15 August 2020

News Flash

वारसदाराचा शोध

उद्योग जगतामध्ये अंबानी, बिर्ला, टाटा, गोदरेज अशी अनेक सुप्रसिद्ध घराणी आहेत.

17-lp-prashantउद्योग जगतामध्ये अंबानी, बिर्ला, टाटा, गोदरेज अशी अनेक सुप्रसिद्ध घराणी आहेत. योग्य वारसाचा शोध हा अशा घराण्यांसाठी कळीचा मुद्दा असतो. डेलावर स्थित व्हिन्टन बंधूंनी एक थिएटर खरेदी केले होते. कालांतराने त्यांनी या व्यवसायाची धुरा दुसऱ्या व तिसऱ्या पिढीकडे सोपविली. तसे करताना सर्व निर्णय मात्र आपल्या हातातच राहतील अशी त्यांनी व्यवस्था केली होती. पण प्रत्यक्षात मात्र नवीन पिढीच्या प्रत्येक नवीन निर्णयामध्ये खोड घालून त्यांनी हा व्यवसाय डबघाईला आणला. तिसऱ्या पिढीत एक नातू, चांगला आर्थिक सल्लागार असूनदेखील निर्णय स्वातंत्र्य नसल्याने तो व्यवसाय वाचवू शकला नाही. आर्थिक तंगीपायी व्यवसाय विकायला लागल्याने सर्व व्हिन्टन कुटुंब रस्त्यावर आले. वारसदाराकडे अनिच्छेने व अर्धेमुर्धे साम्राज्य सोपविल्याने होणारे नुकसान हे असे विनाशक असते.

जेक व एड मिशेल यांच्या वडिलांचे कपडय़ांचे शोरूम होते. या वडिलांनी व्यवसाय मुलांकडे सोपविण्यापूर्वी एक उत्तम निर्णय घेतला. त्यांनी बाहेरून एक विशेषज्ञ बोलाविला. त्याच्याच मार्गदर्शनाखाली व्यवसायाची सूत्रे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याचा शास्त्रोक्त आराखडा राबविण्यात आला.

एकूण सात मुलांपैकी या दोघांनाच वारसदार ठरविण्यासाठीचे पहिले सूत्र म्हणजे कधीही निर्णय घेताना कुटुंबापेक्षा व्यवसायाचे हित प्राधान्याने डोळ्यांसमोर ठेवले गेले पाहिजे. कोणत्याही कुटुंब सदस्याला, कुटुंबाच्या व्यवसायात येण्यापूर्वी बाहेरच्या कॉर्पोरेट जगाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असला पाहिजे. या दुसऱ्या सूत्रामुळे आपोआपच योग्य व्यक्तीला कुटुंबाच्या व्यवसायात महत्त्वाचे स्थान मिळाले. तिसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे परस्परसंवाद. कुटुंबाच्या व्यवसायात कार्यरत असलेले सर्व कुटुंब सदस्य आठवडय़ातून एक दिवशी भेटून वैयक्तिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाबद्दल दुसऱ्या सदस्यांना पूर्ण  माहिती देतील. त्याच बरोबर ज्यांच्याकडे मालकी हक्क आहेत, पण जे प्रत्यक्षात दैनंदिन व्यवसायात  सहभागी नाहीत अशा कुटुंब सदस्यांना तीन महिन्यातून एकदा, सर्व निर्णय व भविष्यातील नियोजन सांगितले जाईल. असे केल्याने सर्व कुटुंबसदस्य व्यवस्थापनाच्या भाषेत ‘एकाच पेज’वर येतील हे सुनिश्चित केले गेले. चौथे व सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे व्यवसायातील निर्णय स्वातंत्र्य दुसऱ्या पिढीकडे असेल व पहिली पिढी केवळ सल्लागार असेल.

बरेचदा वारसदाराकडे सूत्रे सोपविताना भावनिक प्रश्न निर्माण होतात. नवीन पिढीला फाजील आत्मविश्वास असतो की त्यांना आता व्यवसायातील सर्व खाचखळगे माहीत झाले आहेत व ते नवीन जबाबदारी पेलायला समर्थ आहेत; तर जुन्या पिढीला सतत हेच वाटत असते की नवीन पिढी अजून शिकाऊ  आहे व तिला अजूनही मार्गदर्शनाची गरज आहे. हे भावनिक द्वंद नीट हाताळले गेले नाही तर उद्वेग, निराशा, कडवटपणा व अविश्वास वाढीस लागून व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ  शकते. अशावेळी तटस्थ भूमिका असलेल्या सल्लागाराकडून दोन्ही पिढय़ांच्या भावना/भीती किती खऱ्या किंवा निराधार आहेत हे पडताळून घेतले जाऊ  शकते.

पिढीजात उद्योगाचे अध्यक्षपद भूषविण्याआधी त्या उद्योगामध्ये प्रत्येक विभागात काम करणे नवीन पिढीला आवश्यक केले पाहिजे. जोसेफ डागर यांनी आईस्क्रीम कंपनी चालू केली. त्यांची मुलगी लुकोंडाने अध्यक्षपद सांभाळण्यापूर्वी प्रॉडक्शन विभागापासून ते वेअरहाऊस व्यवस्थापनापर्यंत सर्व विभागात काम केले. यामुळे त्यांना व्यवसायातील सर्व बारकावे कळले व पुढे जाऊन कंपनीचा कारभार करणे सोपे झाले. याचाच अर्थ वारसदाराने कंपनीमध्ये खऱ्या अर्थाने घाम गाळणे अत्यावश्यक असते. प्रत्यक्षात शॉप फ्लोअरवर घाम गाळल्याने अचूक निर्णय, अचूक वेळी घेण्याची क्षमता वारसदाराच्या ठायी येते व तसेच कामगारांशी प्रत्यक्ष संपर्कात आल्याने त्यांचे नेतृत्व हे नकळतपणेच प्रस्थापित व्हायला मदत होत असते. नवीन वारसदारांनी शिक्षण चालू असतानाच उन्हाळी सुट्टीमध्ये जर स्वत:च्या पिढीजात धंद्यामध्ये उमेदवारी केली तर ऑन द जॉब ट्रेनिंगचा फायदा त्यांना शिक्षणामध्येदेखील होऊ  शकतो. तसेच शिक्षण काळात अशी उमेदवारी केल्यामुळे नवीन पिढीला हा निर्णय घेणे सोपे होते की भविष्यात ते पिढीजात धंद्यामध्येच करिअर घडविणार आहेत की ते काही नवीन वाटा चोखाळणार आहेत. लुकोंडा यांनी तर कमालच केली. स्वत:चा पिढीजात धंदा म्हणजे आपली जहागीर असे न समजता त्यांनी आपल्या वडिलांची व काकांची रीतसर परवानगी मागितली व मगच त्या आपल्या पिढीजात धंद्यामध्ये शिरल्या. अशा व्यावसायिक वागण्यामुळे पहिल्या पिढीलादेखील कोणतेही दडपण न घेता योग्य निर्णय घेता येतो.

याउलट धीरुभाई अंबानी यांनी एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या थोरल्या मुलाला, मुकेशला, शिक्षण अर्धवट सोडून आपल्याला रिलायन्सचे साम्राज्य उभारायला मदत करण्यास सांगितले. म्हणजेच काय तर वारसदाराला पिढीजात व्यवसायामध्ये कधी हाताशी घेणे हे कधी कधी वारसदाराच्या इच्छेवर अवलंबून नसते.

त्याचप्रमाणे प्रत्येक फॅमिली बिझनेस एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालाच पाहिजे असा अट्टाहास असता कामा नये. कारण कधी कधी पुढच्या पिढीला त्या बिझनेसमध्ये काडीचा रस नसतो. मेकब्रायीड यांचे ज्वेलरी स्टोर्स आहे, पण त्यांना कळले की त्यांच्या पुढच्या पिढीला या धंद्यात रस नाही तेव्हा त्यांनी तो बिझनेस विकण्याचा सुज्ञ निर्णय घेतला. नवीन पिढीला पिढीजात व्यवसाय पुढे चालविण्यात दोन कारणांमुळे रस नसतो; एक म्हणजे आपण आपल्या आई-वडिलांप्रमाणे यशस्वी होऊ  हा आत्मविश्वास त्यांच्या ठायी नसतो व दुसरे म्हणजे बदलत्या काळामध्ये किंवा वाढत्या स्पर्धेमुळे हा पिढीजात धंदा तग धरू शकेल याची त्यांना शाश्वती नसते. अशा वेळी कुटुंबाबाहेरचा वारसदार शोधण्याची पण तयारी ठेवावी.

आशा करतो की तुम्हालादेखील आपल्या पिढीजात धंद्यासाठी वारसदार कसा शोधायचा आहे याची कल्पना आता आली असेल.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2016 1:08 am

Web Title: search of nominee
Next Stories
1 बोधचिन्ह
2 ग्राहक सहभागातून यशाचा मार्ग शोधताना
3 भावनिक पैलू…
Just Now!
X