करिअरमध्येच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी होण्यासाठी लॅटरल थिंकिंगची आवश्यकता असते.

एकदा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा वनविहाराला आलेल्या राजकन्येच्या प्रेमात पडतो. राजकन्यादेखील त्या मुलाच्या प्रेमात आकंठ बुडून जाते. राजाला हे सर्व प्रेमप्रकरण अमान्य असते; त्याला राजकन्या व शेतकऱ्याच्या मुलाला कायमचे विलग करायचे असते. पण राजाला, आपण सर्वाना समान लेखतो, आपण सर्वाना समान संधी देतो असे सर्व रयतेला दाखवूनदेखील द्यायचे होते. ढोंगीपणाच्या बुरख्याखाली आपला अंतस्थ हेतू साध्य करण्यासाठी राजा एक युक्ती करतो. तो दरबार भरवून घोषणा करतो की तो राजकन्येचा विवाह शेतकऱ्याच्या मुलासोबत करून द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. ती अट म्हणजे राजा दोन चिठ्ठय़ा बनविणार; एकावर लिहिले जाईल मंजूर व दुसऱ्यावर नामंजूर. मुलाने मंजूर लिहिलेली चिठ्ठी निवडली तर राजकन्येचा विवाह शेतकऱ्याच्या मुलासोबत होणार व त्याने नामंजूर लिहिलेली चिठ्ठी उचलली तर हा विवाह होणार नाही.

तो दरबार भरविण्याचा आदल्या रात्री दोन चिठ्ठय़ा बनवितो व दोन्ही वर नामंजूर असेच लिहितो. ही चलाखी करताना राजकन्येने पाहिलेले असते. भर दरबारामध्ये वडिलांचा अपमान होऊ नये म्हणून ही चलाखी ती फक्त आपल्या प्रियकराच्या कानामध्ये सांगते. शेतकऱ्याचा मुलगा मंद स्मित करत म्हणतो, ‘‘प्रिये चिंता करू नकोस, आपल्याला हवे तेच होईल,’’ दरबारामध्ये जेव्हा मुलगा सर्वासमोर चिठ्ठी उचलतो, तेव्हा तो ती वाचल्याचे नाटक करून लगेच त्या चिठ्ठीचे तुकडे करतो व राजकन्येवरून ते तुकडे नोटांसारखे ओवाळून टाकत आपण राजकन्येला जिंकल्याचे जाहीर करतो. राजाला खूप आश्चर्य वाटते. तो म्हणतो, ‘‘तू चिठ्ठीचे तुकडे केलेस मग आम्ही कसे मानू की तू जिंकलास?’’ त्यावर त्या मुलाचे उत्तर होते, ‘‘महाराज, राहिलेली दुसरी चिठ्ठी उघडा, त्यावर नामंजूर लिहिले असेल म्हणजेच मला मिळालेली चिठ्ठी ‘मंजूर’ लिहिलेली होती हे सिद्ध होईल.’’ राजाला हे विधान खोडून काढणे शक्यच नसते. शेतकऱ्याच्या मुलाने लॅटरल थिंकिंग वापरून बाजी आपल्यावरच उलटविली हे एव्हाना राजाला कळून चुकलेले असते.

लॅटरल थिंकिंग वापरून कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील यश कसे प्राप्त करता येते हे आपल्याला पुढील काही गोष्टींवरून लक्षात येईल. एका उद्योजकाला अमेरिकेमध्ये टर्किश कॉफी विकण्याचा धंदा चालू करायचा होता. टíकश कॉफी ही संकल्पनाच मुळात अमेरिकेमध्ये खूप कमी लोकांना माहीत असल्याने त्याचा अपेक्षित जम बसत नव्हता. मग विचार केला की ज्या लोकांनी कधी टíकश कॉफीच चाखली नाही अशा लोकांना टार्गेट केले तर? त्या उद्योजकाने मग एस्प्रेसो कॉफी पिणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित केले. थोडय़ाच महिन्यांमध्ये या उद्योजकाचा टर्किश कॉफीचा धंदा १२०० टक्क्यांनी किंवा १३ पट वाढला. टर्किश कॉफी माहीत असलेलाच माणूस ती कॉफी ऑर्डर करेल या समजुतीला तडा देण्याचे काम केल्यामुळेच त्याच्या धंद्यामध्ये बरकत आली.

ग्रेग एका रिक्रूटमेंट एजन्सीचा प्रमुख होता. त्याला एका नामवंत औषध कंपनीसाठी एक माणूस रिक्रूट करण्याची ऑर्डर मिळाली होती. आफ्रिकन अमेरिकन, २५ ते ३५ वयोगटातील तरुण जो दिसायला स्मार्ट असेल व सायन्समध्ये पदवीधर असेल असे काहीसे ते जॉब डिस्क्रिप्शन होते. ग्रेगच्या डेटा बेसमध्ये सध्या असा एकदेखील कँडिडेट नव्हता. त्याच्या ओळखीच्या काँटॅक्ट्समध्येदेखील असा माणूस उपलब्ध नव्हता. याच टेन्शनमध्ये असल्याने तो आज गाडीमध्ये पेट्रोल न भरताच बाहेर पडला होता. वाटेत त्याची गाडी पेट्रोल अभावी बंद पडली असताना एका तिशीतल्या आफ्रिकन अमेरिकन कार चालकाने ग्रेगला मदत करत ग्रेगची गाडी आपल्या गाडीमागे बांधून पेट्रोल पंपपर्यंत आणून दिली. ग्रेगने त्या कार चालकाचे आभार मानले, पण तो त्याचे नाव, पत्ता वगैरे विचारायचेच विसरून गेला. पण याच विसरभोळेपणामुळे त्याला एका भन्नाट कल्पना सुचली.

तो तडक एका नामवंत औषध कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचला. ज्या कंपनीसाठी त्याला माणूस शोधायचा होता त्या कंपनीची ही कंपनी प्रतिस्पर्धी होती. रिसेप्शनला पोहोचल्यावर ग्रेगने आपली गाडी कशी बंद पडली, आपल्याला कशी मदत मिळाली हे सर्व सांगितले, सोबत त्याने एक थाप मारली की त्या माणसाचे नाव विसरलो असलो तरी तो इथे काम करतो व तो सायन्स ग्रॅज्युएट आहे हे माझ्या लक्षात आहे. रिसेप्शनिस्टने मग त्याला त्या माणसाचे नाव ‘डेव्हिड’ आहे का असे विचारले. ग्रेग म्हणाला, ‘नाही.’ मग त्या रिसेप्शनिस्ट ने तो ‘मायकेल’ आहे का असे विचारले. त्यावरदेखील ग्रेग म्हणाला, ‘नाही.’ मग त्या रिसेप्शनिस्टने ‘जॉर्ज’, ‘डोनाल्ड’ अशी अजून काही नावे घेतली, पण ग्रेगने सर्व नावे नाकारली व सरतेशेवटी तो रिसेप्शनिस्टची दिलगिरी मागून व तिने केलेल्या प्रयत्नांचे आभार मानून माघारी निघाला. ग्रेगने मग स्वत:च्या ऑफिसमध्ये पोहोचताच जॉर्ज, डोनाल्ड, डेव्हिड, मायकेल या सर्वाना फोन केले, त्यांचा इंटरवू घेतला व त्यांच्यामधूनच एकाची निवड करून आपल्या क्लायंटची गरज पूर्ण केली.

आपला रेझ्युमे रिक्रूटर लोकांच्या नजरेत सर्वप्रथम भरावा म्हणून एका मुलाने आपला रेझ्युमे चॉकोलेटच्या रॅपर (वेष्टन) रूपात बनविला. आपली सृजनशीलता जो रेझ्युमे डिझायनिंगमध्ये दाखवू शकतो तो आपल्याला जाहिरातीच्या नवनवीन कल्पना देखील सुचवू शकतो हे ताडून अनेक क्रिएटिव्ह कंपन्यांनी त्या मुलाला ताबडतोब जॉब ऑफर केला.

दुसऱ्या एका मुलाने टॉपच्या क्रिएटिव्ह कंपन्यांच्या डायरेक्टरची नावे शोधून काढली. त्याने मग फक्त सहा डॉलर खर्च करून काही गुगलच्या जाहिराती विकत घेतल्या. जेव्हा कधी हे डायरेक्टर स्वत:चे नाव गुगलवर शोधायचे तेव्हा एक जाहिरात पॉपअप व्हायची ज्यात लिहिलेले असायचे, ‘श्रीमान, स्वत:चे नाव शोधण्यात जेवढे थ्रिल आहे त्यापेक्षा जास्त थ्रिल मला हायर करण्यात आहे’ हे काही वेगळे सांगायला हवे का की अशा मुलाला त्वरित जॉब ऑफर करण्यासाठी बोलावून घेण्यात आले!

लॅटरल थिंकिंगचा फंडा आता तुमच्याही अंगवळणी पडूच द्या; बघा मग तुमचे करिअर कसे खऱ्या अर्थाने उजळून निघू शकते!
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com