पोझिटिव्ह थिंकिंग ऊर्फ सकारात्मक विचारसरणी म्हणजे एक सांसर्गिक रोग आहे. जो या रोगाच्या संपर्कात येतो, त्याच्यामध्ये एक नवीन ऊर्जा संचारते. पण बरेचदा बाहेरील जग हे स्पर्धा, गलिच्छ राजकारण, स्वार्थीपणा, असुरक्षितता यांनीच बजबजलेले असते असा गैरसमज झाल्याने ही सकारात्मक ऊर्जा माणसांकडून दडवून ठेवली जाते. आसपासच्या जगातील नकारात्मकता जर कमी करायची असेल तर ही सकारात्मक विचारसरणी फुलून डवरून बहरली पाहिजे व त्यासाठी प्रत्येक माणसाने हा संसर्गजन्य रोग जास्तीत जास्त पसरविला पाहिजे.

एकदा जमिनीत दोन बिया शांतपणे पहुडलेल्या असतात. त्यातील एक बी बाहेरचे जग पाहायला आसुसलेली असते, तर दुसरीने त्या जगाचा धसका घेतलेला असतो. सकारात्मक विचारसरणी असलेली बी आपली मुळे खोलवर नेण्यासाठी खूप आसुसलेली होती, तर नकारात्मक विचार करणारी बी, आपल्यासाठी त्या खोलवर अंधारात काय दडवून ठेवले असेल या भीतीने मुळे घट्ट कवटाळून बसलेली होती. उत्साही बी जमिनीच्या वर डोकावून, सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघण्यास तयार होत होती; आपली जमिनीवर फुटणारी पालवी वसंतोत्सवाची वर्दी देण्यासाठीच आहे याची तिला खात्री होती तर नैराश्याने ग्रासलेल्या बीला आपण जर जमिनीशी संघर्ष केला तर आपला लुसलुशीत अंकुर खरचटला जाईल याची चिंता होती. ऊर्जेने रसरसलेल्या बीला आपल्या पानांना दवबिंदूंचा हार घालण्याची घाई झाली होती; तर उदास बीला आपली पालवी, गोगलगाय फस्त करेल अशी जीवघेणी भीती होती. शेवटी व्हायचे तेच झाले. उत्साही बी तरतरून आल्यावर एका लहान मुलाने तिला खत-पाणी घालण्यास सुरुवात केली. याउलट भेदरलेली बी जमिनीतच झोपून राहिली व एके दिवशी भुकेल्या कोंबडीने ती बी गट्टम करून टाकली. तात्पर्य काय तर नकारात्मक विचारसरणीने फक्त नुकसानच होते. त्यामुळे करिअर करताना आपल्या मनात फक्त सकारात्मक विचारसरणीचेच बीज रुजावे यासाठी आपण खास प्रयत्न केले पाहिजेत.

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
preventive chemotherapy
कोण घेतंय ‘ही’ केमोथेरपी? ठरणार का ती कर्करुग्णांसाठी वरदान? तज्ज्ञ काय सांगतात?

मायकेल जोर्डनला बास्केट बॉल खेळण्याची खूप इच्छा होती, पण त्याची ५ फूट ९ इंच उंची, त्याच्या स्वप्नांच्या आड आली. त्याचा सहकारी लेरोय स्मिथ याची त्याच्या जागी निवड झाली; कारण एकच; तो मायकेलपेक्षा उंच होता. त्याच क्षणी मायकेलने पण केला की आपण आपली उंची वाढवायची व बास्केट बॉल खेळायचे. प्रयत्नपूर्वक त्याने आपली उंची चक्क ६ फूट ३ इंचापर्यंत वाढविली व आपल्या स्वप्नाला गवसणी घातली. ऑलिम्पिकमध्ये २ सुवर्ण पदके व एनबीएचा ‘मोस्ट व्हेल्युएबल’ हा किताब ५ वेळा जिंकून सकारात्मक विचारसरणीचे परिणाम काय असतात हे त्याने जगाला दाखवून दिले, पण त्याच वेळी मेहनतीशिवाय नुसत्या सकारात्मक विचारसरणीचा उपयोग नाही हेदेखील त्याने जगाला पटवून दिले.

‘टपरवेअर’ हा प्लास्टिक कंटेनर क्षेत्रातील एक दादा ब्रॅण्ड. या कंपनीचे सर्वेसर्वा अर्ल टपर व मार्केटिंग विभागाच्या ब्रॉनी वाईज हे दोघेही सकारात्मक विचारसरणीने भारावलेली व्यक्तिमत्त्वे आहेत. ब्रॉनी या आपल्या सर्व सेल्स मीटिंग्समध्ये दोन विचारांवर भर देतात; १९व्या शतकामध्ये प्रचलित असलेला ‘सेल्फ इम्प्रूव्हमेंट’चा फंडा व २० व्या शतकामधील, ‘सदोदित सकारात्मक विचारांनी प्रेरित राहण्याचा ध्यास.’ त्यांचा असा दृढविश्वास आहे की सकारात्मक विचारांनी जर एखादा प्रयत्न केला तर बाईच्या जातीलादेखील काहीही अशक्य नाही.

गार्डनिंगच्या व्यवसायात असलेले एक कुटुंब होते. त्या कुटुंबाचा तो पिढीजात व्यवसाय होता. प्रत्येक पिढीतील कर्त्यांने आपल्या या व्यवसायात एक नियम कटाक्षाने पाळला होता व तो म्हणजे, ‘आमचा व्यवसाय उत्तम चालला आहे,’ असे लिहिलेला बिल्ला शर्टवर परिधान करणे. काही ग्राहक तो बिल्ला पाहून मालकाच्या आशावादाचे मनोमन कौतुक करत तर काही चिकित्सक ग्राहक जेव्हा कधी असा बिल्ला पाहत तेव्हा त्यांना अनेक प्रश्न पडत. ‘चांगले दिवस असताना असा बिल्ला मिरविणे ठीक आहे, पण सगळीकडे महागाई असतानादेखील, गार्डनिंग व्यवसायात मंदी असतानादेखील हा मालक हा बिल्ला कसा काय मिरवू शकतो?’ एकदा असेच, स्वत:चा व्यवसाय डबघाईला आलेल्या ग्राहकाने त्या मालकाला जरा खोचकपणेच प्रश्न केला, ‘‘काय हो? असे काय तुमच्या व्यवसायामध्ये उत्तम चालले आहे की तुम्ही त्याची जाहिरात करत आहात?’’ त्यावर तो मालक म्हणाला, ‘‘तुमच्यासारखे ग्राहक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्हालादेखील नवीन माहिती मिळते, तुमचे बागकामविषयक प्रॉब्लेम कळल्यावर आम्हाला नवीन आव्हाने सोडविण्याच्या संधी मिळतात; त्यायोगे आमचा लर्निग ग्राफ वाढतो, जेव्हा तुमची समस्या सुटल्यावर तुम्ही आनंदी होता तेव्हा आम्हाला आमच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळते व हा विश्वासदेखील की तुम्ही आमचे नाव तुमच्या परिचितांना भविष्यात रिफर कराल.’’ त्यावर ग्राहकाने अजून एक प्रश्न केला की, ‘‘मालक हा बिल्ला आधी आला की व्यवसायातील यश?’’ त्यावर मालकाने हसत हसत सांगितले- बिल्ला; कारण व्यवसाय म्हटले की नफा-नुकसान दोन्हीदेखील आले. पण जर तुम्ही सकारात्मक चेहऱ्याने सामोरे गेलात की खालील फायदे होतात-

१. व्यवसाय उत्तम होत आहे याचाच अर्थ या माणसाकडे आपल्यासारखेच असंख्य ग्राहक समस्या घेऊन येत असणार व ते उत्तम सव्‍‌र्हिस मिळाल्याने समाधानी होऊन परत जात असणार, असा समज नव्या ग्राहकाच्या मनात आपसूकच निर्माण होतो. ‘I am in safe hand’ हा दिलासाच ग्राहकाचे अर्धेअधिक दडपण कमी करतो

२. आनंदी व तृप्त असल्याने, हा माणूस आपल्या सर्व प्रश्नांना शांतपणे उत्तरे देईल, चिडचिड न करता, खोचक प्रतिक्रिया न देता आपली गरज ऐकेल व आपली समस्या खऱ्या अर्थाने जाणून घेईल, अशी भावना ग्राहकाच्या मनात उत्पन्न होते व तो कोणताही आडपडदा न ठेवता मोकळा संवाद साधतो. ग्राहकाची खरी समस्या अशी स्पष्ट कळल्याने त्यावरील उत्तरदेखील चटकन व चपखल सापडते. ज्या ठिकाणी ग्राहकाला असा अनुभव येतो तो साहजिकच माऊथ पब्लिसिटी करून इतर लोकांना त्याच दुकानात जा असा आग्रह करतो.

थोडक्यात काय तुमच्या समस्या, तुमचे नुकसान ऐकण्यात ग्राहकाला रस नसतो, त्याला रस असतो ते त्याच्या समस्या सोडवून देणाऱ्या, त्याचे झालेले नुकसान भरून देणाऱ्या माणसामध्ये; तेव्हा बिल्ला आधी लावा, व्यवसाय आपसूकच येईल.

जेरी हॉटेल इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय मॅनेजर होता. तो जेव्हा जेव्हा नोकरी सोडायचा तेव्हा त्याच्या हाताखालील सर्व वेटर्सदेखील त्याच्यासोबत नवीन ठिकाणी रुजू व्हायचे. याचे कारण एकच होते व ते म्हणजे तो आपल्या हाताखालील प्रत्येक कर्मचाऱ्याला सकारात्मक विचारसरणी वापरून मार्गदर्शन करायचा. जेरीला जेव्हा त्याच्या या कौशल्याबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘‘रोज सकाळी मी जेव्हा उठतो तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय असतात; चांगल्या मूडमध्ये राहायचे किंवा खराब मूडमध्ये राहायचे. मी चांगला मूड निवडतो, पण जर दुर्दैवाने माझ्या मनाविरुद्ध घडले तरी माझ्याकडे दोन पर्याय असतात. दुर्दैवाची शिकार झाल्याबद्दल शोक करत बसायचे की त्या घटनेतून काही तरी नवीन धडा शिकायचा? मी नवीन शिकण्याचा पर्याय निवडतो. कोणी माझ्याकडे तक्रार घेऊन आले तरी माझ्याकडे दोन पर्याय असतात. त्याची तक्रार ऐकायची व खोटी सहानुभूती दाखवायची किंवा त्याचे काय चुकले हे दाखवून, त्याला त्या वाईट परिस्थितीचीदेखील सकारात्मक बाजू दाखवून द्यायची. मी दुसरा पर्याय निवडतो. सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलेल्या जेरीवर एकदा दरोडेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हॉटेलचा गल्ला चोरण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असतानादेखील त्याला दोन पर्याय आठवले. मरण्याचा व जिवंत राहण्याचा. जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टर्स व नर्सेसच्या चेहऱ्यावर हा माणूस काही वाचणार नाही असाच आविर्भाव होता. नर्सेसने जेरीला विचारले, ‘‘तुम्हाला कशाची अ‍ॅलर्जी आहे का?’’ त्यावर जेरीचे उत्तर होते, ‘‘हो, बंदुकीच्या गोळ्यांची.’’ त्याच्या या मिश्कील उत्तरामुळे सर्व मेडिकल स्टाफवरील तणाव दूर झाला. जेरी पुढे म्हणाला, ‘‘डॉक्टर मी जिवंत राहण्याचा चॉईस निवडला आहे. त्यामुळे मी डेड केस आहे समजून उपचार करू नका.’’ मरणाच्या दारात उभ्या असलेल्या जेरीची सकारात्मकता पाहून मेडिकल टीमपण उत्साहित झाली व त्यांनी जेरीला वाचविले.

मित्र हो, सारांश काय तर, सकारात्मक विचारसरणीमुळे करिअर व पर्सनल लाइफ, दोन्हीमध्ये असाध्य असलेलेदेखील साध्य करता येते; तेव्हा बी पॉझिटिव्ह!
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com