17-lp-prashantएकदा एक भारतीय पर्यटक सिंगापूर विमानतळावर उतरला. त्याने टॅक्सी केली. टॅक्सी ड्रायव्हरने त्याला हॉटेलवर व्यवस्थित पोहोचविले. प्रवासात त्या पर्यटकाला पदोपदी सिंगापूरचे चकचकीत, गुळगुळीत रस्ते भुरळ पाडत होते. नाही म्हणायला एका ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने टॅक्सीने यू टर्न घेतल्याचे त्याने नोटीस केले होते. टॅक्सीतून उतरताना पर्यटकाने मीटरमध्ये १२ डॉलर झाल्याचे पाहिले असल्याने, त्याने तितके पैसे ड्रायव्हरच्या हातावर टेकविले; पण टॅक्सी ड्रायव्हरने पर्यटकाला एक डॉलर परत केला आणि म्हणाला, ‘‘खरे तर तुमच्या हॉटेलजवळचा रस्ता काही दिवसांसाठी खणला आहे हे मला माहीत होते, पण आज मी विचारांमध्ये असल्याने ते विसरलो व त्यामुळे मी खणलेल्या रस्त्याने तुम्हाला घेऊन गेलो, पण मग मला चूक उमजताच टॅक्सी माघारी फिरवून मी दुसऱ्या रस्त्याने तुम्हाला हॉटेलवर आणले. मी जर आधीच योग्य रस्ता घेतला असता तर ११ डॉलर झाले असते.’’ त्यावर पर्यटक म्हणाला, ‘‘पण हे तू मला सांगितले नसते तरी चालले असते.’’ त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, ‘‘एअरपोर्ट सोडल्यावर सिंगापूरचा पहिला प्रतिनिधी म्हणून आम्ही पर्यटकांना भेटतो. आमचाच अनुभव पर्यटकांना वाईट आला तर माझ्या देशाबद्दल त्याचे मत कायमचे विपरीत होऊ  शकते. मी तुम्हाला जास्तीच्या भाडय़ासाठी मुद्दामून लांबच्या रस्त्याने आणले असा पूर्वग्रह तुम्हाला होऊ  नये यासाठीच एक डॉलर परत करण्याचा हा अट्टहास!’’

आता दुसरी कथा पाहूया. एका भारतीय पर्यटकाला ट्रेनमधून जपान फिरण्याची इच्छा झाली. पर्यटक ट्रेनमध्ये चढला तेव्हा त्याचे लक्ष समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे गेले. ती व्यक्ती सीटखाली वाकून काही तरी न्याहाळत होती. क्षणार्धात त्या व्यक्तीने आपल्या पिशवीतून सुई-दोरा काढला व ती फाटलेली सीट शिवू लागली. भारतीय पर्यटकाने त्या व्यक्तीला विचारले,     ‘‘ का हो, तुम्ही रेल्वे कर्मचारी तर दिसत नाहीत मग हे काय करत आहात?’’ त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘मी एका शाळेत शिक्षक आहे. ही फाटलेली सीट मी तीन-चार दिवसांपासून पाहत आहे. तुमच्यासारख्या परदेशी पाहुण्यांनी अशी सीट पहिली तर आमच्या देशाबद्दल तुमचे मत नकारात्मक होईल, म्हणून मी आज आठवणीने सुई-दोरा सोबत घेतला.’’ सीट शिवून झाल्यावर तो शिक्षक दुसऱ्या सीटवर जाऊन बसला. पुढच्या स्टेशनवर एक हिप्पी ट्रेनमध्ये चढला व शिक्षकाच्या समोरील सीटवर, अत्यंत बेफिकीरपणा दाखवत स्थानापन्न झाला. पायातील बूट न काढताच त्या माणसाने समोरील सीटवर पाय पसरले. शिक्षकाने मोठय़ा अदबीने त्या माणसाला सीटवरून पाय खाली ठेवण्याची विनंती केली, पण तो उन्मत्त हिप्पी तसाच बसून राहिला. सरतेशेवटी त्या शिक्षकाने त्या माणसाचे पाय आपल्या मांडीवर ओढून घेतले. शिक्षकाचे सर्व वागणे भारतीय पर्यटक दुरून पाहत होता. हिप्पी ओशाळून तिथून निघून गेला. भारतीय पर्यटक आता हिप्पीच्या जागेवर आला व परत एकदा त्या शिक्षकांशी संवाद साधू लागला. ‘‘तुमच्या वागण्याचा अर्थ मला जरा कळू शकेल का?’’ या प्रश्नावर त्या शिक्षकाचे उत्तर होते , ‘‘तो हिप्पी आमच्या देशाचा अतिथी असल्याने मी त्याचा उपमर्द करू शकत नाही, ते आमच्या देशाच्या आदरातिथ्यात बसत नाही, पण त्याच वेळी मी माझ्या राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान सहन करू शकत नाही म्हणून मी माझी मांडी त्या माणसाला देऊ  केली.’’

कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करताना असे देशप्रेम एखादा दाखवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच ‘हो’ आहे. ‘२६ नोव्हेंबर’ मुंबई हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात होता हे एव्हाना सिद्ध झाले आहे. या हल्ल्यात टाटा ग्रुपच्या ‘ताजमहाल’ या हॉटेलचे-देखील प्रचंड नुकसान झाले होते. म्हणूनच जेव्हा थोडय़ा वर्षांनी टाटा मोटर्सला पाकिस्तान सरकारकडून टाटा सुमो ग्रँडसाठी कित्येक कोटींची ऑफर मिळाली तेव्हा टाटा यांनी राष्ट्रप्रेम दाखवत पाकिस्तानच्या मागणीला धुडकावून लावले.

दिलफरोझ काझी या काश्मिरी युवतीने आपले राष्ट्रप्रेम दाखवून देण्यासाठी हरियाणामध्ये काश्मिरी लोकांसाठी कॉलेज सुरू केले आहे. अशांत काश्मीरमध्ये नवीन पिढीच्या हाती बंदुका व बॉम्बच्या जागी रोजगाराचे साधन असावे या दृष्टीने त्यांनी विविध उपाय योजले आहेत. महिलांसाठी पार्ट टाइम कोर्सेस खुद्द काश्मीरमध्ये चालू करून त्यांनी करिअर व राष्ट्रप्रेमाची उत्तम सांगड घातली आहे.

‘जोडी लॉजिक’ नावाचा स्टार्टअप बिझनेस चालू करताना श्रीनिवास कृष्णस्वामी यांनी आपण राष्ट्रप्रेम हा मुद्दादेखील विचारात घेतला होता, असे मोठय़ा अभिमानाने एका इंटरवूमध्ये नमूद केले आहे. भारतामध्ये लग्नासाठी बायोडेटा हा वधू किंवा वर स्वत: तयार न करता त्यांचे आई-वडील किंवा घरातील, नात्यातील ज्येष्ठ व्यक्ती करतात. जोडी लॉजिकमध्ये मात्र स्वत: वधू किंवा वराला त्यांच्या आवडीचा बायोडेटा बनविण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. भारतामध्ये जेव्हा ज्येष्ठांकडून बायोडेटा बनविला जातो तेव्हा पत्रिका, वेतन/ कमाई व कुटुंबाची पाश्र्वभूमी यांना जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जेव्हा वधू व वर एकत्र भेटतात तेव्हा त्यांचे सूत जुळणे जरा कठीण जाते, कारण बायोडेटामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल फारच कमी माहिती दिलेली असते. आपल्या भारतीय समाजातील अरेंज्ड मॅरेजला जास्त यश मिळावे या उद्देशाने त्यांनी हा स्टार्ट अप बिझिनेस चालू केला.

एका व्हिडीओत रस्त्यावर १०० रुपयांची एक नोट पडलेली असते. त्या दिशेने एक वेडसर माणूस व एक नोकरदार माणूस वेगाने जात असतो. नोकरदार माणूस अक्षरश: झडप घालून १०० रुपये उचलतो तर तो वेडा रस्त्यावर पडलेला तिरंगा उचलून मोठय़ा गर्वाने आपला फाटक्या गंजीवर लावतो. हे पाहून त्या नोकरदार माणसाला लाज वाटते व तो ती १०० रुपयाची नोटपण बळेबळेच त्या वेडय़ाच्या हातात सरकवितो. कॉर्पोरेट क्षेत्रामध्येदेखील आपण सर्वानी हाच नियम पाळला पाहिजे. पैसे व देशप्रेम यांची निवड झाल्यास प्राधान्य देशप्रेमालाच मिळाले पाहिजे. देशप्रेम निवडले की एक दिवस पैसे व सोबत आपल्याबद्दलचा आदरभावदेखील आपल्याशी आपसूकच येणारच आहे.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com