News Flash

स्टार्ट अप बिझिनेस

प्रशांतने लठ्ठ पगाराच्या नोकरीवर लाथ मारली व सरळ पाणीपुरीचा व्यवसाय ‘गपागप’ ब्रँडखाली चालू केला,

एका राज्यात एक जुलमी राजा होता. तो प्रजाजनांसाठी कोणतीही जनहिताची कामे करत नसे; उलट तो शेतकरी, व्यापारी या सर्वाकडून विविध प्रकारचे कर प्रमाणाबाहेर उकळत असे व स्वत:ची तिजोरी भरत असे. त्याने एक फर्मान काढले होते, धान्याच्या किंवा इतर तत्सम सामानाच्या गाडय़ाला जितके पशू जोडले असतील त्या प्रमाणात त्या शेतकरी किंवा व्यापाऱ्याने जकात दिली पाहिजे. धान्य असो की कापूस, भाजी असो की विटा, सगळ्या वस्तूंना एकच न्याय होता. त्यामुळे प्रजाजन खूप नाराज होते. ज्या वस्तू केवळ वजनाने जास्त, पण किमतीच्या दृष्टीने स्वस्त होत्या, उदा. विटा; अशा गोष्टींच्या वाहतुकीसाठी हा नियम जाचक ठरत होता. एकदा एका शेतकऱ्याच्या मित्राने, जो विटांची भट्टी लावायचा, त्याने आपली ही व्यथा शेतकऱ्याला सांगितली. ते दिवस संक्रांतीचे होते व गावातील मुले पतंग उडवीत होती. उडणारे पतंग पाहून शेतकऱ्याला एक युक्ती सुचली.

त्याने विटांनी भरलेल्या गाडय़ाला जे दोन धष्टपुष्ट बैल जोडले होते त्यांना चरण्यासाठी सोडून दिले व आपल्या मित्राला एक जड दोरखंड दिला. त्या दोरखंडाला त्याने पन्नासेक पतंग बांधले. जेव्हा सोसाटय़ाचा वारा वाहू लागला तेव्हा हा पतंग बांधलेला दोरखंड त्याने विटांनी भरलेल्या गाडय़ाला जोडला. उडणाऱ्या पतंगांच्या जोरावर व्यापारी व शेतकरी मित्रांनी, जकात नाक्यावरून या गाडय़ाला पलीकडे नेले. गाडय़ाला एकदेखील पशू बांधलेला नसल्याने दोघा मित्रांनी राजाच्या कर्मचाऱ्यांना जकात देणे नाकारले. त्यांचे हे म्हणणे त्या कर्मचाऱ्यांनादेखील मुकाटपणे मान्य करावेच लागले.

त्या शेतकऱ्याप्रमाणेच आपणदेखील जर करिअरमध्ये आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केले तर एखाद्या स्टार्टअप बिझिनेसची मुहूर्तमेढ रोवली जाऊ शकते. नायाब हसन, यूकेमधील असेच एक व्यक्तिमत्त्व. त्यांनी ‘एक्स्वीझीट  हीना आर्ट’ नावाचा बिझिनेस चालू केला. पारंपरिकदृष्टय़ा मेंदी फक्त शरीरावर काढली जाते, पण नायाब यांनी मेंदीचा वापर शोभेच्या मेणबत्त्या, केक्स व चॉकोलेट डेकोरेट करण्यासाठी सुरू केला. यामुळे त्यांचा बिझिनेस खूप मशहूर झाला.

रायन नोवेक, न्यूयॉर्कमधील एका चॉकलेट शॉपमध्ये लादी पुसण्याचे काम करायचा. लहान रायनला तेव्हापासूनच चॉकलेटचे गारूड लहानथोरांवर किती पडू शकते याचा प्रत्यय आला होता. मोठा झाल्यावर म्हणूनच त्याला चॉकलेट पिझ्झा मार्केट करण्याचे स्वप्न पडू लागले. पारंपरिक शाकाहारी किंवा मांसाहारी टॉपिंग्सऐवजी त्याने सुका मेवा, कॅण्डी यांचे टॉपिंग्स, चॉकलेट बेसवर सजविले. त्याचा हा पिझ्झा आता एक फेमस ब्रँड बनला आहे.

आता वर सांगितलेल्या गोष्टीचा दुसरा पैलू पाहू या. जेव्हा एखाद्या व्यवहारात अडवणूक किंवा फसवणूक होते तेव्हाच त्यावर उपाय म्हणून मनुष्यमन काही तरी दुसरा विचार करू लागते. प्रशांत कुलकर्णी, इन्फोसिसमध्ये काम करणारा एक आयटी क्षेत्रामधील तज्ज्ञ. त्याला पाणीपुरी खायची खूप हौस! रस्त्याच्या कडेला असलेली पाणीपुरी खाऊन तो एकदा खूप आजारी पडला. पैसे मोजूनदेखील चांगली सेवा न मिळाल्याने प्रशांत खूप बेचैन होता. यावर त्याने एक वेगळाच विचार केला. आरोग्यदायी चटपटीत चाट सगळ्यांना देता आले तर आरोग्य व चमचमीत खाणे या दोघांचा सुवर्णमध्य साधता येईल. त्याने मग लठ्ठ पगाराच्या नोकरीवर लाथ मारली व सरळ पाणीपुरीचा व्यवसाय ‘गपागप’ ब्रँडखाली चालू केला, पण इथेही या तरुणाने जरा हटके विचार केला व तब्बल ११२ वेगवेगळ्या स्वादांच्या पाणीपुरी रेसिपीज त्याने ‘गपागप’ ब्रँडखाली व २७ वेगवेगळ्या प्रकारच्या चाट डिशेस, ‘चटर पटर’ ब्रँडखाली ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या.

आता वरील कथेचा पुढील भाग पाहू या. पतंगाची कल्पना सुचविणाऱ्या शेतकऱ्याच्या घरातील पाण्याचे एक मडके काही कारणाने तडा जाऊन फुटले व गळू लागले. ते टाकून देऊ या या विचारात असताना त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. हा शेतकरी, शेतात असलेल्या आडातून पाणी शेंदायचा व कावडीच्या मदतीने घरात पाणी भरून ठेवायचा.

त्याने कावडीतील एका चांगल्या मडक्याला बाजूला काढले व ते पाणी साठवायला स्वयंपाकघरात ठेवले. त्याच्या जागी त्याने ते गळके मडके जोडले. जेव्हा तो या कावडीने पाणी भरू लागला तेव्हा गळक्या मडक्याच्या बाजूला असलेल्या शेताच्या कुंपणावर त्याने काही फळझाडे व फुलझाडांच्या बिया टाकल्या. गळक्या मडक्यामुळे त्याचे या बियांना मुद्दामहून पाणी घालण्याचे श्रम वाचले व थोडय़ाच दिवसांमध्ये त्याचे शिवार फळाफुलांनी बहरून गेले. शेतकऱ्याने वापरलेला रिसायकल, री-युजचा हा फंडा, अनेकांनी स्टार्टअप बिझिनेससाठीदेखील वापरला आहे.

एलिसन यूकेमधील एक साधी गृहिणी; तिला मूल झाल्यावर ती नियमितपणे मुलासाठी नवनवीन खेळणी खरेदी करू लागली. सुरुवातीला तिला यात काही वावगे वाटत नव्हते, पण हळूहळू तिचे घर खेळण्यांनी भरत होते, महिन्याचे आर्थिक बजेट, खेळण्यांच्या खरेदीमुळे थोडे डळमळू लागले होते. मुलाच्या वाढत्या वयामुळे जुनी खेळणी वापरली जात नव्हती व त्याच वेळेस मुलाच्या वाढत्या बौद्धिक गरजेसाठी नवीन खेळणी घेणेदेखील गरजेचे होत जात होते. एलिसनला म्हणून आसपास कोणती खेळण्यांची लायब्ररी आहे का हे शोधणे गरजेचे वाटले. तिला नवल वाटले की अशी सोयच कुठे उपलब्ध नाही. तिने मग स्वत:च टॉयबॉक्स लाइव्ह (३८ु७ ’्र५ी) नावाची कंपनी काढली. ही कंपनी महिन्याला २४.९९ पौंड फी घेऊन गरजू लोकांना वेगवेगळी खेळणी भाडय़ाने देते.

असेच काहीसे पॉला या नोकरी करणाऱ्या महिलेसोबत झाले. तिला जाणवले की शॉपिंग करताना बायका खूप काही कपडे खरेदी करतात, पण बरेचदा घरी गेल्यावर त्यातले काही कपडे वापरलेच जात नाहीत. न वापरलेले किंवा नको असलेले कपडे गोळा करण्यासाठी पॉलाने व्हिंटेज फॅशन बुटिक काढले. इथे बायका आपल्याला नको असलेले ड्रेसेस एकमेकींबरोबर एक्स्चेंज करू शकायच्या. या बुटिकमध्ये त्यामुळे रोजच्या रोज नवीन स्टॉक उपलब्ध तर व्हायचाच, पण जुन्या नको असलेल्या कपडय़ांपासून व्हिंटेज लुक असणारे नवीन कपडेपण तयार केले जायचे. तिचे हे बुटिक महिलांमध्ये लोकप्रिय झाले नसते तरच नवल!

स्टार्टअप बिझिनेसच्या या कथा आपल्याला रंजक वाटल्या असतील याच आशेने हा लेख इथे थांबवत आहे, पण अजूनदेखील अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे स्टार्टअप बिझिनेसचा किडा वळवळू शकतो; ती कारणे पाहू या पुढील काही भागांमध्ये..
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:20 am

Web Title: startup business
Next Stories
1 रुट कॉज अ‍ॅनॅलिसिस
2 आदरयुक्त, यशस्वी करिअरचा डीएनए
3 आउट ऑफ बॉक्स थिंकिंग
Just Now!
X