07 June 2020

News Flash

जन्मदिनांक आणि ग्रहप्रवास

सरत्या वर्षांला निरोप देण्याची हुरहूर आणि नव्या वर्षांचं स्वागत करण्याचा आनंद प्रत्येकाच्याच मनात आहे.

सरत्या वर्षांला निरोप देण्याची हुरहूर आणि नव्या वर्षांचं स्वागत करण्याचा आनंद प्रत्येकाच्याच मनात आहे. २०१५ या वर्षांनं आपल्याला काय दिलं याचा लेखजोखा मांडत असतानाच २०१६ या नव्या वर्षांत काय काय करायचं याचे संकल्प केले जात आहेत. ते करत असतानाच येतं वर्ष आपल्याला कसं जाईल याची उत्सुकता बहुतेकांच्या मनात असेल. म्हणूनच संख्याशास्त्राच्या दृष्टीतून आगामी वर्षांकडे बघितलं तर काय दिसतं ते या लेखात मांडलं आहे.

माणसाच्या संपूर्ण आयुष्यात तो जगताना मन आणि बुद्धीचा वापर करून जगत असतो नि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सुख-दु:खाचा अनुभव घेत असतो. बुद्धीने जगणारी माणसे विज्ञानाचे पुरावे शोधतात तर मनाने जगणारी माणसे आधार शोधतात नि सुख-दु:खाच्या झोक्यात स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतात. भूक, वस्त्र आणि निवारा या गरजा शोधण्यात नि जगण्यात माणसाचे आयुष्य संपून जाते. असा आशा-निराशेचा प्रवास चालू असताना आपल्या नशिबात काय आहे! ते पाहण्याची उत्सुकता वाढते नि अशा उत्सुकतेच्या पोटी ज्योतिषशास्त्राकडे माणूस वळतो. निसर्गातली पंचतत्त्वे नि जैविक अवस्था यात बरेच साम्य आहे. त्यामुळे विश्वातील ग्रहमालिका नि माणसाची जन्मवेळ यांचा समन्वय साधला तर व्यक्तीच्या पुढील आयुष्यातील घटनांचे भविष्यनिदान करता येईल अशा विचारातून हे शास्त्र पुढे आले आहे. हजारो वर्षांपूर्वी या शास्त्राचा उगम झाला नि पायरी पायरीने हे शास्त्र प्रगत झाले. फलज्योतिषशास्त्र नि संख्याशास्त्र यांचा मेळ घालून फलादेश पाहिला तर त्यात बरीच सूक्ष्मता लाभते नि या नवीन विचारातून मिळालेले निष्कर्ष खूपच आशादायी वाटतात. जगण्यात सुसूत्रता आणण्यासाठी फलज्योतिष नि संख्याशास्त्राचा उपयोग खूप चांगला होऊ शकतो. जन्मतारखेच्या माध्यमातून मदत करणारे संख्याशास्त्र आज जगात खूप लांबवर पसरलेले आहे. दूरदृष्टी नि प्रयोगशीलता हा संख्याशास्त्र अभ्यासाचा पाया आहे. २०१५ साल या वर्षांला आपण निरोप दिला नि आता २०१६ सालाकडे आपण आशेने पाहात आहोत. २०१६= २+०+१+६ =९ हा मंगळ ग्रहाच्या अमलाखाली येणारा अंक आहे. विशेषत: मिलिटरी, पोलीस खाते नि सरकारी उच्च अधिकारी या लोकांवर या अंकाचा प्रभाव जास्त असतो. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ साली मिळाले त्या सालचा भाग्यांक १+५+८+१+९+४+७=३५=३+५= ८ हा अंक येतो. आता ९ हा अंक ८ चा शत्रू अंक आहे. त्यामुळे हे साल भारतास खूप कटकटीचे ठरेल. राजकारणी लोकांवर विशेषत: माजी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख १७ सप्टेंबर १९५० या जन्मतारखेचा मूलांक ८ येतो तर नवीन वर्षांचा एकांक ९ येतो. त्यामुळे वर्षभर खूपशी संकटे नि आव्हानांना समोरे जावे लागणार आहे. तसेच काही बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतील, तर पक्षातील माणसेच विरोधात उभी राहतील. एकूण काळ काहीसा कठीण राहील, पण त्यांचा भाग्यांक ५ येतो नि त्यांच्या पूर्ण नावाची बेरीज ४१ येते त्याचा एकांकही ५ येतो नि त्यामुळे उत्तम वक्ता नि तडफदार नेतृत्व अखेरीस पूर्ण विजयी ठरेल. मात्र शिस्त नि न्यायामधील कठोरता भारतीयांचे पुढील जीवन निश्चित सुकर करील. विशेषत: महाराष्ट्रातील नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येतील. एकूण या राजकारण्यांविषयी बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. त्यांच्या श्रीमंतीपेक्षा त्यांचे मानसिक दारिद्रय़ उघडे पडेल. असो.
मात्र येणारे पुढील २०१७ साल नवे विचार आणि सद्गुणी लोकांचा प्रभाव घेऊन येईल.
प्रत्येक राशीत सूर्य एक महिना असतो नि सूर्याच्या संपर्कात इतर ग्रह येतात त्याचे योग कुयोग नि जोडीला संख्याशास्त्र अशा एका वेगळ्या अभ्यासातून भविष्य वर्तवताना अधिक सूक्ष्मता लाभेल.

meshमेष -(२१ मार्च ते १९ एप्रिल)
उत्तम प्रगती साधाल
आपला जन्म जर दिनांक २१ मार्च ते १९ एप्रिल दरम्यान झाला असेल तर आपल्यावरती ९ अंकाचा प्रभाव म्हणजे मंगळाचा प्रभाव जास्त राहील. तसेच वर्षांचा येणारा एकांकही ९ आहे. एकूण आपल्यावरती ९ अंकाचा प्रभाव जास्त राहील. साहस-संघर्षांचा अतिरेक टाळा. मदतीस धावून जाणे, दया करणे यातून आपल्या स्वभावाचा जास्तीत जास्त फायदा घेतला जाईल. क्रांतीची मशाल आपल्या हाती देणारी चतुर मंडळी मागच्या मागे पोबारा करतील. नि तुम्ही एकटेच क्रांतिकारी बनाल. त्यातून मनस्ताप, नुकसान आदींना सामोरे जावे लागेल. बुद्धीचा योग्य वापर करून विचारपूर्वक वागलात तर गुरू ग्रहाचीही उत्तम साथ लाभेल नि त्यातून खूपशा विचारांना, योजनांना चालना मिळेल.
जानेवारी २०१६ : नोकरी-उद्योगधंद्यात उत्तम प्रगती साधाल. आरोग्य चांगले राहील. योग्य वेळी योग्य विश्रांती जरूर घ्या. अतिमानसिक ताण घेऊ नका. मनासारखे काही झाले नाही तर क्रोध नको, त्यावर शांतपणे विचार करा. परिचय वाढतील. मुलांना विद्याभ्यासात यश लाभेल. प्रवास आनंददायक होईल.
फ्रेब्रुवारी २०१६ : आपण हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. तसेच नवीन योजना- कल्पनांना लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होईल. अतिआवश्यक गोष्टीसाठी पैसे खर्च करा. घरातील वातावरण आनंदी राहील. गैरसमज, संशय यापासून दूर राहा.
मार्च २०१६ : स्थिर नि शांतपणे प्रसंग हाताळण्याची सवय तुम्हाला यश देईल. गोंधळ, अस्वस्थता, अस्थिरता टाळा. अतिभावनिक होणे टाळा. यातून आरोग्याला त्रास होतो. उत्तम मन:स्वास्थ्य, आरोग्य उत्साह देईल. विशेषत: महिनाअखेरच्या दिवसात शुभवार्ता समजतील.
एप्रिल २०१६ : नवीन परिचयातून, ओळखीतून स्नेह वाढेल. नोकरी-उद्योग क्षेत्रात आपले स्थान घट्ट कराल. दुसऱ्याला मदत जरूर करा. पण ती मदत निर्थक ठरू नये. शांत स्वभावातून कामातील निर्णय यथायोग्य ठरतील.
मे २०१६ : नवीन विचार, नवीन कल्पना आनंदी जगण्यासाठी खूपच मदत करतील. आपण बुद्धी नि मेहनतीतून यश मिळवत आहात. स्वभावातील हट्टी नि तापटपणा कमी करा. कारण तो शरीराला त्रासदायक ठरतो. आत्मविश्वास वाढेल.
जून २०१६ : उद्योगधंद्यात कामात नवीन बदल करण्यासाठी वरिष्ठ मित्रमंडळींचा सल्ला घ्या. नव्या ओळखीतून नवीन योजना तयार होतील. सिनेनाटय़ कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील. जुनी येणी वसूल होतील. नफ्याची गणिते यशस्वी ठरतील.
जुलै २०१६ : नवीन करार, जमीन, स्थावर यांचे व्यवहार करताना जपून करा. राजकारण सामाजिक कार्यात मानसन्मान, मात्र दिलेला शब्द पाळा. नातेसंबंधांतील भावनात्मक गुंतवणुकीतून मनस्ताप होईल. त्यात फार हळवे होऊ नका.
ऑगस्ट २०१६ : उद्योगधंद्यात नोकरीत घेतलेल्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडाल. अचानक धनलाभाचे योग येतील. जुने मित्र, नातेवाईक यांच्या भेटीतून आनंद मिळेल. आरोग्य उत्तम राहील. तरीही मनाची स्थिरता जपा.
सप्टेंबर २०१६ : लाभदायक घटनांचा काळ, जुनी येणी अथवा कमिशन स्वरूपात धनलाभ होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. कोर्टकचेरीची कामे होतील. नवीन उद्योग सुरू करण्यास उत्तम काळ. पैसे जागेत, जमीन विकत घेण्यात गुंतवा.
ऑक्टोबर २०१६ : घरातील वयोवृद्धांची काळजी घ्या. शब्दाला खूप किंमत आहे. शब्द जपून वापरा. आश्वासने, वचने देऊ नका. मात्र कामात नवीन संधी प्राप्त होतील त्या संधी गमावू नका.
नोव्हेंबर २०१६ : मनाला त्रास देणाऱ्या घटनांवर अधिक विचार करीत बसू नका. प्रकृतीची काळजी घ्या. वाचन, ध्यान किंवा करमणूक यात मन रमवा. मित्रमंडळीशी संपर्क साधा. त्यांची खूप मदत होईल.
डिसेंबर २०१६ : वर्ष संपत आलंय. उद्योगधंदा, घरातील समस्या यामुळे मनाला एक प्रकारचा थकवा येईल. पण थोडीशी विश्रांती घेऊन मरगळ झटका. मनातील नवीन योजना, नवीन कामे सादर करा. पुढील वर्षांत तुमच्या कार्यकुशलतेचे कौतुक होईल. संकटात कसे जगायचे याचे नैसर्गिक ज्ञान आपल्यापाशी उत्तम आहे. संघर्ष हा जरी या राशीचा श्वास असला तरी अतिरेक व साहस टाळा. बुद्धीच्या साह्यतून नियोजन करा, ते यशस्वी ठरेल.

vrushabवृषभ – (२० एप्रिल ते २० मे)
नवीन संधी लाभतील
भावनेच्या पटावर हळुवारपणे बुद्धिबळाचा डाव टाकून त्यात यश मिळवणारी ही शुक्राची रास आहे. पण त्यात कपट कारस्थान, खोटे राजकारण बिलकूल नाही. स्वभाव लाघवी, दुसऱ्याविषयी खूप आदर. प्रेमाच्या धाग्यात स्वत:सह दुसऱ्याला माळून आपलेसे करणारी ही रास आहे. सुंदरता तितकाच संयम असलेल्या या महिन्याचा शुभांक ६ येतो आणि २०१६ सालचा एकांक ९ दोन्ही अंकांचे उत्तम सौख्य हातात हात घालून वर्ष पार करतील.

जानेवारी २०१६ : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. आपली घोडदौड प्रगतिपथावरून जोरदार चालू राहील. अधूनमधून येणारे अडथळे फार परिणामकारक ठरणार नाहीत. नोकरीत, उद्योगधंद्यात उत्तम प्रगती होईल. कामाच्या दगदगीतून थकवा येईल. आळीपाळीने विश्रांती घ्या.
फेब्रुवारी २०१६ : अतिशय उत्तम काळ, पण प्रत्येक कामात सावधानता बाळगा. कुठेही संघर्षांची ठिणगी पडू देऊ नका. लाभदायक घटना घडतील. उद्योग नोकरीत पैशाची वाढ होईल. मानसन्मानाचे योग येतील. कलाकार, साहित्यिकांना पुरस्कार मिळतील. कलेचे कौतुक होईल.
मार्च २०१६ : याही महिन्यात आपल्या उत्कर्षांचा प्रवास चालू राहील. खर्चाचे प्रमाण अचानक वाढेल. दिलेला शब्द पाळा. त्याची किंमत पुढे चांगल्या रूपात प्राप्त होईल. तरुणांनी सावधानतेने वागावे. परिचयातून विवाह जमतील. शाब्दिक चकमकी टाळा. द्वेष, मत्सर मनात ठेवून सुडाने वागू नका.
एप्रिल २०१६ : हाती घेतलेले काम व्यवस्थित पार पाडाल. नोकरीत अनपेक्षित यश. घरातील मुलांना विद्याभ्यासात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मन:स्वास्थ्य चांगले राहील. नवीन योजना, नवीन पद्धतीचा उपयोग करा.
मे २०१६ : सावधानता बाळगा, व्यसनापासून दूर रहावे, प्रेमप्रकरणात प्रेमसमुद्राला ओहटी कधीच नसते. भरतीच असते. वाहून जाऊ नका. तसेच उधार-उसने पैसे देऊ नका. फसवणुकीपासून सावध रहावे.
जून २०१६ : आर्थिक बाजू चांगली राहील. नफा-तोटय़ाचे गणित चांगले जमेल. आरोग्य चांगले राहील. न्यायबुद्धीने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. मानसिक स्थिरता उत्तम लाभेल. विद्यार्थी वर्गाने आळस झटकून अभ्यासाला लागावे.
जुलै २०१६ : कोर्ट कचेरीचे निर्णय लाभदायक ठरतील. महिलांना विशेष आनंददायक बातम्या मिळतील. धार्मिक कार्यात विशेष आनंद लाभेल. नोकरी-उद्योगधंद्यात निर्माण होणाऱ्या अडचणी तात्पुरत्या असतील. महिन्याच्या अखेरचा काळ अधिक शुभदायक ठरेल.
ऑगस्ट २०१६ : या महिन्यात कन्या राशीतला गुरू आपल्या राशीला पाचवा. शुभयोगात घरात मंगलकार्ये ठरतील. तसेच जमीन खरेदी-विक्री किंवा घरात मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. मित्र, नातेवाईक मंडळीत दिवस आनंदात जातील. आरोग्याची काळजी घ्या.
सप्टेंबर २०१६ : पैशाची आवक वाढेल. नवीन कल्पना, नवीन योजना यांमधून उद्योगधंद्यात प्रगती होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. कामाचा उरक चांगला राहील. बौद्धिक व राजकीय क्षेत्रांतील लोकांशी नव्याने परिचय होतील. तसेच फायदा – तोटय़ाचे आपल्या मनातील अंदाज खरे ठरतील.
ऑक्टोबर २०१६ : खोलवर विचार करून निर्णय घ्या. खूपशा बाबतीत ठरलेल्या गोष्टी मनासारख्या होतील. आजूबाजूच्या मित्रमंडळी यांच्याबरोबरचे सलोख्याचे संबंध अधिक निकट होतील. ते टिकवणे खूप महत्त्वाचे ठरेल. किरकोळ गोष्टीवरून गैरसमज टाळा.
नोव्हेंबर २०१६ : उद्योगधंद्यात झालेले गैरसमज दूर होतील. नवीन जागा, जमीन घेण्याचे स्वप्न पुरे होईल. अर्थप्राप्ती चांगली होईल. मुलांना शिक्षणात उत्तम यश लाभेल. घरात मंगलकार्ये ठरतील.
डिसेंबर २०१६ : कोर्ट-कचेरीत जाणारी प्रकरणे परस्परांच्या समजुतीने मिटतील. संघर्ष संपेल. नव्या पर्वाची, नव्या वर्षांच्या शुभारंभाची चाहूल लागेल. तसेच पुढील वर्षी येणाऱ्या संधी तुमच्या नव्या कल्पना, नवे विचार यांची वाट पाहात आहे.
आनंद हा जरी प्रेम, माया, वात्सल्य या शब्दांच्या आसपास असला तरी त्याला दु:खाची बोचरी झालर असते. त्यामुळे जगण्याचे वेगळे भान राहते. त्यातून सुख आणि दु:खाच्या अंतरातील सत्याचा मध्यबिंदू आपला नियम मोडत नाही. म्हणून सुख आणि दु:ख यांना अपूर्व मोल प्राप्त झाले आहे.

mithunमिथुन – (२१ मे ते २० जून)
यशदायक घटना
आपला जन्म २१ मे ते २० जून दरम्यान झाला असेल तर आपल्यावरती ५ अंकाचा म्हणजे बुध ग्रहाचा प्रभाव जास्त आहे. संघर्षमय जीवन या दोन शब्दांत यांची मानसिकता कळून येते. उत्तम बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य नि स्पष्ट, सत्य वाणी या जोरावर यांचे समाजातील स्थान वेगळे असते. जीवनात येणाऱ्या व्यक्तीचे वागणे-बोलणे-स्वभाव आदीवरून त्याचे खरे रूप ओळखण्यात ही माणसे अतिशय चाणाक्ष असतात. दूरदर्शी परिस्थितीचे उत्तम आकलन करून समाजाला उत्तम मार्गदर्शन करणे यांना मनापासून आवडत असते. या वर्षीचा २०१६ चा एकांक ९ नि ५ यांचा एकमेकांशी उत्तम संपर्क येत आहे. त्यामुळे या वर्षी बुधाचा अंमल असणाऱ्या व्यक्तींना ९ अंकाच्या मंगळाची साथ लाभणार आहे. त्यामुळे उत्तम निर्णयक्षमता नि बोलण्यातील जरब यातून यांची बरीच कामे पुढे सरकतील.
जानेवारी २०१६ : महिन्याच्या सुरुवातीचा काळ अति उत्तम. यात महत्त्वाच्या कामांना मार्गी लावणे अत्यावश्यक आहे. मनासारखी कामे होतील, मात्र उदासीन वातावरणापासून दूर राहा. आपल्या मित्रमंडळीत मन रमवा. नेतृत्व करा. वेळेला जास्त महत्त्व द्या. यश लाभेल.
फेब्रुवारी २०१६ : शनी ग्रह सोडला तर इतर ग्रहांचे सहकार्य लाभणार नाही. अचानक खर्चाचे योग येतील. दिलेला शब्द पाळा. त्याची किंमत पुढे चांगल्या रूपात प्राप्त होईल. परिचयातून विवाह जमेल. शाब्दिक चकमकी टाळा; सुडाचे वागणे टाळा.
मार्च २०१६ : कोर्ट-कचेरीची कामे होतील. नवीन उद्योगधंद्याची सुरुवात करा. कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रश्न सहज सुटतील. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रवास सुखाचा होईल.
एप्रिल २०१६ : कोर्ट-कचेरीची कामे होतील. मनाला त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींना खूपसे महत्त्व देऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. शक्य झाल्यास प्रवास करा अथवा करमणुकीच्या माध्यमाचा आधार घ्या. धार्मिक कामात विशेष आनंद मिळेल.
मे २०१६ : नवीन परिचयातून होणारी मैत्री फायदेशीर असेल. अतिभावनावश होऊ नका. जुन्या दु:खद कहाण्या ऐकवत बसू नका. दु:ख जपत बसून मनाचे लाड करू नका. आजचे कठोर निर्णय तुमच्या उद्याचा जगण्याचा मार्ग सोपा करतील.
जून २०१६ : आत्मविश्वास वाढेल. नवीन जागेविषयीचे खरेदी-विक्रीच्या व्यवहारास उत्तम काळ. नवीन योजना, नवीन कामे यशस्वी करून दाखवाल. घरातील मुलांची अभ्यासात विशेष प्रगती. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या.
जुलै २०१६ : गैरसमजुतीतून होणारे वादविवाद मिटतील. शेजारी, नातेवाईकांशी संबंध सलोख्याचे ठेवा. फार आततायी निर्णय घेऊ नका. उद्योगधंद्यात नफ्याचा आलेख उंचावेल.
ऑगस्ट २०१६ : घरातील तरुण मुलांना नोकरीनिमित्त परदेशगमनाचा योग येईल. उद्योगधंद्यात वाढ होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग राहील.
सप्टेंबर २०१६ : राजकीय क्षेत्रात वर्चस्व प्राप्त होईल. सामाजिक कार्यात नवीन कामाच्या योजना पुढे सरकतील. अपेक्षितांकडून मदतीचा हातभार लाभेल नि त्यातून कार्यक्षेत्र वाढेल. नावलौकिक होईल.
ऑक्टोबर २०१६ : थोडय़ाशा घरगुती समस्या वाढतील. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात मौल्यवान वस्तूची काळजी घ्या. नवीन योजनांना चालना मिळेल.
नोव्हेंबर २०१६ : नोकरी उद्योगधंद्यात उत्साह वाटेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम संधी प्राप्त होतील. आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. घरात पाहुणे मंडळींची वर्दळ राहील. नोकरीत बदली – बढतीचे योग, पण त्यातून फायदाच होईल.
डिसेंबर २०१६ : मतभेद मिटतील. आर्थिक प्रगती होईल. खर्चही वाढेल. आपल्या यशदायक कामाचे कौतुक होईल. मानसन्मान लाभेल. बुद्धी आणि साहस यांचा उत्तम संगम आपल्या राशीत झाला आहे. बुद्धिवंतांचा पराक्रम त्यांच्या शब्दातून दिसून येतो, मात्र हळव्या गोष्टीत बुद्धीवर मन मात करू लागते नि त्यात बुद्धीचा पराजय होतो तेव्हा मनाच्या भावुकतेला बुद्धिसामर्थ्यांतून जरा दूर ठेवा, म्हणजे नकळत अध्यात्माचा परीसस्पर्श जाणवेल.

karkकर्क – (२१ जून ते २० जुलै)
ताण कमी होईल
आपला जन्म २१ जून ते २० जुलै दरम्यान झाला असेल तर आपल्यावरती चंद्र ग्रहाचा प्रभाव असतो. या चंद्र ग्रहाचा अंक २ येतो. कोमल, संवेदनशील, हळवेपणा या शब्दाचा वापर नेहमी ‘प्रेम’ शब्दाशी निगडित असतो. आईच्या मायेतून डोक्यावर फिरणारा प्रेमळ हात नि त्यातून निर्माण होणारी कौटुंबिक नाती नि त्यांचा जिव्हाळा नि अखेर आयुष्यात, संसारात सांभाळून घेणारी पत्नी तिच्याही मनाचा सुखद स्पर्श या अंकातून डोकावत असतो. या वर्षी २०१६ चा एकांक नऊ बरोबर होणारा २ अंकाचा प्रवास म्हणजे हळवेपणाला सांभाळून होणारी निरागसता नऊ अंकात आहे. पण मंगळाचा हेकेखोरपणा, तापटपणा नि चंद्राची शांतताप्रियता, दयाशीलपणा यांचे सूत जमताना जरा कठीणच आहे. पण काळ हे त्यावर रामबाण अैषध आहे.
जानेवारी २०१६ : खूप वेळा निर्णय घेताना मनाचा गोंधळ होईल. उत्तम चालणारी बुद्धी निर्णय घेताना अवघडेल, पण इतर ग्रहांच्या उत्तम पाठिंब्यातून आर्थिक बळ वाढेल. महिन्याच्या उत्तरार्धात उत्साह वाढेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार फायदेशीर ठरतील नि मनावरचा ताण कमी होईल.
फेब्रुवारी २०१६ : प्रवासाचे योग येतील. कलाशिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळतील. पैशाचे व्यवहार विश्वासू माणसे पारखून करावेत. सामाजिक कार्यात नवीन परिचय होतील. या काळात तुमच्या कामात वेगळे चैतन्य आढळेल.
मार्च २०१६ : वैवाहिक जीवनात आनंद लाभेल. नवीन वास्तूचे खरेदी-विक्रीचे व्यवहार यशस्वी होतील. मात्र सामाजिक कामात आर्थिक व्यवहारात जातीने लक्ष घाला. दया, सहानुभूती शब्दांपासून अंतर ठेवा.
एप्रिल २०१६ : महत्त्वाची कामे पार पाडाल. थोरा-मोठय़ांच्या गाठीभेटी होतील. आर्थिक बाजू स्थिर राहील. वादविवाद मिटतील. भावनांवर नियंत्रण असू द्या. ओळखीतून कामे होतील.
मे २०१६ : उद्योग-व्यवसायात सध्या बदल करू नका. नोकरीत बढतीचे योग येतील. पाहुण्यांची ये-जा वाढेल. हळवेपणातून नको त्या विचारांचा काहूर मनात येईल. पण शक्यतो हा मानसिक प्रवास टाळा. स्वत:ला सावरणे जरुरीचे ठरेल.
जून २०१६ : घरात मुला-मुलींची लग्नकार्ये जमतील. गैरसमजुतीतून निर्माण झालेले प्रकार उघडकीस येऊन आपले मोठेपण सिद्ध कराल. उसने पैसे देणे वा पैशाचे व्यवहार जपून करा. मानसन्मानाचे योग येतील.
जुलै २०१६ : मध्यस्थीतून घरातील वादविवाद शांत होतील. जुनी येणी वसूल होतील. खूपशा दिलासा देणाऱ्या घटना घडतील. धीर येईल. त्यातून वेगळा आत्मविश्वास निर्माण होईल.
ऑगस्ट २०१६ : काही वैचित्र्यपूर्ण अनुभव येतील. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला शांतपणे सामोरे जा. अतिउत्साह, अतिआततायीपणा, अतिगोंधळ, बेपर्वाई, आळशीपणा टाळा. नेटाने व शांतपणे घेतलेले निर्णय त्रासदायक ठरणार नाहीत.
सप्टेंबर २०१६ : काहीसे शांततेचे वातावरण निर्माण होईल. नोकरी-उद्योगात जबाबदारी वाढेल. खूपशा बाबतीत ठरलेल्या गोष्टी मनासारख्या होतील. निर्थक गोष्टींची चिंता करू नका.
ऑक्टोबर २०१६ : या महिन्यात चंद्र ग्रहाचा प्रभाव अधिक वाढेल. लहानसहान गोष्टीवरून वाद घालू नका. बोलण्या-वागण्यात अतिरेक टाळा. मंगळाच्या प्रभावाने साहस, उद्दामपणा त्रासदायक ठरेल.
नोव्हेंबर २०१६ : पोटाचे आजार, अपचन, अ‍ॅसिडीटी या विकारांची काळजी घ्या. रात्रीची जागरणे टाळा. सोसायटी-जागेचे व्यवहार कोर्टात जाऊ देऊ नका. विलंब होईल. महिनाअखेर आर्थिक लाभ.
डिसेंबर २०१६ : मतभेद मिटतील, कोर्ट-कचेरीपर्यंत जाणारी प्रकरणे आपसात मिटतील. संघर्ष संपेल. नव्या वर्षांच्या शुभ सुरुवातीला प्रारंभ होईल.
खरे तर ९ आणि २ अंकाचे एकत्र येणे म्हणजे हळवेपणाला सुरुंग लावल्यासारखे होईल पण कर्क राशीच्या जलतत्त्वातून भावुक मनाचा जन्म होतो. ही माणसे अपमानाने व्याकूळ होतील. शरीरापेक्षा मनाने संवाद साधणारी ही माणसे देव माणूस म्हणून ओळखली जातात. हे यांच्या जगण्यातले श्रेष्ठत्व आढळते.

singhसिंह – (२१ जुलै ते २० ऑगस्ट)
ध्येय गाठाल
आपला जन्म २१ जुलै ते २० ऑगस्ट या दरम्यान झाला असेल तर आपल्यावर सूर्याचा प्रभाव राहील. याचा अंक १ येतो नि रास सिंह आहे. या वर्षीचा २०१६ चा एकांक ९ येतो. नऊ आणि एक यांचे मित्रत्वाचे नाते त्यामुळे १ अंकाला त्याच्या कामात ९ अंकाचे साहस नि सहकार्य संपूर्ण लाभेल. सिंह राशीच्या खूप प्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे अशा माणसांना प्रसिद्धीचे टोक गाठताना खूप कष्ट घ्यावे लागतात. आयुष्यातले उच्च ध्येय गाठताना खूपशी नाजूक स्वप्ने यांच्या पायाखाली चिरडलेली असतात, मात्र हे वर्ष यांना खूपच आनंददायी नि उत्साहाचे जाणार आहे.
जानेवारी २०१६ : उद्योगधंद्यात नोकरीत उत्तम आवक राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन योजनांचे प्रारंभ मनाला आनंद समाधान देतील. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. नवीन ओळखी परिचयातून फायद्याचे गणित तयार होईल.
फेब्रुवारी २०१६ : जमीन-जागा याबाबतचे निर्णय घेताना मोठय़ांचा सल्ला जरूर घ्या. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. नोकरी-धंद्यात वादविवाद टाळा. राजकारणात शक्यतो भाग घेऊ नका. खात्रीशिवाय शब्द देऊ नका.
मार्च २०१६ : आरोग्य उत्तम राहील. उद्योगधंद्यात अतिविश्वासाने राहू नका. दुसऱ्याची निंदानालस्ती करू व ऐकू नका. महत्त्वाचे निर्णय जरूर घ्या.
एप्रिल २०१६ : महिन्याच्या सुरुवातीला थोडेसे त्रासदायक वातावरण, वादविवाद, गैरसमज, आरोप- प्रत्यारोप यामुळे मानसिक स्थिती ठीक राहणार नाही. आरोग्य जपा. संयमाने वागा.
मे २०१६ : शक्यतो आनंदी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या आपल्या आवडत्या क्षेत्राशी एकरूप व्हा. वेळेची किंमत ओळखा. नोकरीत बढतीचे योग.
जून २०१६ : कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढेल. नवीन ओळखी, नवीन परिचय यातून कार्याची व्याप्ती वाढेल. सामाजिक कार्यात मान-सन्मानाचे प्रसंग येतील. एकूण हा महिना मानसिक दृष्टीने खूप चांगला जाईल.
जुलै २०१६ : घरातील वातावरण आनंदी राहील. तरुणांना नोकरीनिमित्त परदेश प्रवास घडेल. बुद्धी नि कर्तृत्व यांचा उपयोग वेळेवर केलात तर नोकरी, उद्योगधंद्यात विशेष प्रगती होईल. राजकारणी पुढारी लोकांपासून अंतर ठेवून राहा.
ऑगस्ट २०१६ : बऱ्याच नवीन जबाबदाऱ्या वाढतील. अचानक जुनी येणी वसूल होतील. उद्योगधंद्यातील गैरसमज दूर होतील. पेचप्रसंगांना उत्तम प्रकारे सामोरे जाल. शक्यतो नात्यात होणारे वादविवाद टाळा. नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत वरिष्ठांशी जमवून घेणे फायद्याचे ठरेल.
सप्टेंबर २०१६ : घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्यात सुधारणा होईल. काळजीचे सावट दूर होईल. शांत व संयमाने वागा. खर्चाचे प्रमाण वाढेल. पण खर्च योग्य कामासाठी होईल. शब्द आश्वासने देऊ नका. धार्मिक कार्यात विशेष आनंद लाभेल.
ऑक्टोबर २०१६ : गुरू, शुक्र आपसातील मतभेद विसरून आपल्या मदतीला आले आहेत. जमीन – स्थावर इस्टेटीचे व्यवहार मार्गी लागतील. पैशाची आवक वाढेल. आधीच्या संकटाचे संधीत रूपांतर.
नोव्हेंबर २०१६ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आपल्यापाशी असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. सामाजिक कार्यात राजकारणात भाग घेतला-घेण्याचा आग्रह झाला तर सावधतेने वागा. फार स्पष्ट मते मांडू नका. नको त्या विरोधातून शत्रुत्व निर्माण करू नका.
डिसेंबर २०१६ : वर्ष संपत आलंय. उद्योगधंदा, घरातील समस्या यामुळे मन थकल्यासारखे होईल. पण काहीसा आराम करून मनाच्या पाटीवरील धूळ दूर सारा नि नव्या विचाराने, नव्या जोमाने पुढे सरका. पुढील वर्षी तुमचा अंक १ तुमची वाट पाहात आहे. तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी चालून येणार आहे.
वर्षांचा अंक नऊ नि रवीचा एक अंक तुमच्या कारकीर्दीला लाभणारी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा खूप छान उपयोग करा. खूप वेळा आपल्यातील चांगुलपणा, धाडस, साहस या गुणांची आपल्यापुरती ओळखसुद्धा झालेली नसते. त्यामुळे त्या गोष्टीचा आपण जीवनात किती प्रमाणात उपयोग करायचा याचे भान आपण विसरून जातो नि मग कधी कधी नको तिथे ऊर्जा वाया गेली याची खंत वाटते. ती वाटू नये म्हणून स्वत:पाशी थांबा नि स्वत:शीच मोकळेपणाने संवाद साधा.

kanyaकन्या – (२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर)
निर्भयतेने वागा
मिथुन राशीनंतर येणारी ही कन्या रास बुधाच्या अमलाखाली येते. ही पृथ्वी तत्त्वाची रास आहे. या राशीचे वैशिष्टय़ म्हणजे बुद्धी, मन नि कर्तृत्व यांचा उत्तम समन्वय साधणारी ही रास आहे. खूप वेळा आपण अज्ञानातच आनंद मानत असतो. अगदी शेवटपर्यंत त्यातील सत्यता आपण शोधत नाही. कन्या रास त्या गोष्टीचा तळ गाठते नि ज्ञानाचा कण नि कण वेचून त्यातली वैज्ञानिकता तपासते या वर्षीचा २०१६चा ९ अंक नि बुधाचा ५ अंक बौद्धिकतेतील सत्याला भिडणारी ही रास त्या राशीला ९ अंकाच्या मंगळाची सोबत लाभत आहे. या वर्षी कला, विज्ञान क्षेत्रात घडणाऱ्या संशोधन कार्यात या राशीच्या लोकांचा सहभाग जास्त असेल.
जानेवारी २०१६ : सुरुवातीचे पंधरा दिवस खूप अनुकूल आहेत. येणारी प्रत्येक संधी तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल करणारी आहे. त्या संधीचे सोने करा. कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील.
फेब्रुवारी २०१६ : मनासारखी कामे होतील. उदासीन वातावरणापासून दूर राहा. आपल्या आवडत्या माणसात मन रमवा. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या सहवासात आनंद मिळेल. दूरचे प्रवास घडतील.
मार्च २०१६ : अति हळवेपणा टाळा. वेळेची किंमत पैशात शोधा म्हणजे वेळेचे महत्त्व कळेल. अमूल्य वेळ फुकट घालवू नका. टी.व्ही. मालिकांच्या खोटय़ा कहाण्यात मन गुंतवू नका. चांगल्या कामातील यशात स्वत:ला प्रोत्साहन द्या.
एप्रिल २०१६ : समजूतदारपणा, साधेपणा नि कामाचा उरक यातून तुमची प्रशंसा होईल. सामाजिक कार्यातील सहभाग, त्यातले योगदान भूषणावह ठरेल.
मे २०१६ : घरातील वातावरण आनंदी, मंगलमय राहील. अनेक कठीण समस्या दूर होतील. नवीन परिचय कामास येतील. धार्मिक कार्यात उत्तम सहभाग, यशदायक घटनांची सुरुवात.
जून २०१६ : आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नको तो खर्च टाळा. कठीण काम सोपे करण्याची कला साधाल. त्यामुळे विशेष कौतुक होईल.
जुलै २०१६ : मन:स्थिती चांगली राहील, पण आपल्या मनमोकळ्या स्वभावाचा कुणाला गैरफायदा घेऊ देऊ नका. आपल्या स्नेहशील वागण्यातून कुणी चुकीचा अर्थ काढणार नाही याची काळजी घ्या. राजकारणात, समाजकार्यात नको ते डावपेच खेळले जातील. सावध राहा. जुनी येणी वसूल होतील.
ऑगस्ट २०१६ : महत्त्वाचे निर्णय घेण्यास वेळ लावू नका. उत्सव समारंभात हिरिरीने भाग घ्याल. आपल्या आनंदी जगण्याचे कौतुक होईल. आपल्या शब्दाला एक वेगळीच किंमत प्राप्त होईल. आजूबाजूच्या लोकांना तुमचा मोठा आधार वाटेल.
सप्टेंबर २०१६ : उत्तम प्रगतीचा काळ, घरात खेळीमेळीचे वातावरण यामुळे मनाला समाधान लाभेल. आपण हाती घेतलेली कामे तडीस न्याल. उत्सव समारंभात आपली एक वेगळी प्रतिमा तयार होईल.
ऑक्टोबर २०१६ : नवीन कामे, नवीन जबाबदाऱ्या उत्तम पार पाडाल. पैशाची गरज भासेल पण अचानक मदतीचा हात लाभेल. जागेसंबंधित वादात दोन पावले मागे या महत्त्वाच्या व्यक्तींकडून मध्यस्थी बोलणी यशस्वी होतील.
नोव्हेंबर २०१६ : वातावरणात काहीसा बदल होईल. खूपशा मनाविरुद्ध घटना घडतील. शांत राहा. गोंधळल्याने अधिक घाबरल्यासारखे होईल. पुढील पंधरवडा जाऊ द्यात पुढे सरकणारा काळ हाच यावर उपाय असतो.
डिसेंबर २०१६ : आरोग्यात सुधारणा, गेल्या महिन्यात घेतलेले निर्णय योग्य ठरतील. आपल्या ठोस कृतीतून आपली एक वेगळी पण चांगली प्रतिमा तयार होईल. आपल्या कुशाग्र कामाचा उत्तम वापर हेच या अखेरच्या महिन्याचे यश ठरेल.
२०१६ सालचा एकांक ९ आणि कन्या राशीच्या बुधाचा ५ अंक बुद्धी नि साहस यांचा उत्तम संगम झाला आहे. बुधाच्या घोडदौडीत ९ अंकाच्या मंगळाची सोबत खूप फायद्याची ठरणार आहे. वर्षभर रेंगाळलेले प्रश्न सुटतील. बौद्धिक स्तरावरून जगणारी ही माणसे हळवेपणा, कोमलता, सहानुभूती अशा शब्दांत अडकत नाहीत. भावनेपेक्षा बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी करण्यात यांना समाधान लाभत असते. त्यात लाभलेली मंगळाची सोबत अधिक निर्भयतेने काम करण्याची ऊर्जा देईल.

tulतूळ – (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर)
समस्या दूर होतील
या वर्षी २०१६ सालचा एकांक ९ नि तूळ राशीचा स्वामी शुक्र यांचा अंक ६, हे दोन्ही अंक स्वभावाने जरी वेगळे असले तरी यांची उत्तम मैत्री आहे. दोघांमधील परस्परांचे असलेले नाते खूपच भावनिक स्तरावर जोडले गेलेले आहे. त्यामुळे शुक्राला मंगळाच्या साहसाचे खूप मोठे साहय़ लाभणार आहे. काही जणांच्या नजरेत नाती वसलेली असतात. मातृत्वाच्या नजरेतून जगाकडे पाहणारी यांची नजर नेहमीच दुसऱ्याच्या दु:खावर फुंकर मारत असते. मात्र यांनी कितीही कठोर बनण्याचा प्रयत्न केला तरी यांच्या हळव्या मनाला दयेचा पाझर फुटणार. या वर्षी नऊ अंकाची साथ घेऊन ६ अंकाचा प्रवास सुरू होईल.
जानेवारी २०१६ : रोजच्या जीवनातल्या व्यवहारात जास्त लक्ष देणे गरजेचे ठरेल. उधार- उसनवारी पैसे देणे चुकीचे ठरेल. तसेच पैसे खर्च करण्याकडे विशेष कल राहील. पैसा ही उद्याची फार मोठी गरज असेल, तेव्हा बचतीकडे लक्ष असू द्यात. आजारीपणा, मानसिक अस्वस्थता यातून मनाने बाहेर पडा.
फेब्रुवारी २०१६ : नवीन नवीन कामे येतील. तसेच सामाजिक जीवनात समाजसेवेची उत्तम संधी लाभेल. घरात धार्मिक कार्ये होतील. आरोग्य चांगले राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
मार्च २०१६ : घरातील वातावरण मानसिक स्थिती चांगली राहील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ आपण मनात आणलेले विचार प्रत्यक्ष कृतीत उतरताना पाहण्याचे भाग्य लाभेल. संघर्षांचे प्रसंग फार सोप्या रीतीने हाताळा. आपल्या कामाच्या कर्तृत्वाचा गौरव होईल.
एप्रिल २०१६ : जमीन, जागा आणि उद्योगधंद्यातले खरेदी- विक्रीचे आपले व्यवहार चांगलेच यशस्वी ठरतील. आपल्या कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. अनपेक्षितपणे जुने मित्र भेटतील. त्यांच्या भेटीत आनंद लाभेल. व्यवसायात नवीन योजना यशस्वी ठरतील.
मे २०१६ : आपल्यासाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे, पण इतर ग्रहांचे साहय़ लाभेल. मात्र नोकरीधंद्यात सावधानता बाळगावी. त्वरित निर्णय घेऊ नका. पैशाची आवक वाढेल. फायद्याचे अंदाज खरे ठरतील.
जून २०१६ : आरोग्य सांभाळा. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. प्रवासात झालेले परिचय खूप मोलाचे ठरतील. पैशाची आवक वाढेल. पैशाचे व्यवहार करू नका. ते त्रासदायक ठरेल. विशेषत: गोड बोलणाऱ्यापासून सावध राहा.
जुलै २०१६ : आपल्यापाशी असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. अतिभावनिक राहू नका. संसारातील वाद विसरून जा. अति दगदग, मेहनतीची कामे टाळा. तब्येतीची काळजी घ्या. शांत आणि संयमाने, धीराने परिस्थिती हाताळा. पैशाची आवक वाढेल.
ऑगस्ट २०१६ : ११ ऑगस्टपर्यंत गुरूचे उत्तम साह्य़ लाभेल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीत स्वत:ला विसरून जाल. सध्या तुमच्यावर ६ व ९ अंकांचा अंमल आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक भावुक प्रसंग उभे राहतील. शांतपणे वागा. त्यातून गैरसमज नकोत.
सप्टेंबर २०१६ : अतिचिकित्सक बुद्धी ठेवून निर्णय घेऊ नका. पैसे जपून वापरा. देण्याघेण्याचे व्यवहार शक्य तो टाळा. मानसिक स्थिती चांगली राहील. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
ऑक्टोबर २०१६ : प्रवासाचे योग येतील. खूप धावपळ वाढेल. कामाचा व्याप वाढेल, पण मिळालेल्या यशामुळे समाधान आनंद लाभेल. सहनशीलता आणि संयम यातून आपले व्यक्तिमत्त्व अधिक उजळून निघेल.
नोव्हेंबर २०१६ : उद्योगधंद्यात किरकोळ गोष्टीवरून मनस्ताप, भागीदारीत नको ते गैरसमज, नोकरीत वरिष्ठांशी मतभेद, पण या महिन्याअखेर धनलाभ नि बरेचसे गैरसमज दूर होतील.
डिसेंबर २०१६ : साहित्य विज्ञान क्षेत्रातील लोकांना उत्तम संधी, नवीन योजना, कामे यांना गती लाभेल. कानावर मोबाइल ठेवून रस्त्यात चालू नका. धांदरटपणा सोडा.
परिस्थितीशी बदलण्यास शुक्र, मंगळाची उत्तम साथ लाभेल; पण त्याबरोबर उत्तम मानसिकतेचीही आवश्यकता आहे. आत्मविश्वास, प्रेरणा हे शब्द जेव्हा माणसाच्या वागणुकीतून सिद्ध होतात. तेव्हा त्या शब्दाचा खराखुरा अनुभव प्रत्यय आपल्याला येतो असाच काहीसा वेगळा स्वत:चा परिचय या वर्षांच्या अखेरच्या काळात होईल नि त्यातून पुढे निर्माण होणाऱ्या समस्यांना आपण सहज सामोरे जाऊ शकाल.

vrushikवृश्चिक – (२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर)
जगण्यातील सहजता जपा
वृश्चिक ही जलरास आहे. यातील मंगळ व मेष या अग्नी राशीतील मंगळ यात बराचसा फरक आहे. साहस, शौर्य नि बेधडक वृत्ती या मंगळ प्रवृत्तीच्या नेमके विरोधी वागणे या मंगळाचे असते. ही माणसे बुद्धीने लढणारी असतात. बुद्धी हे यांचे हत्यार असते. त्यामुळे अशी माणसे सामाजिक कामात राजकारणात खूप मोठय़ा उंचीवर पोहोचतात. त्यामुळे पोलीस खात्यात गुन्हेगार शोधून काढण्यात, रहस्यमय गोष्टीमागील गूढ उकलण्यात या राशीची माणसे वाकबगार असतात. उत्तम बोलणे नि शांतपणे समजून घेणे हे यांच्यामधील विशेषत्व असते.
जानेवारी २०१६ : खूपशा बाबतीत अनुकूलता लाभेल. पैशाची गरज भागेल. सत्य आणि विश्वास या दोन शब्दांत मोठी ताकद आहे. तेव्हा या शब्दांशी प्रामाणिक राहा. कौटुंबिक समस्येत एकमेकांना समजून घ्या. नोकरी, उद्योगधंद्यात नवीन संधी प्राप्त होतील.
फेब्रुवारी २०१६ : नोकरी, उद्योगधंद्यात यशस्वी वाटचाल, मात्र राग, चीड, मान-अपमान या गोष्टींपासून दूर राहाणे. आर्थिक समस्या दूर होतील. माणसाची विद्वत्ता, त्याचे मोठेपण यांची सुरुवात त्याच्या मनातून होते. हे मोठेपण जपा.
मार्च २०१६ : मनातील साशंकता दूर करा. मग अडचणीही दूर होतील. कामाची पूर्तता करण्याची खरी ऊर्जा मनातून प्राप्त होते. उद्योगधंद्यात, राजकारणात, नोकरीत या ऊर्जेचा चांगला उपयोग होईल.
एप्रिल २०१६ : विरोधाचे प्रमाण कमी होईल. उद्योगधंद्यात, नोकरीत यांना उत्तम यश लाभेल. आपल्याविरोधात उभे राहिलेल्यांचे डावपेच त्यांचेच त्यांच्या अंगाशी येतील. जागा स्थावर व्यवहारात फायदा होईल.
मे २०१६ : ग्रहांचे उत्तम बळ आपल्या पाठीशी उभे आहे. साधुत्व सिद्ध करण्यासाठी भगव्या परिधानाची आवश्यकता नाही. तुमच्या मनाचे संस्कार तुमचे मोठेपण सिद्ध करत असते. अध्यात्म्याशी होणारा संवाद मानसिक शांतता देईल.
जून २०१६ : खूप चांगल्या अवस्थेत जीवनप्रवास चालू राहील. करमणूक, प्रवास, गाठीभेटी जुन्या आठवणींना उजाळा एकंदरीत मूड छान. मात्र घरातील ज्येष्ठ माणसांची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक प्रश्न सुटतील.
जुलै २०१६ : कामाला वेग येऊ द्या. पैशाची आवक वाढेल; पण खर्चात तितकीच वाढ होईल. नवीन योजना पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करा. नवीन ओळखी होतील, त्याचा व्यापार, उद्योगधंद्यासाठी उपयोग होईल. यश जरूर मिळेल.
ऑगस्ट २०१६ : ग्रहसौख्य चांगले, खूपशा दिलासा देणाऱ्या घटना घडतील, धीर येईल. एक वेगळा आत्मविश्वास, काम करण्याची उमेद देईल. प्रवासात नवीन परिचय होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सप्टेंबर २०१६ : परिस्थितीत काहीसा बदल होईल. अडचणीची नि अडथळय़ाची शर्यत पार पाडावी लागेल. त्यासाठी मनातील विचलता थांबवून शांतपणे निर्णय घ्या. कामाची गती वाढेल.
ऑक्टोबर २०१६ : प्रकृतीला जपा. हाताखालील माणसे वा सभोवतालची माणसे काहीशा वेगळय़ा पद्धतीने त्रासदायक वाटतील; पण त्यातून मनस्ताप करून घेऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी कामात सतर्क राहा.
नोव्हेंबर २०१६ : आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. उद्योगधंद्यात, नोकरीत नवीन महत्त्वाची कामे हाती येतील, जबाबदारी वाढेल. प्रवासाचे योग येतील, धार्मिक कार्यात विशेष सहभाग, जागेत, जमिनीत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. कागदपत्रे तपासून व्यवहार करा.
डिसेंबर २०१६ : मतभेद, गैरसमज दूर होतील; पण खर्चाचे प्रमाण वाढेल, पण त्याचबरोबर जुनी येणी येतील. प्रिय व्यक्तींच्या अतिप्रेमात पडून कोणतेही निर्णय घेऊ नका.
२०१६ सालचा एकांक ९ येतो. या नऊवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ. एकूण या राशीवर मंगळाचा खूप प्रभाव राहील. मात्र वर्षभर राहणारी गुरू ग्रहाची उपस्थिती परिस्थितीचा उत्तम समन्वय साधील. कुठल्याही गोष्टीत अधिक आक्रमकता नको. या काळात तुमच्यामध्ये उत्साह, वेगळे चैतन्य येईल नि त्यातून तुमचे कर्तृत्व उजळेल. मन मोकळे ठेवलेत तर जगण्यातला निखळ आनंदयात्रेचा अनुभव घेता येईल.

dhanuधनू -(२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर)
साहस बुद्धीचा समन्वय साधा
अग्नी तत्त्वाची ही रास यावर गुरू ग्रहाचा अंमल असतो यांचा शुभांक तीन. यंदाचे वर्ष २०१६. या वर्षांचा एकांक नऊ येतो. एकूण नऊ नि तीन हे मित्रांक आहेत व धनू राशीच्या माध्यमातून यांचा प्रवास सुरू होईल. निसर्गातील प्रत्येक गोष्टीत आपल्याला जगण्याचे एक वेगळे भान देत असते.
आयुष्य किती जगलात यापेक्षा आयुष्यात कसे जगलात याला खूप महत्त्व असते. अल्पायुषी असलेल्या फुलाच्या सुगंधाची दरवळणारी आठवण आपण नेहमी लक्षात ठेवतो. निसर्ग आपल्या खूप जवळ असतो. पण खूप वेळा ही जाणीव आपल्याला शेवटपर्यंत होत नाही. पण धनू ही निसर्गाच्या सान्निध्यात रमणारी व साहस नि बुद्धीच्या समन्वयातून जीवन प्रवास अधिक उत्कटतेने करणारी रास आहे. या वर्षांत ही रास नऊ अंकाच्या माध्यमातून लाभणाऱ्या रोमहर्षक साहसी सहवासाचा अधिक अनुभव देणारी ठरेल.
जानेवारी २०१६ : कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. नवीन परिचय, नवीन ओळखी यातून कार्याची व्याप्ती मोठी होईल. राजकारणात, सामाजिक कार्यात आपला प्रभाव वाढेल.
फेब्रुवारी : जगण्यातला खरा आनंद या महिन्यात लाभेल, कामात उत्साह वाढेल. काही जुनी येणी वसूल होतील. नवीन कामाला गती मिळेल. शाब्दिक वाद टाळा. समजूतदारपणे हाताखालील लोकांच्या व्यथा समजून घ्या.
मार्च २०१६ : लाभदायक घटना घडतील. प्रवास सुखाचे होतील. घरात अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. महिन्याच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे आटपून घ्यावी. उद्योगधंद्यात नवीन कल्पना योजना खूप महत्त्वाच्या ठरतील. महिनाअखेर कामाची गर्दी होईल. त्यातील प्रमुख कामात लक्ष द्या.
एप्रिल २०१६ : खर्चाच्या प्रमाणात तशीच वाढ राहील. जमीन, जागा याबाबतचे निर्णय घेताना मोठय़ांचा सल्ला जरूर घ्या. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. नोकरीधंद्यातील वादविवाद गैरसमज जरूर टाळा. राजकारणात शक्यतो सहभाग टाळा.
मे २०१६ : गेल्या महिन्यापेक्षा आर्थिकबाबतीत खूपच फरक जाणवेल. जुनी येणी, जमीन – घर खरेदी-विक्रीत फायदेशीर गोष्टी घडतील. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल; नवीन ओळखी, परिचयातून कार्याची व्याप्ती मोठी होईल. सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल.
जून २०१६: वादविवाद, आरोप-प्रत्यारोप यापासून दूर राहणे हिताचे ठरेल. मात्र घरातील काही घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. नवीन ओळखी परिचयातून नाजूक प्रश्न निर्माण होतील. पण त्यातून सारे काही मंगलमय घडेल.
जुलै २०१६ : आखलेल्या योजनांचे शुभ परिणाम दिसू लागतील. प्रयत्न नि तळमळ यातून होणाऱ्या गोष्टी पुढे सरकतील. प्रकृतीची काळजी घ्या. ताणतणावापासून दूर राहा. विचाराचे सूत्र बदलल्याने मन हलके होईल.
ऑगस्ट २०१६ : अतिशय उत्तम काळ; नवीन कामे, नवीन संधी पुढे येतील. समाजसेवेची उत्तम संधी लाभेल. घरात धार्मिक कार्ये होतील. आरोग्य चांगले राहील.
सप्टेंबर २०१६: उद्योगधंद्यात, नोकरीत काही लहान-मोठय़ा अडचणी निर्माण होतील. नि त्या सोडवताना त्यातून मार्ग निघतील. हळू हळू ते अडथळे दूर सरतील नि या महिन्यात खऱ्या वास्तवतेचे दर्शन होईल. खरे मित्र नि दूरचे यातला फरक लक्षात येईल.
ऑक्टोबर २०१६ : अति भावनिक राहू नका. संसारातील किरकोळ मतभेद विसरून जा. तब्येतीची काळजी घ्या. अति दगदग मेहनीतीची कामे टाळा. शांत संयमाने, धिराने परिस्थिती हाताळा.
नोव्हेंबर २०१६ : परिस्थितीत खूपसा बदल होईल नि आखालेल्या योजना, कामे यांना गती लाभेल. जमीन खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ, उद्योगधंद्यात नवीन बदल खूप मोलाचे ठरतील. प्रवासाचे योग व त्यातून आनंद मिळेल.
डिसेंबर २०१६: मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल, जुनी येणी वसूल होतील. शुभ ग्रहांचे उत्तम पाठबळ लाभेल. सार्वजनिक कामात आनंद मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. संयमशीलतेने हाताळलेल्या घटनांचे कौतुक होईल.
या वर्षी मंगळ, गुरू यांच्या प्रभावाखाली धनू राशीचा प्रवास होत आहे. हेवेदावे, सूडबुद्धी अशा कटू गोष्टी आपोआप दूर होतील. विरोध संपेल नि स्नेह, सहानुभूती, आपुलकी वाटेल. नि काळजीचे सावट खूप दूर जाईल.

makarमकर – (२१ डिसेंबर ते २० जानेवारी)
मानसिकता जपा
वर्ष २०१६ चा अंक नऊ आहे, तर २१ डिसेंबर ते २० जानेवारी या काळात जन्म घेणाऱ्या लोकांवर शनी ग्रहाचा अंमल असतो. त्यांचा शुभांक आठ आहे म्हणून या वर्षी मंगळ शनी या दोन ग्रहांचा पूर्ण वर्षभर मकर राशीवर प्रभाव असेल. एकूण काळ परीक्षेचा असला तरी प्रत्येक समस्या फक्त प्रश्न उभे करणार नाहीत तर त्यातून प्रगतीची वाट मोकळी करतील.
जानेवारी २०१६: सुरुवातीचा काळ जरी कष्टप्रद वाटला तरी मानसिक स्थिरता तुम्हाला मोठे बळ देईल नि कटकटी शांत होतील. त्यातून प्रतिष्ठेची बूज राखाल. मध्यस्थी म्हणून आपला सन्मान होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.
फेब्रुवारी २०१६: वैवाहिक जीवनाची काही सूत्रे पाळा आपल्या जोडीदाराला काही वेगळे जीवन आहे त्यांनाही त्यांची ठाम मते आहेत त्या मतांचा आदर करा. समाजात वावरताना त्यांना त्यांच्या आवडींना प्रोत्साहन द्या. त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नका. या महिन्यातील हा मंत्र आयुष्यभर वापरा. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
मार्च २०१६ : आर्थिक घडामोडी मनासारख्या घडतील. उद्योगधंद्यातील किरकोळ अडचणी दूर होतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. लग्न, नोकरीबाबतची बोलणी सुरू होतील. विद्यार्थीवर्गाने अभ्यासासाठी जास्त वेळ द्यावा.
एप्रिल २०१६ : शुभ घटनांतून हळवेपणा भावविश्वता वाढेल. जुन्या आठवणी, जुनी माणसे, जुनी वास्तू यांत मन गुंतेल. अतिभावनिक राहू नका. स्वत:साठी वेळ द्या. शांतपणे दिवसातून १०-१५ मिनिटे निर्विकार बसत जा.
मे २०१६ : आपण ठरवलेल्या गोष्टीची पूर्तता होऊ लागेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधाल. उद्योगधंद्यातील कामाचे स्वरूप बदलेल. अडचणी दूर होतील. विशेष म्हणजे कामानिमित्त प्रवासाचे योग येतील आनंदी राहाल.
जून २०१६ : कोर्टकचेरीची कामे लांबतील, जमिनी- जागेचे वाद पुढे येतील. नातेवाईक मित्रमंडळीत होणारे वाद गैरसमज दूर करा. संयम राखा. आरोग्याची काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. महिनाअखेर गैरसमज दूर होतील.
जुलै २०१६ : नोकरी, उद्योगधंद्यात लाभ होतील. नवीन योजना कल्पना यातून कामे मार्गी लागतील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण असूद्यात. विज्ञान, कला क्षेत्रातील लोकांचा विशेष सन्मान होईल.
ऑगस्ट २०१६ : उद्योगधंद्यात, नोकरीत नफा-तोटय़ाचे गणित सारखे होईल. कामांमध्ये बारीकसारीक अडचणी येतील, पण तितक्याच गतीने त्या दूर होतील. मानसिक ताणाखाली राहू नका. योग्य वेळी विश्रांती घ्या.

सप्टेंबर २०१६ : उद्योगधंद्यात, राजकारणात, नोकरीत यशदायक काल, मात्र पैशाचे देण्याघेण्याचे व्यवहार टाळा. लोभाला आवर घाला. राजकीय बौद्धिक क्षेत्रातील मंडळींशी संबंध येतील. कामाच्या बाबतीत संयम नि धिराने घ्या.
आक्टोबर २०१६ : नोकरीधंद्यात वादविवाद टाळा. कोणी अविश्वास दाखविला तर आपली बाजू शेवटपर्यंत पटवून द्या. कोर्टकचेरीच्या प्रकरणात समजुतीने घेऊन समेट करावा. वेळेचे मोल लक्षात घेऊन वागल्यास खूपशा गोष्टीत सफलता प्राप्त होईल.
नोव्हेंबर २०१६ : व्यवसायातल्या स्पर्धेत आपली कामगिरी उत्तम राहील. मात्र गुप्त शत्रूंच्या त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यावर गप्प बसणे मोलाचे ठरेल. जुनी येणी वसूल होतील. महिनाअखेर वातावरण निवळून मन उत्साही आनंदी राहील.
डिसेंबर २०१६ : शुभग्रहांचा उत्तम सहवास आत्मविश्वासात अधिक भर घालील. सार्वजनिक क्षेत्रातल्या राजकारणाला लागलेल्या विक्षिप्त वळणाचा संताप येईल, पण शांत व निर्भयतेने त्यातून मार्ग काढा. माघार घेऊ नका. धिराने नि संयमाने पुढे जा.
मकर राशीवर नऊ आणि आठ अंकांचा प्रभाव राहणार आहे. आणि या प्रभावाखाली येणाऱ्या लोकांनी खूपशा सावधतेने आपले प्रश्न हाताळायचे आहेत. एक लक्षात असूद्यात. जेव्हा आपण संकटाच्या दारात उभे असतो तेव्हा भीतीचे सावट आपल्यावर असते. एका वेगळ्या दबावाखाली आपण वावरत असतो. दबाव म्हणजे आपल्याच मनाने निर्माण केलेले एक दडपण असते अशा वेळी मन स्थिर ठेवून निर्णय घ्यायचे असतात. अशा प्रतिकूल स्थितीत आपले कोण, परके कोण याची जाणीव होते. पण लक्षात असूद्या. यशस्वी माणसांमध्ये दोन महत्त्वाचे गुण असतात. उत्तम आत्मविश्वास आणि मेहनत. या दोन गुणांवर ही माणसे संकटावर मात करून यश संपादन करीत असतात. तेव्हा संपूर्ण वर्षभर आत्मविश्वास नि मेहनत यांचा उपयोग करा. म्हणजे संकटाचे पूर्ण स्वरूप बदलेल.

kumbhकुंभ -(२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी)
उत्तम संधी लाभतील
आपला जन्म २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान झाला असेल तर या कालावधीवर शनी ग्रहाचा अंमल असतो. मकर रास ही पृथ्वी तत्त्वाची तर कुंभ रास वायू तत्त्वाची, जगण्याचे एक वेगळे तत्त्वज्ञान असलेली. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहणारी. आयुष्यभरातल्या प्रमुख योजनांचे हिशेब मांडून कालमापनात बसविण्यात हे पटाईत असतात. पण प्रारब्धाच्या हिशेबात यांचे गणित फारसे अचूक ठरत नाही. पण स्वत:च्या कर्तृत्वविश्वात ही माणसे यशस्वी होत असतात. मोठमोठय़ा हुद्दय़ांवरची यांची नेमणूक योग्य ठरते. वायू राशीतील बुद्धिमान शनीचे वास्तव्य आठ अंकातून या वर्षीच्या २०१६ च्या नऊ अंकासोबत वावरणार आहे. उत्तम बुद्धिमत्ता नि साहस यांचा समन्वय साधून ही रास वर्षभराचा प्रवास पुरा करील.
जानेवारी २०१६: या महिन्यातील ग्रहाचे उत्तम बळ कामास येईल. उद्योगधंदा, नोकरीत चांगले यश लाभेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटेल. साहित्य सिनेनाटय़ क्षेत्रातील लोकांना उत्तम संधी चालून येतील.
फेब्रुवारी २०१६ : विद्याभ्यासात मुलांना उत्तम यश लाभेल. येणाऱ्या समस्यांशी निर्धारतेने लढा. घरातील निर्माण होणारे वाद मिटतील, मात्र कोणतेही अटीतटीचे निर्णय घेऊ नका.
मार्च २०१६ : लाभदायक घटना घडतील. प्रवास सुखाचे होतील. घरात अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळा, महत्त्वाचे निर्णय तातडीने घेऊ नका. उद्योगधंद्यात नव्याने स्पर्धा सुरू होईल. त्यात अति साहसीपणा टाळा. मात्र वेळेला महत्त्व द्या.
एप्रिल २०१६ : कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. नवीन परिचय, नवीन ओळखी यातून कार्याची व्याप्ती मोठी होईल. आर्थिकबाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल, पण त्याबरोबर जुनी येणीही येतील. आरोग्य चांगले राहील.
मे २०१६ : प्रेमात, मैत्रीत काही कारण नसताना अविश्वासाचे वारे वाहू लागतील. किरकोळ वादविवाद, गैरसमज, मानापमान यातून मनस्ताप घडेल. पण महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत फरक होईल. खूपशा बाबतीत समेट होईल नि वातावरण शांत होईल.
जून २०१६ : अतिश्रम दगदग टाळा. पैशाची आवक वाढेल. नवीन कामे हाती येतील, ती वेळेवर करून द्या. हाताखालील लोकांकडून काम करून घेण्याचे कसब आपल्यापाशी आहे त्याचा उपयोग करा. आरोग्य चांगले राहील.

जुलै २०१६ : आपल्यापाशी असलेल्या चौफेर दृष्टीचा उपयोग करा. सामाजिक कामात आपल्या सूचना, आपली मते यांचा आदर केला जाईल. तब्येतीची काळजी घ्या. साथीच्या आजारांपासून जपा आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.
ऑगस्ट २०१६ : लहानसहान समस्या निर्माण होतील, पण त्याची फार काळजी करू नका महिन्याच्या उत्तरार्धकालात उद्योगधंद्यात, नोकरीत आपआपल्या क्षेत्रात उत्तेजन मिळेल. त्यातून आर्थिक लाभ होईल. आश्चर्यकारक नि समाधान देणाऱ्या गोष्टी घडतील.
सप्टेंबर २०१६ : उद्योगधंद्यात, नोकरीत वातावरण दूषित करण्याचे काम सुरू राहील, पण निर्भीडपणे पुढे जा. विचलित होऊ नका. निंदानालस्ती यातून वादविवाद निर्माण करू नका. काळ पुढे सरकला की सारे ठीक होईल. मनाचा सदुपयोग केला की घटनांचा प्रवासही बदलतो.
आक्टोबर २०१६ : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. विद्याभ्यासात विद्यार्थ्यांची विशेष प्रगती होईल. मानसिक बळ वाढेल. नवीन योजनांमध्ये नव्या पद्धतीचा उपयोग वेळेची बचत करेल. आरोग्य चांगले राहील.
नोव्हेंबर २०१६ : अतिभावनिक राहू नका. घरात गैरसमज नि त्यातून वादविवाद, पण हे सारे हास्यास्पद ठरेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. उद्योगधंद्यात कामाच्या बाबतीत सावधतेने वागा. पाहुण्यांची वर्दळ वाढेल नि त्यात आनंदी राहाल.
डिसेंबर २०१६ : आर्थिक समस्या दूर होतील. नोकरीधंद्यात बढतीचे योग. उद्योगात विशेष प्रगती, कोर्टकचेरीची कामे वाढतील. पण मध्यस्थी समेट करून कामे निकालात काढाल. नवीन घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
ही कुंभ रास शनी आधिपत्याखाली येते. अध्यात्म नि बुद्धीचा उत्तम संगम या राशीत आढळतो. जगण्यातल्या इच्छा-अपेक्षांचा भाग स्वार्थापलीकडचे सुंदर जग अशा नव्या विचाराने भारावलेले यांचे मन शनीच्या धीरगंभीर एकांतात राहून भोवतालच्या जगाचे भान जपणारी ही माणसे प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करून आपलं विश्व निर्माण करतात. बुद्धिजीवी वर्गात सामाजिक जीवनात नि:स्वार्थपणे वावरणारी ही कुंभ रास बुद्धी नि साधेपण राखून असते.

minमीन -(२० फेब्रुवारी ते २० मार्च)
साहस आणि सात्त्विकतेचा प्रवास
आपला जन्म २० फे ब्रुवारी ते २० मार्च दरम्यान झाला असेल तर त्या काळात तीन अंकाचा म्हणजे गुरू ग्रहाचा प्रभाव असतो. धनू राशीचा स्वामी जरी गुरू असला तरी धनू रास ही अग्नितत्त्वाची रास आहे, पण मीन रास ही जलतत्त्वाची रास आहे. त्यामुळे ही माणसे काहीशी भावनाप्रधान असतात. सहिष्णुता नि स्वत:वरील विश्वास याच्या साह्यने यांचा जीवनप्रवास चालू असतो. हे संसारी असले तरी यांच्या वागण्या-बोलण्यात एक वेगळे साधुत्व दिसून येते. भूतदयेचा प्रत्ययही येतो. या वर्षांचा २०१६ चा एकांक नऊ नि मीन राशीचा अंक तीन साहस नि सात्त्विकता यांच्या दृढ मैत्रीतून होणारा हा वर्षप्रवास खूपच यशस्वी ठरेल.
जानेवारी २०१६ : नवीन नवीन योजना आखा, नवीन परिचय ओळखीतून फायदा होईल. मात्र पैसे जपून वापरा. खर्चाचे प्रमाण वाढेल. घाईगर्दीतून प्रवास टाळा, शब्द आश्वासने देऊ नका.
फेब्रुवारी २०१६ : महत्त्वाची कामे पार पडतील. नोकरी, व्यवसायात विशेष प्रगती. जमीन जागेचे व्यवहार जागृतपणे करावेत. खूपशा बाबतीत ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होतील. घरातील लहानसान वादाकडे दुर्लक्ष करा.
मार्च २०१६ : घरातील वातावरण मंगलमय राहील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक स्थिती चांगली राहील. सिनेनाटय़ कलाकारांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
एप्रिल २०१६: अर्थप्राप्ती चांगली होईल, तितकाच खर्च वाढेल द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेण्यात मागे-पुढे होईल. तेव्हा तूर्त निर्णय घेण्याची घाई नको. वादविवाद टाळा. समंजसपणे वागा, त्यातून मार्ग निघेल.
मे २०१६ : विचारपूर्वक वागा, रागाने, द्वेषाने माणसे तोडू नका. गैरसमज दूर करा. समोरील व्यक्तींना समजून घ्या. त्यांचे ऐकून मग निर्णय घ्या. पोटाची विशेष काळजी घ्या. आनंदी राहा.
जून २०१६ : गेल्या महिन्यापेक्षा वातावरण काहीसे निवळेल. नवीन परिचय, नवीन घटना यात मन रमेल. आर्थिक लाभ होतील. जागेचे निर्णय घेताना जवळच्या लोकांना विश्वासात घ्या. महिलांना आरोग्य व मानसिक सौख्य लाभेल.
जुलै २०१६ : ठरवलेल्या कार्यक्रमात फेरबदल करावे लागतील. महत्त्वाची कामे, महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावे लागतील. काहीशी मनाची कुचंबणा होईल. पण काही कालांतराने गाडी रुळावर येईल. निराश होऊ नका.

ऑगस्ट २०१६: जुने वाद, मतभेद विसरा. जास्तीतजास्त सकारात्मक, आत्मविश्वासू आणि सहनशील माणसांच्या संपर्कात राहा. सामाजिक जीवनात नवीन संधी उपलब्ध होतील.
सप्टेंबर २०१६ : घरातील महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. जुन्या परिचयाच्या व्यक्ती आपल्या महत्त्वाच्या कामात मदत करतील. पोटाच्या किरकोळ तक्रारी त्रास देतील. कुठलेही भावूक निर्णय तडकाफडकी घेऊ नका.
ऑक्टोबर २०१६ : आपण ठरवलेल्या गोष्टींची पूर्तता होऊ लागेल. घरात वातावरण आनंदी, उत्साही राहील. समाजकार्यात जबाबदारी वाढेल. व्यवहारात लाभदायक घटना घडतील. संयमाने नि शांततेने अडचणीवर मात कराल.
नोव्हेंबर २०१६ : उद्योगधंद्यात, नोकरीत मिळणाऱ्या पैशापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यातून मानसिक संतुलन ढळू देऊ नका. धंद्यात वादविवाद, गैरसमज नकोत. चौफेर दृष्टीचा उपयोग करा. आपल्या सूचनांचा आदर केला जाईल.
डिसेंबर २०१६ : आपल्या त्यागी दानशूर वृत्तीचे कौतुक होईल. हा महिना तसा अडचणी दूर करण्यात जाईल. पण त्यातून कामाची व्यापकता वाढेल. मुलांना परदेशगमनाची संधी लाभेल. प्रेमप्रकरणात मुलांना समजून घ्या. दुखवू नका.
मीन राशीचा हा वर्षप्रवास संपेल. आनंदातही खूपसे हळवे प्रसंग लपलेले असतात. प्रेम, माया, वात्सल्य या हळुवार शब्दातून आपण आपली व्याकूळता व्यक्त करीत असतो, पण खरं म्हणजे सुखदु:खातही आपल्या मनाची स्थिरता आपण कायम ठेवावी. कारण मनाचे जगणे खूप महत्त्वाचे असते. कारण तो आयुष्यभर आपली मित्रासारखी सोबत करत असतो. तेव्हा त्यांच्यातील आनंद कायम असूद्यात.

अखेर हे २०१६ वर्ष संपेल नि येणारे २०१७ या वर्षांचा येणारा एकांक एक त्याबरोबर शून्य. शून्याचे अस्तित्व हे अणूच्या ताकदीसारखे बलशाली असते. त्यामुळे पुढील वर्षांत खूप महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. एका वेगळ्या पण स्वाभिमानी नजरेतून आपला भारत देश जगाकडे पाहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 2:30 am

Web Title: 2016 horoscope predictions
टॅग Astrology,Horoscope
Next Stories
1 मुहूर्ताला महत्त्व किती?
2 विवाह आणि ज्योतिषशास्त्र
3 बारा राशींची सहिष्णुता
Just Now!
X