News Flash

दूरदृष्टी

ज्याचे कणीस भरघोस व उत्तम त्याला प्रथम क्रमांक व फिरती ढाल देण्यात येई.

21-lp-prashantएका गावात दरवर्षी शेतकऱ्यांसाठी एक स्पर्धा भरत असे. ज्याचे कणीस भरघोस व उत्तम त्याला प्रथम क्रमांक व फिरती ढाल देण्यात येई. गावातील गणपतशेठ गेली अनेक वर्षे हे पारितोषिक लीलया जिंकत होता. त्याची खासियत होती की तो दरवर्षी आपण वापरणार असलेले बियाणे आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी वाटून घ्यायचा. स्पर्धेच्या परीक्षकाला ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा त्याने गणपतशेठला प्रश्न केला, ‘अरे, जर तू तुझ्याकडील उत्तम प्रतीचे बियाणे इतरांना देत बसलास तर तू स्पर्धा कशी जिंकशील?’ त्यावर गणपतशेठचे उत्तर होते, ‘स्पर्धा तर तत्कालीन फायदा आहे, पण मी दूरदृष्टीने विचार करतो. जर माझ्याकडे उत्तम बियाणे असेल तर माझे पीक सर्वोत्तम येईलच, पण त्याच वेळी माझ्या आजूबाजूंच्या शेतकऱ्यांकडे निकृष्ट दर्जाचे बियाणे असेल तर वाऱ्यामुळे परागीभवन होऊन संकर होण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे माझे पीक वर्षे सरत जातील तसे हळूहळू कमी दर्जेदार होऊ शकते. पण त्याउलट मी उत्कृष्ट बियाणे इतरांना दिले तर या निकृष्ट संकराचा धोकाच राहणार नाही. तसेही फक्त उत्कृष्ट बियांमुळे सर्वोत्तम पीक येत नाही, त्यासाठी इतर घटकदेखील लागतातच.’’

आता दुसरी कथा पाहू या. एका गावात दरवर्षी कलिंगड खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येत असे. ही स्पर्धा मुलांसाठी असायची व गावातील तीन-चार कलिंगड उत्पादक ही स्पर्धा भरवायचे. सर्व उत्पादक उत्कृष्ट कलिंगडे उत्तम बाजारभाव मिळत असल्याने बाजारात विकायला पाठवायचे व छोटी कलिंगडे स्पर्धेसाठी वापरायचे. पण याला अपवाद होता व उत्तम राव यांचा. ते उत्तमातील उत्तम कलिंगडे स्पर्धेसाठी ठेवायचे. मुलांनादेखील मोठी व रसाळ कलिंगडे फस्त करण्यात मजा यायची; पण त्यांच्यासाठी एकच अट उत्तमराव ठेवायचे; ती म्हणजे मुलांनी बिया न गिळता त्या एका बाउलमध्ये टाकायच्या. हेतू हाच की पुढील वर्षी पीक घेण्यासाठी याच बिया वापरून कलिंगडाची पैदास करायची. उत्तम वाणाच्या बिया मिळाल्याने उत्तमरावांचे पीक अगदी त्यांच्या नावाप्रमाणेच असायचे; अगदी वर्षांनुवर्षे! पण कालांतराने उत्तमराव स्वर्गवासी झाले व त्यांच्या धंद्याची धुरा त्यांच्या मुलाकडे रवीकडे आली. पण रवीनेदेखील क्षणिक फायद्यासाठी इतरांसारखेच करण्यास सुरुवात केली. उत्तम कलिंगडे विकून नफा मिळविणे व बाजारात मागणी नसलेली कलिंगडे स्पर्धेत खायला ठेवणे, असे त्याने चालू केल्याने हळूहळू रवीकडच्या कलिंगडाची गुणवत्तादेखील घसरू लागली. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याच तत्त्वाला हरताळ फासल्याने मग अगोड, छोटी कलिंगडे फुकट खायलादेखील मुले मिळू लागली नाहीत. स्पर्धेचा बोजवारा व पिकाची खालावलेली गुणवत्ता यामुळे गावाची रया कायमची गेली.

कॉर्पोरेट क्षेत्रालादेखील हेच लागू होते. म्हणूनच आजकाल ‘लर्निग ऑर्गनायझेशन’ हा फंडा जन्माला येत आहे. आपल्याकडचे सर्वोत्तम ते इतरांशी शेअर करावे ही भावना वृद्धिंगत होत आहे.

आदित्य ग्रुपचे संतृप्त मिश्रा यांनी पुढाकार घेऊन महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, कोलगेट व विप्रो या कंपन्यांसोबत एक अभियान चालू केले आहे. बरेचदा नामांकित कंपन्यांमधील व्यवस्थापक, स्वत:च्या कंपनीपुरता किंवा कंपनी ज्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये आहे त्याबद्दलच विचार करतात. आपल्या इंडस्ट्री सेक्टरबाहेरील इतर अनेक सेक्टरबद्दलच्या माहितीची ते देवाणघेवाण करत नाही. त्यामुळे नवीन कल्पना, नवीन आव्हाने यांचा विचारच खुंटला जाऊ शकतो. म्हणूनच आदित्य ग्रुप, जो वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये नसला तरी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राशी देवाणघेवाण करण्यास इच्छुक आहे.

असाच काहीसा विचार सीमेन्स कंपनीनेदेखील केला. सीमेन्सच्या व्यवस्थापनाला असे जाणवले की कंपनी कोणत्याही क्षेत्रातील असो, तिच्या पुढील काही आव्हाने सारखीच असतात व म्हणूनच सीमेन्सने बी.एम.डब्लू., बायर अशा कंपनींशी माहितीची देवाणघेवाण चालू केली आहे. आपल्याकडील सर्वोत्तम ज्ञान जर आपण दुसऱ्या कंपनीला उपलब्ध करून दिले तरच आपण ही प्रगती करू व नवीन आव्हानांना पुरून उरू याची त्यांना खात्री पटली आहे.

जीएसके कंपनीच्या ‘टॅलेंट लीडरशिप’ विभागाचे काम बघणाऱ्या नताली वुडफोर्ड यांनी गुगल व माय डेंटिस्ट या कंपन्यांशी संधान साधले आहे. या दोन कंपन्यांमधील आव्हाने, त्यांचे भविष्याबद्दलचे आडाखे या बद्दल जी.एस.के.ला जाणून घ्यायचे आहे. या सहकार्याच्या बदल्यात जी.एस.के.देखील आपल्याकडे त्या कंपन्यांना आमंत्रित करते.

इतरांना मदत करण्याचे अनेक मार्ग असतात. ’ आपल्याकडील सर्वोत्तम ज्ञान वाटणे. ’ आपल्या मित्रांसाठी काय गरजेचे आहे हे ओळखून त्यादृष्टीने मदत करणे. मित्रांना अनावश्यक असलेल्या गोष्टींसाठी मदत करणे म्हणजे पालथ्या घडय़ावर पाणी घालण्यासारखे असते. ’ आपल्या-जवळील रिसोर्सेस मग ते मनुष्यबळ असेल, आर्थिकबळ असेल किंवा तांत्रिकबळ असेल; इतरांशी शेअर करणे. ’ कधी कधी आपल्या मित्रांना संधी उपलब्ध आहे हेच माहीत नसते. अशा वेळी त्या संधीबद्दल जरूर मार्गदर्शन करणे. ’ पारदर्शक अभिप्राय देऊन आपल्या मित्रांना मदत करणे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या उक्तीप्रमाणे आपण उणिवा नजरेस आणून द्याव्यात व त्यावर शक्य असल्यास उपायदेखील सुचवावेत. ’ आपल्या मित्रांच्या उत्पादनांची (अशी उत्पादने जी आपल्या उत्पादनांची स्पर्धक नाहीत. उदा . विप्रो कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महिंद्राची प्रवासी वाहने सुचवून) जाहिरात करून आपण त्यांना मदतीचा हात पुढे करू शकतो. ’ काहीच शक्य नसेल तर आपला अमूल्य वेळ देऊन मदत करणे.

सायन्समध्ये ट्रँझेक्टिव्ह मेमरी सिस्टीम (TMS) ही एक बहुमूल्य कन्सेप्ट आहे. यानुसार जे ज्ञान दोन किंवा दोनपेक्षा अधिक लोकांमध्ये शेअर केले जाते त्यामुळे मैत्री वृद्धिंगत होते, एकमेकांवरील अवलंबित्व वाढल्याने विश्वास वाढतो. थोडक्यात काय तर अनुभवसंपन्न होण्यासाठी, मैत्री व विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याकडचे सर्वोत्तम शेअर करा.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2016 1:18 am

Web Title: corporate stories by prashant dandekar 2
Next Stories
1 गुरुमंत्र
2 कॉमन सेन्स
3 निसर्गाच्या सान्निध्यात
Just Now!
X