07 August 2020

News Flash

नावीन्याचा ध्यास

नावीन्यपूर्ण वस्तूला एक आगळेवेगळेच मूल्य असते.

17-lp-prashantएकदा एका राजकन्येचे एका गुलामावर प्रेम जडले. तिच्या  डोक्यातून गुलामाचे भूत कायमचे उतरविण्यासाठी प्रधानाने राजाला सुचविले की राजकन्या व गुलामाला दोन दिवस एकमेकांच्या सहवासात व्यतीत करण्याची परवानगी द्या. राजाने प्रधानाच्या सल्ल्यानुसार केले. आणि काय आश्चर्य! तिसऱ्या दिवशी राजकन्या राजाला येऊन म्हणाली की, यापुढे मला गुलामाचे तोंडदेखील पाहायचे नाही. राजाने प्रधानाला विचारले की ही किमया कशी घडली. तेव्हा प्रधानाने उत्तर दिले, ‘‘महाराज, आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी जे आपल्याकडे नसते ते मिळविण्याचा हव्यास असतो, हा मनुष्यस्वभाव आहे. एकदा ते मिळाले की थोडय़ाच काळात नव्याची नवलाई संपून त्या गोष्टीमध्ये उणिवाच उणिवा दिसू लागतात व ती गोष्ट नजरेसमोर नकोशी वाटू लागते. राजकन्येला मेहनती गुलामाच्या पीळदार देहयष्टीचे, त्याच्या ताकदीचे आकर्षण वाटत होते. पण ती त्याच्या सहवासामध्ये आली तेव्हा तो किती अरसिक, बुद्धीने सामान्य आहे याची जाणीव होऊन तिचे मन उडाले.’’

कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील असेच असते. इथे राजकन्येऐवजी ग्राहक असतो तर गुलामाऐवजी एखादे प्रॉडक्ट. प्रॉडक्ट नवीन आहे तोपर्यंत ग्राहक वाटेल ती किंमत प्रॉडक्टसाठी मोजायला तयार असतो, कारण त्याला ते हवे असते. पण एकदा ते जुने झाले की ग्राहकाचे मन त्यावरून कायमचे उडते. टेलिफोन, वॉकमन,  पेजर, व्हीसीआर, ही यादी न संपणारी आहे.

नावीन्यपूर्ण वस्तूला एक आगळेवेगळेच मूल्य असते. ते एन्कॅश करायला बऱ्याच कंपन्या निश  (विशिष्ठ) मार्केटमध्ये शिरकाव करायला बघत असतात. जीई अप्लाइन्सेस या कंपनीने ‘फर्स्ट बिल्ड’ नावाचा ऑनलाइन तसाच फिजिकल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. नवीन युगाच्या होम अ‍ॅप्लायन्सेसच्या डिझाइन तसंच विक्रीसाठी याचा उपयोग करण्यात येतो. ग्राहकाभिमुख उत्पादनाचा विचार, त्यासाठीची कल्पनाशक्ती, ती प्रत्यक्षात व्यवहारामध्ये उतरविण्यासाठी लागणारे धैर्य व कौशल्य असे अनेक पैलू ‘फर्स्ट बिल्ड’साठी विचारात घेतले जातात. याव्यतिरिक्त नवीन उत्पादनाचे मार्के टिंग कसे करावे या संदर्भातील सर्वसमावेशक विचारदेखील या प्लॅटफॉर्मवर केला जातो. नवीन कल्पनांना यशस्वीपणे उत्पादनामध्ये रूपांतरित करून, त्या उत्पादनांना त्वरित बाजारात उतरविण्यासाठी जीईने या प्लॅटफॉर्मसोबत एक मायक्रो फॅक्टरीदेखील जोडली गेली आहे. नवीन कल्पना प्रत्यक्षात प्रॉडक्ट रूपामध्ये सादर करणाऱ्या माणसाचे जाहीर कौतुक करून त्याला उचित श्रेय व सोबत योग्य तो मोबदला देण्यात जीई तत्पर असल्याने अनेक संशोधक जीईच्या ‘फर्स्ट बिल्ड’ प्लॅटफॉर्मचा वापर करून घेत आहेत.

सॅमसंग कंपनीचे ओपन इनोव्हेशन सेंटर (ओआयसी)  उद्योगजगतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. नवीन कल्पनाशील उद्योजकांसोबत कशी भागीदारी वाढवायची यासाठी ओआयसीमध्ये चार नीती अवलंबिल्या जातात. पहिली म्हणजे नवीन कल्पना मांडणाऱ्या लोकांसोबत भागीदारीचा प्रस्ताव. दुसऱ्या नीतीअंतर्गत स्टार्ट अप बिझनेस सुरू करणाऱ्या उद्योगांसाठी ‘आरएनडी’ची सुविधा उपलब्ध करून देणे. तिसऱ्या नीतीमध्ये स्टार्ट अप किंवा जम बसलेल्या छोटय़ा बिझनेसला मर्जर व अ‍ॅक्विझिशन अंतर्गत सॅमसंगच्या पंखाखाली घेणे अभिप्रेत असते. त्याअंतर्गत चार-पाच धडपडय़ा व कल्पनाशक्ती असणाऱ्या तरुणांची टीम बांधण्यात येते. त्यांना एका छोटय़ा कंपनीचा दर्जा देण्यात येतो. त्यांना पूर्ण निर्णय स्वातंत्र्य असते. एकदा यांनी नवीन उत्पादन (प्रोटो टाईप) तयार केले की या छोटय़ा कंपनीला मोठय़ा कंपनीप्रमाणे वागणूक देण्यात येते, ज्यायोगे नवीन उत्पादन  जगभर विकण्यासाठी मनुष्यबळ, आर्थिकबळ, लॉजिस्टिक (वितरण जाळे) प्रणाली इत्यादी गोष्टींची तिला कमतरता भासू नये. ‘अ‍ॅक्सिलेरेटर्स’ नावाने न्यूयॉर्क सिटीमध्ये सॅमसंग हा उपक्रम राबविते. त्याचप्रमाणे कंपनी ‘व्हॅल्यू पूल’ तयार करण्यासाठी विद्यापीठ पातळीवरील  विद्यार्थी, ग्राहक, स्वत:च्या उत्पादनांना माल व सेवा पुरविणारे व्हेंडर्स अशा लोकांमध्ये उद्योजक शोधत असते.

‘लेगो’ (छएॅड) ही नावीन्याचा ध्यास घेणारी कंपनी आहे. ती नावीन्याचा तीन प्रकारे विचार करते. कोणत्या नवीन उत्पादनांची गरज आहे आणि ती कुठे आहे. तिसरे म्हणजे या नवीन उत्पादनांमुळे कंपनीला काय फायदे आहेत याचा ताळेबंद मांडण्यात येतो. हा नावीन्याचा ध्यास कसा पूर्ण करायचा हे शिकण्यासाठी लेगोने अन्य १२ कंपन्या याबाबत काय करीत आहेत हे जाणून घेतले. त्यासाठी त्यांनी १२ कंपन्यांमधील लोकांच्या मुलाखती घेतल्या. स्वत:च्या कर्मचाऱ्यांमध्ये नावीन्याची भूक किती आहे, इनोव्हेशनसाठी पूरक असे कंपनी कल्चर सर्व स्तरावर आहे की नाही व नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आवश्यक कौशल्य  आहे की नाही हे जोपासण्यासाठी कंपनीने चार मायक्रो प्रोजेक्ट्स लाँच केले. ‘लर्निग बाय डूईंग’ हे तत्त्व मायक्रो प्रोजेक्टसाठी वापरले जावे हा कंपनीच्या व्यवस्थापनाचा उद्देश होता. व्यवस्थापनाला ही रास्त भीती आहे की बाहेरील व्यक्तींच्या कल्पनांवर आधारित नवीन उत्पादन काढले तर त्यातून स्वामित्व हक्कासंबंधित कायदेशीर अडचणी उभ्या राहू शकतात. त्याचबरोबर व्यवस्थापनाला हेदेखील माहीत आहे की ग्राहकाला रोज नित्यनवीन गोष्टी हव्या असतात, त्यांच्या कल्पना सत्यात याव्यात यासाठी त्यांना लक्षपूर्वक ऐकणारा व त्यायोगे योजना आखणारा माणूस हवा असतो. या सर्व गोष्टी मनात ठेवूनच लेगो कंपनी, कंपनी अंतर्गत असलेल्या ग्रुपवर नावीन्याची भिस्त ठेवून आहे. या ग्रुपमध्ये ३० एक्स्पर्ट्सच्या कल्पना, विचार, अनुभव यांचा साठा आहे तसेच वेगवेगळ्या दहा मुलाखतींमधून गोळा करण्यात आलेले ज्ञानदेखील आहे.

इनोव्हेशनचा हात सोडला त्या कंपन्या कायमच्या गाळात गेल्या. फियाट पद्मिनी, अ‍ॅम्बेसॅडर या मॉडेल्सच्या पुढे जाऊन नवीन काही न दिल्यामुळे या दोन कार कंपन्या मारुती, होंडासारख्या नवनवीन मॉडेल्स नित्यनेमाने देणाऱ्या कंपन्यांपुढे निष्प्रभ ठरल्या. सॅमसंगमुळे हीच पाळी नोकियावर आली, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2016 1:23 am

Web Title: new products
Next Stories
1 साथी हाथ बढमना
2 वाटाघाटी
3 पॉझिटिव्ह थिंकिंग
Just Now!
X