकार या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.

‘झी युवा’चे बिझनेस हेड बावेश जानवलेकर त्या चॅनलच्या काही वैशिष्टय़ांबद्दल सांगतात. ‘झी युवामध्ये वेगळ्या आशय-विषयाच्या मालिका आहेत. साधारणपणे एखाद्या मालिकेत नायिकेचं लग्न होतं आणि मग त्या मालिकेची कथा ही नायिकेचं सासर, माहेर आणि आणखी काही कुटुंब याभोवती फिरते. म्हणजे खरी कथा ही लग्नानंतर सुरू होते. पण आमच्या चॅनलमधील मालिकांच्या कथा या लग्नाआधीच्या असतील. यातही ब्लॅक आणि ग्रे शेडच्या व्यक्तिरेखा असतील, पण त्याही हलक्याफुलक्या कण्टेण्टमध्ये प्रेक्षकांसमोर येतील. स्टुडिओ, बंगला, सेट या ठिकाणांसह मालिकांचं शूटिंग काही प्रमाणात बाहेर म्हणजे आऊटडोअरही असेल. नवीन तरुण कलाकार या मालिकांमधून दिसणार आहेत’, असं ते सांगतात. हे चॅनल फक्त वयाने तरुण असलेल्यांसाठी नसून ते मनाने तरुण असणाऱ्यांसाठीही आहे असंही ते आवर्जून नमूद करतात. बावेश हा मुद्दा आणखी सोप्या भाषेत सांगतात. ‘पोस्ट बालक आणि प्री पालक अशा प्रेक्षकांसाठी या मालिका असल्याचं ते सांगतात. त्यामुळे या चॅनलवरचे कार्यक्रम बघणारा प्रेक्षक फक्त तरुण नसून संपूर्ण कुटुंबच आहे हेही यातून स्पष्ट होतं.

हिंदीमध्ये काही चॅनल्स फक्त तरुणांसाठी आहेत. त्यात म्युझिक चॅनल्स, युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मालिकांचे चॅनल्स, तरुणाईचे प्रश्न, विचार मांडणाऱ्या मालिका-कार्यक्रम यांचा समावेश आहे. अशा सगळ्या चॅनल्सच्या प्रेक्षकवर्गात मराठी तरुण वर्गही मोठा होता. काही परदेशी कार्यक्रमांचं भारतीय अनुकरण असलेल्या मालिका-कार्यक्रमांनाही मराठी तरुण प्रेक्षक लाभला. अशा वेळी मराठी तरुण वर्गासाठी मराठी चॅनल्स का काही करत नाही असा नेहमी प्रश्न असायचा. यावर वेळोवेळी चर्चाही झालेली आहे. आता चर्चेला पूर्णविराम मिळेल. ‘झी युवा’मुळे मराठी तरुण प्रेक्षक त्यांचंच प्रतिनिधित्व करणाऱ्या मराठी कार्यक्रमांकडे वळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तरुणांमध्ये घडणाऱ्या घटना, त्यांचे विचार, वागणं, स्वभाव, ट्रेण्ड, फॅशन, संवाद, करिअर, नातेसंबंध, मैत्री, प्रेम असं सगळंच या मालिकांमध्ये दिसेल. युवापिढीचं रोजचं जगणं या मालिकांमधून समोर येईल. वास्तवदर्शी विषय असले तरी त्याला काल्पनिक गोष्टींची जोड असेल.

कॉलेज हा प्रत्येकाच्या मनातल्या आठवणींचा महत्त्वाचा कोपरा. इथे होत असलेली मैत्री बरंच काही देऊन जाते. इथेच काहींचे प्रेमानुबंध जुळतात. तर इथेच आयुष्यात पुढे जाण्याची योग्य दिशा मिळते. अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी इथे होत असल्यामुळे कॉलेज हा टप्पा प्रत्येकाच्याच खूप जवळचा आहे. असंच कॉलेजविश्व दिसणारं आहे ‘फ्रेशर्स’ या मालिकेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून शिकण्यासाठी एकत्र आलेली तरुण मंडळी एका कॉलेजमध्ये मस्ती, धमाल, मजा करणार आहेत. त्यांची मैत्री, खुलणारं प्रेम, त्यांच्या समस्या अशा अनेक छटा यात दिसतील. अशा अतरंगी मित्रांची सतरंगी यारी ‘फ्रेशर्स’मध्ये दिसेल. तरुणाईच्या जवळ जाणारा आणखी एक विषय म्हणजे लग्न. हाच धागा पकडत ‘लव्ह लग्न लोचा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तीन मित्रांची ही कहाणी आहे. प्रेम या विषयासंबंधीच्या त्यांच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. याच मुद्दय़ाभोवती या मालिकेची कथा फिरते.

‘झी युवा’ हे झी समूहाचंच चॅनल आहे. झी मराठी या चॅनलवरही मालिका, कार्यक्रम असतात. झी मराठी प्रस्थापित चॅनल आहे. त्यामुळे ‘झी युवा’ला त्याच्याच समूहातील चॅनलशी टक्कर द्यावी लागणार आहे. दोन्ही चॅनल्सचा बाज वेगवेगळा असला तरी मराठी प्रेक्षक विभागला जाण्याची शक्यता आहे. तसंच इतर चॅनल्सशी असलेल्या स्पर्धेचा मुद्दाही आहेच. पण याबद्दल बावेश सांगतात, ‘चॅनल्समध्ये असलेली ही निकोप स्पर्धा आहे. हिंदी चॅनल्समध्ये दिसून येणारं वैविध्य आता मराठीमध्येही आणायचंय. प्रेक्षकांना काय बघायचंय हे त्यांना ठरवू द्यावं. मराठी चॅनल्स वाढले तर विविध प्रयोग करायला वाव मिळेल. तसंच कलाकारांनाही वेगवेगळ्या स्वरूपाचं काम करता येईल. नवोदित तरुण कलाकारांनाही भरपूर वाव मिळेल. आपल्याकडे क्रिएटीव्ह कण्टेण्ट खूप चांगला आहे. चॅनल्सच्या अशा निकोप स्पर्धेमुळे मराठी कण्टेण्टमध्ये आणखी प्रगती होईल.’

‘इथेच टाका तंबू’ ही मालिकाही उत्सुकता वाढवणारी आहे. यातल्या नायकाला सोनसरी गावातील रामाश्रय रिसोर्टमध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात. ही माणसं आणि मालिकेतला नायक यांचे संबंध कसे निर्माण होतात. त्यांचे नातेसंबंध कसे तयार होतात यातून या मालिकेची गोष्ट पुढे सरकते. ‘श्रावणबाळ रॉकस्टार’ ही आणखी वेगळ्या धाटणीची मालिका आहे. आत्तापर्यंत फक्त मालिकांचे प्रोमो दिसत असले तरी येत्या काळात कथाबाह्य़, रिअ‍ॅलिटी शो असे कार्यक्रमही दाखवले जाणार असल्याची माहिती बावेश देतात. ‘झी युवा हे फक्त चॅनल नसून एक विचार आहे. वेगळ्या धाटणीच्या मालिका बघण्याचा विचार, नवं काही देऊ पाहण्याचा विचार. ‘झी युवा’ हा एक मंच आहे. तिथे लाइफस्टाइल, शिक्षण, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आजच्या दुनियेतल्या अशा सगळ्या गोष्टी विविध कार्यक्रमांतून दिसून येतील. हे विषय हाताळताना कथा आणि कथाबाह्य़ अशा दोन्ही माध्यमांचा विचार केला जाईल’, असं बावेश सांगतात.

‘झी युवा’ हे चॅनल तरुणाईचे विविध विषय हाताळताना दिसणार आहे. सध्या अनेक प्रस्थापित चॅनल्स आहेत. अशा चॅनल्समध्ये येणं आणि टिकून राहणं हे नव्या चॅनल्ससाठी खऱ्या अर्थाने आव्हान आहे. प्रस्थापित चॅनल्समध्ये अनेक कार्यक्रम लोकप्रिय आहेत. त्यांचा नियमित प्रेक्षकवर्ग नव्या चॅनलकडे कसा वळेल हेही मोठं आव्हान असतं. पण, बावेश याकडे सकारात्मकदृष्टय़ा बघतात. ‘आपल्याकडे सिनेमा, नाटक यांच्यामध्ये प्रयोग होताना दिसतात पण, टीव्ही माध्यमातील कार्यक्रमांमध्ये फारसे दिसून येत नाहीत. सिनेमा, नाटकांमध्ये झालेल्या प्रयोगांना प्रेक्षकांनी उचलून धरलं. मग हा प्रयोग टीव्ही माध्यमातही दाखवायला हवा. प्रेक्षकांना हा प्रयोग, बदल बघायचा असतो. तेच आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही या आव्हानांकडे एक संधी म्हणून बघतो. आम्हाला मिळालेल्या संधीचा आम्ही योग्य लाभ घेतला आहे का हे मोठं आव्हान आहे असं आम्हाला वाटतं’, असं बावेश स्पष्ट करतात.

या चॅनलचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यातल्या मालिकांची नावं. ‘बन मस्का’, ‘फ्रेशर्स’, ‘लव्ह लग्न लोचा’, ‘इथेच टाका तंबू’,  ‘श्रावणबाळ रॉकस्टार’ ही मालिकांची नावं आकर्षक आहेत. छोटी पण चटकदार अशा नावांमुळे मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढते. ‘सगळ्याच मालिकांचे विषय हलकेफुलके असल्यामुळे त्यांची शीर्षकही तशीच हलकीफुलकी असावीत असं ठरवलं होतं. मुद्दाम काव्यात्मक करायची गरज नाही. शीर्षकं साधी-सोपी असावीत. आपण अनेकजण संमिश्र भाषा बोलत असतो. मालिकांच्या विषयानुसार नावंही साधी-सोपी असण्याकडे आमचा कल होता. फार जड नावं आम्हाला नको होती’, बावेश स्पष्ट सांगतात.

‘झी युवा’च्या माध्यमातून अनेक नवे कलाकार, विषय, दिग्दर्शक, तंत्रज्ञ या क्षेत्रात दिसून येतील. नव्यांचे नवे अनोखे प्रयोग या निमित्ताने प्रेक्षक अनुभवतील. इंग्लिश, हिंदी मालिकांकडे वळलेला मराठी तरुण प्रेक्षक या निमित्ताने मराठी कार्यक्रमांकडे वळेल यात शंका नाही. तसंच चॅनलच्या भूमिकेनुसार मनाने तरुण असणाऱ्यांसाठीही ‘झी युवा’ हे चॅनल नवी उमेद घेऊन येईल.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11